महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,826

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९७

By Discover Maharashtra Views: 1287 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९७ –

थोड्या वेळातच आपल्या कारभाऱ्यासह निळोपंत रुजू झाले. “महाराज, सिद्दी कासम त्याच्या खुदाची खैर म्हणून थोडक्यात बचावून निसटला जैतापूरच्या लढाईत.” पेशवे उत्साहाने म्हणाले.

“तपशील काय पेशवे?” महाराजांच्या डोळ्यांसमोर जैतापूरची खाडी तरळू लागली. पेशव्यांनी तपशील दिला. थोडा वेळ शांतता पसरली.

“जेधे फिरून चाकरीत यायचा मनसुबा धरून आहेत. पुरंदरच्या बाजी घोलपांमार्फत निरोप आला आहे तसा त्यांचा.” पेशव्यांनी सर्जेराव जेध्याची बाब चर्चेला घेतली.

“कशासाठी खोळंबलेत ते पेशवे?” राजमुद्रा त्रासिक झाली.

“अभयपत्राची मागणी आहे जेध्यांची महाराज.”

“अभयपत्र?” महाराज विषादाने हसले.

“पंत, गेले होते जेधे औरंगच्या पायांशी त्याचं अभयपत्र घेऊन? हे कान्होजींचे वारस जेधेच ही मागणी घालतात असं मानावं काय?”

पेशव्यांना काय बोलावे ते सुचेना.

“पेशवे, त्यांनी नको त्या वक्तास धरसोड केली तरी आम्हास नाही करता येत. चुकले, फुटले तरी जेधे दौलताचे कदीम चाकर होते. द्या त्यांना अभयपत्र पाठवून. पत्रात लिहा – ‘तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता. कोण्या भरास भरून गेलेत? बरे जे झाले ते फिरोन न ये. परंतु गनिमाची सेवा करता तुम्हास कष्ट होतात. सांप्रत सेवेसी येऊन कार्यभाग करावा. कष्टाची मुजरा होईल. तुम्ही कदीम लोक. स्वामींचे बहुत अन्न भक्षिले. तुमचा भरवसा असे. क्रिया मनी धरून यावयाचे केले, तरी बहुत उत्तम केले. कदाचित गनिमाकडे गेले होतेस. त्या गोष्टी करिता यावयाचा अनमान कराल, तर सर्वस्वी न करणे. बेशक येणे. तुमची सर्फराजी करून बरे चालवू. अंतर न पडे.”

अभयपत्रात लिहावयाचा मजकूर पेशव्यांना सांगताना छत्रपतींच्या मनी समर्थाचे निर्वाणीचे बोल घुमत होते, “सकळ लोक एक करावे। कारभारी कार्यी लावावे। गनिमा निपटून काढावे। चढती वाढती पदवी पावाल येणे.”

अभयपत्राचा मजकूर मनी घोळत असलेले निळोपंत जायला निघाले. तेव्हा त्यांना थोपवून बराच वेळ मनात घोळत असलेला मनसुबा राजांनी त्यांच्या कानी घातला.

“पंत, हंबीररावांसुद्धा जेवढे खासे तेवढ्यास खलबतासाठी आवतनाचे हारकारे द्या.”

महाराजांच्या मनी काय असावे, याचा विचार करीतच पेशवे निघून गेले. मुंबईहून आल्या वार्तेचा राजे विचार करीत होते. तेथील दौलतीचा हेजिब वारल्याची खबर होती. त्या जागी कुणाला नामजाद करावे, यासाठी राजांनी प्रल्हादपंतांना याद केले. “न्यायाधीश, टोपीकरांच्या दरबारी वकिलाची हकिगत कानी आलीच असेल. तुम्ही त्या दरबाराशी संबंधाचे. नव्यानं कुणाला नामजाद करावं त्या जागी?”

प्रल्हादपंतांनी आपणालाच हुकूम झाला नाही, यासाठी हलका नि:श्वास टाकला.

“आम्हाला वाटतं त्रिबक गोपाळ नीट सांभाळतील तो दरबार. तिथल्या दुभाष्यांचा व त्यांचा दाट परिचय आहे. शिवाय आमच्याबरोबर एक-दोनदा टोपीकरांच्या दरबारात ते जाऊनही आलेत.”

राजे व न्यायाधीश यांची त्रिबकजींबद्दल बारकाव्याची चर्चा झाली.

“पंत, हेजिब म्हणून त्रिबकजींना आपले ओळखपत्र द्या.” राजांनी निवाडा दिला.

प्रल्हादपंत गेले. शिलेखान्यावर नजर टाकून यावी, या विचाराने राजे पेहराव अंगी घ्यायला आसवाबखान्यात आले. खिदमतगार त्यांच्या अंगी पेहरावी साज चढवू लागले. एका ख्रिदमतगाराने त्यांच्या मस्तकी राजटोप ठेवला, दर्पणात बघताना आज त्यांना फार प्रकर्षाने जाणवले की – आपला टोप आबासाहेबांच्या उभट टोपागत नाही! तो बसका – मोगली माटाचा आहे!

“आबासाहेबांचा टोप घ्या दास्तानाबाहेर. दर्शन घेऊ या एकदा त्याचं.” आसवाबखानाच्या प्रमुखाकडे बघत राजे म्हणाले. “जी.” त्यानं थोरल्यांच्या राजटोपाचं तबक हळुवार दास्तानाबाहेर घेतले. राजांच्या समोर धरले. क्षणभरच शंभूमनाला वाटले, या टोपाखाली हुबेह्ब आबासाहेबच उभे राहतील. राजांनी त्या तबकातील टोपाला बोटे भिडवून ती कपाळी लावली. हरवलेल्या छत्रपतींचे “स्वामी, स्वामी” या सादवल्या बोलाकडे ध्यानच नव्हते.

“अइ” एकदम वळून त्यांनी पाहिले. समोर कवी कुलेश आणि राजापूरचे सुभेदार देवाजी विठ्ठल रिवाजासाठी झुकताना त्यांना दिसले.

मरसिवार चीरठी? ?” कुलेशांकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. आपण स्वामींना भेटायला रि थेट आसवाबखान्यात आलो आहोत; हे जाणून कुलेश अदबीने म्हणाले, “क्षमा स्वामी. मामलाही है ऐसा जो यहाँ आना पडा।”

“कसला?” सुभेदार देवाजी विठ्ठल यांना निरखत राजांनी विचारले.

“जी. जे पाहिलं ते तातडीनं सरकारांच्या कानी घालण्याजोगं आहे. नाही तर कसुरीचा गुन्हा बसेल माथी म्हणून राजापुराहून टाकोटाक आलोत आम्ही.”

“बोला, देवजी.” कधी सहसा न पडणारी तिकोनी आठी राजकपाळी उमटली. देवजींनी क्षणैक कुलेशांकडे बघितले. कुलेशांनी त्यांना नजरेनेच दिलासा दिला.

“राजापूरच्या खाडीत गलबतात बसून शहजादा अकबर… अकबर इराणला निघून गेला महाराज!” ज्यासाठी ते आले होते, ती बाब देवाजींनी सांगितली.

“झियाउद्दीन महमद शुजाई और पचास आदमी हे उसके साथ” कुलेशांनी अधिकाची माहिती दिली.

अकबराच्या पहिल्या भेटीपासूनच्या कैक आठवणी राजमनात फिरल्या. “आम्ही दिलेला मानाचा मोतीकंठा कलावंतिणीला देणारा, आमच्यासाठी फिरंगी दरबारात मध्यस्थी करणारा, बापाविरुद्ध बंड करून उठलेला अकबर – न भेटता – न बोलता इराणला निघून गेला! अकबर! काय क्वणानुबंध त्याचा? काय उपयोग झाला त्याचा आम्हास? कशासाठी दिला त्यास आसरा आम्ही? त्याच्या मार्गाने काही राजकारण चालते होईल म्हणून! पण औरंगजेबाला एक निमित्त जाले आमच्या मुलखात फौजा घुसवायला.

आम्ही अकबराला आसरा न देता हाकलला असता दौलतीपार तर? टळता औरंगचा ससेमिरा आबासाहेबांच्या या श्रींच्या राज्यामागचा? कधीच नाही. तरीही तो चालून आलाच असता.’ विचारच विचार उफाळून गेले शंभूमनात. शांतपणे त्यांनी देवाजींना विचारले, “सुभेदार, दुर्गादासही गेले त्याच्याबरोबर?”

“जी नाही. दुर्गादास आपल्या असामी घेऊन रतलामकडे निघून गेले.” राजांनी ते ऐकून सुटकेचा वाटावा, असा सुस्कारा सोडला. दुर्गादासबद्दल त्यांचे मत चांगले होते. तेही भरीला पडून गेले असते अकबराबरोबर इराणात तर?

“तुम्हास काय वाटतं कविजी, करील इराणचा शाहा आब्बास शहजाद्याची मदत? येतील दोघे चालून दिल्लीवर?” राजांनी कुलेशांना विचारले.

“नामुमकीन स्वामी! शहजादे की कबर अब इराणमें होगी! उस कब्र को कलमा पढने के लिए शाही खूनका भी कोई नहीं मिलेगा वहाँ।”

जहरी होते, तरी ते सत्य होते. ते ऐकून राजे क्षणमात्र विचारगत झाले. याच दरम्यान जिंजीच्या उत्तर वेशीत बारा हजार सैन्य पाठीशी घेत प्रवेशणाऱ्या केसो त्रिमल आणि संताजी घोरपडे यांच्या आगवानीसाठी हरजीराजांनी पाठविलेले जैतजी काटकर आणि गोपाळ दादाजी त्यांना खांदाभेट देत होते. नौबती, नगारे दुडदुडत होते. आता कर्नाटक हरजीराजे आणि केसो त्रिमल यांच्या जोडचालीने औरंगजेबाशी झुंजणार होता.

रायगडाच्या खलबतखान्यात अंथरल्या लोड-गिर्द्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते. बैठकीत कुलेश, रूपाजी, खंडोजी बल्लाळ, निळोपंत, प्रल्हादपंत, कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित, धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती.

निळोपंतांनी खलबताचा हेत खोलला, “इदलशाही तर पडली – तिचेच सरदार गाठीशी घेत गनिमानं दुतोंडी हमला पुकारला आहे. एकीकडून गोवळकोंड्याचा मुलूख आणि दुसरीकडून आपला कर्नाटकपटात घ्यायचा इरादा आहे त्याचा -“त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बळानं कर्नाटक प्रांतात उतरतो आहोत.” राजांनी खलबत आपल्या हाती घेत नजर सर्वांवर फिरवली.

“म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे. विजापूरच्या घेरात औरंगला मदत करून तो दबा धरून आहे. हरजींच्या कुमकेसाठी आम्ही केसो त्रिमल वब संताजींना धाडलंच आहे. आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला. धनाजी, रूपाजी, खंडोजी तुम्ही बरोबर असा आमच्या. पेशवे राणीसाहेबांच्या शिक्कामोर्तबाने इकडील कारभार हुशारीनं बघतील.”

खलबतातील प्रत्येक जण कान लावून राजाज्ञा ऐकत होता.

“पेशवे, आम्ही येत असल्याचा धैलीस्वार धाडा जिंजीला हरजींच्याकडे. जे इथं अवघे राहणार आहात, ते आपापल्या जागी बरे नेटाक असा. औरंगच्या फौजा मुलखात घुसू म्हणतील त्यांना कुबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्थ करावी.”

खलबतातल्या मंत्रिगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजे आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील. पण कुलेशांवर त्यांनी तिसरीच जोखीम सोपविली.

“कुलेश, तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी सुलूख मोडून उचल खाऊ बघतील, त्यावर बरं ध्यान ठेवा.”

बराच वेळ खलबत चालले. अगदी बारीक-सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजांनी दिल्या. पुन्हा भंडारापरडी फिरली. खलबत उठले. पहाऱ्याच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिटल्या शिळेला आतून हत्यारमुठीचा सांकेतिक ठोका दिला. शिळा खोलली गेली. उजेड व वारा अंगावर घेत राजे शिळेबाहेर पडले. त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घोळू लागले. त्यांना कल्पनाही असायचे कारण नव्हते की, जिंजीला हरजीराजांच्या खासेवाड्यात केसो त्रिमल आणि हरजीराजे यांची, ऐकणाऱ्याचा थरकाप उडावा, अशी जंगी तोंडातोंडी जुंपली होती! कारण काय होते त्याचे?

सेंट जॉर्ज येथील टोपीकरांच्या वखारीवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमलेल्या गोपाळ दादाजींच्या जागी केसोपंतांनी आपल्या अखत्यारीत चिमाजी पंडितला नेमले होते. गोपाळ दादाजी कडक शिस्तीचे असल्याने टोपीकरांना मानवणारे नव्हते. त्यांची बदली करावी, म्हणून सेंट जॉर्जच्या वखारवाल्यांनी केसो त्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरविले होते. हा सारा घालमेलीचा करीणा हरजींच्या कानी पडला होता. केसो त्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते!!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment