धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४७ –

संभाजीराजांनी बाळंभट राजोपाध्यांना वर्दी दिली.

“शास्त्रीबुवा,” सकवारबाईच्या महाली ते रुजू झाल्यावर पुतळाबाईनी त्यांना प्रश्न केला. “स्वारींचे कोण-कोण विधी राहून गेले?” “स्वामींचे अंत्यसंस्कार “भडाय़री’ने झाले आहेत. त्यांची शास्त्रशुद्ध मुंज झाली होती. संस्कार शास्त्रयुक्त ‘मंत्राग्री’ने व्हायला पाहिजे होते.”

“तुम्ही असतानाही ते झाले नाहीत. काय समजावं आम्ही?” पुतळाबाईच्या

डोळ्यांत सात्त्विक संतापाची झाक चमकली. चरकलेले राजोपाध्ये घाईने म्हणाले, “आम्ही असण्याचा प्रश्न नव्हता मासाहेब. स्वामींच्या संस्कारांना ज्येष्ठ म्हणून मंत्राग्रीसाठी युवराजांची आवश्यकता होती.”

“मग आता काय करता येईल? शास्त्रार्थ काय सांगतो?” चुटपुट लागलेल्या संभाजीराजांनी विचारले.

“अजूनही शास्त्रसंमत विधी करता येतील स्वामींचे.”

“कसे?” कुठेतरी खोलवर समाधान लाभलेल्या संभाजीराजांनी विचारले.

“स्वामींची काष्ठप्रतिमा सिद्ध करून, युबराजांच्या हस्ते तिला मंत्राग्री देऊन पिंडदान करावं लागेल.” संभाजीराजे आणि पुतळाबाई एकमेकांकडे बघतच राहिले.

“ठीक आहे शास्त्रीबुवा, तुम्ही शास्त्राप्रमाणे सिद्धता करा.” पुतळाबाई निर्धाराने म्हणाल्या.

“जी.” राजोपाध्ये जायला निघाले.

“आणि हे बघा, आमच्यासाठी एक मुहूर्त शोधा. आम्ही… अग्निभक्षण करणार आहोत!”

“मासाहे ब…” संभाजीराजे कळवळून काही बोलणार तोच हात उठवून तो डोलवीत पुतळाबाई म्हणाल्या, “हं – युवराज, तुम्ही वचन दिलंय आम्हाला, आता पायगोव्याचं काही बोलू नका.” शांतपणे पुतळाबाई अंत:पुराकडे निघूनही गेल्या. कोंडल्या घशाने, त्यांची पाठमोरी मूर्ती बघणाऱ्या शंभूराजांना कळून चुकले, “आबासाहेब, तुमच्या जबानीचंही बळ आमच्या ठायी नाही! अशाच जायला निघालेल्या थोरल्या आऊंना तुम्ही रोखून धरलंत. आम्ही!’

संभाजीराजे सुत्नपणे आपल्या महाली फेर घेत होते.

“धनी” आत आलेला रायाजी बोलता-बोलता रुकला.

“काय?”

“पुरारं आल्याली सरकारस्वारी गड चढत्येय!”

संभाजीराजे खिळल्यासारखे झाले. आठवणींचा गंगासागर खळबळला. येसूबाईंची रूपेच रूपे क्षणभरात डोळ्यांपुढून सरकून गेली.

“चल.” त्याच पावली संभाजीराजे आघाडी मनोऱ्याकडे निघाले. मनोऱ्याच्या दुसऱ्या मजल्यावरून नाणेदरवाजातून येणाऱ्या वाटेला त्यांचे डोळे खिळून पडले. केशव पंडित, उधो योगदेव, चांगोजी, कवी कुलेश, पिलाजी यांनी धरल्या मेळातून एक पडदाबंद मेणा मनोऱ्याच्या पायथ्याशी ठाण झाला. त्यातून दीड वर्षाच्या भवानीबाईंना छातीशी बिलगतं घेतलेली धाराऊ प्रथम उतरली. भवानीबाई उंचर्निच मनोऱ्याकडे टुकुटुक बघत होत्या.

मनोऱ्याच्या दगडबंद उंबरठ्याला हात लावून तो मळवटाशी नेत येसूबाई बालेकिल्ल्यात आल्या. संभाजीराजांनी मनोरा सोडला. येसूबाई सातमहालाकडे गेल्या. मासाहेब पुतळाबाई, सकवारबाई आणि होय – सोयराबाईंचीही पायधूळ मळवटी घेण्यासाठी!

भवानीबाईंना घेतलेली धाराऊ संभाजीराजांच्या महाली आली. तिच्या काखेतून भवानीबाईंना आपल्या भुजेवर घेत संभाजीराजांनी म्हातारीच्या पावलाला हात लावताच ती फुटली. ओढींनं राजांना जवळ घेत, त्यांच्या चर्येवरून आपली थरथरती बोटे फिरवून ती कानशिलाशी मोडत म्हणाली, “किती सोकलास रं  माझ्या ल्येका! कशानं क्काय क्काय घडलं म्हनावं ह्यो!”

भवानीबाईंच्या गालावर ओठ टेकणाऱ्या संभाजीराजांना बघून तर तिचे डोळे पाघळू लागले.

“दादामहाराज!” दरवाजाच्या रोखाने प्रेमभरी साद आली. रामराजांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या येसूबाई येत होत्या. उगवतीचा सूर्य संगती घेऊन येणाऱ्या बासंतिक पहाटेसारख्या! शांत, नि:शब्द, धीरगंभीर. त्यांच्या चालीत थेट जिजाऊंचे वळण आले होते, डोळ्यांत पुतळाबाईंचा निर्धार. आपल्या स्वारींच्या जबळ येताच पदर ओंजळीत भरून त्यांनी वाकून त्रिवार नमस्कार केला.

“येसूः…” हा एकच, अनंत भावनांच्या भाराखाली वाकलेला, घोगरट शब्द संभाजीराजांच्या तोंडून कसातरी बाहेर पडू शकला.

तो ऐकताच हातचा पदर ओठाशी नेत, तोंड डाव्या दंडाला भिडवलेल्या येसूबाई निशाणकाठीसारख्या उभ्याउभ्याच देहभर थरथरू लागल्या. केवढे, केवढे बोलायचे असून एक – एकही शब्द दोघांच्याही तोंडून बाहेर फुटत नव्हता. संभाजीराजांचा हात भवानीबाईच्या पाठीवरून नुसताच फिरत राहिला – मन कुठंतरीच!

धरल्या आभाळाआडून आषाढी एकादशीचा दिवस कुचमत वर चढला. पंचक्रोशीतील माणसं जथ्यांनी रायगड चढू लागली. एवढे माणूस गड चढत होते, पण कुणीच कुणाशी काही शब्दाने बोलत नव्हते.

भल्या पहाटेच सतरान घेऊन जगदीश्वराचे, देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई सातमहालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्या अंगी हिरव्याकंच शालूचा सौभाग्यनेसू, गळ्यात काळ्या मण्यांचा पोत आणि कपाळी मेणमळल्या दाट कुंकवाच्या मळवटाची आडवी बोटे स्पष्ट दिसत होती. त्यांच्या पाठीशी येसूबाई, सकवारबाई, धाराऊ असा जनाना उभा होता. समोर खालच्या मानेने संभाजीराजे, रामराजे, पिलाजीमामा, हंबीरराव, येसाजी, आनंदराव, केशव पंडित अशी मंडळी खडी होती. शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिकापात्रावर मधूनच नजर टाकीत बाळंभट राजोपाध्ये मंत्रघोष करीत होते. नाशिक-त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या घोषात तो मिसळला होता. हारीने मांडलेल्या सुपे, दुरड्या, तबके यांतील एक-एक वाण उचलून येसूबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या. भरल्या चुड्याने पुतळाबाई ‘सतीची वाणं’ वाटत होत्या. वाण घेणारी सुवासिन आपल्या भरल्या मळवटाचा माथा मासाहेब पुतळाबाईच्या विमल चरणांवर ठेवीत होती. तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता –

“औक्षवंत व्हा! सौभाग्यवंत व्हा!” सुवासिनींनी माथे टेकल्याने पुतळाबाईंचे पाय कुंकमय झाले होते. नजर ठरणार नाही, असे अपार- अपार तेज त्यांच्या चर्येवरून फाकले होते.

राजोपाध्यांनी एक सुवर्णतबक त्यांच्यासमोर ठेवले. त्यात छत्रपती महाराजांच्या पायांची सेवा करून अंगभर पावन झालेल्या, जरीनकस असलेल्या, भगव्या मोजड्या होत्या. पुतळाबाईनी समोर स्वारीच उभी असावी, तसे त्या मोजडयांवर गंध, हळदकुंकू, अक्षता वाहिल्या. राजोपाध्यांनी दिलेली दूधरंगी फुलांची ओंजळ अर्पण केली, हातच्या तबकातील तेवत्या पंचनिरांजनांनी आणि डोळ्यांत तेवत्या दोन भावनिरांजनांनी समोरच्या अमोल दौलतीला ओवाळताना त्यांना वाटले, या मोजड्यांवर क्षणात खुद्द स्वारीच उभी राहील! हसतमुखाने म्हणेल, “पुतळा, किती वखत करता? इथं चंद्र-सूर्यांची, तारका-नक्षत्रांची एवढी निरांजनं तेवून आहेत – पण – पण तुमच्याखेरीज ती पूर्ण नाहीत. लवकर या!”

“मासाहेब, हात जोडावेत. जलसिंचन होत आहे.” बाळंभट राजोपाध्ये मंत्र थांबवून घोगरट म्हणाले.

पुतळाबाईनी हात जोडून डोळे मिटले. मंत्रघोषात पवित्र नद्यांचे शीतल जलसिंचन त्यांच्या मस्तकावर होऊ लागले. घटिकापात्र अर्धे-अधिक डुबलेले बघून राजोपाध्ये म्हणाले, “चलावं…” चौघा मावळ्यांनी घटिकापात्राचे घंगाळ उचलले.

पुतळाबाई उठल्या. त्यांच्या पायांना मिठी भरत येसूबाई मुसमुसत म्हणाल्या – “मासाहेब….”

त्यांच्या डुईच्या पदरावर हातपंजा ठेवीत निर्विकार पुतळाबाईंनी आशीर्वाद दिला, “सौभाग्यवंत व्हा! आमच्या युवराजांना – बाळराजांना सांभाळा. स्वारींचा गडमाणूस सांभाळा.”

सातमहालाच्या सरत्या जोत्यावर असलेला दगडी खांब आला – “सतीचा खांब!’ रजपुती रिवाजाप्रमाणे सातमहाला बरोबरच कारागिरांनी तो उठविला होता. आज पहिल्याने त्याची पूजा होणार होती. पुतळाबाईनी खांबाला गंध-फुले वाहिली. या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता. सती जाणाऱ्या राजस्त्रीने निर्धारपूर्वक आपल्या मळवटीचे कुंकुमलेणे एकदा का त्याला स्वहस्ते मढविले की, तिची वाट फक्त चितेची. मग मागे फिरणे नाही.

तो उभा खांब पुतळाबाईनी एकदा डोळाभर बघून घेतला. आपल्या माथ्याचा मळवट त्याच्या माथ्यावर देण्यासाठी उठलेला त्यांचा चुडेसंपन्न हात क्षणभर रुकला. संभाजीराजांच्यात गुंतवा झालेले त्यांचे मन आक्रोशून उठू बघत होते. मोठ्या निकराने त्याला थोपवून पुन्हा स्थिरचित्त झालेल्या पुतळाबाईनी मेणात मन मिसळलेला आपला पावन मळवट वर्षन्‌वर्ष वाट बघणाऱ्या त्या मानकरी खांबाला दिला!

जलाभिपषेकाने ओलेत्या झालेल्या पुतळाबाईनी आपल्या कर्पूरगौर हातांची ओंजळ सिद्ध केली. राजोपाध्यांनी त्या ओंजळीत त्यांच्या स्वामींच्या भगव्या मोजड्या ठेवल्या. चालल्या! पावलागणिक नात्यागोत्यांचे मागील पाश रायगडाला बहाल करून मासाहेब पुतळाबाई चालल्या. मोजड्या हाती घेऊन. अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली! तेजाची अमर सोबत करण्यासाठी जातिवंत तेज चालले! गलबलून गेलेल्या संभाजीराजांच्या हातून रामराजांचा हात केव्हा गळून पडला, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. चालणे अशक्य झालेली त्यांची सुंद पावले परतून खासेवाड्याकडे वळली. चक्क माघारी!

“आऊसाहेब, मासाब…” म्हणत माणसेच माणसे पुतळाबाईंच्या पायांवर धडाधड लोटांगणे घेऊ लागली. कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई, आभाळ तुडवीत जाणाऱ्या विजेसारख्या काळ्या हौदावर आल्या. उभा हौदचौक माणसांनी फुलून गेला होता. काखोट्यात मुंडासी, पगड्या घेतलेली माणसे सतीला मान देण्यासाठी दाटली होती.

हौदाच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या. चढण्यासाठी त्या चितेला चहूबाजूंनी शिड्या भिडविल्या होत्या. घटिकापात्र काठापर्यंत डुबलेले पाहून राजोपाध्यांनी ब्रह्मवृंदांना मंत्रघोष सुमार करण्याची इशारत दिली. सतीजवळ येत ते हात जोडून म्हणाले, “मासाहेब, मुहूर्तचटिका भरत आली. चूड कुणा

हस्ते घेणार?”

“युवराजांच्या.” चितेवरची नजर न ढळविता निर्धारी बोल आले.

मान डोलवीत राजोपाध्ये दाटल्या कंठाने म्हणाले, “क्षमा असावी. युवराज आले नाहीत इथं!”

“मतलब? त्यांना वर्दी द्या. सांगा – तुम्ही युवराज असलात तरी आम्ही राणीसाहेब आहोत! आमची आज्ञा आहे. येऊन चूड द्या आम्हास!” त्यांच्या डोळ्यांत जगदंबेचे पाजळलेले पोत जणू उतरले होते.

“जी.” राजोपाध्यांनी आज्ञा पावती करायला माणूस पिटाळला. त्याने पेश येऊन संभाजीराजांना ती आज्ञा शब्दाबरहुकूम सांगितली.

डोळे निपटून, बांधील मनाने आज्ञाधारक संभाजीराजे काळ्या हौदावर रुजू झाले. पुतळाबाईच्या पायांवर आपले मस्तक ठेवीत म्हणाले, “आम्ही आलोत मासाहेब!”

“औक्षवंत व्हा! विजयवंत व्हा!” पुतळाबाईनी शेवटचा आशीर्वाद दिला.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here