महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४२

By Discover Maharashtra Views: 3571 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४२…

ते बघताना, इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुची मात्र न राहवून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, “ओ नो इट कान्ट! व्वो नहीं मार सकटा!”

मनुचीने, मिर्झा राजाने तबकात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते, त्या घरात बसविले! मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला!

पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनुचीने मिर्झा राजाला पटवून दिले की, त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद

झालेला आहे! तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही! राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की, त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता! आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता!

आपल्या कमानबाक भुवया वर चढवीत मिर्झा राजा, राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला!

मग निकोलो मनुची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वत:शीच बोलल्यासारखा पुटपुटला, “बिलकूल दुरुस्त! वो नहीं मर सकता!!”

राजांचा “घोडेशह’ मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता! हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला,

“फतह आपकी हुई राजासाब. हमने शिकस्त ली!” दस्तुर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली! ती

खेळातील ‘फत्तेची’ रिवाजी शाही बक्षिशी होती.

लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, “हम हार-जीत मामुली मानते है, राजाजी! इजाजत हो तो मनकी एक बात खोल देना चाहते

🔊 “हां! जरूर.” मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्यासफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर

दिली. ते रंगसतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यांत आपल्या

बाकदार नाकाचा शेंडा खोल-खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, “राजाजी, मर्दाना कितना भी बडा हो, जनम लेता है जनाने की कोखमें!” आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्कानळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली!!

👉 मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून, राजे रजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा-पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या

कुरणातून रखडत चालावे तशी गत रजपुताच्या गोटात राजांची झाली होती! दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत-रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहीत असते!

मिर्झा राजाने राजांच्याबरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यांतील दोन असामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कळछवाह! किरतसिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता – आणि, आणि उग्रसेन कछवाह राजांच्याबरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन परतणार होता! तहाची तामिली होईपर्यंत, म्हणजे तेवीस गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजीराजे रजपुताला ‘श्रींच्या’ राज्याचे जामीन राहणार होते!

हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरतसिंग आणि उग्रसेन

कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना दोन महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बज्ष्याला – केंवर किरतला – त्याने बजावले, “कॅवर, सम्हलके रहना! वो सेवाजी है; पहाडका सेर!”

उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली, “उग्रभान, ठीक परख लेना कि, सेवाजी आपकाही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है! गाफील मत रहना! हो सकता हे, सेवाजी किसीका भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा!”

▶ मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळ-जवळ पावल्यासारखीच होती.

आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनाती धरून केशरी साफे बांधलेले तरणेबांड किरत आणि उग्रसेन उभे होते.

मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला, “राजासाब, हम आपको बिदा दे रहे है। लेकिन बिदा देना हमारा सुभाव नहीं!

हमें अच्छा लगता है। आगवानी करना! आप कुंवर शंभू को भेज देना। हम शाही ढंगसे उनकी आगवानी करेंगे!!”

तळहातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती. त्याहून स्वत:ची वाटत होती. त्यांच्या

निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, “डरना मत राजासाब! बेशक, बिनाहर्ज कुंवर को भेज देना! उनका बाल तक बांका नहीं होगा! इतबार करो! हम कसम उठाते है!” मिर्झाने शामियान्याच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले.

त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली! त्यांतील दोन पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोपविड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, “हम शिवजीकी कसम उठाते है, जब-तक हम जिंदा है, तबतक आपके कँवरका यहाँ बाल भी बांका नहीं होगा!”

मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांबरोबर किरतसिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदमबाज चालीने चालू लागले. कोंढाणा किरतसिंगाच्या हवाली करून राजवाड्यावर मासाहेबांच्यासह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिराखदाने ऊरभर जळत होती

जिजाबाईंच्या महालाकडून आलेली ‘थाळ्याची’ वर्दी, त्यांनी “भूक नाही’ अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखविण्याचे धाडस काही त्यांना होत

नव्हते. रजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कंठ्याचा एकएक मणी ओघळत जावा, तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे

मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते! प्रत्यक्ष फर्जद संभाजी राजांना रजपुताच्या गोटात धाडावे लागणार होते! जामीन म्हणून!!

राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता, “एकला जीव पदरी घातला! स्वारीच त्यांच्या आऊ आणि आवा!!’ त्या आवाजात मिर्झा

राजाचे हिंदोस्तानी बोल मिसळत होते – ‘बेशक-बिनाहर्ज भेज देना आपके कुंवरको! हम कसम उठाते है…. !

राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवीत असते. राजांना रक्ताची नाती नसतात! असली तरी ती मनाच्या जामदारखान्यात “मोहरबंद’ करून ठेवावी लागतात!

राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता – ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी? आऊसाहेबांना त्यासाठी हिंमतबंद कसे करावे? पुन:पुन्हा

त्यांना वाटत होते की, तडक जिजाऊंच्या महाली जावे, मनी दाटलेले मोकळ्या ओठी बोलावे. पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडखळत होते. हाताची बोटे छातीवरच्या

कवड्यांवर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते.

“आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया. संगती बाळधनी हाईत.” राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धरकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले

दौडते घोडे थांबावे, तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या.

“थाळ्यास नाही आलात? गडकोटांची चिंता करता?” महालात शंभूराजांच्यासह आलेल्या जिजाऊ संथपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या

महाराजसाहेबांच्या पायांवर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या दोनदळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिष्यांची जबान त्यांना आठवली – “साक्षात रुद्र, पुराणांतला रुद्र जन्मास आला आहे! उंच गडकोटावर राहील… प्रलय माजवील… पण…पण! जसा आस्गणांकडून नाडला गेला, तसाच योग या कुंडलीत दिसतो!!’ त्या आठवणीने

राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले –

“त्या रुद्र-शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या

मावळमाणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले. तुम्हा-आम्हाला ते प्रसंग पडला, तर कैकवेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांना ठावे नसते की, राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा! आम्ही त्यासाठीच “शिवलिंग’ पूजतो. शंभूराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे! रुद्रासारखेच वर्तावे!’

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४२…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment