महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७७

By Discover Maharashtra Views: 1220 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७७ –

दुसऱ्या दिवशीच दुपारला धाराऊ राजांच्या भेटीस आली. डुईवरच्या टोपपदराचा काठ चिमटीने मागे सारीत म्हणाली, “याक मागनं हाय पुता, ऐकशील?”

तिची पायधूळ घेऊन तिला हातजोड देत बैठकी दालनाच्या मध्यभागी आणताना महाराज म्हणाले, “आऊ, एवढे परके झालो आम्ही? मागण्याची का, हक्काची बोली नाही?”

“हाय तर, म्हूनच जीव घुटमाळतोय. आता या म्हातारीचं ऐक.”

“तुम्ही बोला. ते-ते होईल.” महाराजांना काहीच अंदाज नव्हता.

“आता ठकलाव. ध्याई उताराला लागली. जीव गावाकडं वड घेतोय. जाऊ दे मला कापूरव्हाळाकडं!” कमरेत वाकलेली म्हातारी कसल्यातरी नेटाने ताठ खडी झाली.

तिची नजर राजांच्या मुखडाभर फिरली.

“आऊ…” म्हणत महाराजांनी तोंड फिरविले.

“सपनात नव्हतं एवढं बगू-भोगून झालं की, माज्या राजा. कापूरहाळाच्या गाड्यांच्या कोन्याचा साळुता म्या. तुमा लोकांच्या पायाच्या धुळीची दिकुन सर नव्हती, या ध्याईची. लई मया करलीसा म्हातारीवर.”

काळीज खळबळून टाकणारे ते निकोप कुणबाऊ बोल राजांना झेपेनासे झाले. वळून धाराऊजवळ झटकन येत तिच्या सुरकुतल्या ओठांवर आपला हाततळवा ठेवून महाराज म्हणाले, “आण आहे आऊ खंडोबाची. एक शब्द बोलू नको असा.” आज पहिल्याने राजे धाराऊला एकेरी बोलले.

“याकच आस ऱ्हायलीती ल्येकरा, सूनबाईच्या पदराखाली नातवाला पिता बगायची. खंडुबानं फेडली ती.” म्हातारीने मायेने राजांचा हात हातात घेतला.

“एवढ्या कंटाळलात आम्हाला आऊ? तुम्ही दिसलात की, थोरल्या आऊंची वाण आम्ही सोसू शकत होतो. तुम्ही नका आम्हाला अशा पारख्या होऊन जाऊ!”

“ल्हान हाईस! कसं कळावं तुला काय वाटतं म्हाताऱ्या जिवाला ते. ज्या जागंला जिंदगी गुदारली, पोरंबाळं झाली, त्या जागंला जीव ठेवण्यासारखं सारथीक न्हाई दुसरं जल्माचं. एवढी आस पुरव. जाऊ दे मला व्हाळाकडं.” पावसाळी सांज दिसावी, तशी म्हातारी दिसत होती. तिचे बोलणे सोसवेना झालेले महाराज काही न बोलता तसेच बाहेर पडले. आता तिला रोखता येणे कुणालाच शक्‍य नव्हते.

कापूरहोळाकडे जाणारा धाराऊचा मेणा तयार झाला. त्याच्या दुहाती हत्याऱ्यांच्या मेळाने रायाजी-अंतोजी उभे होते. साज पेहराव, सोनेरी होन यांनी महाराजांनी म्हातारीचा मरातब केला. येसूबाईनी धाराऊच्या पायांवर डोके ठेवून उठताच तिला गलबलती मिठीच भरली. थकला हात त्यांच्या पाठीवर मायेने फिरवीत धाराऊने त्यांचा आवेग ओसरू दिला. शिवर्पिडीवर दुधाची धार उतरावी, तसे तिचे काळीजमिठीचे बोल येसूबाईंच्या कानावर पडले, “उगं माज्य बये. लई तुटसील आतनं. हुब्या मुल्कातनं ढीगावारी आलं बाळंतइडं पर शिणगारपुरस्नं न्हाई योक आला!”

ते ऐकताच ढवळल्या गेल्या येसूबाईनी गदगदून तोंड ओंजळीत घेतले. त्यांना गपकन उराशी घेत पाचाडवाड्याची वाजती घाट याद यावी, अमे धाराऊ बोलली, “दुकं पागळू नको ल्येकी, बाईच्या जातीला आबाळाची झळ आन्‌ भुईचं काटं धोंडे आपलं म्हणतच चालाय लागतं. सास्वांची सय ठीव.” म्हातारीने पाळण्याकडे जात आतल्या बाळराजांना उचलून बिलगते घेतले. त्यांचे पटापट मुके घेतले. पुन्हा त्यांना आत ठेवले. छत्रपतींनी कापूरहोळाच्या धाराऊ गाडे – छे भोसले झालेल्या म्हातारीच्या पायांवर शिवगंधी कपाळ ठेवले!!

मेणा निघाला. नजरेआड जाईतो, त्या मेण्याकडे बघणाऱ्या हिंदुपदपादशहा छत्रपती संभाजीराजांच्या मनात एकच एक विचार भिरमटत राहिला – ‘तुम्ही पाजलं ते दूध आणि दिली ती माया; अंगच्या रक्ताचा थेंब-थेंब चढविला तुमच्या पायावर तरी नाही फेड व्हायची त्याची!’

गांगोलीहून रायगडी आलेले महाराज एकाच विचारात होते – किल्ले रामसेजच्या. स्फटिकाची, भवानीची पूजा बांधून महाराज वाड्याच्या सदरी बैठकीवर आले. जमल्यांनी ताजीम दिली. फिरंगी दरबारच्या वकिलाबरोबर आलेले येसाजी पुढे होत पेश झाले. “फिरंगी दरवबारचा नजराणा आणि खलिता आहे, महाराज. बाळराजांच्या जन्माची खबर ऐकून धाडलाय.” वकिलाकडे हातरोख देत येसाजी बोलले. फिरंगी वकिलाने आणला नजराणा पेश केला. महाराजांनी त्याला हात दिला.

“खलिता काय मजकुराचा?” त्यांनी येसाजींना विचारले.

“जी. आताषीच्या आपल्या कारखान्यांस्री बारदाना आणायची परवानगी दिलेय. हबश्यासंगे फटकून राह्यचा इतबार दिलाय.”

महाराज सहेतुक हसले. फिरंगी वकिलाला फेरनजराणा देऊन त्याची बोळवण करण्यात आली.

“बादशहानं चाल दिलेला रुहुल्लाखान नगरच्या रोखानं कूच झाला स्वामी.” निळोपंतांच्या तोंडून पहिली बडी खबर राजांच्या कानी आली.

दौलतीला पडल्या शत्रूंच्या चौफेर घेराचे चित्र महाराजांना दिसू लागले. एकाएकी त्यांना आग्ऱ्याच्या कोठीत फसगतीने अडकलेल्या आबासाहेबांची आणि स्वत:ची याद झाली. मराठी विलायतींना नख लावण्यासाठी औरंगजेब भुई-आस्मान एक करणार याचे भान असल्यानेच त्यांनी बगलेचा सवाल निळोपंताना घातला.

“टोपीकरांची लढाऊ गलबतं आताशा आपल्या दर्यात घुसताहेत. त्यांना मुंबईत कोंडण्यासाठी आपले सिद्दी संबूळ, मिस्त्री काय करताहेत पंत?”

आहे “त्यांच्यावर छाप्यामागून छापे घालून संबूळ-मिस्त्रींनी त्यांना मुंबईत हटविलं आहे.”

“पंत, औरंग नुसता भुईवरून नाही, दर्याच्या मार्गानं हबशी, टोपीकर, फिरंग्यांना हातास धरून चाल घेणार. तीन फळ्यांनी आपणास दर्या झुंजता ठेवून, भुईवर मिळेल त्या कुबल जागेला गाठून औरंग ठेचायचा आहे.”

“दर्याच्या तीन फळ्या!” प्रल्हादपंतांच्या तोंडून बोल आले.

“चौल-गोव्याचा फिरंगी जरबेत दाबेल ती दाभोळ, कुडाळ, डिचोलीची आंगरे, काटे, दर्यासारंग यांची एक फळी, जंजिऱ्यात कोंडला हबशी पटात ठेवील ती नागोठाणे, आपटे, दंडाराजपुरीची मायनाक, दादाजी प्रभू, पावला-पडवळ, काटे यांची दुसरी फळी आणि मुंबईच्या टोपीकराला, जरब देत दर्यात फिरती जिवाजी विनायक, सुंदरजी बाजी, संबूळ-मिस्त्री यांची तिसरी फळी.” महाराजांच्या डोळ्यांसमोर औरंग चोरवाटेने शिरू बघणाऱ्या दर्याची आघाडी तरळत राहिली. समोरचे सर्वच जण डोळ्यांत जीव आणि कानांत मन आणून छत्रपतींची चाल ऐकत होते.

“पंत, आता येसाजीकाकांना दंडाराजपुरीचा पावलोक काढता घेण्यास कळवा. त्यांची गरज आहे, इथं चालून येत्या गनिमाच्या तोंडावर.” राजबोटे कंठातल्या मोत्याच्या माळेत पिरगळती फिरू लागली.

“जी. कुतुबशाहीच्या दरबारात बादशानं मुहम्मद शिकोदी याला वकील म्हणून नजराण्यासह पाठविल्याची वार्ता आहे महाराज. गोवळकोंडेकरांनी त्याची आगवानी करून अडीच लाखांची पेशकशही त्याला नजर केली आहे.” निळोपंत औरंगच्या एक-एक चालीचा माग देऊ लागले.

“साफ आहे पंत, जे दरबार औरंगच्या आगवानीसाठी तो औरंगाबादेला पोचताच खास सरदार पाठवितात ती कुतुबशाही काय किंवा आदिलशाही काय; भ्रमात आहेत. धर्माच्या गुणानं, चालून आल्या शत्रूच्या मनातली माणुसकी जागेल अशा वेड्या आशेवर आहेत दोन्ही दरबार!”

“आज्ञा होईल तर बोलावं काय स्वामी?” हात जोडून प्रल्हादपंत म्हणाले.

“बेशक.” महाराजांनी त्यांना डोळेजोड दिली.

“दक्षिणेच्या लहान-थोर ताकदींचा मेळ घालून त्रिदली दाबजोर फळी उठवावी असं राजकारण होतं, कै. स्वामींचं. त्यासाठी…”

“रुकलात प्रल्हादपंत? तुम्हास काय वाटतं? कोण राजकारण खेळते जर असते तर महाराजसाहेब आज? करते रजपूत मिर्झाशी केला तसा सलूख औरंगशी? आणि मानता तो औरंग? वावटळी उठवीत आल्या ढाश्या वाऱ्यासामने जाणार नाही, दक्खनेचा एकही दरबार हाती दिवली घेऊन पंत! आदिल-कुतुवशाही आमच्याशी वरचा दोस्ताना दाबीत त्याच्यासमोर नांगीच टाकणार. मिळेल तिथे त्यास जोड देऊन टोपीकर, हबशी, फिरंगी आपल्या दर्याच्या बसकणी जतणार. ही – ही हातघाई आहे, फक्त आम्हास झगडावी लागणारी. मिळालीच तर जोड मिळणार केवळ अरबी आरमाराची.” सर्वांना महाराज कितीतरी वेगळे, निर्धारी दिसत होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment