धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५१

By Discover Maharashtra Views: 1236 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५१ –

संध्याकाळी राजसदरेवर आलेल्या संभाजीराजांना दाभोळचे सुभेदार वेंकाजी निमदेव यांचे कारभारी मुजरा देत पेश आले. त्यांच्या पाठीशी एक तबकधारी होता.

“आम्ही दाभोळहून आलोत धनी. सुभ्यावर झाल्या मोत्याच्या वृष्टीचा नमुना, आज्ञेप्रमाणं साहेबस्वारींना दाखविण्यासाठी आणला आहे.” कारभारी म्हणाले.

कारभाऱ्यांनी तबकधाऱ्याच्या हातातील तबकावरचा सरपोस हटविला. राजांनी ओंजळभर मोत्ये तबकातून उचलली. ती निरखीत ते कवी कुलेशांना म्हणाले, “केवढा चमत्कार आहे कविजी, आभाळातूनसुद्धा कधी-कधी असे देखणे काव्य उतरते धरतीवर!”

“जी! मानो आकाशसुंदरीका मोतीकंठा उतर आया है!” कविजी ते दूधवर्णी सौंदर्य निरखीत म्हणाले.

“कविराज, धरतीसाठी विरहव्याकूळ आकाशपुरुषाच्या डोळ्यांतून सुटलेले हे अश्रू आहेत, असं म्हटलं तर?”

“स्वामी, बाकऱ्यांचे दानपत्र सिद्ध झाले आहे. संमतीचे शिक्कामोर्तब द्यावे.” रघुनाथपंतांनी दानपत्र सामोरे धरल्याने संभाजीराजांनी ओंजळीतील मोती तबकात सोडले. लेखणी हाती घेऊन दानपत्र वाचले आणि त्याच्या अग्रभागी स्वहस्ते अक्षरमोती उमटविले –

“मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज।।

छत्रपते: यदत्रोपरिलिखितं।। छ. श्री।॥॥”

“खान जहानबहादूर जाफरजंग कोकलताश दख्खनसुभा प्रति राजे शंभू उपरी विशेष -” प्रल्हादपंतांनी मायना रेखला. अहिवंतगडावरून शिकस्त खाल्ल्यानंतर बागलाणातील किल्ले साल्हेरला परीघ घालून बसलेल्या खानाला जाणाऱ्या जरबी खलित्याचा मजकूर राजे संतप्त मुद्रेने सांगू लागले – “सांप्रत तुम्ही बागलाणप्रांती घातला फौजी हैधोस इकडे पावला आहे! एवढा पाऊसकाळच काय तो उलगण्याची आम्ही वाट बघतो आहोत. खुल्या मैदानी तुमच्या हत्याराचे पाणी जोखण्यास खासा आम्हीच बागलाणात उतरणार आहोत. बरे समजोन असणे!”

प्रल्हादपंतांनी, रेखल्या मजकुरावर वाळू शिवरून खलिताबळी थैलीत सरकवली.

“फिरंगाणातून विजरईचा खलिता आहे स्वामी. आपले डिचोलीचे सुभेदार मोरो दादाजींनी केला तह मोडल्याची तक्रार आहे विजरईची.” प्रल्हादपंतांनी राजांच्या कानी घातले.

“काय केले मोरो दादाजींनी?”

“बार्देश प्रांती सिओलिम भागात छापा घालून काही असामी दस्त केल्या आहेत सुभेदारांनी. डिचोलीतून जडजवाहीर घेऊन जाणारा एक फिरंगी व्यापारीही कैद केला आहे त्यांनी.” विचारगत राजे फेर घेऊ लागले. कै. महाराजांनी फिरंग्यांशी तह केला होता. त्यात एकमेकांच्या मुलखावर हमला करू नये, अशी एक अट होती. तसेच परस्परांच्या प्रदेशात निर्वेध व्यापार चालावा असा सुलूख होता.

“पंत, मोरो दादाजींना दस्त आगामी तातडीने सोडण्यास लिहा. फिरून आपल्या तर्फेनं तहाचा भंग होईल, अशी हरकत न करण्याची समज द्या त्यांना.”

“जी.” एकाच वेळी कोकलखानाला जरब देणारे आणि आपल्या चुकल्या अधिकाऱ्याला समज देणारे राजे बघून प्रल्हादपंतांची मान डुलली.

“कुडाळचं सुबेदार आल्यात.” पहाऱ्याने वर्दी आणली. हातपंजा उठवून राजांनी तिला मंजुरी दिली.

कुडाळचे देशाधिकारी गणोराम पेश आले.

“केव्हा आलात गणोराम?” राजांनी त्यांचे कुशल घेतले.

“आत्ताच गड चढलो स्वामी. एक खास बाब कानी घालण्यासाठी आलोत.”

“बोला.” राजांनी त्यांच्या पपडीभर नजर फिरविली.

“पाटगावी मौनीबुबा राहतात आमच्या सुभ्यात. थोर ईश्वरपुरुष आहेत. थोरल्या स्वामींनी कर्नाटकस्वारीच्या समयी त्यांचे दर्शन घेतले होते. स्वामी त्यांच्या बाबीने काही करणार….“सुभेदार, ऐकून आहोत आम्ही मौनीबुवांबद्दल. जरूर त्यांचे ऊर्जित चालवू.” राजांनी गणोरामांना विश्वास दिला. संतुष्ट होऊन ते मुजरा देऊन बाहेर पडले.

“पंत, मौनीबुवांच्या मठाला वाजंत्री व भोई यासाठी सालीना निशाणी होन एकशे पंचवीस मुक्रर केल्याचे कागदपत्र तयार करा. बुवांना दिवाणी वजावाटा माफ केला आहे, असे त्यात लिहा. ही देणगी मठशिष्य तुरुतगिरी आहेत, त्यांच्याच हवाली पावती होईल असे बघा.” राजांनी प्रल्हादपंतांना लागलीच निर्णय दिला.

“राजे शिर्के आन्‌ महाडिक गड चढत्याहाईत.” आत आल्या अंतोजीने वर्दी दिली.

मनाची दफ्तरी कामे तशीच सोडून राजे प्रल्हाद निराजींना म्हणाले, “चला, सामोरे जाऊ.” प्रल्हाद निराजी, अंतोजी आणि काही धारकरी यांसह शंभूराजे बालेकिल्ल्यातून आघाडी मनोऱ्यात आले.

कमरेच्या हत्यारांवर मुठी ठेवलेले गणोजीराजे, हरजीराजे व अमळोजीराजे महाडिक शिबंदीच्या मेळाने येताना बघून शंभूराजे पुढे झाले. सर्वांना खांदाभेट देऊन त्यांचे कुशल घेतले. हरजीराजे संभाजीराजांचे मेहुणे होते. राजांच्या थोरल्या भगिनी अंबिकाबाई त्यांना दिल्या होत्या. दोन्ही बाजूंना गणोजीराजे व हरजीराजे असे दोन मेहुणे घेत संभाजीराजे सातमहालाकडे वळले.

मेहुणेमंडळ येसूबाईच्या महाली आले. त्यांना भेटून, सकवारबाईचे दर्शन करून साऱ्या असामी राजांच्या खासेवाड्यातील बैठकी दालनात आल्या. पाहुणे आल्याची खबर लागलेले हंबीरराव, येसाजी कंक, आनंदराव, रूपाजी, जोत्याजी केसरकर, तुकोजी पालकर, त्र्यंबक बाजी यांच्यासह त्यांच्या भेटीला आले.

सादिलवारीचे क्षेमकुशल झाल्यावर हरजीरावांनी दयाचा प्रश्न उभा केला, “राजांच्या मंचकारोहणावरच पुढील कारभार चालणार आहे की काय सरलष्कर?”

“आमी त्येच म्हन्तोय. पाच म्हयनं जालं गादी रिकामी हाय.” हंबीररावांनी त्यांना दुजोरा दिला.

“राजे, तुम्ही अभिषेक करवून घेणार आहात की नाही?” हरजीरावांनी रोकडा सवाल केला. “त्याशिवाय काही महत्त्वाच्या बाबी निकाली लागत नाहीत.” गणोजीराजे काय अर्थाने बोलले ते कुणालीही कळले नाही.

“आम्ही तुम्हा सर्वांच्या भावना जाणतो. अभिषेकही घेणार आहोत आम्ही. त्यासाठी लागणारी सिद्धता मात्र पावसाळा परतल्याशिवाय होणार नाही. हा आमचा अभिषेक नाही. महाराजसाहेबांच्या गादीच्या अखत्यारीचा आहे. त्याच इतमामानं तो करावा लागेल. भोवतीचे दरबार त्यावर नजर लावून आहेत. घाईचे हे कार्य नव्हे.” संभाजी राजांनी शांतपणे सर्वांना उत्तर दिले. सर्वांना ते पुरेसे झाले.

थाळ्याची वर्दी आल्याने सर्वांसह राजे उठले. दालनाबाहेर येताच त्यांची वाट बघत उभा असलेला बांधकामाचा अखत्यारी प्रमुख हिरोजी इंदुलकर लवून म्हणाला, “आमास्त्री बरं याद क्येलं व्हतं धन्यानी.”

त्याला बघताच राजांची चर्या पालटत कष्टी झाली. आपला हाततळवा निरखीत ते पडेल म्हणाले, “हिरोजी, महादरवाजासामने निकोप जागा निवडून सती गेल्या मासाहेबांचं वृंदावन उठवा. त्या नाहीत, त्यांचं वृंदावन तरी येता-जाता नजरेस पडेल आमच्या.” पुतळाबाईच्या आठवणीने सर्वांचेच चेहरे म्लान झाले.

संध्याकाळी हरजीराजे, अमळोजी, गणोजी यांच्यासह गडाचा घेर टाकून जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेशताना संभाजीराजे हरजींना म्हणाले, “एक मोठी जिम्मेदारी टाकणार आहोत आम्ही तुमच्यावर राजे. विश्वास आहे, तुम्ही ती पार पाडाल.”

“जी. आम्ही घरचेच आहोत. पडेल ती जोखीम आपली मानू.” हरजींनी त्यांना विश्वास दिला.

रपिंडीवरचे एक बिल्वदल उचलून राजांनी ते हरजींच्या हाती दिले. महाडिकांनी आण म्हणून ते “जिम्मेदारी काय’ ते कळले नसताही आपले केले. ते बोलणे ऐकून उत्सुक झालेल्या गणोजींची मात्र निराशा झाली.

गडावर रात्र उतरली. सुखदालनात मंचकावर लेटलेल्या राजांच्या पायांशी बसून त्यांचे पाय चुरणाऱ्या येसूबाई मध्येच थांबल्या. पदर नेटका करताना त्यांच्या हातीचा चुडा किणकिणला. बांधील बोलात त्या म्हणाल्या, “एक ऐकणं होईल का?”

“सांगा.”

“आजवर कधी काही बोललो नाही. पण एक मागणं आहे पायांशी.” येसूबाईचा आवाज बघता-बघता जडावला.

कपाळावर घेतलेली भुज हटवून संभाजीराजे बसते होत म्हणाले, “असं काय बोलता येसू? मनी असेल ते साफ सांगा. तुम्ही साधी मागणी घातली होती – भवानींच्यासाठी गंडादोरा आणायची. तो आम्ही आणलाच नाही. आणले ते गंडांतर.” राजांचा आवाज दुखरा झाला.

“असं बोलू नये. आलं होतं त्यातून निभावलंय भावेश्वरीच्या कृपेनं. पुढचा विचार करता काही पायांशी ठेवावं म्हणतो आम्ही.” “बिनधोक सांगा येसू. कितीही अवघड असलं तरी तुमची इच्छा पूर्ण करू.”

ते ऐकताना येसूबाईची चर्या उजळली. आपोआपच त्यांचे हात राजांचे पाय चुरू लागले. कसे बोलावे या विचारात त्या थोड्या घोटाळल्या. मग अंधाऱ्या रात्रीला आधार देण्यासाठी लाख-लाख चांदण्या लुकलुकाव्या तसे त्यांच्या तोंडून बोलू उमटले, “आता दस्त केल्या असामीवरचे चौकीपहारे उठवावे स्वारीनं! आबासाहेबांच्या हाता-पाठीशी हयातभर वावरलेली ती माणसं आहेत. चुकली तरी आपलीच आहेत. स्वारीनं त्यांना अभय द्यावं. पदरी घ्यावं.”

झाले “येसू!” नको तो विषय जिव्हाळ्याच्या ओठांतून आलेला ऐकून राजे संभ्रमित झाले. “आबासाहेब असते, तर त्यांचे पाय धरूनही आम्ही हेच मागणं घातलं असतं.

अशी हुन्नराची माणसं घडवितो म्हटल्यानं घडविता येत नाहीत. पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली म्हणून वेशीवरून काही नदी उठवून लावता येत नाही. आपली माणसं चुकली तर सांगायचं कुणाला? दाद मागायची कुणाकडं? ही माणसं वडीलधारी आहेत, मोठ्या अनुभवाची आहेत. मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात म्हणूनच त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं. स्वारीनं ते दाखवावं. खुद्द स्वारींच्या बाबतीनं आबासाहेबांनी असं दाखवलं आहे.” महाराजांच्या आठवणीने येसूबाईंचा गळा दाटून आला.

आपल्यासमोर प्रत्यक्ष थोरल्या आऊ म्हणजे पाचाडच्या मासाहेब बसल्या आहेत, असा भ्रम राजांना चाटून गेला. आपल्या प्रिय पत्नीचा हात मायेने आपल्या हाती घेत तो हलके थोपटून राजे म्हणाले, “आम्ही निर्णयासाठी चाचपडत होतो येसू. तुम्ही आम्हाला भलं बळ दिलंत. तुमच्या इच्छेप्रमाणं होईल.”

“ते तातडीनं व्हावं. पेशवे… पेशवे ज्वराच्या व्याधीनं कोठीत अंथरुणाला खिळलेत.” येसूबाईचा आवाज कातरला.

“काय म्हणता तुम्ही?” स्वतःलाच विचारला वाटावा, असा प्रश्न राजांच्या तोंडून सुटला. येसूबाईच्याकडे, खुद्द राजांच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते.

“जगदंब, जगदंब!” म्हणत अस्वस्थ राजे लेटले. येसूबाई त्यांचे पाय चुरू लागल्या. चिराखदाने कुचमत तेवू लागली.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment