धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६५

By Discover Maharashtra Views: 2412 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६५ –

मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारे जण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थबकत होते, तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन वाटतोड सुरू होत होती.

“थकलात?” राजांनी प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री तोडली.

“जी, नाही.”

कसल्यातरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्म-पट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या, लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला ‘संन्यासी’ हात ठेवला!

“जरा येता?” घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारत केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघंही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे, याचा कुणालाच अंदाज येईना. “आमचे एक ऐकता?” राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. वव्जीग काही क्षण खोळंबले! मनी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते, आज ते करणे पडले.

भ “पल्ला लांबचा आहे…” राजे थांबले. आपसूकच.

“तुम्ही… तुम्ही – थांबता?” राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतांसारखे एकमेकांस भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली. एकाच हातपकडीतून!

“जी, आज्ञा!” कुठूनतरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाडयावर आदळताना ठणकावा, तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पाणथरून आले. चंदावलीचा फुलला स्वार, ऐन धुमाळीत हत्यारमार करीत हरोलीला यावा, तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे टपेच दूर हटवीत वर आला – “खरंच आमचे काळीजच यांच्या रूपानं कुणी णी तरी सोनरसात डुबवून ते आम्हांस आपल्या सावळ्या हातांनी पेश केलं आहे!!’ राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते!

“सावळे हात – एकला जीव!’ क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले.

“चला!” संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेराखालून तांड्याकडे चालले.

“कृष्णाजीपंत, बडे ध्यानसे सुनो।” तांड्यात येताच राजे कृष्णाजीपंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले.

“हा. स्वामिन्‌!”

“हुम आगे कूच करते है। हमारे फर्जंद, केसोपंत और कविजीके साथ पिछे लौटेंगे, मथुरा! ये हमारी सबसे किमती अमानत आज तुम्हारे हाथमें है! मुल्कमें जाकर हम हमारे सरदार-हशम भेजेंगे दस्तुरी खत देकर. तब तक कुंवर तुम्हारे भाईके पास रहेंगे। अभीसे ये हमारे नहीं, तुम्हारे बेटे है। ” राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मणभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले.

“बोलो।” राजांचे सलगी देणे सुरू झाले.

“हम गरीब ब्राह्मण ये राजपुत्र. कुछ न होनवार बना। तो हम कैसे मँह दिखायेंगे आपको स्वामी?” कृष्णाजी मनचे बोलले.

“कृष्णाजीपंत, न होनवार अब भी हो सकता हे! हम इसका नामोश तुमपर कभी नही डालेंगे। ” राजांनी कृष्णाजीपंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले! त्यांनी केसोपंतांना तयार केले.

“तुम्ही केसोपंतांबरोबर परतीची चाल धरा. ते सांगतील तसे वागा. कुणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका.” राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठांतून निसटणारे बोलन्‌बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले!

“केसोपंत, तुम्हारे घरमें कौन-कौन है?” राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले.

“माँ है, भाई-बहने है। ” त्रिमल उत्तरले.

“तो आजसे ये तुम्हारे भांजे! ध्यान रखना।” राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्‍याबरोबर भेलकांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा, तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते. आणि तो क्षण आला. निरोपाचा! शिबडातील लोटक्यात दही होताना चहू अंगांनी विरजण साकवटत येते, तसे राजांचे मन दाटून आले! आता धीरपुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले! शब्दांनी नकळतच चिलखते चढविली! भावनांचे बुरूज काळजावर खडे झाले!

राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हातांनी थोपटले. भवानीच्या दोन डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते! दोन वाटणारे – पण जे काही बघा-भोगायचे असेल, ते एकवटून भोगणारे! एकजोड झालेले!

राजांनी झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजीबरोबर मागे राहिले होते, म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, “आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला. कमी बोला. हिच्यावर भरोसा ठेवा.”

ओंजळीत बैरागी “शिवा’ची, बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनर्पिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीवर दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावेत तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून ओघळत छातीवर कोसळले. ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलगती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायावर टेकविले!

त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठवणारी एक सरसरती रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यांत भोसलाई मोती आणून सोडले! संन्याशाने आपल्या केसलांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले. अश्रूंच्या रूपाने! “शंभूबाळ उठा.” लगबगीने राजांनी त्यांना वर उठून घेतले.

“महाराजसाहेब, आमचा… मासाहेबांना, थोरल्या-धाकट्या आऊसाहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा!”

ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्यातरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे, तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले – ‘आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत!!’ राजांचा हात चटकन छातीवर गेला. पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती!

चारी पायांना दातेरी आकडेचाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन, हैराण झाले. “आणि – आणि हे सलामत परत आले नाहीत तर – तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी! सती जायला निघताना घातली तशी त्या वेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार!’ राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सणकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. भिडली! परिस्थितीच्या वारेझोताने ती मावळी जरीपटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली! त्या मिठीत राजांचे ‘राजेपण’ आणि संभाजीराजांचे ‘बाळराजेपण’ गुदमरून गेले.

निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वांत किमती हिरा जपण्यासाठी केसोपंतांच्या हाती काही हिरे, माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, “औक्षवंत व्हा!”

“आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा. हे त्रिमलकाका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी!” राजांचे डोळे शांत होते.

“जय भवानी!” राजांच्या धीरबोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले! “जय भवानी!!”

कधी नव्हता तो भोसलेकुळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजे, तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर राजे, राजगडावर थकदिल जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसूबाई! संजाबाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले, छातीवर आडवे यज्ञोपवीत चढविलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखूदेखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते! केसोपंतांनी त्यांना उत्तरी आन्हिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केसोपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली.

आकाशसुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आप आपल्या निळ्या केसगुंफणीत माळावे, तशी ही बोली होती! मधुरातली मधुर. ऐ अंगाभोवती पिवळाधमक शालनामा पांघरतो आहोत, असे वाटायला लावणारी! आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे. पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते.

एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला! “ही भाषा देशी, आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात, तशीच आहे!’ मंदिरातून परतताना “कंसका किल्ला’ हे बेसाऊ ठिकाण आले. विसाजीपंत म्हणाले, “देखना है किला?” “जरूर,” म्हणत संभाजीराजे “कंसकिल्ला’ या मथुरेतील सर्वांत उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची बल्ही मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या.

“थोरल्या मासाहेब या यमुनाकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील?

एक वळण शभ लाच्या गजांच्या मनात सर्रकन फेर टाकून गेले. ते डे डोळेजोड बघत राहिले. त्यांना अंदाज नव्हता की, याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल! राजे प्रयागच्या त्रिवेणी संगमात स्त्रान करून घाटपायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने या वेळी रोखले होते! हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, “बुवाजी, ये गरुडके पाँख है! मैनाकेके पहाडीके! हर काममें यश देनेवाले. ले जावो पांच!”

राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमानबाक चढवून गेले. “हर काममें यश देनेवाले! गरुडके पाॉँख!’”’ पारध्याच्या हातातली पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. ‘आता एकाच कामी यश पाहिजे. शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या!’

राजांनी गरुडाची पाच पिसे आपल्या सडक बोटात घेतली! सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की, त्यांचा “गरुडबन्चा’ कंसकिल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे! आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६५ –

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment