धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६७ –

पायांवरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्याजवळ आले. घोड्यावरचे जिन काढून ठेवावे, तसे राजांनी मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे ‘दिवस’ घातले! सारा गडदेव सुतकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमका बारामावळात पसरली! वाडी-मजऱ्यांतील खोपटांची पाखी हळहळली.

राजांनी राजगडाहून धाडलेला थैलीस्वार शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डुईची पगडी काढून तो पिलाजी शिर्क्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. “टाकोटाक निघोन येणे. खाजगीने बोलणे आहे.” एवढाच मजकूर राजांनी पिलाजींना लिहिला होता. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसाएवढा चालून आला, तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून दोन महिने हटले होते. दसरा सजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते, थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची.

“कोई आया है?” रोज ते स्त्रान, देवदर्शन करून परतताच कृष्णाजीपंतांच्या आईंना – लक्ष्मीबाईंना विचारीत होते. जसे दिवस चाल धरीत होते, तशी त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता चढत होती. धुके दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात, खांद्यांना पडशा टांगलेली, उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोषाख केलेली दोन माणसे शिरली! त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशीबाहेरच थांबले होते शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई होत्या त्यांची खूणगाठ व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डोकीच्या रुमालाच्या शेवास बांधलेली खडाधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली. नि तो म्हणाला, “आज्ञा है, ये भांजेको दिखाना!” व्यापारी त्रिमलांच्या सदरी

बैठकीवर टेकले. नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला – “कोई आया ठै?” त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजींनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खडयाने त्यांच्या डोळ्यांत लाख-लाख सूर्य पेटविले! “महाराजसाहेबांची अंगठी!’ स्वत:ला हरवून ते एकरोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उसळत्या खड्यातून असंख्य मुद्रा उमाळ्या घेत होत्या – “मासाहेब,

महाराजसाहेब, साऱ्या आऊसाहेब, धाराऊ, गोमाजीबाबा, अंतोजी, रायाजी, केशव पंडित, महमद सैस -”

चमकून त्यांनी सदेरवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांवर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले

– “आईचा भंडारा! रानचा वारा!” ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखटवीत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. फारा दिवसांनी ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली – “भवानीचा भंडारा! रानचा वारा!” प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले. तिरथ यात्रेला!’ बरोबर “बटु’ वेषातील भांजे शंभूराजे होते. कुणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाईही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना “तीर्थयात्रा करायची होती! राजे आणि संभाजीराजे घडविणाऱ्या “माँजी जिजाऊ’ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळाभर बघायच्या होत्या!

जडावल्या उराने संभाजीराजांनी यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. थिजवल्या थंडीला धरून ‘त्रिमल कुटुंबाची’ वाटतोड सुरू झाली. त्याच्यावर ‘नजर’ ठेवून पुढे-मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कुणी फकिराचे, कुणी अत्तरियांचे, कुणी वेदा तर कुणी चक्क मोगली सरदारांचे वेष धारण केले होते. कोरल्या दाढ्या राखल्या होत्या “यात्रा’ उत्तर सोडून मावळाच्या रोखाने सरकत होती. चालून-चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यांत मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्या तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून त्या घालत होत्या.

आता उज्जैन जवळ येऊ लागले होते. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गेळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चुलवाणावर खिचडीचे पात्र चढविले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कुणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रोखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळ-जवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजरा देऊन ‘सावधपणा”‘चा इशारा भरला. चार मोगली स्वारांचे घोडेपथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पायउतार हशमांनी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजे चरकली. आपण त्यांना बघितलेच नाही, अशा थाटात सारे आपापल्या जागी कामातच राहिले.

“काफिर नस्ल, कहासे आये हो?” घोडाइतांच्या म्होरक्‍्याने काशीपंतांवर डोळे वटारीत दरडावले.

“जी, मथुरासे!” केसो त्रिमल अजिजीने म्हणाले.

“कहां निकले?”

“तिरथ यात्राको. रामेसर जा रहे हे, हुजूर।”

“ये कौन हे?” म्होरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला! म्होरक्याचे नाव हरहिकमतखाँ होते.

“ये मेरा भांजा है सरकार!” काशीपंत उत्तरले.

“झूट! सुव्वर, ये सेवा दख्यनीका बच्चा ‘संभा’ है!”

त्या शब्दांनी शंभूराजांची कानपाळी रसरसून आली! काळजावर निखारा ठेवल्यागत झाले. संपला! आता सारा मामलाच संपला! शंभूराजांच्या सुमार झालेल्या पायपोटऱ्या पुन्हा दाटल्यागत झाल्या.

“सेवा? कौन ‘सेवा’? ये मेरा भांजा है!” आपणाला “शिवाजी’ कोण ते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही, अशा थाटात केसोपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले.

“ये तेरा भांजा! नाम क्‍या हे इसका? माँ किधर हे इसकी?” म्होरक्‍्याने प्रश्नांचे आसूड ओढले.

“ट्सका नाम माधव है! माँ गुजर गयी हे इसकी!” काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले!

“झूट! बम्मन सिधे जुबाँ नहीं खुलेगी तेरी.” त्या हवालदाराने हातातील कोरडा फाडकन काशीपंतांच्या बगलेवर उतरविला. त्याच्या शेवाची चाटती जीभ संभाजीराजांच्या दंडावर वळ उठवून गेली! यात्रेकरू कळवळले. “शाही’ चापात अडकले.

“ह॒म गरीब ब्राह्मण यात्रा जा रहे है! सरकार रहम करो।” कळ विसरून केसोपंत छातीवरचे जानवे दाखवीत अंगचे सगळे कसब पणाला लावून कच खाणाऱ्या नियतीशी झगडू लागले. गयावया करू लागले.

“हरहिकमतखाँ, ये बम्मन है, तो इसकी जुबाँ यूं खुलेगी! इसे एकही थालेमें खाना लेने कहो, अपने भांजेके साथ!” स्वारांपैकी एकाने म्होरक्याला तिढा सुचविला.

“मरहब्बा बिलकूल दुरुस्त!” म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले, ऐ, बुतपरस्त, ये भांजा है तुम्हारा, तो खाना खाओ इसके साथ एकही थालेमें! ए बूढी, लगा दो थाला.” हिकमतखाने हुक्‍्म फर्मावला. सारेच यात्रेकरू गडबडले. पेचात पडले. हे कैसे घडावे?

“शास्त्रमे ये करना…” केसोपंत काहीतरी बोलायला गेले.

“गया जहात्नुममें तेरा शास्तर! थाला लगाव।” हिकमतखॉँने त्यांना बोलूच दिले नाही.

काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली. या वेळी हे राजरक्त उफाळेल. शंभूराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील. मग साऱ्यांचीच रवानगी उज्नैनच्या आबदारखान्यात होईल. जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले. त्यात मथुरेची मिठाई ठेवली. घोंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एक तर्फेला केसोपंत बसले.

“बैठो, बेटा!” म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंथरलेल्या घडीवर बसण्याची हातखूण केली. माणसाच्या आयुष्यात काही-काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात! शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनीही मने बांधली. डोळे फार बोलके असतात. कधी-कधी ते जबानीपेक्षा अधिक व अचूक बोलतात! भोजनपत्राला नमस्कार करून त्यांनी त्यात हात घातले. त्यातील एक हात होता, यमुनेच्या पाण्याचे अर्घ्य देणाऱ्या ब्राह्मणाचा. दुसरा हात होता, धरतीला रक्ताचे अर्घ्य देण्याचाच ज्याचा ‘कुलवसा’ आहे, अशा भोसल्याचा! हा नियतीचा फेर होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवू लागले! हिकमतखाँ आणि त्याचे हशम ते बघताना चरफडले.

“इसकी माका – गल्लत खबर दी कम्बख्तोंने.” हिकमतखॉने खबर देणाऱ्यांचा उद्धार केला.

“ये चावल चबानेवाला गुलछब्बा सेवाका बच्चा कैसे हो सकता है? चलो।” घोडेपथक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत्या टापांनी आले, तसे निघून गेले! साऱ्या यात्रेकरूंनी नि:श्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, ‘खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजे होता! !

तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते, त्यांना आज जाणवले होते – “आम्हास – असं सामोरं बसून कधी आबासाहेबांबरोबर एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही!! ‘

उत्तरी जन्मला – वाढलेला एक संस्कारशील ब्राह्मण आणि ‘श्री’च्या राज्याच्या निर्मात्याचा एकमेव राजअंकुर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते.

कधी-कधी नियती वाढून ठेवते ‘ ते “ताट ‘ म्हणतात ते असे!!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६७ –

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here