महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१२

By Discover Maharashtra Views: 1223 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१२ –

पन्हाळ्याच्या कोकणदरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याने पलोत्यांची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनौबत म्हलोजी घोरपड्यांना तो धपापतच म्हणाला – “घात जाला घोरपडेबाबा. कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय. घोडा कितसा हाय माग न्हाई रातीचा घावला.””

पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले. म्हलोजी आपले चिरंजीव संताजी, बहिर्जी यांच्या जोडीने पागेसमोर आले. पाचशे घोडा हां-हां म्हणता जीनबंद झाला. त्याला पाठीशी घेत म्हलोजी कोकणदरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळगडाच्या रोखाने. आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. ‘घोर’ पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला, झाल्या उमरीचे घोरपडे दोन बांड्या मुलांसह दौडू लागले.

“आबा, गाठू आम्ही संगमेश्वर वेळेवर?” थोरल्या संतीजीने शकाने विचारले.

“आरं, निस्तं पोहोचून काय कामाचं? वेळ पडली तर शिर काटून ठिवाय लागेल शिवाजीऱ्हाजाचा अंकुर जपाय!” म्हलोजीच्या पांढरघोट गलमिश्या वाऱ्यावर फरफरून गेल्या.

एकीकडून म्हलोजी आणि दुसऱ्या वाटेने मुकर्रबखान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी ऊरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व जोतिबावर नित्याच्या घाटा घणघणून गेल्या. काळरात्र पळापळाने चढू लागली. या वेळी संगमेश्वर गाढ सुख झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी, गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कूस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही, कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग, गावोगावचे फितवेखोर, दरिया गिळायला बसलेले फिरंगी, हबशी – चित्रांमागून चित्रे त्यांच्या मनी गस्त घालीत होती. येसूबाई, आबासाहेब, थोरल्या आऊ, धाराऊ, समर्थ, सती गेलेल्या आऊसाहेब, कुठेतरी खुल्दाबादेत कोठीत पडलेल्या राणूआक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नाकपुड्या झटकून फुरफुरत होती.

मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला. पळे पावलापावलांनी पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तररात्र धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाईत हमचौकात उतरले. तीरासारखे वाडयात घुसले. खिदमतगाराला त्यांनी कुलेशांना बिगीबिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुखदालनाशेजारच्या कोठीत झोपलेल्या कुलेशांना खिदमतगाराने आत जाऊन उठवले. डुईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले.

“क्या है?” मुजरा करणाऱ्या घोडाईतांना त्यांनी शंकेने विचारले.

“राना-पांदीनं, आडवाटेनं गनीम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चटशिरी. कानी घालू द्या त्येंच्या ह्ये.” खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे-तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावरून लोंबते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आत जाऊन मंचकाशेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले, “स्वामी, स्वामी उठिये।”

“कोण?” म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्याघरट्यांत कोंबडी आरवत होती.

“वकुत न्हाई. घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतीया. खाशांनी चढे घोडे व्हावं आन्‌ खिनभरबी न थांबात याच वख्ताला संगमेश्वर सोडावं.”

“इथल्या पागंपरास दौडीत लय घोडा हाय. तड न्हाई लागायची.” दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले.

हात पाठीशी बांधून सुखदालनात इकडे-तिकडे झपाझप फेर धरणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागले. कोनाड्यात पेटत्या टेंभ्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले, “शिर्क्यांची – शिर्क्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूरशिवाय तळ नाही गनिमाचा जवळपास. बिशाद नाही त्यांची एवढ्या गचपणात घाटा-पांदीतून रात्रीच संगमेश्वरावर चालून येण्याची! कुलेश यांची व्यवस्था करा!”

खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करत, कुलेश आणि मुजरा करत, चुटपुटत टत खबरे बाहेर पडले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मनी शिर्क्यांची भिंगरी घुमत फिरू लागली.

“आता रायगडी गेल्यावर श्रीसखींना कसं सांगायचं त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकून लावणं पडलं शिरकाणातून? काय हा शिर्क्यांचा आमचा क्णानुबंध? काय मिळालं श्रीसखींना आमच्या नावे मळवटी बाशिंग बांधून?’ राजांच्या मनी विचार आले.

तबकात ठेवलेल्या राजटोपाकडे ते बघू लागले. टेंभ्याच्या मंद उजेडात त्याची कलाबूत झगमगत होती. त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजटोप उभ्या माटाचा होता. आपला बसक्या माटाचा – मोगली किमॉशागतच! आमच्या आजोबांचाही तसाच! त्यांनी निदान निजामशाही, आदिलशाही सतत जरबेत ठेवल्या. आम्ही? राखू ही मराठशाही?

इकडे संगमेश्वराच्या वेशीत घुसलेले म्हलोजीबाबा आपले घोडालोक संगमेश्वरभोवती पांगते फेकून, त्याला कडं टाकून संगमेश्वर राखायला खडे ठाकले. आडवाटेने जिवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोहोचले होते. त्यांच्या पांगत्या शिबंदीने नरड्याच्या घाटा फोडून उगवत्या पहाटेला थरकावून टाकणाऱ्या किलकाऱ्या उठविल्या, “हर हर म्हायेव.” त्या विरायच्या आत बेभान, बेलाग, दौडत्या हशमांची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब, इखलास धुराळ्याचा लोळ उठवीत संगमेश्वराच्या वेशीत घुसले. उगवता दिवस त्या धुळीच्या लोळाने पुरता झाकाळून गेला. “धीन… धीन”च्या आरोळ्यांनी संगमेश्वर दणाणले. कालवाच कालवा झाला. देसायांच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे झेपावले. बाहेरून, भयकातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना धडकायचेच थांबले. राया-अंता तर कुणाचंही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. आज सगळा रिवाज बाजूला ठेवत राया तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदगदा हलवत म्हणाला, “इळभर थांबू नगासा. घात झालाय. हत्यार घ्या नि भाईर पडा – निघा… निघा.”

गर्रकन वळून दालनातल्या तबकातील टोप मस्तकावर ठेवून, म्यानातली तलवार बाहेर खेचून म्यान तसेच फेकत राजांनी डाव्या हाती ढाल तोलली. आपल्या दालनातून हाती ढाल-हत्यार घेतलेले कुलेशही बाहेर आले. सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या जागेचे हत्यार घेऊन “चला, भाईर व्हा. गाव येरगाटलंय. गनीम आला.” म्हणत बाहेर पडू लागले. कालवाच कालवा उडाला वाड्यावर. राया- अंता, कुलेश, अर्जोजी यांच्यासह महाराज दरवाजाबाहेर पडले. वाड्याच्या पागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोतद्दार डोळ्यांत जीव आणून टकमक दरवाजाकडेच बघत होते. म्हलोजींची फळी फोडून वाड्यापर्यंत घुसलेले दहा-वीस हशम हत्याराने फेकले की, जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते. क्षणक्षण डोंगरागत छाताडावर असह्य झाल्याने मोतद्दार आपल्या जिवापेक्षाही घोडी मोलाची मानून दरवाजातल्या झोंबाझोंबीकडे सरकले.

एवढ्यात शे-पाचशे हशमांचे “धीन धीन’ गर्जणारे, जंग अंगभर सरसरलेले, बेभान भिरे घेऊन इखलासखान आपल्या हातची तेग नाचवत दरवाजातच येऊन भिडला. सगळा जीवच महाराजांच्यात अडकल्याने मुकर्रबखानाच्या पथकाचे वार हटवत-हटवत म्हलोजीही, संताजी- बहिर्जीसह त्याला आडवे होत मोठ्या निकराने दरवाजापाशीच आले. दरवाजासमोरच आता कुरुक्षेत्र पेटले, मोतद्दारांनी आणलेली जनावरे राजे, कुलेश, अर्जोजी, राया- अंता यांनी अटीतटीने मांडाखाली घेतली होती. म्हलोजींनी आपला घोडा धन्याच्या जवळ काढला होता. भिंगरीसारखा तो त्यांच्या घोड्याभोवती फिरवत म्हलोजी झाले वार झेलताना, वार करतानाच ओरडत होते, “भांगा काडा धनी. नावडी जवळ करा. व्हडक्‍्यात बसून इथनं निघा. जिवाची बाजी लावू आमी.” म्हलोजींच्या रूपाने मराठी दौलतच आक्रोशत होती. जागजागी मावळे-हशमांची जंगी हत्यारी-मारामारी जुंपली होती. खणखणाट, आरोळ्या, टापा, वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता.

भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोफण फिरवावी तसे हातचे हत्यार सपासप फिरवत भांगा मिळेल तिथे मांडाखालचा चंद्रावत घुसवू लागले. म्हलोजी, कुलेश, संताजी, बहिर्जी, अर्जोजी असे कुर्बान पटाईत वादळातून दिवली जतून न्यावी, तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी, कडे टाकून पणाला पेटले. जसा महाराजांचा पांढरा चंद्रावत सरकत होता, तसा इखलासही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेला टाकत सरकू लागला. आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते. पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपल्या लोकांना चेतना देताना म्हलोजी, कुलेश – मुकर्रब, इखलास कोरड पडावी, अशा किलकाऱ्या देऊ लागले. गर्दीतून बाहेर पडलेल्या काही मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडकी डचमळत होती.

काठावरच्या माळरानावर चाललेल्या झोंबाझोंबीकडे डोळ्यांत प्राण आणून बघत होती.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment