महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,265

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१४

By Discover Maharashtra Views: 1239 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१४ –

हशमांनी काढण्या खेचल्या. भालाइतांनी टोच जारी केली. तयार केल्या घोड्यांवर राजांना आणि कुले शांना लादण्यात आले. दोघांचेही हात दोरखंडांनी करकचून आवळण्यात आले. रश्यांनी दोघांची शरीरे घोड्यांना जाम जखडून टाकण्यात आली. राजांच्या घोड्यांचे कायदे इखलासने मुठीत आवळले. दोन्ही घोड्यांना ते दौडत राहावेत म्हणून खुब्यावर भाल्याची टोच द्यायला दोन-दोन घोडाईत स्वार तयार झाले. छत्रपती, छंदोगामात्यांना गोणीसारखे घोड्यांवर आवळून होताच, हातातली तेग उंच उठवून मुकरबखान केवढ्यातरी मोठ्याने ओरडला, “धीन धीन, चलो”

मराठी दौलत काढणीबंद करून फत्ते झाली. मुकरब-इखलासची फौज मिरजेच्या रोखाने दौडू लागली. प्रांत संगमेश्वर, खेळणा, पन्हाळा, मलकापूर कुठल्याच ठाण्याला संगमेश्वरात घडल्या रामायणाची काहीही कल्पना नव्हती. उनतापीचे दिवस आल्याने माणसे शिवारांकडे मशागतीला चालली होती. दहा-पाच घोडाईत बरोबर घेऊन, जीव संगमेश्वरात अडकलेले संताजी-बहिर्जी रायगडाच्या रोखे दौडत होते. “महाराजास्त्री सोडवायाच पायजे पर कसं? कुठं नेलं आसंल हरामजाद्यांनी? घाईत पडल्या आबास््री डाग द्यावा बी जमला न्हाई. काय करावं? कसं करावं?” दौडत्या जनावरांच्या टापांपुढेही त्यांची सैरभैर मने धावत होती.

सरदेसायांच्या वाड्याची वाताहत झाली होती. लढाऊ मर्दाने होते, ते कामास आले होते. दस्त झालेले कत्तलीसाठी एकजाग केले जात होते. मुकर्रबखानला नेता येणे शक्‍यच नसल्यामुळे, स्वाराविना इतस्तत: मोकाट सुटलेली जनावरे शेपट्या चाळवीत नावडीच्या माळावर गवत चाबलत फिरत होती. वाड्याच्या चौकातील सांगतेच्या यज्ञकुंडातील समिधांची राख फरफरत इकडे-तिकडे उधळत होती. देव्हाऱ्यातल्या शिवपिंडीवरचे अभिषेकपात्र पाणी संपून कोरडे झाल्याने आ वासून शिवपिंडीकडे बघत होते. अशिव, ओस दिसत होते.

विजयी मुकर्रबची फौज किल्ले पन्हाळा बगलेला टाकून भेडसगाव, बत्तीसशिराळा मार्गे मिरजेचे, बंदिस्त भुईकोट मोगली ठाणे जवळ करायला निघाली.

उंच पन्हाळ्याच्या मेटावर गस्त घालणाऱ्या मेटकऱ्यांना दूरवरून ती दिसूनही गेली. पण तिच्यातून न सगळ्यांच्याच जिवाचा दिवा फडफडत चाललाय याचा कुणालाही थांग नव्हता. संगमेश्वराहून कसेतरी निसटलेले काही मावळे घोडाईत, मुकर्रब राजांना कोल्हापूरला आपल्या ठाण्यावर नेईल, ह्या अंदाजाने विशाळगड जागवून, पन्हाळा तसाच बगलेला ठेवून आडवाटेने कोल्हापूरला जवळ करत होते.

मलकापूर तर्फेने मुकर्रबच्या फौजेने वारणा नदी ओलांडली. पूर्वीच इदलशाहीत असलेले, आता औरंगचे झालेले बत्तीसशिराळ्याचे भुईकोट ठाणे मुकर्रबच्या फौजेने जवळ केले. वारणेचा हा काठ धरून चारीकडे मोगली ठाणी होती. खान अल्लाद झाला. बिनघोर झाला. गेले दोन दिवस त्याने रात्रीची दौड, संगमेश्वराची लढाई, परतीची ऊरफोड दौड आपल्या फौजेचे कैक हशम गमावूनही शिताफीने साधली होती. संगमेश्वराहून त्याने हरकारे धाडून कोल्हापूरच्या ठाण्याहून मागवून घेतलेली कुमकही पोहोचली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही, असा हशम आता मुकर्रबच्या प्रचंड फौजेला एकवटला होता. पहारेकरी पिटाळून लावत असल्याने त्यातल्याच कैकांना इच्छा असूनही काफर कैदी बघायला मिळत नव्हते!

अकलूजला साठ हजार मोगली तळावर नुसता कल्लोळ-कालवा उडाला होता. संगमेश्वराहूनच मुकर्रबने पाठवलेले हरकारे तळावर पोहोचले होते, “सैतान संबा गिरफ्त हुआ।” ही खबर काही क्षणांतच हा हा म्हणता साठ हजारांच्या तळभर पसरली. पुऱ्या तळावरचे हशम जागजागी एकमेकांना छातवाने भिडवत, मिठ्या मारून जल्लोशाने म्हणत होते, “सुना! काफर संबा कब्ज हुआ। सुबहान अल्ला!”

आपल्या शाही डेऱ्यात, बारबार कुर्निसात घालून ही जन्नती खूशखबर कानी घालणाऱ्या वझीर असदखानाला, तसबीहची माळ गरगर फिरवत, फुटू बघणारा काळजातला आनंद मोठ्या मुश्किलीने रोखत शहेनशाह आलमगीर शांत, धीमा हुक्‍्म देत होता, “फौज उठाव अकलूजकी। बहादूरगड चलनेका इंतजाम करो। भेज दो शाही खिल्लत और मरातब मुकर्रबको। पेश याद फर्माओं उसको।”

एव्हाना बत्तीस शिराळा सोडून मिरज भुईकोट ठाण्यात आल्या मुकर्रबची, पदरचे किमती कैदी जिवंत ठेवण्याची हर कोशिश चालली होती. त्याला भरवसा होता, जान बचावण्यासाठी दोन्ही कैदी झक्कत इस्लाम कुबूल करतील. कुणी सांगावे, सूरमा राजे खिल्लत पांघरून दख्खन सुभेदारीची नामजादी पत्करतील! विजापूरच्या सिकंदर आदिलशाहाचा, गोवळकोंड्याच्या तानाशाहाचा पाड लागला नाही, तिथे या मामुली संबाची काय बात! म्हणूनच तो त्यांच्या आवतीभोवती जिवाचे बरे-वाईट करण्यासाठी कोणतेही हत्यार त्यांच्या हाती येणार नाही याची, त्यांनी काहीतरी खाना घ्यावा याची, हर कोशिश करत होता. एवढी दौड झाली होती. पण सांगतेचे भोजन संगमेश्वरात घेतल्या पासून राजांनी आणि कुलेशांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता.

आपली तैनाती फौज घेऊन औरंगजेब अकलूजहून पेडगावच्या बहादूरगडाकडे आगेकूच झाला. त्याचा निम्माअधिक तळही हालला. दस्त कैदी बादशहासमोर पेश करायला उतावीळ झालेला मुकर्रब मिरजेहून अकलूजला पोहोचला. कैद्यांना बघायला त्या तळावरचे मागे राहिले हशम आरोळ्या ठोकत झुंडीने दाटीवाटी करू लागले. थंडी हटती टाकून आता ऊनतापीचे दिवस चढू लागले.

भूकंपाने हलावा तसा रायगड गड्ड्यातून हलला होता. संताजी-बहिर्जी गडावर पोहोचले होते. पाचाडच्या राबत्या बाजूने पडलेला एत्तिकादखानाचा घेर चुकवून चोरदरवाजाने ते गड चढून आले होते. खासेवाड्यात महाराणी येसूबाईच्यासमोर उभा राहताना संताजी हातच्या जिनाने तोंड झाकून घेत कुडीभर गदगदत म्हणाला, “जगदंबा कोपली मासाब, त्वांड न्हाई सांगाय. धनी संगमेसुरात फसलं! कोल्हापूरच्या खानाच्या घेरात… घेरात दस्त झालं!!!” जिनाने झाकल्या चेहऱ्यानेच येसूबाईच्या पायावर पडत एवढ्या उभारीचा संताजी – पण तोही गदगदू लागला. कानांवर गपकन हात घेतलेल्या येसूबाई, अंगावर वीज पडल्यागत जागीच बधिर झाल्या. आपण श्रीसखी आहोत, रायगडावर आहोत, महाराणी आहोत, कशाचेच भान उरले नाही त्यांना. “आई वाघजाई” असा आगडोंब उभी कुडी हालवून टाकत गरगर फिरला त्यांच्या आतल्या आत, विस्फारल्या भोसलाई डोळ्यांसमोर रायगडासकट ब्रह्मांड फिरले. देवमहालाकडे धावत जगदंबेच्या देव्हाऱ्या समोर त्या एकल्याच अंगभर हलू-हमसू लागल्या. त्यांना कुशीत थोपटतं घ्याव्या अशा जिजाऊ नव्हत्या, धाराऊ नव्हती. आता होती फक्त आणि फक्त जगदंबाच!

केवढे फिरले त्यांच्या मनी! स्वारीला सोडविण्यासाठी जिवाचे रान केले पाहिजे. पण कसे? गड तर खानाच्या घेराने आवळून टाकलेला. त्यांना फार-फार सय झाली, ती सरलष्कर हंबीरमामांची. भडभडून-भडभडून आलं. रूपाजी, मानाजी त्र्यंबक-रामसेजाकडे जखडून पडले होते. निळोपंत कल्याण-भिवंडीत गुंतून पडले होते. जेवढे-जेवढे कुवतीचे खासे होते, ते-ते मुलूखभर अटीतटीने आपापल्या प्रांताला भिंगरीसारखी अटीतटीची घोडी फेकत होते.

पुरत्या एकाकी झाल्या येसूबाई. वादळातली मोगरवेल थरथरावी तशा थरथरू लागल्या. उभी हयातच फिरली क्षणभरातच त्यांच्या पाणभरल्या डोळ्यांसमोर. “जन्म देणारं आणि वतनाच्या लालसेनं पारखं झालेलं शृंगारपूर! “सूनबाई’ आहेत असं कधीच भासू नये, असे प्रेम देणारे आबासाहेब. थोरल्या आऊ, सती गेलेल्या मासाहेब यांनी मुलीसारखा दिलेला घरोबा. सिंहासनाच्या हवसेपोटी रात्रंदिन स्वारींना- आम्हास पाण्यात बघणाऱ्या रामराजांच्या मासाहेब. त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडीलकीचा पाठआधार देणारे हंबीरमामा. साफ मनाची, वावगी बाब समोर आली, तर तडकन बोलून दावणारी स्वारी. आजोळचे असून स्वारींना झोपेच्या सुखालासुद्धा पारखे करणारे फलटणकर. पडली ही दौलत, तर काय करील आमचे औरंग? त्याचा जनाना – छी छी’ मान डावी-उजवी तडफडती झटकताना एकाकी, असहाय लहान मुलीगत त्या हमसू लागल्या. उसासा बाहेरही पडू नये एवढ्या जीवघेण्या कोंडीने त्यांचा ऊर वरखाली डचमळू लागला.

“राणीसाहेब! धीरानं मन बांधावं. गडावरच नव्हे; तर मुलखात जगदंबेच्या रूपानं आता आहात त्या आपण एकल्याच. अशीच आली होती नौबत, थोरले महाराज आणि पोर वयाचे महाराज आगऱ्यात याच औरंगच्या कोठडीत फसले होते त्यासमयास थोरल्या आऊसाहेबांच्यावर! हबशी जौहरच्या घेरात थोरले स्वामी अडकून पडले पन्हाळ्यावर तेव्हा वेढ्याचा उपराळा करण्यासाठी कमरेला हत्यार बांधून जायला निघाल्याही होत्या त्या पन्हाळ्याकडं. हे सारं मनी धरावं. उठावं. पायबळानं गडाला धीर द्यावा.” देवमहाली आल्या खंडोजींचे शब्द येसूबाईच्या पाठीवर जसे मायेचा, धीराचा हातच फिरवून गेले. “राजा’ हा उपभोगधुन्य स्वामी असतो, हे जेवढे खरे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक, अशा राजाची राणी शून्य तर असतेच; पण स्वामिनी असलीच तर खांद्यावर पडणाऱ्या फक्त जोखमींची; कारण ती असते केवळ सावली! एकल्या राजाची नव्हे तर त्याच्यासाठी तळहाती जीव घेऊन प्रसंगी आपल्या जिवांची कुरवंडी करणाऱ्या शेकडो रयतेची.

पदरशेवाने आपल्या नेत्रकडा टिपून येसूबाई उठल्याच. एकदा देव्हाऱ्यातील जगदंबमूर्ती डोळ्यांत भरून घेत निर्धारी म्हणाल्या – “खंडोजी, रूपाजी-मानाजींना रामसेज सोडून मिळेल तेवढ्या कुमकेनं रायगडाचा उपराळा करायला लिहा. रामराजांना आता आमच्याच महाली राहाण्याची व्यवस्था करायला सांगा! येसाजी दाभाड्यांना अर्जोजी, गिर्जोजींना असाल तसे रायगड जवळ करायला हारकारे द्या. तुम्ही कुठल्याही कारणासाठी गड सोडू नका. भरोसा आहे आमचा – स्वारी प्रसंगी मोडेल, पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूख नाही मानणार!! जशी स्वारी तसेच रामराजे मानून पोख्तपणे चालविले पाहिजे साऱ्यांनी!!”

त्या येसूबाई नव्हे – साक्षात मूर्तिरूप जगदंबाच मानवी रूपाने बोलताहेत असा खंडोजींना भास झाला.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment