धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८…

रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्याशुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडवून नऊ वर्षे बयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले! एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते – पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले.

“दिवाण-इ-खास’चा मगरबी दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा राहिला. अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या. पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारिये कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत, हे कुणाच्याही ध्यानी आले नाही! वजीर जाफरखानाने सर्वांत प्रथम चौकशी केली, ती रामसिंगाची! रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालांचा कोरडा ओढला –

“क्यो – रामसिंग, ‘सेवा’ किधर है?”

“जी. हुजूर, उनकी तबियत बिगड गयी है। सख्त बुखार आया है उनको!” रामसिंग झुकूनच बोलला. कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डुलली

“उन्होंने अपने फर्जदको भेजा है अलिजा!” रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत म्हणाला. औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले. निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते! त्या चार डोळ्यांत कमालीची तफावत होती. त्यातले दोन होते, कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे; आणि दोन होते, आतबाहेर स्फटिक-साफ संभाजीराजांचे! संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला. त्याने विचारले – “क्यों फर्जंद संभू, तुम्हे नहीं आया बुखार?”

अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, “नाही! आम्हास बुखार येत नाही! आमच्यामुळे इतरांस बुखार येतो!”

“क्या बोला वो?” औरंगजेबाने भुवया चढवीत रामसिंगाला विचारले. संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते! पण जाब देणे त्याला भाग होते. तो वाकून म्हणाला, “जी हुजूर. वे बोले – हमें बुखार नहीं हे! ”

“कैसी मासूमी हे। जाफर, संभाको नजराना इनायत करो।” औरंगजेबाने वबजिराला आज्ञा केली. संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली. रामसिंगाच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती घडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत, काळेशार, शाळिग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते. त्याजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते. रामसिंग राजे-संभाजीराजे यांना घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला.

खुद्द मिर्झाच्या आग्ऱ्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल, असे कधी राजांच्या स्वप्नातसुद्धा आले नसते. पण स्वप्न आणि सत्य नेहमीच एकमेकांना हूल देऊन एकमेकांवर कुरघोडी करीत असतात!

संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलादखानला हुकूम दिला, “सेवाको मुकामपरसे रणअंदाजखाँके कोठीपर ले जाव।” राजांना रणअंदाजखानाच्या कोठीवर हलवून जशी दाराची केली, तशी शिवाजीची बिनबोभाट कत्तल करण्यात येणार होती! रामसिंगाच्या हवेलीसमोर खुल्या तळावर ते शक्‍य नव्हते. कशी कुणाला ठाऊक, पण ही खबर रामसिंगाला लागली. तो तडक मीर बक्षी मुहम्मद अमीनखान यांच्या हवेलीवर गेला. अमीनखान मित्र होता. उच्च पदावर होता. त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे, तो निर्धारी निरोप पाठविला – “शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिल्यासह मला ठार करा!’ तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले की, शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे. समोर आलेल्या अमीनखानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला.

“शिवाजी आग्ऱ्यातून बाहेर जाणार नाही, यासाठी तू ओलीस राहतोस काय?’ असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठविला! राजांच्या प्राणावरचे जामीनकदब्यावर निभावते, हे पाहून नि:श्वास टाकून रामसिंगाने बक्षी अमीनखानाकडून जामीनकदबा दस्तखत करून पाठवून दिला. औरंगजेबाने तो मंजूर केला. रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला! रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वत:चे प्राण टांगून घेतले हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्र झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, “आम्ही बेलाफुलाची आणभाक घेऊन तुम्हास एतबार देऊ. निश्चिंत असणे.”

महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्यासह रामसिंगाच्या हवेलीत आले. हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशाह, गिरधरलाल, गोपीराम, तेजसिंह अशी रामसिंगाची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथपंत, दत्तोजीपंत, त्र्यंबकपंत, निराजी अशा असामी होत्या. राजांनी चौरंगावरच्या शाळिग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवर्पिडीवरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, “हम शिवजीकी कसम उठाते है, जबतक तुम हमारे लिये जमान हो, हम आगरा नहीं छोडेंगे। ” राजांनी रामसिंगाची ऊरभेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला आणभाकेने बांधील झाले. एकाच वेळी राजे दोन कैदेत पडले! एक होती, औरंगजेबाच्या राजकारणाची. दुसरी होती, रामसिंगाच्या प्रेमाची!

तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा, तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला! उलटी चालली नाही, तर ती मोगली सल्तनत कसली?

संभाजीराजे आणि रामसिंग आग्ऱ्याचा फेरफटका करून परतत होते. त्यांच्या घोड्यांमागून दहा-बारा रजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक ‘कुम्हारबाडी’च्या वस्तीत घुसले. इथे कुंभाराच्या धाब्यांच्या घरांसमोर उभट-उंच रांजण, गेळे, माठ कुंभारांनी हारीनं मांडले होते. ते बघताच रामसिंगाने हात बर करून पथक थांबविले. मागे न बघताच त्याने हाका दिला, “दुंगर!”

“जी,” म्हणत दुंगगमल आघाडीला आला.

“उसमेंके माठ लेना. राजासाबके हशमोके लिये.” रामसिंगाने एका कुंभाराच्या ओसरीकडे हात उठवीत त्याला आज्ञा दिली. कुंभारी चाक फिरविणाऱ्या कुंभाराने ‘शाही सवाऱ्या’ बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपविले. पुढे येत रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्निस करून तो अदबीने म्हणाला, “क्‍या हुकूम है सरकार? कौनसी खिदमत करूं?” त्याच्या डोक्यावर उत्तरी पागोटे होते. चिखल-मळले हात त्याने मावळी रामरामाच्या पद्धतीने जोडले.

“अच्छे माठ देना. इन मेहमान साहबानके लोगोंको देना है।॥” रामसिंग संभाजीराजांच्याकडे हाताने दाखवीत म्हणाला. कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपुटला, “सवाऱ्या मावळी मुलखाच्या दिसत्यात!” कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली. कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भुबई नकळत वर चढली. “असामी देशीची दिसते. मावळबोली बोलते.’ एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला! काहीतरी आकार घेऊ लागला. कुंभाराने एक गोल खडा उचलून दुंगरमलला भाजीव माठ ठणाठण वाजवून दाखविले. संभाजीराजांच्या मनात कसलेतरी ठोके ठणठणून गेले. हातांत पेलून, पारखून बघून दुंगरने चार माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खेचून दुंगरच्या दिशेने घोड्यावरूनच फेकली. ती झेलीत दुंगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगाच्या हातात दिली. एक-एक उचलून कुंभाराने आणि दुंगरने माठ चार स्वारांच्या हातांत दिले. दुंगरने घोड्यावर झेप घेतली.

कुंभाराने वाकून पुन्हा, घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तसलीम केली.

“चलिये कुवर.” रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबर म्हणाला. रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या रजपूत घोडाइतांनीही टाचा दिल्या. पथक हलले. मुद्दाम कायदे आखडते धरून संभाजीराजांनी आपल्या घोड्याला लटकी टाच दिल्यासारखे केले! घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे, या अंदेशाने खूर मागे-पुढे नाचवून जागीच थांबले! रामसिंग-दुंगगर पथकासह पाच-दहा कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोऱ्या मोत्याचा कंठा उतरून हातात घेतला. कुंभार संभाजीराजांच्या घोड्याकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता.

संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला! “आम्ही मावळाचे. भवानीचे भुत्ये! पारख ठेवा. येतो आम्ही. राम-राम!” संभाजीराजांनी घोड्याला जबरी टाच दिली. “राम-राम जी.” हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चकित पडलेल्या, कंठ्याकडे बघताना हरखून गेलेल्या कुंभाराने अंदाज लावला,

“बच्चा मावळी सरदाराचा हाय!” कुंभार मूळचा मराठी मुलखाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आग्ऱ्यात आणून सोडले होते.

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here