महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७९

By Discover Maharashtra Views: 2373 6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७९ –

“हृबशी, हबशी, हबशी!” संतसत, बेचैन छत्रपती आवळल्या मुठीने स्वत:शीच झगडत होते. कवी कुलेश, प्रल्हादपंत, निळोपंत, खंडेराव अशी भोवतीची मंडळीही, दादाजींनी दंडाराजपुरीहून पाठविल्या हारकाऱ्याची जबान ऐकताना सुन्न झाली होती. सिद्दी खैरतने दिवसाढवळ्या नागोठाणे बंदरात घुसखोरी करून रयताव्याची भर चौकात नाके छाटली होती!

“जंजिरा घेरातून येसाजी कंकांचा पावलोक काढता घेतल्यानंच हबशी असा मोकाट सुटलाय.” प्रल्हादपंत जंजिरा-वेढा बळकट करण्याच्या सल्ल्याने म्हणाले.

महाराज विचारात पडले. घेरामुळेच खजिन्यावरचा ताण वाढत होता. “निळोपंत, दादाजींना कलमी हुकूम द्या – जलकोटच्या फौजा काढत्या घेऊन महाडात ठाण व्हा म्हणावं. दौलतखान, मायनाक, जिवाजींना आपआपले दर्यातळ, गलबतं, माणूससुद्धा हमेश जागते ठेवण्यास कळवा.” महाराजांनी निवाडा दिला.

ज्या जोरावर हबशी खोड्याने वागत होता, तो तिढाच सरळ करावा म्हणून निळोपंतांना शेवटची सूचना मिळाली, “त्या पावलांनी तुम्ही चालता ती आम्ही बरी पारखून आहोत याची सख्त ताकीद द्या, चौल-गोव्याच्या फिरंग्यास आणि मुंबईच्या टोपीकरास.”

“कोल्हापुरास हंबीररावांचा निरोप हाय. मिरज ठाण्यावर आदिलशाहीचा सालार शर्जाखान वीस हजारांच्या बळानं उतरलाय. त्याचा बेत कळत न्हाई.” खंडेराव पानसंबळ चिंतेने बोलले.

“पेशवे, मामांना कळवा, या बाक्या समयी आदिलशाहीशी दोस्ताना रक्षून चालविणं आहे. तुम्ही पाऊस उलगेतो पन्हाळा, कोल्हापूर, कऱ्हाडचा मुलूख हुशार ठेवून असणं. अज्जमशाहास दबीत ठेवणं.”

“बालकुंडाच्या घाटीनं रामसेजवर कासमखानानं हमला केला. किल्लेदारानं दगड बरसवून तो फिरवला आहे. बातमी मिळतेय बादशहानं कासिमखानाला उत्तरेकडून आणि राणोजीला दक्षिणेकडून तळकोकणात उतरायचा हुकूम दिलाय.” निळोपंतांनी शाही कडवी चाल समोर ठेवली.

“पंत, जेवढा उतरतो तेवढा औरंगचा हशम आम्हास तळकोकणातच पाहिजे. जी हसमखानाची केली तीच गत करतील आमचे तुकोजी-रूपाजी-मानाजी त्यांची.” औरंगची हर चाल बारकाव्याने ऐकूनही महाराजांच्या मनाचा टवकासुद्धा कचरत, कातरत नव्हता. कसलेतरी न उकलते बळ त्या मनात जसे दिवसागणिक ठासले जात होते.

“आपल्या कैदेतला कंकडकिल्ल्याचा ठाणेदार शहा अलिलखान पळून बहादूरखानाच्या तळावर नाशकात गेल्याची खबर आहे.” खंडोजी म्हणाले.

महाराजांची नाकपाळी ते ऐकताना किंचित रुंदावली. नाकगड़ा आक्रसला. “चिटणीस, दस्त कैदी पळून जातात ते कसबानं तुरी देऊन नव्हे. तोबरा देऊन! हर किल्लेदारास कलम द्या. असा बोभाट येतो, तर गय-मुलाहिजा नाही.”

महाराज बोलून गेले, पण मनात दूरवर कुठेतरी टिटवी केकाटून गेली – “शिर्के-निंबाळकरांसारखे आप्त राजरोस पळून जाताहेत त्यांचं करणार काय छत्रपती असून आम्ही?” तो काळोखच दूर सारत फक्त कुलेशांना थांबण्यास सांगून महाराजांनी सर्वांस निरोप दिला.

“कविराज, शहजादा अकबरास आगे वर्दी द्या. आम्ही त्याशी खल-बात करण्यास खास येत आहोत.” थांबविल्या कुलेशांना राजाज्ञा मिळाली.

“जी.” कुलेशांनी रुकार भरला. त्यांच्या मनी काही बोलायचे होते. कारण त्यांना एकट्यांनाच एकांती घेतल्याचे पाहून बाहेर गेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी त्यांना स्पष्ट जाणवली होती. पण विचारगत महाराज बघून ते मन मारून राहिले. मंत्रिवाडीतील एकही मंत्री त्यांच्या घरी, आमंत्रण देऊनसुद्धा भोजनास येत नव्हता. त्यांचे महाराजांच्या आसपास वावरणे अनेकांना पसंत नव्हते.

दोन दिवसांतच श्रावणसरींना न जुमानता महाराजांनी कवी कुलेशांसह रायगड सोडला. महाडघाटीने महाबळेश्वरची चढण उतरून ते चिपळूण, संगमेश्वर, खेळणा अशा मजला टाकत राजापूरला अकबराच्या तळावर आले. संगती मोजका घोडाईत होता. डेऱ्याच्या तोंडावर आल्या दुर्गादास राठोडसह अकबराने महाराजांची आगवानी करून त्यांना इतमामाने आत नेऊन बैठकीवर बसविले. ही अकबराशी दुसरी भेट होती. महाराजांसाठी आल्या रिवाजी नजराण्याला हात देऊन त्यांनी तो स्वीकारला. बैठकीला तोंड फुटले –

“राजासाब, तंग आये। शेर होकर घास खाना बडी तोहमत की सजा।’ अकबर पिळवटून बोलला.

“तेच म्हणतो आम्ही. शेरास खाना रान पालथं घालून धुंडावा लागतो. इथं कोंडून नाही तड लागणार तुमची.” महाराज म्हणाले.

“राय क्‍या आपकी राजासाब?” कोकणात राहून दिल्लीतख्ताचे स्वप्न अद्याप अकबराच्या डोळ्यांत तरळत होते. महाराजांना अकबर फक्त वापरायचा होता.

“तुमचा सल्ला दुर्गाजी?” महाराजांनी राठोडलामध्ये घेतला.

“जी, अब औरंग दख्खनमें फसा है। नहीं हिलेगा। राजासाब, हम शहजादाके साथ राजस्थान लोटेंगे। रजपूत इकठ़्ा बांधेंगे। ”

“रास्त. आम्ही काय करावं या मसलतीत?” महाराजांनी मिश्याकल्ल्यांचा राठोड नीट निरखला. त्यांना वाटले तो सैन्याच्या कुमकेची गळ घालणार.

“सिर्फ हमारे जानेका इंतजाम। ” महाराज सैन्यबळ देऊच शकत नाहीत हे ताडूनच राठोड शहाणपणाने बोलला.

“मतलब? एवढा जाग-जाग शत्रूचा तळ पडला असता, तुम्ही जाणार शहजाद्यांना घेऊन उत्तरेत? जाणता? दिसेल तिथं शहजाद्यांना दस्त करून दाखल करण्याची फर्माने सुटलीत औरंगाबादेहून!”

“वो क्‍या खाक करेंगा दस्त हमको? हम उसके ही बच्चे है। दर्यासे उड जायेंगे हम। देंगे हाथ आप हमको?” चिडीने अकबर निर्धारी बोलला.

महाराजांनी सहेतुक कुलेशांकडे बघितले. निर्णय दिला. “ठीक आहे. आम्ही करू बंदोबस्त हत्यारी पहारा आणि तुम्हास सैन्य देण्याचा. दुर्गाजी, जगदंब तुम्हास फत्ते देईल.”

महाराज उठले. अकबराचा निरोप घेऊन त्यांनी राजापूर सोडले.

रायगडाच्या खासेदालनात महाराज कवी कुलेशासंगती शहजादा अकबराला काय चाल द्यावी, यावर बातचीत करत होते. दालनावर खास सेवक पुरुषा व जोत्याजी केसरकर पहारा देत होते. थंडी गडभर उतरल्याने छत्रपतींनी खांद्याभोवती शालनामा लपेटता घेतला होता. “कविराज, शहजाद्याचा माग तलास घेतलात तुम्ही? राजी आहे तो हिंदोस्थानात गुजराथेला जायला? कुवत आहे त्याची रजपुतांच्या मदतीनं हिंदोस्थान बांधण्याची?” औरंगजेबाला काटशह देण्याच्या विचारात गढलेल्या महाराजांच्या तोंडून सवालाच्या पाठलागात सवाल सुटले. त्यांचा बेत मोठा होता. उमेदीच्या दुर्गादास राठोडांना त्यांनी त्यासाठीच बोलावणे धाडले होते. त्याला दहा हजार फौजेचे पाठबळ द्यावे व अकबरासह गुजराथेत पाठवावे. त्याने अंबरचा रजपूत राजा रामसिंग याची जोड घेऊन थेट दस्तच करावे. उत्तरेस परतणाऱ्या औरंगला आणि दगडापरीस वीट सुमार, या न्यायाने अकबराला दिल्लीला तक्तनशिन करावे.

“हमने बातचीत की है शहजादेसे। चाहे जो करने तैयार है, शहजादा। शाही असामी है अकबर। उसका लाभ उठाना चाहिये।” कुलेश म्हणाले. “त्याला हत्यारी हशमांचं बळ देऊन मुलखाबाहेर काढणे हेच लागीचं. आपल्या फौजेवर बारीक ध्यान ठेवील अशी, हुन्नराची असामी बघतो आहोत, त्यासाठी आम्ही.”

आता कुलेशही अकबराच्या बाबीने विचारगत झाले. कनोजी पद्धतीचा, कमरेत वाकून महाराजांना नमस्कार करून बाहेर पडले. एकले महाराज पायफेर घेऊ लागले. त्यांना ठायी ठाय आणि जिकडे-तिकडे औरंगमुद्रा दिसू लागल्या.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment