महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४४

By Discover Maharashtra Views: 1248 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४४ –

मल्हारबुवांशी जिव्हाळ्याची चर्चा करून संभाजी राजांनी कोरटीचा मठ सोडला. त्यांचे मन समाधान पावले होते. दुडक्या चालीने दौड घेत असताना ते हंबीररावांना म्हणाले, “मामासाहेब, कऱ्हाडतर्फेच्या देशाधिकारी भानाजी गोपाळांना पत्र देण्यास सांगा चिटणिसांना –

“आम्ही गोसावीबुवांचे दर्शन घेतले. संभाषण प्रसंग झाला आहे. बुवा सदाव्रती, प्रामाणिक ईश्वरभक्त आहेत. मौजे नाडोली गाव त्यांचे मठास अग्रहार करून चालविणे. उजूर व हरकत न घेणे.”

जी.” हंबीररावांनाही तो निर्णय ऐकून समाधान वाटले होते. ‘चंद्रावत ‘ फौज गाठण्यासाठी आडव्या वाटेने वाईच्या रोखाने दौडत होता!

संभाजीराजांचा मेळ पडताच फौजेचा तळ एक मुक्काम करून वाईहून हलला. महाबळेश्वरमार्गे, रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाच्या खोरीवर आला.

कुलदेवता भवानीचे स्थान असलेल्या प्रतापगडाचे शिखर दिसताच मान लवती करून संभाजीराजांनी त्याला वंदन दिले. वरकड फौज घाटमाथ्यावरच ठेवून हंबीरराव, रूपाजी, महादजी, रायाजी-अंतोजी अशा शेलक्या मर्दान्यासह, पाचशे धारकरी घेऊन ते खोरीत उतरले. भवानीची पायधूळ घेण्यासाठी प्रतापगडाच्या वाटेला लागले.

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली, जनीच्या टेंब्यावरची अफझलची ठसठशीत कबर दिसताच संभाजीराजांच्या हातचे कायदे आखडले गेले. चुनेरंगी कबरीवर नजर खिळलेले युवराज हंबीररावांना म्हणाले, “मामासाहेब, आबासाहेबांच्या हातून मरण लाभलेला खानही भाग्यवानच! आपल्या दरबारची चाकरी करीत तो इतरत्र कुठेही कामी येता, तर त्याची एवढी भरीव नामोनिशाणी मागे ना उरती!”

“जी युवराज, आमी एवढं लगत दिमतीला हुतो थोरल्या धन्यांच्या पर – पर आमास्तीबी कदी माग घावला न्हाई त्येंचा. मान्सं काय, पावसाळी आळंब्यागत येत्यात आन्‌ जात्यात. पर धनी त्ये धनीच!” महाराजांच्या आठवणीने हंबीररावांचा आवाज धरल्यासारखा झाला.

आगवानीसाठी आलेल्या प्रतापगडाच्या किल्लेदारासमवेत रचीव पायऱ्या चढत संभाजीराजे गडमाथ्यावर आले. केदारेश्वराचे दर्शन घेऊन बालेकिल्ल्याकडे जाताना किल्लेदाराला म्हणाले, “आईच्या पूजेची सिद्धता करा. आम्ही थोडा समय आहोत इथं. पुढं निवांतपणी येणार आहेत.”

“जी?” म्हणत किल्लेदार भवानीच्या पुजाऱ्याला गाठण्यासाठी निघून गेला.

दुपारचा प्रहर टळला होता. हातपाय क्षाळलेले संभाजीराजे बालेकिल्ल्यातून बाहेर आले. तटबंदीच्या लगत होत एकटेच उत्तरेच्या रायगडाच्या रोखाने बघत उभे राहिले.

“देवळाकडं चलायचं न्हवं? जुपी जाल्येय सम्दी पूजंची.” हंबीररावांनी सांगितले.

“चला.”

सरलष्करांसह युवराज भवानीच्या मंदिरात आले. स्वहस्ते देवीची पूजा बांधून तीर्थ-प्रसाद घेतला. गडावर एक फेर टाकून भरल्या मळवटाने ते सर्वांसह प्रतापगड उतरले. आता मनाला ओढ होती फक्त रायगडाची.

पारघाटातील फौजेला मिळून संभाजीराजे महाडावर उतरले आणि मृगाच्या पावसाने घसघसती झड धरली. बीस हजारांचा माणूसमेळ पार धारांखाली झोडपून निघू लागला. फौज खिळून पडली.

“युवराज आले!” खबर कडकडत्या विजांनी रायगडावर पावती केली!

गडागडांची चौकीबंदी करून आलेले पिलाजीमामा संभाजीराजांच्या सैन्याला मिळाले. मृगाने भांगा देताच हंबीरराव, पिलाजीमामा यांच्यासह संभाजीराजांच्या फौजेने पगड्यांवरचे पाणशिंतोडे झटकले. हत्यारबंद मावळ्यांचा पाणलोट रायगडाकडे निघाला. पाचाडची वेस येताच रणशिंग, नगारे, चौघडे यांची झिंबड उसळली. आला तर कटबाल्यांच्या हस्तकांशी इथंच मुकाबल्याचा प्रसंग येणार होता.

कमरेची म्यानबंद तेग उपसून आघाडीला असलेल्या संभाजीराजांनी तो हात तसाच उंच उठविताच पाठच्या मावळी लोटातून, मृगाने भरले आभाळही थरकून जावे असा रणगोष उसळला – “हर हर म्हाद्येवा!”

प्रचंड वृक्ष डांगलत, चीत्कारत येणाऱ्या हत्तीसमोर, कुया उठवीत कोल्ह्यांचा तांडा यावा, तसा मालसावंत हा सरदार पाचाडच्या वेशीवर आपल्या मेळासह संभाजीराजांना आडवा आला. डोळ्यांत पळस उतरलेले संभाजीराजे घोडा फेकीत खासा पुढे झाले. खुद्द मालसावंतालाच त्यांनी अंगावर घेतला.

तलवारीच्या चार चौकातच संभाजीराजांनी त्याला घोड्यावरून खालच्या चिखलात उतरविला! आडणा निखळला. बांधे फुटताच पाण्याचा मुसंडा उधळावा तशी युवराज-सरलष्करांची फौज पाचाडात घुसली.

“मामासाहेब, तुम्ही असेच गड चढून येसाजीकाकांना मिळा. पुऱ्या गडाची चौकीबंदी करा.” चढ्या घोड्यावरूनच तेगीचे टोक रायगडाकडे रोखून संभाजीराजांनी पिलाजीमामांना आज्ञा दिली. आपला जमाव घेऊन पिलाजी रायगड चढू लागले.

हंबीरराव, आनंदराव यांच्या सोबतीने संभाजीराजे थोरल्या आऊंच्या छत्रीजवळ आले. मांड मोडून त्यांनी मोजड्या उतरल्या. अंगावरची वस्त्रे भिजलेले युवराज, मृगधारांनी भिजलेल्या छत्रीसमोर आले. आपला माथा त्या छत्रीच्या पायरीवर ठेवलेल्या संभाजीराजांना तो वर उचलावासा वाटेना. “भुरक्या पाणसरींचेच हात करून थोरल्या आऊसाहेब ते आमच्या पाठीवरून तर फिरवीत नाहीत ना!’ या विचाराने तर युवराजांचा उमदा देह थरथरला. मोट्या निकराने त्या चिंब पायरीवरचा माथा त्यांनी वर घेतला. तसे पायीच संभाजीराजे खासेवाड्याकडे निघाले. मासाहेब पुतळाबाईंचे दर्शन घेण्यासाठी!

वाड्याची सदर येताच तुळईला टांगल्या घाटेखाली येऊन ते सुन्न मनाने उभे राहिले. एखादा पुतळाच चालतो आहे असे वाटावे, तसे जड पावली आतल्या दरुणीदालनाकडे निघाले. दालनाचा दगडी उंबरठा ओलांडताना त्यांनी मन बांधून घेतले. आत पुतळाबाई, एका झरोकक्‍्याशी पाठमोऱ्या उभ्या होत्या. पांढऱ्या वस्त्रामुळे त्या जिजाऊंच्यासारख्या दिसत होत्या.

“मासाहेब, आम्ही आलोत…” दालन शहारले.

जशा होत्या तशाच पुतळाबाई मुखावर ओंजळ चढवीत उभ्या अंगी गदगदू लागल्या. नावाप्रमाणेच उजळ असलेला तो जीव अनिवार शोकाने घशा-काळजात भरून आला. “आपलं उजाड कपाळ एवढ्या वर्षांनंतर भेटणाऱ्या युवराजांना कसं दाखवावं?” या एकाच कोंडीनं पुतळाबाई घुसमटल्या होत्या! तशाच उभ्या होत्या.

पावलागणिक टपकणाऱ्या आसवांचे भान नसलेले संभाजीराजे पुढे होत पुतळाबाईच्या जवळ जाऊन कळवळून म्हणाले, “आम्ही – आम्ही आलोत मासाहेब.”

पदराने डोळे निपटीत पुतळाबाई वळल्या. त्यांचा केतकरंगी फटफटीत मळवट बघताना कुणीतरी तेगीचे धारदार टोकच आपल्या छातीवरून आडवे ओढल्यासारखे संभाजी राजांना वाटले. क्षणापूर्वी बांधलेले मन त्यांच्या कब्जातून निसटले. “आबासाहेब आपल्याबरोबर केवढं मोलाचं काहीतरी घेऊन गेलेत!’ या विचाराने तर ते उजाडपणाच्या भावनेने शहारलेच!

मस्तक चरणांवर ठेवण्यासाठी वाकू बघणाऱ्या संभाजीराजांना थोपवून मिठीत घेत पुतळाबाई उमसल्या, “असं कसं झालं हे युवराज! स्वारी तुम्हा-आम्हाला न भेटता गेली! हयात वाया झाली! आता जीव थकला!” त्या ममतेच्या मिठीत संभाजीराजांना बाटले, “आम्ही – आम्ही तुमच्या पोटीच उपजतो तर…. ‘कसल्यातरी विचाराने शोकावेग आवरल्या पुतळाबाईंनी धरल्या खांद्यांनी संभाजीराजांना तसेच समोर घेतले. गर्दन खाली घातलेल्या युवराजांना त्या बांधील बोलल्या, “मान वर घ्या.”

संभाजीराजांनी मासाहेबांच्या नजरेला नजर दिली. क्षणापूर्वी वरच्या आभाळासारखी दाटून आलेली मासाहेबांची नजर आता पार निवळली होती. त्यांच्या डोळ्यांत जसे दोन सूर्यच उतरले होते.

“आम्हास “मासाहेब ‘ म्हणता. एक मागणं ऐकता आमचं?” त्या आवाजाला थेट महाराजांची झाक आली होती.

गले “जी. मागणं का, आज्ञा व्हावी.” तसली पोच नसलेले संभाजीराजे अदबीने बोलून

“न.

“तर मग ही आमची पहिली आणि शेवटची आज्ञाच माना. आईच्या माळेवर हात ठेवून सांगा ती पाळू म्हणून.”

“जी, पाळू.”

“शंभूबाळ, स्वारी गेली आता – आता जिणं संपवावं म्हणतो आम्ही!! आम्ही स्वारीच्या मोजड्यांची दौलत उराशी घेऊन अग्री भक्षण करणार! सती जाणार! सिद्धता करा.” दालनाच्या पोकळीत नजर रोवलेल्या पुतळाबाई मूर्तीसारख्या दिसू लागल्या, प्रतापगडाच्या मंदिरातील! निश्चल, निर्धारी.

उतरत्या निशाणासारखे ढासळलेले संभाजीराजे त्यांच्या पायाभोवती मिठी घालत हताश स्फुंदताना म्हणाले, “काय बोललात हे मासाहेब! कसली आज्ञा केलीत ही आम्हाला!” त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या वरच्या मूर्तीला यातला एकही शब्द काही ऐकू जात नव्हता.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment