धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५८ –

“चेऊलच्या सुभेदार तिमाजी व्यंकटेशांचा निरोप आहे स्वामी.” निळोजीपंतांनी हबश्यांच्या आगळिकीला हात घातला.

“काय म्हणतात तिमाजी?” महाराजांचे शिवगंध आठी घेत आक्रसले.

“आपली मुंबईकडे जाणारी दोन गलबते आणि त्यावरची चार माणसे सिद्द्यानं दर्यावर दस्त केली होती. तिमाजींनी मुंबईच्या टोपीकरांना “ही बाब आम्ही रायगडी कळवू. स्वामी गय करणार नाहीत.’ अशी जरब देताच टोपीकरांनी ती गलबते व माणसे सिद्द्याकडून हस्तगत करून आबाजींच्या मध्यस्थीनं आपल्या हवाली केली आहेत. ”

हे ऐकताना महाराजांची मुद्रा संमिश्र भावनांनी भरून आली. सिद्द्याच्या माजोरीचा संताप, टोपीकरांचे बदलते लागी धोरण, तिमाजींची तत्परता, आवजी पंडितांची यशस्वी होत असलेली हेजिबी अशा अनेक छटा त्यात होत्या.

“पेशवे, चिमाजींना संतोषाचे पत्र द्या. आवजींना मुंबईतील हबश्यांच्या हालचालींवर बारीक ध्यान ठेवण्यास लिहा.” महाराजांच्या डोळ्यांसमोर वेंगुर्ला, मालवणपासून मुंबईपर्यंतचा दर्याकिनारा उभा ठाकला. त्यावरची टोपीकर, हबशी, फिरंगी टपून बसलेली, तीन चालींची तीन पाणसावजे मनात घर करू लागली. या तीन दर्यासत्तांचा मेळ पडू देणे, राज्याला हिताचे नव्हते. त्यासाठी जबाबी तोड म्हणून किनाऱ्यावर जलकोट उठविणे, अरबांशी मैत्री ठेवणे, किनारपट्टी धरून आताषीचे कारखाने बांधणे, हेच उपाय होते. हबश्यांच्या चाचेगिरीला तोंड देण्यासाठी अरबी चाचे राखून ठेवणे भाग होते. त्यासाठी महाराजांनी आखणी सांगितली, “पंत, राजापुरापासून खंदेरीपावेतो असलेली दर्याठाणी माणूसमेळानं बळकट ठेवण्याचा सारंगांना निरोप द्या. जमेल तेवढा दोस्ताना अरब दर्यावर्दाशी राखून चालवण्यास सांगा.”

महाराजांनी बैठक सोडली. हरजीराजांसह ते सदरेबाहेर पडले. बाहेर काही कुणबाऊ माणसे खोळंबून होती. त्यांच्याकडे हात करीत चांगोजीने त्यांना पुढे घातले, “ह्ये प्रचंडगडाचं कोळी, मेटकरी हाईत. भेटीसाटनं आल्यात धन्यांच्या.” कांबळी काचोळ्या आणि लंगोट्या घातलेली ती माणसे काकाळीने मुजरा देत वाकली. महाराजांची शोधक नजर त्या माणसांभोवती फिरली.

“बोला बाबा, का गड चढून आलात? ”

बावरून त्या कोळ्या-मेटकऱ्यांनी नुसते एकमेकांकडे बघितले.

“बिनधास्त बोला. का आलात?” छत्रपतींनी त्यांना उबदार धीर दिला. धाडस धरून त्यांच्यापैकी एक म्हणाला,

“आमापैकी काही गडाच्या चाकरीला हाईत. आमा गरिबांवर गाईंची वणी ज्यारी क्‍्येलिया, घरपट्टी बसलिया. गुराढोराबगार हाय काय आमांकडं धनी? त्येवढी वणी उटवावी धनी, आमवयली.’” पुढे होत त्याने छत्रपतींचे एकदम पायच धरले. “उठा.” महाराजांनी त्याच्या खांद्याला आधार देत अगोदर त्याला उठते केले. कसलातरी निर्धार त्यांच्या चर्येवर दाटून आला.

“चांगोजी, जरा दफ्तरदार चिमणगावकरांना पेश घ्या.” राजाज्ञा सुटली. दफ्तरात जाऊन चांगोजी चिमणगावकरांना घेऊन आला. महाराजांनी त्यांना जागीच निवाडा फर्मावला, “दफ्तरदार, प्रचंडगडाच्या मुद्राधारी रघोजी हिररावांना तातडीनं हुकूम द्या. या कोळी-मेटकऱ्यांबरची गाईची वणी माफ केल्याचं लिहा. गडाला जे हवालदार, नाईकवडी, रजपूत आहेत तेवढ्यांना दोन म्हशींची वणीही माफ असल्याचे कळवा. वरकड म्हशींची वणी घेत जाणे. या लोकांना घरपट्टी बार आहे याचीही समज द्या त्यांना.”

“जी.” दफ्तरदारांनी राजाज्ञा ध्यानपूर्वक ऐकली.

“बाबांनो, आज गडाला मुक्काम करा. चांगोजी, यांची थाळ्याची व्यवस्था बघा.” महाराजांच्या पाठमोऱ्या आकृतीला ती संतुष्ट झालेली गरीब माणसे कुणबाऊ कृतज्ञतेने मुजरा देत होती. महाराजांच्या मनी समर्थ खलित्याचे वचन घोळत होते – “राजी राखता जग। मग कार्यभागाची लगबग… सकळ लोक एक करावे। गनिमा निपटून सांडावे।”

चैत्री पुनव आली. रायगड उतरून आलेले महाराज कमरेच्या केवळ पितांबरानिशी उघड्या पाठीने काळ नदीच्या पात्रात उभे राहिले. एका सालापूर्वी काळ झालेल्या आबासाहेबांच्या आत्म्याला ते भरल्या ओंजळीने वर्ष श्राद्धाचे तर्पण देऊ लागले. नदीकाठावर बाळंभट, कविजी, उधो योगदेव, केशव पंडित, उमाजी पंडित उभे होते.

महाराजांच्या मनाच्या पात्रात आठवणींची एक-एक ओंजळ उतरू लागली – “एक साल मागे पडले. आबासाहेब गेले असे अजून मन घेत नाही. पण ते सत्य आहे. जाताना ते जमल्या असामींना म्हणाले, “ये तो मृत्युलोक। कितेक आले तितुके गेले।’ तो तर रिवाजच आहे. पण हा मृत्युलोक पावन होतो, तो आबासाहेबांसारख्यांच्या येण्याने. पोरका होतो, तो त्यांच्या जाण्याने. आपल्या शब्दांखातर माणसे जिवांचे तर्पण करून धन्य होताहेत, हे बघण्याचे भाग्य किती लोकांना मिळते? आबासाहेबांना ते मिळाले. ते शिवनेरीवर उपजले आणि त्यांनी रायगडी देह ठेवला. पन्नास वर्षांची हयात; पण केवढा मोहरा पालटून टाकला त्या सायवळ हातांनी माणसा-मुलखांचा! किती शोध घ्यावा; आबासाहेब कोण होते उमगत नाही. ही खरी जिंदगी, जिला खरे तर सदूतीसाठी तर्पणाचीही गरज नाही.

“आबासाहेब, आमच्या भटकल्या क्षणांनी आम्ही पठाणी गोटाच्या गोत्यात गेलो. त्यानं ज्या यातना तुम्हाला झाल्या त्याची भरपाई उभी हयात आम्ही असे तर्पण करीत उभेच राहिलो, तरी होणार नाही. किती उपटला तरी, हा सल काही मनातून न हलता हलत नाही. आपणाला अर्ध्य देण्याची खरे तर आमची योग्यता नाही. र पाचाडच्या मासाहेबांनी केले, पेशवे मोरोपंतांनी केले, ते खरे समर्पण! तुम्ही उठविलेल्या या दौलतीत आमची हाव नाही. आम्ही हाती राजमुद्रा घेतली आहे; ती लागल्या कलंकाला साफ धुवून काढण्यासाठी. अंगी खेळणारे तुमचे रक्तबरीज शाबीत करण्यासाठी! आमच्या पायात हिंमत आणि हातात येश भरा. थोर मनी आम्हास आशीर्वाद द्या. जे चुकले-माकले आहे ते पदरी घ्या.!

श्राद्धविधी करून महाराज रायगड चढले. निळोपंतांना वर्दी देऊन त्यांनी सिंहासनसदर भरविण्याची आज्ञा केली. या सदरेला हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, दादाजी व भिमाजी काकडे, जैताजी काटकर यांना मानविडे देऊन पाचारण करण्यात आले.

भरल्या सदरेला साक्ष ठेवून महाराजांनी हरजीराजांना म्यानबंद तलवार, अलंकार, वस्त्रे व शिरपेचाचे तबक बहाल केले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नजर त्यांच्या नजरेत विश्वासाने रोवीत महाराज म्हणाले, “राजे, आम्ही प्रांत कर्नाटकाची कारभारी एखत्यारी तुम्हा हाती सुपुर्द करतो आहोत. प्रांताला बेंगळुर, जिंजी, होसकोट, कोलार, वेलूर, दोडुबाळापूर, चिक्कवाळापूर असा मुलूख आहे. भोवती मदुरा, म म्हैसूर, हुक्केरी रामनाड अशा नायकांचा प्रदेश आहे. तंजावरी एकोजीकाका आहेत. घेऊन प्रांत वाढीला लागेल यासाठी कोशिस करा.

प्रांत कर्नाटक ही दौलतीची गाठीची फळी आहे. भोवतीच्या नायक राज्यांवर आब-जरब ठेवून ती बळकट राखा. तुमच्या दिमतीला शामजी, जैताजी आणि काकडेबंधू देत आहोत. तुम्ही आहात म्हणजे आम्हीच कर्नाटकात आहोत असे आम्ही मानतो. प्रसंगी आम्हाला हारकारा द्या. आम्ही जातीनं तुमची कुमक करू. आजच गड उतरा. आई जगदंब तुम्हास येश देणार भली आहे.” महाराजांनी प्रेमभराने हरजींना ऊरभेट दिली. हरजींनी छत्रपतींना विश्वास दिला, “आम्ही स्वामिकार्यात काडीची ती कसूर करणार नाही. छत्रपतींनी निर्धास्त असावे. ”

शामजी, जैताजी, दादाजी व भीमाजी यांचाही मानवस्त्रे देऊन मरातब करण्यात आला. हरजीराजांसह महाराज रायगड उतरून पाचाडात आले. पंधरा हजारांची दिमत व निवडीची माणसे घेऊन हरजींनी पाचाड सोडले. मराठी राज्याचे ‘कारभारी एखत्यार” म्हणून हरजीराजे महाडीक कर्नाटकाच्या रोखाने चालले.

पाचाडच्या वेशीबाहेर पडणाऱ्या हरजींच्या फौजेकडे बघणाऱ्या महाराजांच्या मनात मुद्रा तरळून गेली, ती मेहुणे गणोजीराजांची! एक मेहुणे जोखीम घेऊन दूरवरच्या प्रांतात चालले होते. दुसरे वतनासाठी नाराज होऊन न भेटता-बोलता पाठ फिरवून शृंगारपुरी निघून गेले होते.

गडावर परतल्या महाराजांना वाकनीस रामचंद्र दत्ताजी आणि कारभारी शिवाजी सुरो पेश आले. रामचंद्रपंतांनी बाईच्या एका दत्तकविधानातील सरकारी शेरणीच्या भरण्याची बाब महाराजांच्या कानी घातली. “वाईला केशवजी नाईक म्हणून आहेत, महाराज. वारस नाही म्हणून त्यांच्या स्त्रीने – पिलाईने त्यांच्या भावाचा -गंगाजींचा मुलगा दत्तक घेतला आहे. थोरल्या स्वामींच्या संमतीनेच हे दत्तकविधान झालेले आहे. या विधानासाठी केशवजींनी सरकारी शेरणी म्हणून पाच हजार होनांचा भरणा दफ्तरी करावा, असा कौल थोरल्या स्वामींनी दिला होता. पैकी दोन हजार होन केशवजींनी भरणा केले आहेत. बाकी निघणाऱ्या तीन हजारांसाठी ते हप्ते जोडून मागताहेत. ”

“केशवजी असामी कसा?” महाराजांनी अंदाज घेत विचारले.

“माणूस शब्दाला जागणारा आहे. हप्ते दिले तर होन-होन पावता करील.” शिवाजी सुरोंनी इतबार दिला.

“मग त्यास हप्ते बांधून द्या.” महाराजांनी लागलीच निवाडा दिला. रामचंद्रपंत आणि शिवाजी सुरो समाधानाने मुजरा देत निघून गेले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here