महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,956

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०९

By Discover Maharashtra Views: 1283 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०९ –

कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले –

“शिरकाणात झाल्या बोलाचालीत गणोजी शिर्क्यांशी भांडण झाले. कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले. माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत. तवान्या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिर्क्यांची बाब उकलत नाही. मनचं बोलणं ते होत नाही. वाट बघतो आहोत.”

इदल, कुत्बशाही डुबवून, त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चौवाटांनी औरंगच्या फौजा मुलखात उतरल्या होत्या. “काय करावं? रायगड या बाक्‍या समयास सोडावा? कुलेश लिहिताहेत तेही वाजवी आहे. तेच काय; पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिर्क्यांशी हातघाई करण्याची. हा अस्तनीतला सल निपटायला आम्ही आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात.’ गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निरखत विचार केला. “धाडावं खंडोजींना शिरकाणात? छे -‘ सदर सोडून ते अंत:पुराकडे चालले. हारीने उभ्या सात महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला. तो बघताच मासाहेब – पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले. “कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे.”

अंत:पुर येताच राया-अंता बाहेरच रुकले. आत येताच भवानीबाईचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले. महाराज तो नजारा बघतच राहिले. स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईनी बाळराजांना उतरून घेतले. ते बघून महाराज म्हणाले, “का उतरवलेत त्यांना? किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर?” बाळराजांना जवळ घेत शिर्क्यांची बाब येसूबाईच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले. ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, “खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या! काय निवाडा आहे स्वारींचा?”

“खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडे.” महाराजांनी निर्णय दिला.

“आम्हास वाटतं… खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकाणात. ही घरची बाब. खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून!” येसूबाईनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा

“श्रीसखी राज्ञी जयति।” या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईकडे महाराज बघतच राहिले.

दिवसफुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले. पाचाडपागेत पाच हजार घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता. पेशवे निळोपंत, रामचंद्रपंत, खंडोजी, चांगोजी, राया-अंता अशा मेळासह शिर्क्यांशी हत्यारझोंबी वेळ पडली तर घ्यायची; म्हणून ते सिंहासनचौकातील सिंहासनासमोर आले. हेच ते सिंहासन होते, ज्याच्यावर बसणे सोपे होते, पण त्याची जोखीम पेलणे फार-फार अवघड होते. “याच सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हास आरोपित म्हणून पेश घेतलं होतं. पेलेल ही जोखीम आम्हास?’ विचारच विचार मनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला. निरोपासाठी ते येसूबाईच्याकडे चालले. एकलेच. सोबतचा माणूसमेळ सिंहासनचौकातच थांबला.

काही भले-बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसूबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासेमहालात आल्या होत्या. स्वारी समोर येताच त्यांना म्हणाली, “गडावर जातीनं देख ठेवा. आम्ही नाही इथं.”

घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते, कर्ते पुरुष कसे घायाळ होतात, हे जिजाऊच्या तोंडून कैकवार ऐकलेल्या येसूबाई “सांभाळून असावं,” म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या. महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले. काही न बोलताच समोरच्या श्रीसखीला डोळाभर निरखताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की, त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगोलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती! त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले, “निर्धास्त असा. शिर्क्यांशी कमी-अधिकाचं नाही वागणार आम्ही. पण… पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली?”

“जी. टवळ्याचं नेजं उचकटलंय तिच्या. घडाईला टाकलेय ती सोनारशाळेत.”

“येसू, बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला. माणसाचं काय? जाऊ द्या. तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर. औरंगच्या फौजा फिरताहेत चौफेर, येतो आम्ही.” महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले. येसूबाईनी दिले भवानीचे तीर्थ ओठांआड करताना आपल्या भवानीबाईना ते हसत म्हणाले, “तुमचं तीर्थ घेतो आहोत!” भवानीबाई लाजल्या. येसूबाईनी बाळराजे आणि भवानीबाई डावे-उजवे बिलगते घेतले. सिंहासनचौकातील माणूसमेळ संगती घेऊन महाराज रायगड उतरले.

खेळण्याच्या बालेकिल्ल्यात कुलेश महाराजांना शिर्क्यांचा तपशील देऊ लागले. “शिर्के नहीं मानते आपको स्वामी!”

“विचार काय आहे त्यांचा कविजी?” महाराजांनी कुलेशांना विचारले.

“जी। शिर्के खुदको औरंग के नामजाद, शिरकानके “राजा’ मानते हे। सुना हे, रामराजाको हाथ लेकर बगावत करनेका इरादा है उनका।”

“काय…?” आठ सालांपूर्वी ज्या बाबीने घडू नये, ते घडल्याचे बघायला मिळालेल्या महाराजांना तीच बाब आता पुन्हा ऐकायला मिळत होती.

“कौनसे भी ताकतपर तुले है शिर्के! बातचीतमें हमसे झगडा हुआ। – हथियार लेकर हमपर टूट पडे। खेलना लौटना पडा।”

“कविजी, खुद्द आम्हीच चालून जाऊ शिरकाणावर! त्यासाठीच सोडला आहे आम्ही रायगड. तुम्ही आमच्या फौजेची जातीने देखभाल बघा.” राजे निर्धारी बोलले.

दोन दिवस महाराज खेळण्यावर विचारात होते. त्यांच्या येण्याची चाहूल शिर्क्यानाही लागली होती. गणोजी, कान्होजी, सारे शिर्केबंधू शिरकाण बांधून तयारच होते. महाराजांच्या मनात पिलाजींच्या अनेक आठवणी फिरत होत्या. ज्या शंंगारपुरात जामात म्हणून इतमामाने जावे, तिथे तिसऱ्या दिवशी सैन्यबंदीने चालून जावे लागले राजांना. औरंगला मिळालेले शिर्के तयारच होते. खूप अटीतटीची लढाई झाली शिरकाणात. शिर्क्यांची शिकस्त झाली. गणोजी, कान्होजी तर फौज टाकून कोल्हापूरच्या रोखाने पळूनच गेले. पिलाजी कुठे गायब झाले तेही कळले नाही. आबासाहेबांनी याच पिलाजींना ते सुर्व्यांकडे असताना त्यांची नेक मर्दानगी बघून जवळ केले होते. शृंगारपूरतर्फेला जोडून दिले होते खुद्द महाराजही आबासाहेबांनंतर पन्हाळ्याहून रायगडी गेले, तेव्हा रायगड पटात घेण्याचे पाठबळ दिले होते पिलाजींनी. या सर्वांहून ते श्रीसखी – येसूबाईचे वडील आहेत, या जाणिवेने मनाचे पान कातरले राजांच्या. शिरकाणाच्या बंदोबस्तासाठी शिबंदी ठेवून ते खेळण्याकडे निघाले.

खेळण्यावर येताच कुलेशांसह गडफेर टाकताना शिरकाणावर नजर ठेवणारा खेळणा डागडुजीला आलाय हे फार जाणवले त्यांना.

“डागडुजी करून घ्या पुऱ्या गडाची, कुलेश.” राजाज्ञा म्हणून ते बोलून गेले. पण… “प्रसंगी गडाची करता येते डागडुजी. पण गणोजींसारख्या आप्तेष्टांची कशी करावी?’

हे मनात आलेले ते बोलणार होते तरी कुणाला?

“इथे राहूनच शिरकाणावर चोख नजर ठेवा कविजी. आम्ही निघतो पन्हाळा, बत्तीस शिराळा, सातारा वाईमार्गे महाड घाटानं रायगडाला.” असे कुलेशांना सांगून एक मुक्काम करून महाराज खेळण्यावरून पन्हाळ्याला आले.

तो हाच पन्हाळा होता ज्याच्याशी राज्यांच्या कैक आठवणी जखडल्या होत्या. या इथेच आबासाहेबांची अखेरची भेट झाली होती. शिवर्पिडीचे दर्शन करून बालेकिल्ल्याच्या सदरेवर आल्या छत्रपतींच्या आठवणींबरोबर पायफेर चालू होता. नुकत्याच झालेल्या शिर्क्यांच्या लढाईचा आठव फिरत होता. येसूबाईना कधी आणले नाही, या कोटरासारख्या गडावर याची बोच लागली त्यांना.

“कृष्णाजी कोन्हेरे आल्यात भेटीसाटनं.” गडातर्फेचे सरनौबत म्हलोजीबाबा म्हणाले. राजांनी त्यांच्याकडे चमकून बघितले. त्यांच्या शेजारी त्यांचे ऐन भरातले संताजी व बहिरोजी हे घोरपडे बंधू उभे होते. आझमशहाच्या बंदोबस्तासाठी राजांनीच पन्हाळ्याला पाठविलेले न्यायाधीश प्रल्हादपंत होते. ते म्हणाले, “महाजनकीची काही तक्रार आहे कृष्णाजींची.”

राजांनी रुकाराचा हात उठविला. कृष्णाजी कोन्हेऱ्यांची तक्रार तपशिलात ऐकून घेतली. “योग्य वाटेल तो निवाडा करा कृष्णाजींचा. त्यासाठी प्रांतमजकुराचे – देसक, नायकवाडी, देशकुलकर्णी यांची अगोदर मजालस भरवा न्यायाधीश.” प्रल्हादपंतांवर कान्होऱ्यांच्या महाजनकीची बाब त्यांनी सोपवली.

“प्रल्हादपंत, चला सज्जाकोठीवर जाऊ.” काही बेताने त्यांनी न्यायाधीशांना बरोबर घेतले. सदर सोडून ते सर्वासह सज्जाकोठीवर आले.

“पंत – शिरक्यांच्या बाबीनं बेचैन झालोत आम्ही. तुम्ही बरेच दिवस आहात या प्रांती. काय बेत आहे त्यांचा?”

पंत चमकले; प्रश्न ऐकताच… कोरडच पडली त्यांच्या तोंडाला. “बाब घरची आहे स्वामी – काय बोलावं आम्ही?” त्यांनी जाब दिला कसातरी. ते खरेच होते. कुणीच काही बोलू-करू शकत नव्हते.

उंच कोठीच्या गच्चीवर जाण्यासाठी सारे गच्चीचा जिना चढू लागले. पांढरट गलमिश्यांचे म्हलोजी तर राजांच्या पाठोपाठच तरातर जिने चढले.

सज्जाकोठीच्या गच्चीवरून दिसणारा कोल्हापूर, जोतिबाचा परिसर बघताना राजांनी विचारले, “कोल्हापुरात कोण मुगल ठाण देऊन?”

“शेख – निजाम कुतुबशाही म्हनतेला! गोवळकोंड्याचा ‘मुकर्रबखान’ किताबत देऊन नामजाद केलंय बादशानं त्येला विजापूर पडल्यावर. पन्नाळ्यावर लई डोळा ठिऊन हाय.” म्हलोजींच्या गलमिश्या गडवाऱ्यावर फरफरत होत्या.

“भिडतो का गडाला?”

“जी. अधनं-मधनं टाकतो झॅप. पन आम्ही हाय न्हवं डोळ्यांत तेल घालून.” म्हलोजींनी गलमिश्यांवर हात फिरवला.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment