महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८३

By Discover Maharashtra Views: 2377 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८३ –

पादशाहपूरहून रात्रीच कूच करून कल्याणजवळच्या मढगडढीमार्गे राजे गांगोलीला आले. त्यांच्याबरोबर दोन हजार घोडालोक आणि दोनशे पावलोक होता. त्यांच्या राहुट्या गांगोलीत पडल्या. पुत्रप्रासी झाली त्या वेळी राजे येसूबाईना भेटण्यासाठी मागे आले होते गांगोलीत. संगती आलेल्या प्रल्हादपंतांशी राजांची पुढच्या हालचालींची, वाड्याच्या सदरेवर बातचीत चालली होती. “न्यायाधीश, बहिर्जींना कलम द्या. गाठीचे निवडक खबरगीर फिरंग्यांच्या चौल-तारापूर भागात पेरण्यास लिहा. मिळेल ती खबर उचलून टाकोटाक आम्हास पावती करायला कळवा.”

“जा. एक संतोषाची खबर आली आहे. बीड भागात आपल्या फौजेनं आदिलशाहीचा किल्ले धारूर कब्ज केला आहे.” प्रल्हादपंत म्हणाले.

“किल्ले धारूर! याच किल्ल्यावर मिर्झा राजेने नेताजी पालकरकाकांस कैद करून ठेवले होते. आम्ही आबासाहेबांसह आग्ऱ्यातून सहीसलामत सुटलो, त्याने संतापून गेलेल्या औरंगने कैदी काकांना किल्ल्याबाहेर काढून, जखडबंद करून, उंटाच्या पाठीवर लादून पाठवावे, असा मिर्झा राजास हुकूम केला आणि चांदणीचौकात पोहोचताच त्यांची भरचौकात सुन्नत केली.’ नेताजी पालकरांच्या आठवणीने राजे कातर झाले. समाधान एवढेच की, तो किल्ले धारूर आता स्वराज्यात आला.

जसा पन्हाळा तसेच गांगोली गाव राजांच्या आठवणींच्या गाठीचे होते. इथल्या नदीला एक घेराचा डोह होता. त्यात, आलेच कधी तर खाशे, होडकी टाकून पाणफेर घेता यावा, अशी सोय गांगोलीच्या सुभेदाराने केली होती. दोन दिवस झाले आणि मनात औरंग, फिरंगा, सिद्दी, टोपीकर यांच्या आघाटोपीक आघाड्या फिरत असलेले राजे प्रल्हादपंतांना म्हणाले, “चला न्यायाधीश, पाणफेर टाकू मिळूनच.”

गांगोलीच्या सुभेदाराने खाशांसाठी, दोरखंडाने खुट्यांना आवळलेली होडकी खुली करून सिद्ध केली. महाराज आणि न्यायाधीश होड्यांत बसले. सोबतीला दहा- बारा धारकरीही बसले. राजकारणाच्या नाना बाबींवर चर्चा सुरू झाली. होडकी डोहात संथ फेर घेऊ लागली. मधूनच वल्ह्यांचा ‘चुबुक-चुबुक’ असा आवाज उठत होता. यात हाका मिसळवत डोहकाठावरून खुद्द महाराजांना कुणीतरी सादवीत होते!

“साहेब, सरकार, महाराज कोणीतरी पोटतिडिकेने, हात उंचावून साद घालीत होते. महाराजांसह सर्व आश्चर्याने घोटाळ्यात पडले होते. महाराजांचा हातइशारा पकडत होड्या सरसरत काठाकडे आल्या. महाराज भुईउतार झाले. काठावरची, भगवी कफनीधारी असामी थेट महाराजांसमोर लोटांगण घालून ऐकणाऱ्यांचे काळीज पिळवटून टाकेल, असे गलबलून टाकणारे, घोगरट बोलली –

“साहेब थोर, सर्वज्ञ शास्त्रार्थाचा अर्थ स्वत: जाणतात. पंडितांचा निशा होय ऐसा निवाडा करतात. मग माझ्या बाबींचे पारिपत्य का होत नाही?” तो होता चिपळूणचा कृष्णाजीपंत! रायगडावर उपोषण धरलेला!

“सुमार व्हा बाबा. एकांती आहोत आम्ही इथं. बोला – साफ-साफ बोला काय सल आहे तुमचा? पारिपत्य करू आम्ही त्याचे.”

कृष्णाजीपंताने आपले चिपळूणचे देशकुलकर्ण, खाशाच्या मसलती बैठकीचे असल्याचा फायदा घेऊन राहुजी सोमनाथांनी कसे गिळंकृत केले, याची कलमकथा सांगितली. ती शांतपणे ऐकून घेतल्यावर महाराजांनी न्यायाधीशांना नजर दिली.

“महाराज, कृष्णाजी म्हणतो ते सही आहे. थोरल्या महाराजांनीसुद्धा एकाचा वतनछेद करून दुसऱ्यास कधी दिला नाही. राहुजींच्या गैरमेळानं, आपला अपसमज करून दिल्यानं हे झालं आहे.” न्यायाधीश तपशील देत म्हणाले.

“न्यायाधीश, तुम्ही, रामचंद्रपंत, कुलेश असे बसून मजालस भरवा. कृष्णाजीपंतांचं देशकुलकर्ण त्यांचं त्यास मिळेल असं राजपत्र सिद्ध करा. आणि… आणि राहुजींना कळवा – तुम्ही आबासाहेबांपासून सेवेत असता, असा मनाचा हलका भाव कैसा दाखविला? बिनबोभाट वतन कृष्णाजीपंतास सुपुर्द करा!”

महाराजांनी डोहाकाठीच दिल्या निवाड्याने मन भरून पावले कृष्णाजीचे. औरंगाबादेच्या आपल्या शाही महालात औरंगजेब बेचैन फेऱ्या घेत होता. रामसेज, कल्याण-भिवंडी, कोल्हापूर-पन्हाळा मराठी मुलखात त्याने फेकलेल्या चौफेर फळ्यांवरून त्याच्या मनाजोगी एकही खबर येत नव्हती! त्याचा स्वभाव आता चिडचिडा आणि संशयखोर झाला होता. त्याचे रणमस्त, बहादूर, मामूर, शाबदी, ईरज, इज्जत असे पस्तिसांवर मातबर खान जागजागी प्रचंड तळ टाकून बसले होते. आझम, कामबक्ष असे शहजादे, मुईजुद्दीन सारखे नातू त्याने या पहाडी मुलूखभर पेरले होते. एकही नाबकार त्याला तसल्ली देईल, अशी कामयाबीची खबर काही पाठवत नव्हता. प्रत्येक जण नव्या कुमकेची, तोफांची, घोडे-उंटांची, रसदेची नुसती मागणी करीत होता! नाही म्हणायला त्याच्या रुहुल्लाखानाने सुपुर्द केलेली जोखीम, त्याच्या इच्छेबाहेर फत्ते केली होती. फितवेखोरीची! गाजरांची जुडी समोर बांधून, घाण्याचे बैल लाकडी लाटेभोवती फिरते ठेवावेत, तसे रुहुल्लाने जागजागचे मराठी सरदार स्वराज्यापासून तोडून सलतनती भोवती फिरते केले होते.

फेऱ्या घेणाऱ्या औरंगजेबाच्या कदमा-कदमांबरोबर, खाटकाचा पाळीव बोका पायात घोटाळत, घोटाळत फिरावा तसा वजीर असदखान – “जी-आका अली, जो हुक्‍्म हजरतपन्हा, बिल्कुल दुरुस्त हजरत” म्हणत फिरत होता. फर्मानेच फर्माने घेतलेले घुडस्वार, सांडणीस्वार, जासूद औरंगाबादेच्या वेशीतून बाहेर पडत होते.

मरहठ्ठ्यांनी आता कहार मांडला होता. ते जालना, नगर, पेडगाव, वऱ्हाड, खानदेश, सोलापूर या बादशाहाच्या खास फौजबंद ठाण्यांपर्यंत थेट धडका देत होते. इकडे तारापूरवर तर कोटबंद फिरंग्यांची पाचावर धारणा बसली. खासा राजेच एक हजार घोडा आणि दोनशे पावलोकांनिशी गांगोलीहून तारापुरावर उतरले! संगती प्रल्हादपंत होते. फिरंग्यांना धडक भरविणारा “हर हर म्हाद्येव”चा रणघोष उठला. दमण, वसई भागात पूर्वीच पेरलेल्या कुमकी शिबंद्या राजांना मिळाल्या. पुरे तारापूर दिवसाढवळ्या लुटीवर आणि जाळावर पडले. फिरंग्यांकडचे कानडी आणि फिरंगी सैनिक जीव बचावण्यासाठी रानोमाळ पळू लागले. बऱ्हाणपूर, औरंगाबादेकडे मोगलांची झाली; तीच गत तारापूरच्या फिरंग्यांची झाली.

राजांच्या विजयी फौजेतील तुकड्या दमण वसईतर्फेच्या असेरीम, डहाणू, सैवाना अशा गावांवर उतरल्या. ती गावेही लुटली-जाळली गेली. तारापूरच्या माळावर पडल्या डेऱ्यात राजे आणि प्रल्हादपंत फिरंग्यांच्या, औरंगजेबाच्या, मूग गिळून बसल्या आदिल व कुतुबशाही दरबारच्या चालींची चर्चा करीत होते. ती तोडत वर्दीदार डेऱ्यात आला आणि म्हणाला, “दमणचं हरी शिवदेव भेटीला आल्यात. संगती एक काढण्या घातलेला, पांढऱ्या ढगल्याचा कैदी हाय.”

राजांनी इजाजती हात उठविला. हरी शिवदेव काढणीबंद कैद्याला पाठीशी घेऊन डेऱ्यात आले. तो एक फिरंगी पाद्री होता. रिवाज देत हरी शिवदेव म्हणाले, “लुटीची वस्त असती, तर गोणीत भरून धाडली असती गडाच्या जामादारीत, पण या कुचकामी डगलेवाल्याचं काय करावं? आज्ञा व्हावी महाराज.”

पाद्मयाला अंगभर न्याहाळत महाराज बसल्या बैठकीवरून उठले. कैदी पाद्मासमोर आले. तो रंगाने लालबुंद आणि किरमिजी दाढीचा पाद्री कुठल्यातरी चमत्कारिक बोलीत काहीतरी बोलला. आकाशाकडे डोळे नेत उजवा तळहात त्याने कपाळ व डावा, उजवा खांदा यांना भिडवला. त्याचे डोळे भयकातर झाल्याचे साफ दिसून येत होते. अंगचा सफेद डगला लटलटत होता. त्याच्या समोर उभे राहून त्याच्या निळ्या- घाऱ्या डोळ्यांत आपली नजर खुपसलेल्या महाराजांच्या मनात येसाजी गंभीरांनी कानी घातलेल्या तळफिरंगाणाच्या हलाखीचे बोल तर घुमत होतेच; पण तो पाद्री बघताना, कशी कोण जाणे राजांना समर्थांची याद झाली.

“कारभारी कार्यी लावावे,

मागील अपराध क्षमावे।

चढती वाढती कीर्ति, पावाल येणे।।

सकळ लोक एक करावे –

गनिमा निपटून काढावे।”

राजे पाद्रयाकडे बघतच राहिले. तो थरथर कापतच होता. राजांबद्दल बरेच काहीबाही ऐकून होता तो. त्याला वाटले आपली गर्दन उडवून कत्तलच होणार आता! पाद्रयापासून वळते होत पुन्हा बैठक घेत ते शेजारीच उभ्या असलेल्या प्रल्हादपंतांना म्हणाले, “काय करावं या किरिस्ताव पाद्रयाचं न्यायाधीश?”

“जी, सोडून द्यावं त्यास. तो काही लढाऊ असामी नाही.” प्रल्हादपंतांनी निवाडा देत आपला अंदाज सांगताना पुढे म्हटले – “शिवाय आपले येसाजी गंभीर फिरंग्यांच्या दरबारी हेजिबी करताहेत. यास काही बरं-वाईट केलं, तर त्यांना तोशीस दिल्याशिवाय राहायचा नाही तो दरबार.”

महाराज विचारगत झाले. ‘अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं. असले हस्तक मारतात ती आमच्या मावळमाणसांची मनंच. यास सोडावं? कदापि नाही! मारावं ते राजकारणास लागी नाही.’

हरी शिवदेवांकडे बघत महाराजांनी निवाडा दिला. “यास असाच रायगडी धाडा, हरिजी. कोठीबंद ठेवण्यास कळवा. याची ही गत ऐकून फिरंगी दरबार काय करतो, ते दिसेल. तो मैत्रीचा सुलूख करा म्हणतो, ते ढोंगी की मनचं तेही उघड होईल!”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment