धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८९ –

पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बालेकिल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. ‘केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी!

कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे शिर्के आणि फलटणकर? काय बाटत असेल पेडगावच्या कोठीत राणूआक्कांना?’

“महाराज, कुनी पठानी असामी आलीय पावसाचं गड चढून, भेट मागतीय.” पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या, लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी. पण कुठे? काही आठवेना –

“आदाबअर्ज – जिल्हे सुबहानी – मुल्के मऱ्हाट.” आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली.

“कौन? मिलनेका मतलब?” राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते.

“पेहचाना नहीं राजासाबने नाचीजको?” पठाणी मोकळे हास्य खुलले.

“नहीं. बताओ.”

“मिरबतखान!” दिलेरचा भाऊ! तो भीमेचा काठ. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. “खान – तुम?” म्हणत मिरबातला त्यांनी ऊरभेट दिली. “कैसा हाल?” सगळे माहीत होते, तरी बळेच राजांनी विचारले.

“क्या बताना राजासाब! वो क्‍या बादशहा है? शैतान है – संगदिल! हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत कर के! तंग आये उसके जुल्मसे!” मिरबात पिळवटून बोलला.

“खान, कळलंय आम्हास सगळं. तुम्ही दोन दिवस मनमोकळी विश्रांती घ्या गडावर. काही उणं पडायचं नाही तुम्हास.”

“दो दिन? इस बरसातमें आये है हम – क्‍या मेहमानदारीके लिये राजासाब? जिंदगी रख्खी है, पैरपर राजासाबके.” कमरबंद खोलून मिरबातने आपली पठाणी तेगच, गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायांवर ठेवली.

त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला – ‘आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो, तर ‘लेकरा कुठं गेला होतास?’ म्हणत आम्हाला मिठीत घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण?’

राजांनी मिरबातला पदरी ठेवून घेतले.

कोकणातून आलेला अकबराचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती श्रीसखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा होता.

“शहजादे म्हणतात – फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी.” पेशव्यांनी अकबराचा तपशील समोर ठेवला.

“आणिक काही?”

“जी. ते म्हणतात – म्हणतात -” निळोपंत चाचरले.

“बोला” राजांना शंका आली की, आणखी काही मागणी आहे की काय शहजाद्यांची?

“जी! शहजादे म्हणतात – कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्लानं करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी त्यांच्यावर.” खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती.

“आवढंच?” राजांनी छातीवरची कवड्यांची माळ वरखाली होईल, असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते, ते कुलेशच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले.

“इस कठिन समय को साथ देनेके लिए लिखा है, हमने सब जमीनदारोंको स्वामी!” कुलेशांनी आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला.

राजांनी कुलेशांना सांगितले, “तुमची चिंता वाटते शहजाद्यास कुलेश.”

“हम लिखेंगे उसको – खुद की करनी चाहिए उसने!” हसत कुलेश म्हणाले.

“तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे, शहजादा कुलेश.”

“जी. सुलुख हुआ है, तो भेजने चाहिए करारपत्र.”

“तूर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणाची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही.”

“अच्छा होगा वह!” कुलेशांनी दुजोरा दिला.

“चला सदरी जाऊ कविजी.” राजांनी कुलेशांसह सिंहासनसदर जवळ केली.

“महाराज, परततानासुद्धा औरंगनं माणूसफोडीचा तडाखा दिलाय.” खंडोजी चिंतेने म्हणाले.

“को – कोण चिटणीस?”

“नायब शाहकुली, खंडूजी, रंभा शंकराजी अशा फितल्या माणसांना मनसबी दिल्या आहेत, नगरकोटात बादशहानं.”

ते ऐकताना सचिंत झालेले राजे सदरेच्या झरोक्याशी झाले. आभाळातून कोसळताना पांढऱ्याधोट असलेल्या पाणसरी भुईला मिळताच गदळ होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या.

“मोगली सेना परतत आहेत, या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी.” खंडोजींनी पाणधारा निरखणाऱ्या राजांची तंद्रा तोडली.

“कुलेश, खंडोजी, का आणि कशी आली आपल्या बोलीचालीत कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे एक – कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ!”

“समजलो नाही आम्ही.” सरळधोप स्वभावाचे खंडोजी बुचकळ्यात पडले. कुलेशांना तर ती मऱ्हाटबोली म्हण कळलीच नाही.

“खास नाही काही खंडोजी. दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतंय हे आमच्या मनी.” जे बोलायचे होते, ते मनाआड टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावणसरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासनसदरेसमोरचा हमचौक क्षणात उन्हात, क्षणात पाऊसधारांत न्हाऊन निघत होता.

नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली अंबेच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले.

थोड्याच दिवसांत, रायगड ज्याचा अंदाज बांधून होता, ती खबर येऊन थडकली – “बादशाहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही, आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशाहा याला गोवळकोंड्यात घेरून टाकला.” औरंगनं आपला बेटा आझम यास फौजबंदीनं जेव्हा विजापूरचा बालराजा शिकंदर याच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाह्या खडबडून जाग्या झाल्या! इस्लामी असल्या तरी त्या ‘दख्खनी’ आहेत हे साफ झालं होतं. “जशी त्या शाह्मांनी नांग्या टाकून, गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती – तसंच आता आपण वागायचं का?’ मोठा वर्माचा होता हा सवाल महाराजांपुढे.

दसऱ्याच्या निमित्ताने जमलेले खासे, बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासनसदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानांतील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हादपंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वरपंत, रामचंद्रपंत ब कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हरजीराजेसुद्धा होते.

पेशव्यांनी बैठकीबेत खुला केला – “नगरकोटाच्या खबरा आहेत. गनीम आदिलशाहीचा रोख धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलखातून त्यानं नामोश घेत जवळ-जवळ सगळे तळ उठविले आहेत….”

बैठक शांतपणे, कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकी सिंहासनवजा आसनावर बसलेले राजे मसलतभर नजर फिरवीत होते. आबासाहेब गेल्यापासून, पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मनी फिरकी घेऊ लागली.

“कै. स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या, असे काही मनी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यांस.” पेशव्यांचे निवेदन चालूच होते. ‘पुढची चाल कशी ठेवावी?’ असा सवाल उठवून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढातरी नि:श्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरविला होता.

तोच बेत सुचवीत कुलेश म्हणाले, “आदिलशाही की फिक्र इस दर्बारको क्यों? वे चूप बैठे थे, हम पर गुजरी तो!”

“छुंदोगामात्य म्हणतात ते रास्त आहे. कर्नाटकात होतो आम्ही, तरी हररोज इकडच्या खबरीसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथपंतांना धाडलं होतं आम्ही.” राजांशेजारी बसलेले हरजीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले.

“आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही त्यामुळे.” एवढा वेळ गप्प असलेले प्रल्हादपंत बोलले.

“थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही. चिवट झुंजेल बादशाहाशी. शिवाय सर्जाखानासारखे मातबर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत ते झुंजत ठेवतील औरंग.” निळोपंत वर्माचे बोलले.

मसलतकऱ्यांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलट-सुलट विचारांची पाठशिवण पडली होती.

“आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्तमेढ आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झा राजेसंगती तर त्यांना नाइलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरतेपावेतो दौडणाऱ्या त्यांनी कधी विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती! पन्हाळ्यावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, “आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार. त्याची फिकीर करा.”

आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. “आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडलं आहे. शिकंदरशाहनं आगवानीही केली आहे त्याची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागी आहे.” महाराज समोर दिसणारी पूर्वक्षितिजकड नजरेत पकडत निर्धारी बोलले.

“हरजी, तुम्ही कर्नाटक रोखून आहात. तिकडंसुद्धा घुसतील मोगली फौजा.” हरजींच्याकडे वळून राजे केवढेतरी टोकाचे बोलले.

“जी. मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आज हत्यार धरलं, तो उद्या कुतुबशाही, कर्नाटक, पुरी दख्खनच धरेल पटाखाली हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नेटाबळानं ठेवलाय आम्ही, हे नजरेखाली घालायला यावं एकदा महाराजांनी कर्नाटकात.” हरजी धीराचे बोलले.

औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचणी करून जागोजागच्या बाक्‍यांनी गडकोट जय्यत तैयार ठेवून सावध असावे, असा निर्णय करून मसलत उठली.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here