धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६८ –

सारे ताप, आयास भोगून ‘ त्रिमल कुटुंबा’चा यात्रेकरू जथा राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगिरांनी ही बातमी बालेकिल्ल्यावर केव्हाच पोच केली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजे गड उतरून वाडीत पायथ्याशी आले

शंभूराजांना सामोरे जायला. खरे म्हटले, तर आपल्या काळजाचा “सोनतुकडा ‘ पुढच्या हातांनी पावता घ्यायला! बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशव पंडित, कृष्णाजी, सैस, गोमाजीबाबा अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होती. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्याची तांबड्या सखलादी अस्तराची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्या मधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठपका दिसला. छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर, ओठा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापांबरोबर पाण्याच्या सफेद-साफ धारा उसळतात, तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले! आठवणी, चेहेरे, ठिकाणे यांचा मनात कालकल्लोळ माजून उठला.

“आम्ही फर्मान घेऊन परतलो, तेव्हा महाराजसाहेब माचीवर आले नव्हते – आजही आले नसले तर! ‘ बटुवेषातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखटत होत्या. काळीज धडधडत होते. क्षण-क्षण असह्य झाला होता. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो, तसे संभाजीराजांना भोवतीच्या कुरणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसलीतरी झगमग दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे जोडून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. नकळतच त्यांचा हात केसोपंतांच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोनजराबतूची उन्हाने नुसती झगमग तळपत होती! तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यांत लाख-लाख सूर्य काजवे होऊन उतरले! पोळ्यात दडून बसलेल्या मधमाश्यांची झुंड उसळावी तशी उरात रक्तलाटांची सळसळ उठली.

साथीच्या लक्ष्मीबाई-काशीपंतांना गोंधळून टाकीत संभाजीराजांनी हात उभवते करून सादवले – “महाराजसाहेब!” आणि ओठातून निसटलेले शब्द आपल्या अगोदर दौडताहेत हे कळून येताच ते तडक धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडावा दूर उडाल्या! पावसाच्या भरमार सरींनी झोडपट्टी केलेले शिंगरू पागा समोर दिसताच शेपटी उभवून दौडत सुटावे, तसे शंभूराजे धावू लागले! शक्‍य झाले असते, तर वरच्या मावळी आभाळानेच ते “भोसलाई राजफूल ‘ आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते! त्याचा मनकल्लोळ शांत करण्यासाठी! भोवतीच्या कुरणाला फुटलेला एक सोनअंकुर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आक्रशीत त्यांनी डोळे लहाने केले.

“शंभूबाळ! – दौडताहेत – पडले तर?’ आठी हातांनी कुणीतरी पुढे लोटावे, तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातर सामोरे का चालताहेत, हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पायठसे वेचीत मागून पुढे ओढले गेले! घामाने अभिषेकलेल्या, लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभवून धावते येत होते. खांद्यावरून घसरू, ओघळू बघणारी झोळी मध्येच ते सावरीत होते. शक्‍य असते, तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती! झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताना राजे गलबलून उठले.

गडाच्या तटबंदीला भन्नाट, मावळी रानवारा सपकाऱ्याने येऊन भिडावा तसे, डोंगरमाथ्यावरून उड्या टाकीत आलेला खळाळ ओढा, नजर न ठरणाऱ्या फेसाळ नदीला भिडावा तसे, शिवगंधाच्या दोनदळी पावनपट्टयाला भवानीचा दुबोटी, उसळ्या भंडारा भिडावा तसे – तस्सेच संभाजीराजे पायझेपांनी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला नि:श्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसंन्याशाला बटुसंन्यासी मिळाला! दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला, शहाणे, सोशीक धाकुटपण मिळाले! आबासाहेबांना बाळराजे मिळाले!

राजांच्या कमरेला शंभूराजांची घट्ट हातमिठी पडली. आपले राजांच्या जाम्यात झाकले गेलेले तोंड ते डावे-उजवे घुसळून टाकीत होते. त्यामुळे कपाळीचा गंधटिळा विसकटला जात होता – राजांच्या टोपाची मोतीलग हिंदोळत होती.

“महा..ज -” शंभूराजे बोलू बघत होते – पण, शब्दांच्याच दाटल्या घशात भाव घुसमटून घुटमळू लागले. राजांचे सडक हाततळवे शंभूराजांच्या पाठीवरून फिरू लागले. मायेने? अभिमानाने? धन्यतेने? कसे! कसे ते त्या हातांना आणि त्या पाठीलाच ठाऊक! त्या फिरत्या हातांनी शंभूराजांचा उतू घातलेला ऊर निवांत केला. मान उठवून त्यांनी भरल्या डोळ्यांनी राजांच्याकडे पाहिले. ती – तीच उभट मुद्रा पिंडीसारखी. आठवणीसरशी संभाजीराजे राजांपासून मागे हटले. गुडघे टेकून त्यांनी राजांच्या पायांवर कपाळ टेकविले! उठून खांद्याची झोळी पोटाकडे पुढे घेतली. तिच्यात हात घालून, राजांनी उत्तरी-निरोप घेताना दिलेली सोनर्पिंडी बाहेर काढली! पिंडी उन्हात झपकन सळसळली. एक निसटती नजर राजांना देऊन हातची सोनपिंडी राजांच्या ओंजळीत ठेवीत, ते अदबीने एवढेच म्हणाले, “आम्ही – आम्ही कमी बोललो!”

उन्हात झळकत्या ओंजळीतील पिंडीकडे बघताना राजांना वाटले – ‘यांनी -यांनी अधिक बोलले पाहिजे!!!

राजांना प्रयागला त्रिवेणीसंगमाच्या घाटपायऱ्यावर भेटलेला तो पारधी आठवला! “हर काममें यश देनेवाले गरुडके पॉँख!” समाधानाचा नि:श्वास राजांच्या नाकपाळ्यांतून निसटला. रायवळी आंब्यांच्या पानडेऱ्यात, भातगोटे खाऊन तृस्तावला कवडा भरल्या गांजानं घुमकी भरीतच होता – ‘कुट-कुट्‌ – कुटुर्र-कुटुर्र! ‘ पण – राजांना आता ती घुमकी ऐकूच येत नव्हती!!

संभाजीराजांनी बटुवेष उतरून राजवेष अंगी धारण केला. भोयांनी ‘जय भवानी’ गर्जत खांदे दिलेली पालखी राजगड चढू लागली. तिच्यात राजे आणि संभाजीराजे बसले होते. पालखीमागून मोरोपंत आपले मेहुणे कृष्णाजी, काशीपंत यांच्यासह गड चढू लागले. लक्ष्मीबाई मेण्यात बसल्या. पाली दरवाजा येताच गडनौबत कधी नव्हे, ती चढीच्या तारेने घुमून उठली. तिची दुडदुड ऐकून गडावरच्या बंदुका, उखळी, तोफांनी आपले “धडाडधुम्म ‘ कठ फोडले. बारांची दणकी धडधड गुंजणमावळ खोऱ्यात घुमू लागली.

संजीवनी माचीवर पालखी ठाण झाली. राजे, शंभूराजे पायउतार झाले. एकचालीने चालू लागले. मागून भरल्या मनांची इमानी मंडळी चालली. माचीची माणसे झुंडीने पुढे येत “पायदर्शने ‘ घेऊ लागली. बालेकिल्ल्यावर बाहेर निघणारे भुयार आले! धारकऱ्यांनी धोंड हटविली. राजे- संभाजीराजे भुयारात उतरले. टेंभ्याचा धूसरमंद प्रकाश पायऱ्यावर उतरला होता. चालता-चालताच दोघेही एका पायरीवर थांबले. एकमेकांना नजर भिडविताना ते शांत होते. भोसल्यांना भुयारीचे भय कधीच नसते!! वाटेवरच्या किंवा जीवनाच्या वाटेवरच्या! कारण त्यांच्या भाळी भवानीचा भंडारा भरलेला असतो.

बालेकिल्ला आला. सदरचौकात उंबरट्यापर्यंत स्वाऱ्या आल्या. कुणालाच कल्पना नसताना आतून गोंदल्या हातात काळे कोंबडे घट्ट धरलेली धाराऊ एकाएकी पुढे आली! शंभूराजांना बघताच तिचा कुणबी प्रेमा उमळून आला. बोल निसटले, “आरं, माज्या ल्येकरा! कुटं हुतास? कुटं रं हुतास यदोळ?” हातचे कोंबडे तिने शंभूराजांची डावी बगल धरून सरासर तीन वेळा उतरले. भेदरले कोंबडे कसेतरीच केकाटले. धाराऊने ते फडफडत्या पंखांनिशी दूर फेकून दिले.

“आऊ!” संभाजीराजांनी सर्वांसमक्ष तिच्या कुणबी पायांवर आपले राजकपाळ टेकले. पदराच्या ओच्यात नारळ घ्यावा, तसे धाराऊने वाकून त्यांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. कधीतरी फार पूर्वी सईबाईसाहेबांना सांगावासा वाटलेला विचार धाराऊचे भाबडे मन पुन्हा एकवार गोंदून गेला – “राजाच्या या ल्येकराला कुन्या पाप्याच्या बदनजरंची

मुंगी कंदी बी डसू ने!” धाराऊच्या डोळ्यांच्या मावळघागरी पाझरू लागल्या.

धाराऊला सोडून राजांना खेटून शंभूराजे सदरेच्या दगडी उंबरठ्यात उभे राहिले. सुवासिनींनी त्यांच्या पायांवर शिगभरल्या घागरी रित्या केल्या. त्यांचे पाणी शंभूराजांच्या पायी चालून पडलेल्या भेगांत शिरून चरचरले! चेहऱ्याभोवती पाजळली निरांजने फिरली. संभाजीराजांचे भिरेभिरे डोळे शोधीत होते मासाहेबांना! उंबरठा पार करून ते राजांच्यासह सदरचौकात आले. कधी नव्हे, त्या जिजाऊ सदरचौकात येऊन उभ्या होत्या! तिथे उभे राहणेही त्यांना असह्य झाले. यमुनेच्या मायाळ पात्राने पलटी घेतली! थकल्या जिजाऊंच्या पायांत बळ उतरले. कपाळीचा कुलवंत पदर घरंगळा झाला आहे, याचे भान त्यांना उरले नाही! त्या सामोऱ्या चालत आल्या. त्यांच्या रूपाने मावळी आऊपणाची एकवट मूर्तीच चालत आली! राजांना सोडून पायझेप टाकीत शंभूराजे उसळले. क्षणात जिजाऊंना त्यांची बिलगती घट्ट हातमिठी पडली. सदरचौक दाटून आला.

“मासाहेब! मासाहेब!” प्रत्येक शब्दांनिशी शंभूराजांचा ऊर भरून येत होता. एका विचाराबरोबर तर त्यांचे भरले छातवान कसे गच्च गच्च दाटून आले – ‘मासाहेबांच्या अंगच्या नेसूलाही एक प्रकारचा भावमंगल वास येतो! जिवाचा कोंदवा करून टाकणारा! बुकक्‍्क्यात मिसळलेल्या भंडाऱ्यासारखा!!’ आणि – आणि शंभूराजे आपले तोंड आवेगाने मासाहेबांच्या नेसूत नुसते घुसळू लागले! आज आणि आत्ता जिजाऊंना कळून आले की, ‘आई भवानीला आठ हात का असतात!! तेही तिला थिटेच पडत असतील! ‘ हातांचे थिटेपण जिजाऊ जबानीने भरून काढू लागल्या – “शंभूबाळ! शंभूबाळ! शंभूबाळ!!”

त्या थबथबत्या मिठीतही जिजाऊंच्या मनावर एका विचित्र विचाराची घोरपड बोचऱ्या नख्या रुपवीत सरासर निर्दयपणे चढून आली – ‘शंभूबाळांचा… काळ झाला!! ‘

जिजाऊ थरारल्या. सणसणत आलेला एक वर्मी तोफगोळा, दौडत्या घोड्याबरोबर फरफट होत चाललेली रिकीब, झिजून-झिजून नव्हत्या झालेल्या औषधी मात्रा क्षणात त्यांच्या पाणथर डोळ्यांसमोर तरळून सरकल्या! त्यांनी त्यांचे थोरले पुत्र, खाशांची स्वारी आणि सूनबाई नेल्या होत्या! जिवाभावाच्या माणसांचा “काळ  होतो, तेव्हा मागे राहणाऱ्यांच्या हयातीचा “बरड-माळ  होतो, हे त्यांनी भोगले होते. जिजाऊंनी शंभूराजांना एकदम हातांच्या आवेगी मिठीत कोंडून-कोंडून टाकले. त्यांच्या डोळ्यांतील ‘थोरली-माया ‘ शंभूराजांच्या टोपावर टपटपू लागली.

सदरेवरच्या हर असामीला ते बघताना वाटले – ‘आपण – आपणच “धाकले राजे’ आहोत! ह्या ‘थोरल्या-माये’खाली न्हातो आहोत! ‘ भावनेचा कढ उलगताच जिजाऊंनी पदरकाठाने नेत्रकडा सावरल्या. शंभूराजांचा मोहरांच्या थैलीने सतका उतरून त्यांच्या खांदावळीवर हात चढवीत त्या शांतपणे म्हणाल्या – “चला!”

आभाळाच्या निळाईन विजेचा तेजवान झोत ब्रिलगता घेऊन किनारी लावण्यासाठी चालावे, तशा जिजाऊ चालल्या… देवमहालाच्या रोखाने! शंभूराजांना जगदंबेच्या औक्षवंत चरणांवर घालण्यासाठी!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६८.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here