महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५०

By Discover Maharashtra Views: 3583 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५०.

मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे, या भरोशाने राजे सैन्यासह तळकोकणात गेले होते. त्यांना जाऊन पाच दिवस मागे हटले होते. जिजाऊसाहेब सदरेवरचे निवाड्याचे आणि खलित्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपते घेत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते “बाळाजी, थांबू या आता. येतो आम्ही.” जिजाऊ सदरबैठकीवरून उठत चिटणिसांना म्हणाल्या. चिराखलागणीची वेळ होत आली होती. “जशी आज्ञा,” म्हणत बराच वेळ कुरुकुरु चालविलेले सफेद शहामृगपीस बाळाजींनी कलमदानात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले.

तिकडे जिजाऊंच्या खासेमहालात नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळ- जवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईंच्या शेजारी संभाजीराजे उभे होते त्यांच्या तर्फेने सखूबाई, राणूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारीजण जिजाऊंची वाट बघत होती. इतक्यात बुट्ट्याचा काळाशार शालू नेसलेल्या गौरवर्णी सोयराबाई तोलत्या धिम्या पावलांनी आपली कन्या बाळीबाईसह त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि दोन-चार कुणबिणी होत्या. त्यांना बघताच सगळ्या राणीवशाने आपले “उभे राहणे’ झटकन सावरले!

संभाजीराजांनी कमरेत वाकून त्यांना “तिपेडी’ अदबमुजरा केला. सोयराबाई सिधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाईंची मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईंच्या पायांवर खिळली होती. त्या गोऱ्यापान पायांवरच्या कोरलेल्या आळत्याच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे मन गुरफटल्यागत झाले! आपले बिब्बेवाणाचे डोळे संभाजीराजांच्यावर जोडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत, सोयराबाई पुतळाबाईच्याकडे न बघताच म्हणाल्या, “बाकी धाकल्या बाई, फर्मानाची बाब बाळराजांच्यावर निभावली म्हणून निभावली! खुद्द स्वारींनाच फर्मान घेणे पडले असते, तर कोण बेअदबी झाली असती साऱ्यांची! आमचे बाळराजे हुशारीचे, कुठलीच कसूर त्यांनी नाही केली!”

टाकली मान वर उठवून पुतळाबाईनी एकवार सोयराबाईच्याकडे बघितले. पायांवरची आळत्याची नक्षी त्यांच्या डोळ्यांत दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले! “या,” म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्याजवळ उभ्या असलेल्या बाळीबाईंना हाताला धरून आपल्याजवळ घेतले. “कोण प्रकारचं खलबत चाललं आहे बाळराजे थोरल्या बाईशी?” असे हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांच्या येण्याने महालाला जणू सुगंधी भरलेपण मिळाले! कुणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदर सावरीत बोलून गेल्या, “नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना… ‘ सोयराबाईच्या नाकाचा मुळात लालसर असलेला शेंडा लालावून आला.

मंचकावर शांत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले, “काय म्हणत होतात?” “…की उमर लहान असताना त्यांना फर्मान घेणं पडलं!! त्यांनी म्हणूनच हुशारीनं ते निभावलं!” ते ऐकताना राणीवशातील सगळ्या राण्या एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या! सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती! जिजाबाईंना, संभाजीराजांना, राणीवशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की, राजे तळकोकणात नव्हते! ते मिर्झा राजाच्या गोटात, त्यांच्यासाठी दिलेल्या शामियान्यात, पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे अस्वस्थ फेऱ्या घेत होते.

मिर्झा राजाने तळकोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना कऱ्हेपठारावर आपल्या तळात बोलावून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिर्झाने खुद्द त्यांच्या नावाचे “बफादारी’ जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठविले होते. औरंगजेबाने तातडीने खुद्द राजांच्या नावे ‘फर्मान’ पाठविले होते! तळकोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते. आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षी जानी बेगच्या “शाही रिवाजा”प्रमाणे आज फर्मान स्वीकारले होते!!

फर्मानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून ‘“शाहीथैली’ खालच्या मानेने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कढ आठवला होता. “जनावरासमोर गुडघे टेकून फर्मान घेताना जाम्यावर डाग पडतात! ते जाता जात नाहीत!” फर्मान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेऱ्या शामियान्यात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला – “शंभूराजे, फर्मान घेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटशी घेतलं. आज आम्हीही फर्मान घेऊन आलो. पण, पण आम्हाला पोटाशी घेणारं इथं कुणीच नाही!!’

परंतु आपले राजेपण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांना जगण्याचा धीर दिला होता! दुर्बलांच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे ‘राजेपण’! राजांनी ते पाळले होते. फार-फार मोठी किंमत देऊन!

मिर्झा राजाच्या हिशेबी शिवाजीराजांचे “श्रींचे राज्य/ आता निकालात निघाले होते. सगळा राजस्थानी चिवटपणा पणाला लावून “शिवाजी आणि संभाजी’ हे दख्खनी मावळमणी त्याने उचलले होते. आपल्या निष्ठावंत हातांनी औरंगजेबाच्या जपाच्या तसबीहच्या माळेत ते गुंफण्यात आपण फत्ते घेतली, या समाधानात मिर्झा राजे होता!

आता त्याची रेगिस्तानी पिंगट नजर विजापुराकडे आदिलशाहीच्या रोखाने वळली! तो पुरा दख्खन पायाखाली रगडायला आला होता. मिर्झा राजाने आपला खास हेजिब राजगडावर पाठवून राजांना आपल्या फौजेनिशी पुरंदराच्या तळावर दाखल होण्याचा निरोप पाठविला! विजापुरावर चालून जाऊन शाही चाकरी बजावण्यासाठी! त्यासाठी राजांना त्याने आपल्या तहात बांधून घेतले होते.

राजे रजपुताबरोबर विजापूरच्या रोखाने गेल्याला दोन महिने लोटले. नेहमीसारख्या जिजाऊ सदरकाम आटोपते घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दांबरोबर शहामृगपीस चालवीत होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदरचौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात भिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला.

“काय पंत?” जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या.

“शृंगारपुराहून एक वेद-पारंगत शास्त्री आलेत. केशव पंडित नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर…” मोरोपंत अदबीने थांबले.

“पेश करा त्यांना पंत.”

मोरोपंतांनी सदरदरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशव पंडित आत आले.

अंजिरी रंगाचा जरीकिनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबडया काठाच्या धोतरावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशव पंडितांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले.

“काय योजून येणं केलंत शास्त्रीबुवा?” जिजाऊंनी केशव पंडितांच्याकडे बघत शांतपणे विचारले.

त्या प्रश्नाने केशवभट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, “थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद-उपनिषद. पायीच्या सेवेचा योग येईल तर…. ”

“छान! आम्ही अशा असामीच्या शोधातच आहोत. मोरोपंत, यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब!” जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या. आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की, कसलेतरी विचार त्यांच्या बरोबर चाल असावेत. पण ते राजांचे नव्हते. संभाजीराजांचे नव्हते. राजांच्या राणीवशाचे तर नव्हतेच. राज्याचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नातसूनबाईंचा! येसूबाईचा!

संभाजीराजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीराबांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणी त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वत:शी म्हणाल्या, “फार दिवस झाले. पोर डोळ्यांआड राहिली. एकदा बलावू धाडलं पाहिजे!”

पन्हाळाप्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराखलागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बाले किल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊसाहेबांना आपण आल्याची वर्दी पाठविली. त्या वेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशवभट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्यासह मंचकावर बसल्या होत्या.

केशवभटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना, संभाजीराजांना रामायण-महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली.

बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशव पंडित यांना निरोप दिला. रामोशी वेषातील, दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले.

“कोण मामल्याची खबर? बोला नाईक.” विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला.

“इज्यापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यास्री आन्‌ रजपुताला शर्जाखानाम्होरं शिकस्त घ्याया लागली.”

“ते कानी आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानानं पहाडाचं काळीज दाखविलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या चार सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे, सर्जाखान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत.

काय झालं पन्हाळ्याचं?”

“जी कंदी घडायचं न्हाई, असं घडलं पन्हाळ्यावं आईसाहेब… आपला हजार पाऊलोक पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला! गड काई हाताला लागला नाई.” बहिर्जीने मान खाली घातली.

“मतलब?” संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. हजार लोक एका छाप्यात खर्ची पडले होते! “इज्यापूर सोडताना धन्यांनी फौजंच्या दोन फळ्या केल्या. एक सरलस्करांच्या दिमतीला दिली. दुसरी संगं घेऊन खासं राजं कालच्या षष्ठीला पन्हाळगडाला मध्यरातीचं भिडलं. नेताजीस्री त्येनी षष्ठीची रात नेमून दिल्याली हती. पर नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं न्हाईत! वाट बघून राजे हैरान झालं. रात टळतीला यायला लागली म्हून आपली फौज घिऊन गड चडाय लागलं, पर गडकऱ्याला सासूद लागल्याला हुता.

धुकटलेल्या तटाभवत्यानं आपलं धारकरी घेऊन त्यो दब्यानं बसला हुता. राजं टप्प्यात येताच त्यो मोहऱ्यानं चालून आला. चाल्ञन्यात हत्यारमार झाली! हजार माणूस उतरंडीला पडला! गर्दी करून राजं उरलेल्या लोकांनिशी विशाळगडाकडं सरकलं.”

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५०.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment