महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,701

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२३

By Discover Maharashtra Views: 1329 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२३ –

झाली नसेल कधी, आम्हाला आबासाहेबांची होते तशी आमच्या पेशवे निळोपंतांना त्यांच्या वडिलांची कधी याद? कधीच का केला नाही मोरोपंतांचा निसटतासुद्धा उल्लेख आमच्याशी बोलताना त्यांनी? की खांद्यावर जोखीम पडताच तोडूनच टाकावी लागतात माणसास नाळेची नाती? मोरोपंत, रायगडाच्या मंत्रिवाडीतील तुमच्या राहत्या वाड्यावर चौकीपहारे बसविताना काय वाटले आम्हास ते आमचे आम्हालाच ठाऊक! आपल्याच सही हाताने आपलाच डावा हात कलम करायची अशी नौबत औरंगवरही येऊ नये या पुढच्या हयातीत! पंतांची जोखमीची जागा दिली आम्ही त्यांचेच पुत्र निळोपंतांस – पण – पण – नाही भरून निघाली कधी त्या क्षणी झाल्या कोंडीची जखम. पंत, तुम्ही, आबासाहेब, गोदावरी यांची मनापासून माफी मागण्यासाठी “माणूस’ म्हणून तडफडतेय आमचे हे मावळमन. पण तुम्ही – तुम्हीच सारे हात डोलवून

“नको, नको’ का म्हणताय या क्षणाला? का? का?

राजांनी गदगदून गर्दन हलवली. साकळल्या रक्तथेबांत थटलेले त्यांच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब त्यामुळे इकडे-तिकडे टपकले. खाचा झाल्या, रक्तसाकळल्या, नाकाम डोळ्यांसमोर अण्णाजी उभे ठाकले त्यांच्या! अण्णाजी – अण्णाजी! कसल्या क्र्णानुबंधाची होती असामी? आबासाहेबांच्या काळात धाराबंदीचे काम चोख करणारे अण्णाजी – आमची मात्र मुस्कटदाबी करायला धजावलेच कसे? अण्णाजी – गोदावरी – रामराजांच्या मासाहेब. कसला त्रिकोण हा आमच्या पावलापावलांत अडकत गेलेला? गोदावरीची माफी मागण्याचेसुद्धा विचार उठतात मनात. मग अण्णाजी, मासाहेबांची मात्र माफी मागण्याचे का नाही घेत मन? अगदी या क्षणीसुद्धा!

गोव्याच्या मांडवीखाडीत आमचा वाहतीला लागलेला घोडा अटीतटीने थोपवून आम्हास प्राणदान देणाऱ्या खंडोजींचे जन्मदाते बाळाजी! आबासाहेबांचे नेक कलमबाज! कलम! हत्यारापेक्षा कारीगर होणारे हत्यारांचेही हत्यार! कसे रोखले त्यांनी ते मासाहेबांच्या भिडेस पडून आम्हाविरुद्ध? त्यांचे पुत्र असूनही कधीच केला नाही निळो- खंडोजींनीसुद्धा आमच्याशी बातचीत करताना त्यांचा उल्लेख? कसा धजावला त्यांचा हात त्यांच्या, आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय दौलतीचा तुकडा थेट शहजादा अकबरास तोडून देण्याची लिखावट करण्यास? नसतेच पाठवले अकबराने त्यांनी रेखलेले खलिते आम्हांकडे पन्हाळगडावर? होताच त्यांचा – अण्णाजींचा, मासाहेबांचा आमच्यावरच्या विषप्रयोगाचा कटाव फत्ते तर? तर – होता आमच्या श्वासांचा क्षणात शेवट याहून कमी वेदनांनी. पण या क्षणी या वेदनासुद्धा वेदना का नाही वाटत?

अण्णाजी, बाळाजी, शामजी, हिरोजी यांना काय वाटले असेल हत्तींच्या पायी चितचुराडा होताना? खंत? असह्य वेदना? अपार यातना? छे उ तपशील आला होता, डोंगराएवढा बोजा अंगावर पडतानासुद्धा ते शांत होते असा. समजू-उमजून केल्या करणीने कचदिल होतात, ते कसले खंदे शूर? त्यांच्या मनात येऊन पार दूर गेलेले काळे क्षण आज आमच्यासमोर कसे उभे आहेत? का धडपडताहेत ते आपले काळेपण उजळ करण्यासाठी!

जखडबंद असले तरी त्यांना इजाजत देण्यासाठी का उठताहेत आमचे हात? पुरे अंग घुसळून वर उठवण्यासाठी म्हणून राजांनी दोन्ही हातांना झटका दिला. पन्हा कचला भक्कम तख्ता-कुलाह त्यांच्या मनगटात!

निरुपयाने राजे देही शांत राहिले; पण मन फडफडतच राहिले – त्या फडफडीतूनच आवाज उठू लागले – “प्रल्हादपंत – न्यायाधीश!” एकदा गफलत झाली तरीही त्यांच्याच हाती न्यायाधीशाची सूत्रे देताना आम्ही म्हणालो होतो, “मुलखात जसे डोंगरकडे तसे न्यायाधीश! आल्या वादळवाऱ्यानं झाडंझुडपं डुलली-हेलावली एवढंच काय उन्मळून पडली तरी समजू शकतं. पण – पण डोंगरकडेच पायीचा धर सोडून लटलटू लागले तर?” अगदी निर्वाणीचा म्हणून औरंग दौलत डुबवायला चालून येताच खुद्द न्यायाधीशांनीच हातमिळवणी करावी शिर्क्याशी? त्यासाठी त्यांनाच दस्त करण्याचा आखरी कूम सोडावा लागला आम्हास? आणि – आणि आज तर खुद्द आमच्याच बाबीने

“न्यायाधीश’ होण्याची संधी मिळावी औरंगजेबास? शेवटी काळ आणि नियतीच असते का, प्रत्येकाचा न्यायाधीश? औरंगने अन्याय नाही, न्यायच दिला आहे आम्हास, असे पुन्हा पुन्हा का वाटते? याहून गैर कोणताही निवाडा केला असता त्याने, तर दिल्लीच्या चांदणीचौकात नेताजी पालकरांचा मुहम्मद कुलीखान करणारा तो, आमचे मामासाहेब बजाजी निंबाळकर यांच्यावर अफझलच्या स्वारीत गुदरला तसा प्रसंग गुदरता औरंगमुळे आमच्यावर तर?

औरंगने तोही विचार नक्कीच केला असणार म्हणूनच तर त्याने रुहुल्लाच्या सवालास आमच्या सामनेच तडकावून दिले – “ये नहीं पढेगा नमाज कभी.”

औरंग! आलीच नसती नौबत तर – राजहवसेपोटी ढोंग म्हणून तू हयातभर पुढे धरलेला इस्लाम न पत्करताही पढलो असतो आम्ही नमाज! एवढ्याचसाठी की, तुझ्या अल्लातालाने मेहर होऊन आपल्याच बाप-भावांची अघोर कत्तल करणाऱ्या, आपल्याच बेटीला कैदेत टाकणाऱ्या, लाखो गोरगरीब हिंदूंना जीवे मारणाऱ्या, शरण आलेल्यांना इस्लामी करणाऱ्या, त्यातल्या ताकदवरांना मनसबी बक्षून लाचार करणाऱ्या तुला एकदा तरी माफ करून “’परवरदिगार’ असल्याची खातर पटवावी त्याने यासाठी!

जसजशा दिवसरात्रीच्या, कुणासही सोडविता न येणाऱ्या चावरमिठ्या कडकडून पडत होत्या तसतशी राजे-कुलेश दोघांचीही मने साकळून, एकवटून, थळी करून येत होती – एकाच विचारावर – “सोनं झालं आहे जिवाचं!”

त्या पुऱ्या तळावर चमत्कारिक विचारांचे जाळेच जाळे पसरले होते. दोघेही जबान, नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होत. त्यांची मन अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती – “महाराणी एकल्या आहेत मागं. या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत, रयतेला धीर-दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन? कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ?’

औरंग तर आपल्या शामियान्यात, कधी दोघा कैद्यांचा, कधी “’सेवाचा’ बगावती मलूख कसा डुबवावा, याचा विचार करताना हातची माळ ओढत, मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता. बेटी झीनत त्याला वाळामिश्रित लिंबूशरबत मधून-मधून स्वत: देताना धाडसाने विचारत होती – “कैसी हे तबियत अब आब्बाजान?” खरे तर आपल्या आब्बाजाननी कैद्यांना सुनावलेली सख्त सजा तिच्याही स्त्रीमनात रुपत-सलत होती.

औरंगलाही घोर पडला होता, हिंदोस्थानच्या सल्तनतीला आपल्या मागे कोण सांभाळेल याचा! खरोखर सत्तेची राज्ये साम, दाम, दंड, भेदाने उठविणे सोपे आहे, पण त्यात जीव अडकणे केवढे अवघड आहे.

तळावरचे सारे सरदार, हशम जथ्याजथ्याने दबक्या कुजबुजीत विचार करीत होते तिघांचाच – दोन कैदी आणि शहेनशहा यांचा. तो तळ नव्हताच, होते मनामनांचा मेळ-गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतवळ झालेले प्रचंड जाळे!

नवा दिवस उगवला होता. कैद्यांचे झाले एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत, म्हणूनच ताबेदार इखलासने नवे जल्लादी पथक कैद्यांसमोर घेतले! !

दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले. उरले तख्ता-कुलाह आणि साखळदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे.

“देखते क्‍या हो? फेंक दो कुत्तोंपर बो नमकीन पानी – छाल उखाडकर इनकी!” बावरल्या-बावचळलेल्या हबशी जल्लादांवर इखलास ओरडला. पथकातले, सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले. त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापत्यांनी दोन्ही कैद्यांची जागजागी साल सोलायला सुरुवात केली! जल्लादच आता पुरे हैराण झाले. दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हूँ की चूं करीत नव्हता. जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती. त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमी जोषच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी. पण आज? काय ताज्नुब बघत होते ते! त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना!

राजे आणि कुलेशांचे देह आता मानवी दिसेनातच. ते झाले होते, जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती!

सापतेधारी मागे हटले. तख्तासारखी, तांब्याची भगुणी घेतलेले हबशी पुढे झाले. त्या भगुण्यात भरले होते मीठपाणी! तावल्या धावेवर लोहाराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे, तसे त्या हबशांनी हातच्या भांड्यांतील मीठपाणी राजे-कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली. लोहाराच्या पाण्याची ‘चरचर’ भोवतीच्यांना ऐकायला येते, या मीठपाण्याची चरचर तशी कुणालाच ऐक्‌ येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया भोसकल्यागत वाटत होते, ते फक्त, राजे- कुलेशांना! देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या. गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर डोळेही नव्हते. तरीही लाटाच लाटांवर डुचमळत्या तळ्याकडे बघत, शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा, तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment