धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३९ –

रायगड उतरलेले हंबीरराव कऱ्हाडच्या आणि आनंदराव सातारच्या रोखाने एकमेळाने निघाले. हंबीररावांच्या बरोबर “एकविचाराची जाणती मसलतही’ रायगडापासून दूर-दूर निघाली. मागे उरली कट-कारस्थाने!

पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजी राजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं, “आबा, चुकलं-माकलं आमचं आहे. तुमचं आम्ही काही राहू देणार नाही.” मनोमन हे म्हटले जाताच सभोवारच्या झाडांच्या घेरावरून कावळेच कावळे झेपावले. पिंडस्पर्श होतो न होतो, तोच तो फस्तही झाला.

अंत्यकर्म संपताच काय होऊ घातले आहे, याची स्पष्ट कल्पना असलेले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले. सज्जाकोठीत समोर बसलेल्या परशरामपंतांना त्यांनी कोकणसुभा रावजी पंडित यांना द्यायच्या खलित्याचा मजकूर सांगितला. “रा. रा. रावजी पंडित, कोकणसुभा तर्फ राजापूर यांसी अनेक दंडवत उपरी विशेष तर्फ राजापूर कडील दिवाणी जमली रसद, दाणागोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल, ते करावे. देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास प हुजूर भेटीस यावे.”

परशरामपंतांनी वाळू शिवरून ओली शाई टिपत खलिता बाजूस ठेवला. दुसरी वळी मेजावर उलगडती धरली.

कोठीच्या पायथ्याशी जमल्या मावळ्यांचा अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता. त्याच्याशी मेळ घालीत पायफेर धरून संभीजाराजे मजकूर सांगू लागले.

“राजश्रिया विराजित, सेनाधुरंधर, सकल गुणालंकृत सरलष्कर मामासाहेब मोहिते यांचे चरणांसी – युबराज शंभूराजे यांचे अनेक दंडवत, उपरी विशेष –

रायगडी तीर्थरूप आबासाहेबांचा काळ होवोन पंधरा दिवस लोटले. इकडे पन्हाळ्यास त्यांचे धर्मशास्त्राचे करणे ते आम्ही कार्यी लावले आहे. कानी आल्या खबरांवरून रायगडी माणसांचा बनाव घडतो आहे. प्रधानमंडळ अवघे एकमसलत जहाले आहे. महाराणी मासाहेब त्यास हातास धरून खलबतात आहेत. रामराजे यास मंचकारोहण करू म्हणतात. आम्हाला परके-एकले पाडू बघतात. जिवास धोका होईल, असा अंदेश पैदा जाहला आहे. तुम्हाखेरीज पाठीराखा अन्य नाही. तुम्ही पूर्वील, आबासाहेबांपासोन इमानाचे. आम्ही ज्येष्ठ असता, दौलतीस गनिमांचा घेर असता आम्हास बगलेस टाकणे हा कोण मामला? कुलदैवताच्या आणभाकेने इमान बरे रक्षून असणे. आम्हास जोड देणे. जे साहेबी केले असते, तैसेच करून चालविणे. तुम्ही आम्हास त्यांच्या ठायीच आहात. बहुत काय लिहिणे? जाणिजे.”

शृंगारपूरच्या पिलाजीमामांनाही – “समय बाका आहे. सुभे प्रभानवल्लीची जमाव शिबंदी एकजाग करून बरे सिद्ध असणे.” असा खलिता तयार झाला.

महाराज गेल्याची वार्ता ऐकून कोल्हापूर, राजापूर, मलकापूर, रांगणा, वबारणखोरे, सामानगड, विशाळगड अशा भागांतून रोज मावळ्याचे तांडे युवराजांना मुजरा देण्यासाठी पन्हाळगड चढत होते. त्यांचा ओघ बघून सावध झालेला हिरोजी फर्जंद कोकणपट्टीत निसटला होता.

जमल्या मावळ्यांतील निवडक माणसे उचलून संभाजीराजांनी किल्लेदार विठ्ठलपंत, बहिर्जी इंगळा, सोमाजी व कृष्णाजी बंकी यांच्यावर हत्यारबंद चौकीपहारे चढवून पन्हाळा पटात घेतला होता.

अक्षय्य तृतीयेला आदली रात्र ‘उद्या काय घडणार?’ याची चिंता करीत उतरली.

पन्हाळ्यावर काय घडले आहे, याचा काहीच मागमूस नसलेले कटवाल्यांचे खलबत दरुणीदालनात बसले. दालनाच्या बंद दरवाजावर कान्होजी भांडवलकरांच्या हत्यारबंद धारकऱ्यांचा कडेकोट पहारा फिरू लागला. आत महाराणी सोयराबाई बसलेल्या. बैठकीसमोर अण्णाजी दत्तो, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ हे मंत्रिगण, हवालदार कान्होजी भांडवलदार, जासुदांचा नाईक खंडोजी, गणोजी कावळा, शहाजी भोसला असे कटवाले फेराने उभे होते.

“उदईक अक्षय्य तृतीया आहे. दिवस मुहूर्ताचा आहे. बाळराजांच्या मंचकारोहणास योग्य आहे.” अण्णाजींनी सलामीची आघाडी खोलली.

ज्यांच्यासाठी हे तालेवारांचे खलबत बसले होते, ते रामराजे आपल्या सुखदालनात शांत झोपी गेले होते.

“पण अण्णाजी, या मसलतीत सरलष्कर असते तर बरं होतं.” मोरोपंतांनी चिंता व्यक्त केली. “आता नसले तरी राज्याभिषेकास ते येतील, असे पाचारण करू.” दूरची स्वप्ने बघणाऱ्या सोयराबाई खलबत फुटू द्यायला तयार नव्हत्या.

“युवराज ज्येष्ठ आहेत. उद्या त्यांच्या ज्येष्ठपणाचं कारण पुढं करून कुणी अदावत घेतली तर काय करणार आपण? खुद्द हंबीररावच त्या विचाराचे दिसतात.” मोरोपंत पुढे

जे-जे आडवे येणार असे वाटत होते ते-ते बोलू लागले.

“युवराज ज्येष्ठ असतील; पण प्रत्यक्ष स्वामी हयात असता ते दिलेरला सामील होतात, मग त्यांच्या पश्चात मस्तकी छत्र आल्यावर ते काय करतील याचा भरवसा कुणी द्यावा? स्वभाव तेज, लहरी आहे त्यांचा! कारभारी मामला आणि माणसं यांचा मेळ पाडणं नाही साधणार त्यांना.” अण्णाजी जाळे विणू लागले.

“पण बाळराजे अजाण आहेत. दौलतीचा व्याप मोठा आहे.” प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले.

“शिवाय गनिमांचा चारी तर्फांना घेर आहे.” राहुजींनी त्यांचा सूर उचलून धरला. “बाळराजे अजाण आहेत, ते तर साफच आहे. त्यांच्या नावे सिक्कामोर्तब करतील त्या महाराणी साहेब तर जाणत्या आहेत. कैलासवासी स्वामींनी हे राज्य अजाण वयातच उभे केले, तेही जाणत्या आऊसाहेबांच्या बळावर!” अण्णाजींनी सोयराबाईंचा पाट जिजाऊंच्या पंक्तीला मांडला!

“पण कैलासवासी स्वामींची अंतिम इच्छा काय होती, ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण करतो आहोत, त्याला रयतेची मान्यता कशी लाभावी?” मोरोपंतांनी मुळाला हात घातला.

“आमच्या बाळराजांच्या लग्नकार्याला स्वारीनं पन्हाळगडी आवतन धाडलं नाही, यातच त्यांची इच्छा दिसत नाही काय?” सोयराबाईंनी सुरेख पलटी मारली.

“खलिते धाडूनही युवराज रायगडी पडल्या छत्रपतींना भेटायला येत नाहीत, यात त्यांचाही इरादा स्पष्ट होत नाही काय?” अण्णाजींनी त्या पलटीला जोड दिली.

“पण युवराजांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर हे मांडलं तर – कुणी सांगावं ते समजुतीनं घेतीलही!” मोरोपंत हे बोलताना चाचरले; पण बोलले.

“काय बोलता तुम्ही पेशवे? त्यांना इथं इतमामानं आणणं, हे आपल्या हाती निखारे ओढून घेणं आहे अंगावर! तसं घडणारच असेल तर… तर आम्ही सुरनिसीची वस्त्रं

उतरून या सेवेतून मुक्त होऊ!” अण्णाजींनी हातचा बाहेर काढला. “आणि आम्हीही आमचं महाराणीपद रायगडीच ठेवून थेट तळबीडची वाट धरू.” सोयराबाईंनी त्या हातच्यात आपला बिनतोड एक मिसळला.

“स्पष्ट सांगतो आम्ही, युबराज गादीवर येण्यास पात्र नाहीत. ते स्वामी होण्यात दौलतीला धोका आहे. आम्ही स्वामींचं अन्न भक्षण केलं आहे. त्यांच्या दौलतीला गोता

देण्याचं पाप आम्ही करणार नाही. रामराजे स्वामी होण्यातच राज्याचं हित आहे.” अण्णाजींनी डळमळीत मोरोपंतांना, विणल्या जाळ्यात पुरते गुंडाळले. तरीही मोरोपंतांनी मोलाची शंका बोलून दाखविली, “हे पटतं आम्हास; पण पन्हाळगडी राहून युवराज हे स्वस्थपणं बघतील, याला मान तुकवतील असं कसं धरून चालता तुम्ही अण्णाजी?”

“वास्तविक फितव्यानं गनिमाला सामील होणाऱ्यांना स्वारीनं माफ कसं फर्मावलं याचंच कोडं वाटतं आम्हाला!” युवराज बारस तर नाहीतच; पण ते ‘शिक्षापात्र गुन्हेगार’

आहेत, हे सोयराबाईंनी आडवळणाने सुचविले. “पंत, जे मायेपोटी स्वामी करू शकले नाहीत, तेच आपणाला कठोरपणानं करावं लागणार आहे. तुमची-आमची भेट होती, तर जे स्वामींनी सर्वप्रथम करण्याची आज्ञा

आपणाला दिली असती, तेच करावं लागणार आहे.” धडक मारण्यापूर्वी गवा रेडा पायखुरांनी माती उकरतो, तसे अण्णाजींनी शब्द उकरून काढले.

“म्हणजे? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते सुरनीस?” मोरोपंत गोंधळून म्हणाले.

“रामराजांना मंचकारोहण करताच फौजबंदीनं पन्हाळा घेरून युवराजांना जेरबंद करून महाराणींसमोर आणावं लागेल! त्याच करतील त्यांचा काय तो आखरी निवाडा.” अण्णाजींच्या मनात साठून-साठून घट्ट झालेले गरळ बाहेर पडले.

“सुरनीस -” मोरोपंत अंगभर थरथरत चीत्कारले.

“होय. आम्ही पुन्हा तेच म्हणतो. युवराजांना जेरबंद करूनच आणावं लागेल. पंत, एका म्यानात दोन हत्यारं राबत नसतात. रामराजांना गादीवर बसवून युवराजांना खुलं

सोडू म्हणाल, तर ते तुम्हा-आम्हाला काय खुद्द रामराजां नाही सुखाची झोप लागू देणार नाहीत! सर्वांत अधिक धोका त्यांना आणि महाराणींना पोहोचेल. आम्ही चांगलं जाणतो युवराजांना.” अण्णाजींच्या बोलण्याने मोरोपंतांसह सारे सुन्न झाले. खलबताच्या एकाच टप्प्याचा विचार सर्वांनी केला होता. अण्णाजींच्या तोंडून त्याचा दुसरा टप्पा खुला होताच सारे चमकले. गंभीर झाले.

“स्वामींच्या दौलतीच्या बऱ्या निर्गतासाठी रामराजांना मंचकारोहण करणं जसं महत्त्वाचं आहे, तसं हेही अटळ म्हणून करावं लागणार आहे. धमक नसेल, तर या फंदात न

पडता दौलतीचं भवितव्य दैवावर सोपवून आपापल्या बतनावर जावं सर्वांनी.” अण्णाजींनी कौशल्याने सर्वांना कर्तव्याची जाण दिली.

मोरोपंतांना आता कळून चुकले की, आपण दलदलीच्या पाणंदीमध्ये निम्म्यावर फासला काटला आहे! इथून परतणे शक्‍य नव्हते. कारण जे “युवराजांना बंदिस्त करू’ म्हणतात ते पेशव्यांना प्रसंगी अंधारकोठीच दाखवायला कमी कसे करतील? हे सोडून युवराजांकडे जावे, तर ते बदनाम! एकच मार्ग उरेल, वस्त्रे उतरून मुक्त होणे. या बिकट

प्रसंगी कै. स्वामींचे राज्य टाकून मुक्त होणे, हे कसले इमान ठरेल? मोरोपंत पार गोंधळले. दलदलीची पाणंद चालण्यावाचून मार्गच नव्हता. खूप विचार करून ते बोलले, “ठीक आहे अण्णाजी! आम्ही सहमत आहोत या मसलतीला.” ते ऐकताना सोयराबाईंचा चेहरा झळझळून उजळला.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here