महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,782

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६६

By Discover Maharashtra Views: 1304 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६६ –

तो क्षण ऐन तोंडावर आला ज्याची अटकळ कैलासवासी स्वामींनी केव्हाच बांधली होती. आता सर्वांसमोर एकच होते. अटीतटीचा जंग-झगडा. पंचवीस वर्षानंतर दख्खनेकडे वळलेल्या एका पाताळयंत्री, पाशवी शत्रूबरोबर. जबर महत्त्वाकांक्षा आपल्या तसबीहच्या माळेत गुंफून अलमगिराने दक्षिणेचा मोहरा ठेवला होता. कन्याकुमारीपासून काबूलपर्यंत सल्तनतीचे जाळे फेकण्याची महत्त्वाकांक्षा! जिच्या हातात होते शस्त्र, मांडेखाली घोडे, उंट, हत्ती आणि मनात निवडीचे कपट, क्रौर्य! जिची ढाल होती धर्म, मागे होती सार्वभौमत्वाची हवस. जिचा प्यारा रंग होता हिरवा. निशाणी होती चांद-तारा आणि नारा होता, “दीन, दीन.’

या येत्या संकटाला तोंड देण्यासाठी द्षिणियांची फळी बांधण्याचे आवाहन करणारे खलिते विश्वासू हारकऱ्यां मार्फत कुतुबशाही आणि आदिलशाही दरबाराला धाडण्यात आले. पन्हाळ्यास बांधाबांध करून गड सोडावा, या विचारात असलेल्या महाराजांच्या कानांवर अश्विन वद्य द्रादशीला मन थिजवून टाकणारी दुसरी वार्ता येऊन आदळली.

येसूबाईना पाठविलेल्या जोत्याजीने पन्हाळगड चढून खालच्या मानेने महाराजांना वृत्तान्त दिला, “थोरल्या म्हालाच्या मासाब गेल्या! इख घोटून त्येंनी सोताचा घात करून घेतला!!”

अश्विन वद्य प्रतिपदेच्या दिवशी रायगडाच्या थोरल्या महालाच्या दरुणीदालनाचा दरवाजा, दिवस कासऱ्याने वर चढला तरी खुललाच नव्हता. भेदरून गेल्या कुणबिणींनी दरवाजावर थापा देऊन शेवटी महाराणींच्या खाजगी कारभाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी रामराजांसह येऊन हाका-थापा दिल्या. दरवाजा खुलला नाही. शेवटी येसूबाई त्या बंद दरवाजासमोर आल्या त्यांनाही दाद मिळाली नाही. नाइलाजाने दरवाजा उखडून काढण्याचा हुकूम शेवटी त्यांना द्यावा लागला.

आतले दृश्य जमल्या माणसांच्या अंगावर काटा सरकविणारे होते. एक देखणी, मध्यम वयस्क, राजमानिनी मंचकावर शांत पहुडली होती. तिच्याशी इमान देणारी एक विषकुपी चौरंगीवर तशीच आडवी पडली होती. भोसलेकुळीच्या करारी जनान्याचे एक पर्व शांत झाले होते. डोळ्यांत आसवे आणि बगलेला रामराजे घेऊन, मासाहेबांच्या पायांवर डोके टेकवून येसूबाई तिथून बाहेर पडल्या होत्या. कडव्या सोयराबाईंनी, मांडले पट हरताच, कुणालाही कल्पना येणार नाही, असा वेगळा पट मांडून स्वत:च सजा घेतली होती. शरणागत नव्हे! पुतळाबाई बाहेरून जळत अंतर्धान पावल्या होत्या. सोयराबाई आतून जळत!

सुत्त झालेल्या महाराजांच्या डोळ्यांतून दाढीवर उतरणारे अशू म्हणत होते, “तुम्ही स्वत:शीसुद्धा कुणाला अंदाज न येणारा बनावच केलात! आबासाहेब समजू शकले नाहीत तुम्हाला; तिथं आम्ही काय समजावं? ही असली सजा घेऊन तुम्ही कधीही न मिटणारा वळ उठविला आहे आमच्या काळजावर. तुम्ही म्हणाला नाहीत – “आमचे हे रूप ध्यानी ठेवा.” पण आम्ही कधीच ते विसरू शकत नाही. जसे सती गेल्या मासाहेबांच्या पोटी आम्ही उपजतो तर बरे होते, तसेच तुमच्या पोटी उपजतो, तर केवढे सवाल मिटते! तुमचे, आमचे आबासाहेबांचे, सर्वांचेच…”

वह त्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते. गड सोयराबाईंच्या सुतकात होता. आल्यापासून महाराजांची येसूबाईशी भेट झाली नव्हती. खरे तर त्यांना कुणालाच भेटावेसे वाटत नव्हते. रायगडावर येताच ते भेटले होते, फक्त एकट्या रामराजांना. त्या भेटीची आठवण त्यांचा एकसारखा पाठपुरावा करीत होती. नकळतच; पण केवढे जिव्हारीचे बोलले होते, अजाण रामराजे आपल्या दादामहाराजांना!

छत्रपती दृष्टीस पडताच बाळ रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते, “आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज! आमची सजा आम्ही घेऊ – आमच्या मासाहेबांसारखी!”

ते ऐकताना काळजाच्या ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते. आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता – “वयाला न पेलणारे काहीसुद्धा यांच्या कानी पडता कामा नये. त्यासाठी येसाजी दाभाड्यांच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसे जोडली पाहिजेत. यांना जपले पाहिजे.’ त्याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती. गैरवकुबाची, वरकड असा कुणीच असामी रामराजांभोवती असणार नाही, याची दक्षता घेतली होती.

आळंबी उठावीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्रच उमटली होती – “रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत!” महाराजांना याची कल्पनाही नव्हती. औरंगच्या चालीचा अंदाज बांधीत ते पायफेर घेत होते. मध्येच थबकत होते.

“रानीसाब येत्यात.” बाहेरच्या पहाऱ्याने आत येत त्यांची साखळी तोडली. येसूबाई आत आल्या. महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले. डोळ्यांना भिडल्या डोळ्यांतून एकच वेदना सरकून गेली – सोयराबाईंची.

“आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे?” श्रीसखीचा तडक सवाल उठला.

“कसलं म्हणता?” छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले.

“रामराजांना स्वारीनं नजरबंद केलं आहे? तेही मासाहेबांचं सुतक फिटायच्या आत?” जसे भावेश्वरीनेच छत्रपतींच्यावर डोळे रोखले होते.

“काय म्हणालात?” एक अस्फुट बोल घरंगळला. डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकूळ झाली. येसूबाईंना पाठमोरे होत त्यांच्या एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला, “आणि तुम्ही – तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात?”

आतापर्यंत निर्धाराने वर असलेली येसूबाईंची मान खाली गेली. शब्द उमटले, “चुकलं आमचं.” अंगावर येतेशी वाटणारी शांतता त्या दोन राजमनांत कोंदटली.

“आम्ही थोरल्या महालाला खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे. रामराजे नजरबंद नाहीत – विश्वासबंद आहेत. वऱ्हाडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो आहोत आम्ही. बाळराजांची सोयरीक त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इराद्यानं!! जे बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही, हे जाणतो आम्ही.” महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलेही. त्यांच्या जात्या पावलांकडे बघणाऱ्या येसूबाईना कळून चुकले – “कितीही मनी आणलं तरी रानवाऱ्याचा माग काही नाही घेता येत! त्याच्या संगती दौडणं, एवढंच काय ते उरतं हाती!”

गडाचे सुतक उठले. फार दिवस मनात रुतणारा एक सल उखडून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला. ते पाचाडात आले. पाचाडात पंधरा हजार घोडालोक जिनबंदीने खडा ठाकला होता. कंकांचा दहा हजार पाऊलोक तोफखान्यांसह आधीच आगेकूच झाला होता. गिर्जोजी यादव, विनायक उमाजी, खंडराव पाणसंबळ, बाजीराव जेधे, येसाजी कंक अशा शेलक्या मंडळींबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला. सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला असलेल्या ‘चंद्रावत’ जनावरावर मांड जमविली. कूचाचे डंके-नगारे झडले. निशाणी काठ्या वर उठल्या.

छत्रपतींनी हात उठवून इशारत देताच पाठचा घोडालोक टापांवर पडला. खासा महाराज चालून निघाले. स्वारी नगरवर! कैदेत कोंडून पडल्या राणूआक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुब्याने. पुणे, कोरेगाव असे तळ टाकीत, कुकडी नदी पार करून घोडदळाने पाऊलोकांचा मेळ घेतला. पारनेरला जरब देऊन पंचवीस हजारांच्या माणूसबळाने संतस छत्रपती अहमदनगरच्या शिवेत घुसले. भुईकोटाचा मोगली किल्लेदार असलेल्या मुकीमखानाने चलाखीने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला. कोटाभोवती फिरलेले अर्धाकासरा रुंदीचे आणि तीन पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने तुडुंब भरलेलेच होते. मुकीमखान अल्लाद झाला.

खंदकामुळे मावळ्यांना तटाला भिडता येईना. सारे बळ ओतून महादरवाजा फोडण्याखेरीज मार्ग उरला नाही. तीन दिवस मराठ्यांनी नगरच्या कोटाला पान लावण्यासाठी जंग-जंग केले. रोजाना धारेवर पडणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली. कोट अलगदच राहिला. पार खट्टा झालेल्या छत्रपतींनी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी फौजेला परतीचा इशारा दिला. अपार खंत घेऊन नगरवेशीबाहेर पडणाऱ्या महाराजांची गर्दन खाली गेली. चर्या म्लान झाली. गजाआडच्या राणूआक्कांच्या मूर्ती डोळ्यांसमोर हटता हटेनात. मनात आबासाहेबांचे बोल थडथडू लागले, “सह्याद्री जिंकायला निघालात आणि कबिला गमावून आलात. शरम – शरम वाटते तुमची आम्हाला.”

शिकस्त खाल्लेले मानी शंभूमन स्वतःलाच धारेवर धरत म्हणत होते, “आबासाहेब, तुम्हाला वाटलीच असेल. पण आज आमची आम्हालाच शरम वाटते आहे. स्वत:बाबत!’

कोठीतल्या राणूआक्का यांची खबर उचलण्यासाठी गिरजोजी यादवाला नामजाद करून, आणि येसाजी कंकांना नगरभागात राहण्याची आज्ञा देऊन विषण्ण महाराज रायगडी परतले. थप्पड खाल्ल्यासारखे. नगरची मोहीम पार फसली.

कार्तिकी थंडीवर राने दहिवरू लागली. शहजादा अकबर मराठी मुलखात येऊन सहा महिने लोटले होते. त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतलेल्या छत्रपतींनी कवी कुलेशांना बोलावून घेऊन मनसुबा दिला, “कविजी, सुधागडला जिवाजी हरींना कळवा, आम्ही शहजाद्याच्या भेटीला येतो आहोत. एकांत भेटीचा इंतजाम आखून ठेवणे.”

“जी.” ही लांबणीला पडलेली भेट होणार याचे कुलेशांना समाधान वाटले. आता अकबराला भेटणे भाग होते. चालून येणाऱ्या औरंगला शत्रू मानणारी मिळेल ती लहान-थोर ताकद एकवट करायची होती. खरोखरच अकबर बापाविरुद्ध बंड करून उठला आहे काय, हे पारखून घ्यायचे होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment