धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५२

संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५२...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५२…

संभाजीराजांच्यासह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूखभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी ह्यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वत:शी खूणगाठ बांधली – ‘आता शिवाजी खरोखरच संपला! शिवाजीच्या रूपाने आता नवा ‘मिर्झा राजे’ तयार होईल!

निवडक लोकांनिशी मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊसाहेबांनी केशव पंडितांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. “आमच्या नातसूनबाईंना संगती घेऊन तुरंतीने गड जवळ करणे,” असा सांगावा खलित्यात लिहिला होता.

राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण – पण, स्वत:शीच शंका यावी असा बरिकट-बाका प्रसंग राजांच्यावर आला होता! मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर ‘श्रीं’च्या राज्याची आणभाक राजांनी घेतली होती. मावळमाणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्या वेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वत: राजेच सुन्न झाले होते.

राजांना या सगळ्याचाच जाब एकाच पायी विचारता येणार होता. आदिशक्ती जगदंबेच्या! जेव्हा-जेव्हा विचार करकरून मेंदूचे टाके उसवू बघत होते, तेव्हा-तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणांवर ठेवीत होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते!

संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले; जगदंबेच्या दर्शनाला. बरोबर प्रतापराव, प्रभाकरभट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून ‘जनीचा टेंबा’ हे अफजलभेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची, राजांनी बांधवून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली! केवढेतरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळून गेले – त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता! अफजलच्या वेषात! त्याच्या हातात केवढीतरी मोठी “बाघनखे’ होती! ती मुठीत बेमालूम छपवीत, हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, “आइये राजासाब, घबराइये मत!” राजांच्या जिवाची घालमेल झाली. “जगदंब! जगदंब!” पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला!

पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी-उतार झाल्या. राजे, संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडविली. आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले! तीच नऊ पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शिर राजांना दिसत होते!! कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात, तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले! जामा काखेत दाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले. डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते.

तो ‘शिवाचा’ “शिवाशी’ चाललेला “शिवकर’ असा गूढ संवाद होता! राजांनी डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला दोनच दळे होती!! मधले दळ गायब झाले होते! हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले!

पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुऊन राजे, संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनसाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी, अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. “आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडबात लेकरू पायांखाली येते आहे! अंबे, डोळे उघड! दाही दिशा अंधेरल्या. पोत पाजळ!’ राजांचे मन कालवून कळवळत होते. मस्तक वर घ्यावे, असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या, उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून-पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक-एक झालो आहोत, असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणांवर ठेवले. राजे, संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले.

प्रतापगडाची तटबंदी, पहारे-मोर्चे नजरेखाली घालून दिवस उतराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले! राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली! पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले – त्या कबरीवर आता अफजल उभा होता! पण – पण त्याच्या अंगावरचा सगळा वेष राजपुती होता! मिर्झा राजासारखा!! मान मागे टाकून तो किंकाळत होता – “लवा, लवा दगा!” राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या ब्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, “महाराजसाहेब इथं – इथंच तुम्ही खान जीवे घेतला होता?” राजांच्या कपाळीचा तो व्रण सय्यद बंदाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता.

“होय, इथंच शंभूराजे!” राजे शांतपणे म्हणाले.

पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागेपुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखीमागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धिम्या चालीने उतरण उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळी खोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते –

“आदिशक्तीचे कवतुक मोठे,

भुत्या मज केले! भुत्या मज केले!!”

राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोरसवदा स्त्री-बानदान बसले होते. पुतळाबाईंच्या खाजगीकडच्या कुणबी दासीने त्याला त्या महालात आणून सोडले होते. ती पोरवयी स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेली शस्त्रे कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिराळ्या तबकांत ठेवलेले सफेद, केशरी टोप निरखीत होती. मधूनच देव्हाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. “आम्हास या मर्दाना- महालात का आणून बसविले आहे?” असे स्वत:लाच तिने विचारले. इतक्यात नौबत-नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रोखाने खिडकीच्या झरोकयाकडे तिने पाहिले. देव्हाऱ्यातील समयांच्या ज्योती मंद वारेझोताने क्षणभर थरथरून गेल्या. त्या पोरवयी स्त्रीने आपले परवंट्याचे नेसू ठीक करीत पायांतील तोड्यांकडे पाहिले.

जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बालेकिल्ल्यावर आली. जिजाऊसाहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दासी दिसत नव्हती. मस्तकीचा टोप तबकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडविला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली! चांदीचे चमकीले तोडे त्यांना दिसले!

मंचकावर कुणीतरी बसले होते! झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताठ करीत त्यांनी मंचकाला सवाल केला, “कोण… कोण बसले आहे, आमच्या बैठकीवर?”

मंचकावरच्या स्त्री-बानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांकडे पाहिले! त्यांना बघताच ती स्त्री झटकन खाली पायउतार झाली! गदका खेळताना गोमाजीबाबा आडवी धरीत त्या फरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजळून गेलेल्या टपोऱ्या डोळ्यांच्या दोन शुक्रचांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारीच गडबडून गेली!

चौरंगावरच्या टोपांकडे निरखून बघत त्यांनी अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत, याची नीट खातरजमा करून घेतली!

“तुम्ही?” म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठमोरे झाले! आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधडत्या काळजाने ते स्त्री-बखानदानही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला रुतून कचणारा तोडा बाकून त्याने अगोदर ढिला केला. “आता कुठं जावं?” या पेचाने ते गोंधळून गेले! त्या होत्या येसूबाई! आपल्या आबांच्या बरोबर – पिलाजींच्या बरोबर – त्या राजगडी दाखल झाल्या होत्या!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५२…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here