महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,325

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३६

By Discover Maharashtra Views: 6014 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३६…

शंभूराजांना म्हणाले, “हां, धरा म्हवरा धाकलं राजं. नदर माज्या पायावं आन गदक्यावर ठिवा.” गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी

जमिनीत रुतले. फरीच्या परजात चढविलेली मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली.

“जय भवानी!” गर्जत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले.

⚔“जय भवानी!” गर्जत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीगदकक्‍्याचा “घाई’ हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगीत चौक फिरू लागले. इशारत देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या

दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच “धप, धप’ असे आवाज मैदानात उठू लागले.

“घाई’च्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खूश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. “हो!’ म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थबथबलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, “वय जालं आता धाकलं राजं. अंग लगी

घामेजतं! हां, घ्या बघू आता, ‘छूट’!”

गोमाजींनी ‘छूट’ या चढाईचा पवित्रा घेतला! म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले! वार करायला ते आता सापडणार नव्हते. आणि ते कसे चालून येणार, हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते! “छूट’ हा चढाईचा प्रकारच ‘बेछूट’ मारगिरीचा होता! गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन’ या निधडेपणाने लढावे, तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा-उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे-तिकडे फिरू लागले. बाळराजांची गदकक्‍्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदकक्‍्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले.

“बाळराजं, वार कारीगर व्हनार हां! हुशार असा.” गोमाजी धीमेपणाने बोलले.

“नाही होणार!” नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी, गोमाजींनी आपल्या हातातील गदका एकदम उंच उठविला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत “हार हार म्हादेव!’ अशी अंगावर काटा उठविणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले! त्यांची फरी आडवी टाकायची चुकली! वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली! आणि काय होतंय, हे कळायच्या आतच गोमाजीच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला!!

त्या कळीसरशी सणकलेले बाळराजे कळवळून उठले.

एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिश्यांतून शब्द आले

“तुम्हावं असा वार टाकताना जिवाला काय वाटतंया कसं सांगावं? पर बेहुशार ऱ्हाऊ नगा. हत्यार चालवायचं म्हंजी दिल तयार असाय लागतो. लढाईत ह्या परास लई मोठा

गरादोळ उठतो. बाळराजं त्येनं कच खावून न्हाई भागायचं!” गोमाजींच्या इमानी डोळ्यांत पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले,

“आम्ही कच खाणार नाही!!

▶ घ्या मोहरा गोमाजीबाबा!” पुन्हा ‘छूट’ची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची

कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजीबाबा आहेत, याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गदका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत, गदका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी-उजवी हूल देऊ

लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे, हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि “जय भवानी’ अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्यांचे

पाते लवायच्या आत दोन छलांगीतच गोमाजीबाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला! एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सर्रकन माथ्याकडे सरकली. आणि

ओठांतून मात्र नकळत शब्द बाहेर पडले, “भले!” गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यांत आनंदाचे अश्रू जमा झाले होते! गदका काली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून, त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले

“आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झेलल्यात आमी. चिवट झाल्यात आमची चमडी. तुटता तुटायची नाही!! तुमचं धा वार अंगावं पडलं, तर धा

दागिनं चढलं अंगावं बाळराजं!” गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते.

“गोमाजीबाबा !” एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साद धावत आली गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली. काळजात मासळी सरकली. अंतोजीची सादर कातरी होती ऊर खालीवर होणाऱ्या, समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले, “का-काय जालं रं अंता?”

“मासायबांनी बाळराजांस्तनी घिऊन यायला धाडलं. आपलं… आपलं पंतकाका ग्येलं!!”

“आऑ कोन?” म्हणून टाळा वासताना गोमाजीबाबांच्या गलमिश्या थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले.

“डबीरकाका!” अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गदक्याचे घाई, छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गदका केव्हा घरंगळून पडला, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भावुक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंगथोर रूपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते! दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ओंजळी-ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले! पंतकाका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते-आस्ते वर उठताना दिसू लागले.

गोमाजीबाबांचे बोल, शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डबीरकाकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता – “आमची ही हाडं पार म्हातारी जाली. पर लई-

लई वार झेलल्यात आमी!”

🏇राजे बसनूरस्वारीवर गेल्याला एक महिना लोटला. होळीपुनवेचा दिवस राजगडावर उजाडला! गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोधतपास घेऊन

ऐनाची सरळसोट, चखोट होळी तोडून, ती वाजतगाजत गडावर आणली. होळी चौकात आंबवतीने नटलेली होळी खडी ठाकली.

पुनवेचा थाळ्याएवढा चंद्र बारा मावळाचे कातळकडे पार करून उगवतीबाहेर आला. झोपडाखोपटांत पोळी नि कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे, मस्तकावर

कंगणीदार लाल पिळाच्या पगड्या चढवून होळीचौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली! ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंदखोऱ्यात पसरून घुमू लागली. गडमाथ्यावर चांदण्याच्या दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले.

अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढविलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा रुतवीत जिजाऊसाहेबांच्या

खासेमहालात आले. होळीचौकातून वर्दी आली होती – “खाशा स्वारीनं चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते!”

▶ जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, “बाळराजे, जा हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबलेत.”

“मासाहेब…” शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठांत ठेवून थांबले.

“का काय झालं?” जिजाबाईनी मायेने त्यांना विचारले“…!” शंभूराजे गप्पच होते.

“बोला. मनी असलेलं साफ करावं.” जिजाऊंनी धीर दिला.

जिजाबाईच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, “तुम्ही… तुम्ही याल आमच्या संगती? होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मजा येते! याल?”

ते ऐकताना जिजाबाईचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. “आम्हाला कधी कुणी “बरोबर या’ असा आग्रह केला नाही! आम्ही जातो म्हणून ठरविलेल्या वाटेनं आम्हास जाता आलं नाही!

जिजाबाईना गप्पनिसूर बघून शंभूराजे वरमले. “चुकलं आमचं…” म्हणत झुकता मुजरा करीत-करीत मागल्या पावली पाच कदम मागे हटू लागले.

क्रमशः

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment