धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३८ –

“सरलष्कर सरकारांचे बंधूच आहेत. ते रामराजांच्या पाठीशी मामासाहेब म्हणून उभे राहतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. इतरांची आम्ही समजूत पाडू. युवराज रायगडी स्वामी म्हणून येण्यात धोका आहे. जे करणं असेल ते तातडीनं आणि गुसपणं करावं लागेल. बाळराजांना मंचकारोहण करून कारभारी सूत्रे महाराणींनी आपल्या हाती घेतल्याखेरीज राज्याची बरी निर्गत लागणार नाही. या वेळी आपण खंबीरपणं धीर बांधून असावं.”

“आम्ही खंबीरच आहोत. तुम्ही अवघ्यांसह बाळराजांच्या पाठीशी असा म्हणजे झालं.”

“कुलदैवताच्या आणभाकेनं आम्ही ते करू. निर्धास्त असावं.”

सोयराबाईंच्या राजगळाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वांत सुळसुळता मासा लागला. हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता. आपल्या अजब अक्कलहुशारीने जाळे विणणारा होता! छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता, युवराज असता संभाजी राजांना बगलेला टाकून रामराजांची गादीवर स्थापना करण्याचा घाट अण्णाजींनी का घालावा? त्याला अनेक कारणे होती. एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्यामुळेच नाहक खर्ची पडली हा ठाम सल त्यांच्या मनातून हलता हलत नव्हता. तसाच धारावसुलीच्या आपल्या तर्फेच्या अधिकारात युवराजांनी वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजांच्या हाताखाली सुरनिशी चालू राहील की नाही, चालू राहिली तरी पुऱ्या अधिकाराने राबविता येईल की नाही, ती कायम हाती टिकेल की नाही, याची त्यांना शाश्वती नव्हती. रामराजे स्वामी होण्यात मात्र तेच महाराणीचे प्रमुख सल्लागार राहणार असण्याची शक्‍यता होती.

सोयराबाई तर संभाजीराजांच्या मागे महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच हात धुऊन लागल्या होत्या. शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने सोयराबाई आणि सुरनीस अण्णाजी दत्तो यांची हातमिळवणी ओघानेच झाली.

संध्याकाळी नाशिक-त्र्यंबक भागातून आलेले पेशवे मोरोपंत रायगडावर आले. तेही महाराणींच्या भेटीसाठी सातमहालात रुजू झाले. महाराजांविना सुना-सुना वाटणारा बालेकिल्ला बघून त्यांच्या मनात कालवाकालव दाटली होती. सांत्वनाचे चार शब्दही त्यांना महाराणींना सांगवेनात. तोंडावर उपरणे घेत ते लहान मुलासारखे कोंदटते गदगदले. त्यांचा उमासा सुमार होताच सोयराबाई त्यांना म्हणाल्या, “तुम्हीच असा धीर टाकलात तर आम्ही कुणाकडं बघावं पंत? या बाळराजांना कोण देणार पाठबळ? आम्ही तर उजाडच झालो. काय करावं समजेना झालं आहे!” सोयराबाईंच्या शब्दाशब्दांनेच मोरोपंतांच्या पोटात रायगड चढतानाच पडलेला खड्डा दुणावत चालला. डोळे टिपून मान लववीत ते बांधील बोलले, “खाशांनी काळीज टाकू नये. आम्ही पाठीशी आहोत.”

“तोच आधार आहे. तुमच्याकडून हीच उमेद राखून आहोत आम्ही. अण्णाजींची भेट घ्या. जे करणं ते त्यांच्या तुमच्या एक विचारे करा. आम्ही काय सांगणार?” जे सांगायचं होते, ते सांगूनही सोयराबाई नामानिराळ्या झाल्या!

“एकविचार’ पूर्वीच झाला होता. सोयराबाई आणि अण्णाजींचा! प्रधानमंत्री असलेल्या मोरोपंतांना त्यात कसबाने सामील करून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येणार नव्हते. शेवटी मोरोपंत दौलतीचे शिक्केधारी पंतप्रधान होते.

उदास-उदास रायगडावर खिन्न काळी रात्र उतरली. ती उजळायला असमर्थ असलेले टेंभे शिलगले. मंत्रिवाडीतील अण्णाजींच्या वाड्यात मोरोपंत आणि अण्णाजींचा मध्यरात्रीपर्यंत खल चालला. दुमन झालेले मोरोपंत पक्‍क्‍या निर्णयाला येत नव्हते. अण्णाजी आपल्या बुद्धीचे सारे कसब पणाला लावून रामराजांचा पक्ष त्यांच्या गळी उतरवीत होते. मोरोपंतांनी जरी ठाम निर्णय अद्याप दिला नव्हता, तरी त्यांचाही कल अम्मळ रामराजांकडे झुकला होता.

वद्य पंचमीच्या दिवसफुटीला रात्रभर पाचाडात मुक्काम केलेले हंबीरराव रायगड चढू लागले. ते पुतळाबाईची भेट घ्यायला विसरले नव्हते. महाराज आजारी पडल्यापासून काय-काय नि कसे घडत गेले याचा तोंडवळा त्या भेटीत हंबीररावांना उमगला होता. महाराज गेल्याचे जेवढे दुःख त्यांना वाटले होते, तेवढेच महाराणींची बुद्धी पालटल्याचे.

त्यांच्या मागाने इमानाची माणसे परतत असल्याचे त्यांना वाटले. गडावर येताच हंबीरराव महाराणींच्या भेटीसाठी सातमहालाच्या दरुणीदालनात दाखल झाले. त्यांना बघताच श्वेतवस्त्रधारी सोयराबाई फुटफुटून रडल्या. महाराजांच्या आठवणीनं हंबीररावांचे डोळेही पाघळू लागले. एवढा पहाडदिल नेटाक गडी पण धन्यांच्या आठवानं लहान बन्चागत हुंदकला. रामराजांना जवळ घेत सोयराबाई घोगरे म्हणाल्या, “आमचं एक राहू द्या. तुमच्या या भाच्यांना – बाळराजांना कुणी धीर द्यावा? बरं झालं तुम्ही गडावर आलात ते. आमचा घोर थोडा तरी मिटेल आता, नाहीतर एवढ्या दौलतीची जोखीम कुणाच्या बळावर पत्करावी यांनी?” सोयराबाईंनी हंबीररावांना कसबानं चाचपून बघितले.

छत्रपतींचे श्राद्धकर्म होण्याअगोदरच महाराणी दौलतीचा विषय काढतील, असे काही हंबीररावांना वाटले नव्हते. त्यांनाही गडावरच्या माणसांना खूप विचारायचे होते.

“गडाचे दरवाजे बंद का होते? धनी पडून असताना आम्हाला साधी खबर ती का नाही मिळाली? छत्रपतींना शेवटचा अग्निदाह भडाय़रीनं कसा काय दिला सर्वांनी?’ पण हे विचारण्याची वेळ नव्हती, हे हंबीररावांना जगल्या हयातीने शिकविले होते.

रामराजांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटीत हंबीरराव सोयराबाईंना समन्वयाचे भान देण्यासाठी म्हणाले, “ह्ये आणि युवराज म्हंजे धन्यांच्या दोन डोळ्यांगत हाईत.

त्येश्री बलवून घेऊ पन्हाळ्यावरनं. काय करायचं ते युवराज, पेशवे, सुरनीस, न्यायाधीश, येसाजीकाका, तुम्ही-आम्ही मिळून करू. धनी ग्येल्याचं बगून चौतर्फांचा गलिम आता उचल खानार. धन्यांचं शास्त्र-धर्माचं हुंद्या सम्दं. मग ठरवू सम्दं.”

सोयराबाईनी रायगडावर बसून चार पावसाळे काढले असले, तरी हंबीररावांनी मरण पाठीशी टाकून दौलतीसाठी वणवण मुलूखभर दौडत चार उन्हाळे सोसले होते! ते इमानाचे आणि बिनतोडीचे बोलले होते.

त्यांच्या मनसुब्याची दिशा ध्यानी येताच सोयराबाई सावरत सावध झाल्या. आपल्या बेतात हंबीरराव सामील होणार नाहीत, हे त्यांनी ताडले. उलट हंबीरराव, हाताशी लागणारी अण्णाजी, मोरोपंत ही माणसे फोडतील, या शंकेनेच त्यांच्या मनी फणा उठविला. हंबीररावांना रायगडावरून टाकोटाक दूर कसे उचलावे, हा विचार घोळत असताना सोयराबाई वरवर म्हणाल्या, “आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर नाही. जे करणं असेल ते तुमच्या मसलतीनंच करू. बाळराजे, मामासाहेबांचे पाय शिवता?” सोयराबाईंनी हंबीररावांच्या मनातील रक्ताचे नाते, शेवटचा यत्न म्हणून तपासून बघितले.

पाय शिवण्यासाठी वाकू बघणाऱ्या रामराजांना वरच थोपवीत हंबीरराव म्हणाले, “नगं. ह्ये काय करता भलतंच! तुमी बाळराजं म्हून धन्यापोटी उपाजला तवाच चाकर जालो आमी तुमचं. खासगतीचं नातं तवाच सरलं. आमचा मुजरा घ्यायचा तुमी.” आणि महाराणी-रामराजांना मुजरा देऊन हंबीरराव बाहेर जायला निघाले. त्यांच्या धिप्पाड पाठीवर सोयराबाईंची जळजळीत नजर पलित्यासारखी फिरली. तिने रक्ताच्या नात्याचे अंकुर जाळून टाकले. बांधल्या बेतातून सोयराबाईंनी हंबीररावांचे नाव स्वहस्ते फुली मारून पुसून टाकले.

वर्दी पाठवून त्यांनी प्रथम अण्णाजींना बोलावून घेतले आणि आपल्या सुरेल राजबोलीत त्यांना कानमंत्र दिला, “सरलष्कर पाठीशी उभे राहतील; ते होणार नाही. त्यांना आम्ही श्राद्धकर्म झालं की, कऱ्हाडप्रांती कूच होण्याचा हुकूम देणार आहोत. त्यांच्यापासून बरं सावध असणं.”

अण्णाजी ते ऐकताना चिंताग्रस्त झाले. पाठीशी सेनाबळ असलेल्या हंबीररावांची “सरलष्कर’ म्हणून ताकद ते जाणून होते. तरी त्यांना विश्वास वाटला की, एकदा रामराजांचा मंचकारोहण पार पडला की, हंबीरराव आडवे जाणार नाहीत. त्या जोरावरच ते सोयराबाईंना म्हणाले, “आम्ही हरकोशिस करू त्यांना वळते करण्यासाठी. महाराणींनी निर्धास्त असावं. विधी होताच ते कऱ्हाडप्रांती गुंतले राहतील, असं मात्र करावं!”

अण्णाजींनी मसलतीतल्या असामींना गाठून हंबीररावांचा कल सामील होण्याकडे नाही, हे कानी घातले. मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी सारे हंबीररावांशी भेटागाठीत जेवढ्यास तेवढे आणि जपून बोलू लागले.

चैत्र वद्य द्वादशीला महाराजांचे श्राद्भकर्म सुरू झाले. साबाजी व परसोजी भोसले यांच्या मदतीने रामराजांच्या हस्ते छत्रपतींना पिंडदान देण्यासाठी राजोपाध्ये काळ्या हौदावर तिष्ठले होते. भोवतीच्या करंज्यांच्या झाडांवर काळे पक्षी दाट-दाटून कलकलाट करीत होते; पण पिंडस्पर्श घेण्यासाठी एकही उतरत नव्हता!

श्राद्धविधीच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या प्रहराला हंबीररावांना सातमहालाची वर्दी आली. ते महाराणींसमोर दाखल झाले, तेव्हा तिथे येसाजी कंक, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत होते. हंबीररावांचा मुजरा घेत सोयराबाई नेहमीच्या सदरी भाषेत म्हणाल्या, “या सरलष्कर, सारे तुमचीच वाट बघताहेत.” जी

“काही मनसुब्यानं याद केलं तुम्हाला. तुम्ही म्हणाला त्या विचारानं आम्ही बेचैन आहोत. आता गनीम चौतर्फेने उचल खायची भीती वाढली आहे. तुम्ही जेवढे कदीम आहात, ते आपापल्या मुलखावर ठाण घेणं. आनंदराव, रूपाजी, तुम्ही सातारातर्फ जवळ करा. येसाजी, तुम्ही दहा हजारांची फौज पाचाडात एकजाग ठेवा. सरलष्कर, तुम्ही टाकीनं कऱ्हाडप्रांतावर उतरून आपला जमाव सिद्ध ठेवा. पंत, अण्णाजी, तुम्ही आपापले मुलूख जवळ करा.” महाराणींचे हुकूम झेलीत “जी” म्हणत पगड्या सरासर झुकल्या.

वर होत हंबीरराव मान खोलण्यासाठी म्हणाले, “…पर इथली निर्गत कशानं कशी करायची हाय? बारदाना मोट्टा. सम्दं फुडं ध्यान देऊन व्हाय पायजे.”

“ते तुम्हा साऱ्यांच्या मसलतीनं निवांत करू. या क्षणी गरज आहे, ती मुलूख राखण्याची. आजच निघावं साऱ्यांनी.”

“जी.” हंबीररावांसह सारे हुंकारले. सोयराबाईनी बैठक सोडली. सर्वांना विडे देण्यात आले. ही सदर हंबीरराव, आनंदराव यांना रायगडावरून बाहेर काढण्यासाठीच होती. अण्णाजी आणि मोरोपंत मागेच राहणार होते.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here