धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९४

9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९४ –

सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेला म्हलोजीबाबा घोरपड्यांचा तरणा मुलगा संताजी सामोरा आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव – म्हलोजी यांची रणमस्त व रुहुल्लाखात यांच्याशी जोरावारीची हातघाई झाली होती. तिचा वृत्तान्त राजांना देऊन संताजी म्हणाला, “पार पिटाळल्यात दोन्ही खानं बेळगावच्या बाजूला सरलष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुरादखान यास कोट नेटानं झुंजवावा, असा थैलीस्वार दिलाय.”

संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितलेले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ येऊन त्याचा खांदा थोपटीत राजांनी विचारले, “कसे आहे आमचे म्हलोजीबाबा आणि किल्ले पन्हाळा?”

“जी. आबा गेल्यात कापशीला – गावाकडं. किल्ला म्हनशिला तर तूर्ताला आम्हाकडंच हाय की.”

या पाऊसमाऱ्यातच कुडाळच्या नीळकंठ नारायणांनी पाठविलेला थैलीस्वार, कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीत मजकूर होता –

“मोगली सारंग याकुतखानाचा खेमसावंतास खलिता आहे की – पादशहास येऊन मिळावे. जशी अर्जुनजी अचलोजी यांची केली, तशी हजरत तुमचीही सर्फराजी करतील.”

नीळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुन्नराने त्याने खेमसावंताशी याकुतखान बांधत असलेल्या संधानाची बित्तंबातमी कळविली होती.

शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण; पण त्यालाही वाळवी डसावी, असे दिवस धरले होते. अनेकविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसलेतरी नाकळते अशुभ भोवती भिरभिरतेय असे वाटत होते. ते कुणाशीच मनमोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्या – रेड्यांची एकमेकांना माथी थडकावीत, तुंबळ टक्कर माजावी, तशी त्यांच्या भोसलाई मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती.

“कुणासच कसं वाटेना, हे राज्य श्रींचं म्हणून? का नांगी टाकताहेत सारे औरंगपुढं? औरंगजेब! आम्हास आग्ऱ्यास एकदा विचारणारा – ‘खेलोगे हौदा हमारे पहेलवानसे?’ कसा दिसत असेल तो या उतारवयात? त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद? दिसत असतील कधी आबासाहेबांच्या – आमच्या मुद्रा त्याच्या मिटल्या डोळ्यांस? येत असेल त्याला आपल्या बापाची – भावाची, विष चारलेल्या मिर्झा राजाची, हिरकणी खाल्लेल्या दिलेरची, कैदेत टाकलेल्या आपल्या मुलांची याद?’

रायगडची राजसभा भरली होती. नुकताच श्रावण संपला होता. सिंहासनचौकातील आडपडदे हिवाळी वाऱ्यावर थरथरत होते. पूर्वाभिमुख राजसिंहासनावर महाराज बसले होते. त्यांची चर्या गंभीर होती. प्रधान मंडळातील आठी खांबांजवळ अष्टप्रधान उभे होते. सिंहासनपायरीवरच्या आसनावर बाळ शिवाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारी छंदोगामात्य कुलेश खडे होते. दरबारी चौकात अंथरलेल्या रुजाम्यांवर रूपाजी, कृष्णाजी नरस प्रभू, येसाजी, म्हलोजीबाबा, संताजी – धनाजी, जानराव, बारदमल असे कितीतरी मानकरी आपापल्या जागी खडे होते. एवढे माणूस एकवटले होते, पण आडपडद्यांची सळसळही ऐकू यावी, अशी भयाण शांतता दरबारभर पसरली होती.

कारण? कारण साफ होते. त्रिदलातील एक दल तुटले होते. आदिलशाहीचे विजापूर पडले होते! बाल शिकंदर औरंगजेबाच्या हवाली झाला होता. तळपत्या नंग्या तेगी पेललेल्या हशमांच्या घेरात सजल्या शाही हत्तीच्या हौद्यात बसून औरंगजेबाने विजापुरात फत्तेचा फेरफटका टाकला होता. शहरभर दवंडी पिटली होती – “बिजापूर की रियाया अब दिल्लीतख्तके सल्तनतकी रियाया है। किसपर भी जुल्मजोरी नहीं होंगी। सब शाही सल्तनतसे इमानदारी रक्‍खे।”

दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला आता चार वर्षानंतर पहिली फत्ते मिळाली! पठाणी बेदिलीनं बजबजलेली आदिलशाही कोसळली. ती खबर लागताच चौवाटा जासूद फेकून हा दरबार राजांनी भरविला होता. गंभीर मसलतीचा दरबार. सगळ्यांची कल्पना होती, नेहमीसारखे निळोपंत दरबारी बोलणे खोलतील. तसे घडले नाही. सिंहासनाच्या दुहातीच्या कोरल्या सिंहमुखांवर आपले हातपंजे घट्ट रुपवीत महाराजच बोलले – “सारे जाणता… इदलशाही पडली.” भरून आले छातवान रिते करीत महाराजांनी लांबीचा सुस्कारा सोडला. शांतताच शांतता पसरली.

“क्रणानुबंधाची ती गादी राखून औरंग गुंतवून ठेवावा, यासाठी आम्ही जंग – जंग केलं. आता दौलतीवरचं सावट वाढलं आहे. खबरा आहेत मोगली फौजा आता गोवळकोंड्याचा रोख धरतील. ती हूलही असेल. साऱ्या बाक्‍्यांना त्यासाठीच पाचारण केलं आहे. ज्यास जे वाटेल ते मोकळ्या मनी मसलतीचं बोलावं. हे राज्य उभारण्यासाठी आबासाहेबांपासून गावोगावचे धारकरी कामी आलेत, हे सारे जाणता. हे राज्य आमचं एकल्याचं नाही, हे आई जगदंबेचं, जिवाचा आटापिटा केलेल्या थोरल्या आऊंचं – आबासाहेबांचं, रानावनांत राबणाऱ्या खानदेश – वऱ्हाडपासून जिंजीपावेतो लढणाऱ्या धारकऱ्यांचं हे राज्य आहे. प्राणबाजी लावून ते राखून चालविणं ही जोखीम तुम्हा -आम्हांवर आहे.” काय नि किती बोलावेसे झालेले महाराज सिंहासनावरून उठले.

सारा दरबार कानांचे शिंपले करून ते शंभूबोल ऐकत होता. “समय बाका आहे. मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार वंडाळी करताहेत. आपले म्हणावे ते पारखे होऊन, गनीमतळ गाठून मनसवीसाठी औरंगजेबास कुर्निसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एकदिलाने सर्वांनी शर्थ करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे; सारे खुला मनसुबा दरबारसमोर ठेवतील. कोणी कचदिल होऊन आत-बाहेर करणार नाहीत.” आपण नकळत उभे ठाकलोत, हे जाणवलेले राजे बसते झाले.

राजांना बघताना मिर्झा राजाशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालेल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात, खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला, “एवढं चिंतागती व्हाय नगं महाराजांनी. आदिलशाही पडल्याली न्हाई. पठाणांच्या बेदिलीचा काव्यानं फायदा उठवून बादशानं पाडल्याली हाय. आम्ही हाय तवर त्येच्या प्याद्यालादिकुन थारा देत न्हाई मुलखात. ही जी खिल्लता पांघराय बुनगी, बुजगावणी पळत्यात त्यार्री आज न्हाई, उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय त्ये. महाराजांनी बिनघोरी असावं. आम्ही पाठीशी हाव.” हंबीररावांच्या रूपाने जसा मावळकडाच रांगड्या बोलीत, कुचमल्या दरबारला धीर देत सुनावून गेला.

“कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबीत आम्ही डोळ्यांत तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही रामचंद्रपंतांनी सरलष्करांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मान डुलवून साथ भरली. थिजल्या, मुकाट दरबाराला अंग धरू लागले.

“आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ.” खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्याने दरबारातली चिटणिसी बैठक सोडून खडे होत, आपली दाद नोंदविली.

“शहजादा अकबरकी मददसे फिरंगोंको चूप बिठाना, जमीनदारोंको मिलाकर राजासाबके साथ रखना हमारी जोखीम है। पन्हाला, खेलना, मलकापूर प्रांत की राजासाब फिक्र न करे)” कुलेशांनी कनोजी हिंदोस्थानीत आपली साथ प्रकट केली. खांबालगतचे न्यायाधीश प्रल्हादपंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले.

आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले, “राजकारणातलं काही कळत न्हाई आम्हास्त्री. महाराजांनी बोलताव म्हणून माफी करावी.” हंबीरराव घुटमळले.

“बोला. सरलष्कर तुम्ही कदीम, घरचे. अगदी नि:संकोच बोला.” “माफी असावी महाराज. त्या शाजाद्याचा काही उपेग न्हाई. उलट त्याचंच निमित्त करून बादशा पुन्हा दौलतीत घुसायचं भ्या हाय. छंदुगामात्यांनी नाद सोडावा, आता त्येचा अन्‌….”

आता दरबारचे ध्यान एकट्या हंबीररावांवर खिळले. अनेकांच्या मनातला सल बोलण्याचे – तेही भरदरबारात हे फत्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार, वय व त्याग होताच तेवढा.

“काय आहे मनी? साफ बोला मामासाहेब.” राजांनी त्यांना मुभा दिली.

आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साती प्रधानी खांबांवर आणि छंदोगामात्यांवर त्यांनी एकदा फिरविली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सपप्रधान, कुलेश, दरबारी मानकरी, खुद्द महाराज सारेच हंवीररावांकडे बघू लागले.

“बाब आमच्या अखत्यारीची न्हाई महाराज. पर कुनीतरी, कवातरी हो बोलाय पायजेच. आम्ही रगात सांडलंय थोरल्यांच्या ह्या गादीपायी म्हनूच बोलताव – कानांवर येतंय आमच्या की, मंत्रिमंडळातल्या असामी, दफ्तरी अधिकारी आणि छंदुगामात्य कब्जी यांचा बेबनाव हाय!”

प्रधानी खांबांलगतच्या बड्या असामी एकमेकांकडे बघूच लागल्या. कुलेशांचा चेहरा खरकन उतरला. काळीज पिळून काढणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली.

“कसला बेबनाव सरलष्कर?” महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या.

“आम्हास्री कळतंय मंत्रिबाडीतील कुणी असामी छंदुगामात्यारत्री ‘कनुजा’ म्हून पंगतीला घेत न्हाई! कबजी दिकुन कुनाकडं जात न्हाईत. त्येंचं महाराजांच्या आसपास असणं कैकांना पसंद न्हाई. या बाकक्‍या वक्ताला येळेसुर या बाबीचा कंडका पडाय पायजे.” हत्यारघाईतले हंबीरराव परवडले, पण हे जबानमार करणारे नको असेच मंत्रिमंडळातील असामींना होऊन गेले.

निर्धाराने प्रल्हादपंत म्हणाले, “सरलष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यच कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानांहून ते स्वतःस वेगळे मानतात. महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्याकडे पंक्तीस पाचारण करतात. कुणी जात नाही त्यांच्याकडे.”

ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले, “सरकार, झूट बोलते है, न्यायाधीश। हमने कनोजमें जनम लिया ये कैसा कसूर हमारा? राजासाब के चरणोंमें निष्ठा रखते हे और आखरी दमतक रखेंगे। मंत्रिगणसे क्‍या वास्ता हमारा?” कुलेशांना क्रोधभाराने धड बोलवेना.

चित्रविचित्र विचारांची, क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढा गैरमेळ घर करून बसला आहे, या विचाराने तर मन अपार खंतावले त्यांचे.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment