धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३७ –

आज पहाट धरूनच पन्हाळगडावर खबर कोसळली होती. रायगडाने दाबून ठेवण्याचा कडेकोट कट बांधला होता, तरी पाचाडहून पुतळाबाईमार्फत आणि कऱ्हाड प्रांतातील तळबीडच्या तळावरून हंबीररावांमार्फत ती पन्हाळगडावर पोहोचली होती. पुतळाबाईंनी खासा हारकारा धाडून कळविले होते, “आज ऐन मध्यान्ही आवस झाली. आमचे कुंकुबळ थकले. तुम्हा-आम्हाला उघडे टाकून स्वारी सुख झाली. गडावर गैरमेळ पडला आहे. अंतकाली स्वारींना मंत्राग्री तोही पावला नाही. बुध फिरल्याने भडागय्रीवर सांगता झाली आहे! प्रसंग बाका आहे. धीर रक्षून असणे. जे करणे ते सावध चित्ती विचाराने करणे. माणसे पुरी पारखून जवळ धरणे. आम्ही तुमच्या वाटेला डोळे जोडून आहोत. आई जगदंबेच्या इच्छेवर अन्य जोर नाही. उदंड बोलणे आहे ते भेटीत.”

हंबीररावांनी कळविले होते, “धनी दौलतीला पारखे झाले. आम्ही रायगडी कूच करतो आहोत. काळीज टाकू नगा. आम्ही पाठीशी आहोत.”

जिव्हाळ्याच्या माणसांनी “धीर टाकू नको’ म्हटले, तरी धीर खचावा असाच प्रसंग आला होता. चालते- बोलते, हसऱ्या मुखाचे आबासाहेब आता या जगात नाहीत, हे सत्य मानायला संभाजीराजांचे मनच घेईना. कितीही हापसले तरी दर्याकाठच्या वाळूतील खड्ड्याचे पाणी हटता हटत नाही, तशा न हटणाऱ्या आठवणीच आठवणी त्यांच्या मनात दाटून येऊ लागल्या. एखाद्या प्रसंगी, सर्व बाजवांनी आयुष्याचे केवळ फोलपणच माणसाला जाणवते. तसेच ते संभाजीराजांना जाणवू लागले. नियतीचा सर्वांत जबर तडाखा खाल्लेले संभाजीराजांचे बंबाळ मन चौवाटांनी सैराट धावू लागले. शोक, खंत, विरह, असहाय्यता, संताप, उपेक्षा, अवमान, उद्गेग या विचित्र भावनांचे अनावर कढ उकळू लागले.

“गेले – आबासाहेब गेले! न भेटता-बोलता, आमचीच हाय खाल्ली त्यांनी. पहाडासारखा पुरुष आमच्याच करणीनं काळीजदेठात खचला. आम्हाला सर्वांत कडी सजा फर्मावून गेला… आबासाहेब, आसगण असून फसवून गेलात! का! कसे?

“शरम – शरम वाटते तुमची आम्हाला” असं कडवं सुनावण्यासाठी तरी एकवार दर्शन द्यायचं होतंत आम्हास!

“गडाचे दरवाजे बंद करणाऱ्या शहाण्यासुरत्यांनो, गडावर पालाण घालायला तेवढंच कसं रे विसरलात? जौहरचा वेढा फोडणारे, आग्रा कोठीतून निसटलेले आबासाहेब बरच्यावर हूल देतील, हे ध्यानी कसं आलं नाही तुमच्या? कसली पुण्याई गाठीशी बांधलीत ही?

“आता कुणाच्या तोंडून “शंभूराजे – लेकरा’ अशी चिंब मायाभरली साद आम्ही ऐकावी? साक्षात अष्टभुजा भवानीच समोर उभी करणारा “’जगदंब’ हा आईचा बोल आता कुणाच्या तोंडून आमच्या कानी पडावा? कुणाची पायधूळ आम्ही मस्तकी धरावी? त्या मावळमाचीवर कुणासोबत उभं राहून पाचाडच्या सदरेचं दर्शन घ्यावं? कशासाठी आता आम्ही रायगडाचं तोंड बघावं? सिंहासनासाठी? त्या दगडधोंड्याच्या दौलतीसाठी? छे होणं नाही!

“कसली माणसं वावरताहेत रायगडावर? ज्या आबा साहेबांनी मावळ्यांना “हर हर महादेव’ हा मरणाचा महामंत्र दिला, त्यांना अंती मंत्राग्रीही दिला नाहीत! अरे, तुम्ही दिलेला भडागय़री इथं आमच्या उरात भडकतो आहे! आलो तर त्यासाठीच येणार आहोत आम्ही रायगडी – हिसाब पावता करायला.

“मराठी दौलतीचे छत्रपती म्हणजे पोरखेळ वाटला की काय तुम्हाला? त्यांना खुशाल प्याद्या-फर्जांनी कोंडून टाकावं? तो इमानदार रायगड ढसढसला असेल तुमच्या साऱ्या करण्या बघून!

“आम्ही आबासाहेबांच्यावर रोष धरला होता तो साफ-साफ होता. उघड होता सूर्यप्रकाशाएवढा. पडत्या क्षणांनी आम्हाला वाहतीला लावलं, तरी थोर दिलानं त्या जाणत्या पुरुषानं आम्हाला छातीशी लावलं. त्यांना दिल्या यातनांच्या पश्चात्तापाहून आम्ही बाहेर पडतो न पडतो तोच आमचं, आमचं समजून घेणारं एकटं स्थान असलेले आबासाहेबच आमच्यापासून छिनावलेत! शोकाच्या दरीत फेकलंत आम्हाला? कसं फेडाल हे? त्याचाही एक नमुना दावला पाहिजे कम्बख्त असतील त्यांना! कशासाठी आलो आम्ही युवराज म्हणून जन्माला? दाबल्या तोंडी बुक्‍क्‍्यांचे तडाखे खाण्यासाठी? हे असे जन्मदात्याला शेवटच्या क्षणी पारखे होण्यासाठी?

“थोरल्या आऊ, तुम्ही असतात तर, आमचं पोरकं तोंड तरी आम्ही तुमच्या कुशीत ठेवलं असतं. पण – पण त्या असत्या तर त्यांनाच या प्रसंगी थोपटून शांत करण्याचा प्रसंग येता आमच्यावर! नाही! आमच्या थोरल्या आऊसाहेब गेलेल्या नाहीत! दगडी काळजाचा मृत्यूही त्यांना नेऊ शकत नाही! आम्ही स्पष्ट ऐकतो आहोत त्यांचे बोल – “शंभूबाळ, युवराज, शांत व्हा! धीर ठेवा.” त्यांचे आकाशी हात आमच्या पाठीवरून फिरताहेत. प्रत्यक्ष आबासाहेबच आपल्या हातांनी आपली लाडकी भवानी तलवार आमच्या कमरेत आवळताहेत! थोरल्या आऊ हसल्या मुखी सरशीनं आमच्या कपाळी शिवगंध रेखताहेत! तळहाती दह्मयाच्या कवड्या ठेवताहेत! नाही आम्ही शोक करणार नाही. पोरकं मानणार नाही स्वत:ला. त्या असंख्यांची कुरवंडी करून उठविलेल्या “श्री’च्या राज्याला उघडं पडू देणार नाही. ही दौलत कोत्या, कारस्थानी हातांखाली कदापिद्दी जाऊ देणार नाही. पाचाडच्या मासाहेब, आम्ही सावध झालो आहोत. आबासाहेबांचा भगवा जरीपटका आम्ही घेतला आहे खांद्यावर! आता आण आहे, ती त्यांची आणि भवानीची.

“जी काळीज तोडणारी जीवघेणी खंत आम्ही आबासाहेबांना दिली तिची भरसक भरपाई करणार आहोत आम्ही. प्रसंगी कुडी ठेवण्याची सजा पत्करूनही! कसला सिद्दी, कुठला टोपीकर आणि काय जातीचा औरंग आहे, ते बघणारच आहोत आम्ही!’ छातीवरच्या कवड्यांची माळ संभाजीराजांच्या मुठीत एकदम घट्ट आवळली गेली.

खंबीर मनाने, शांत हाताने त्यांनी सुखदालनाचा आडबंद परतवून दरवाजा खोलला. नवा रानवारा झपकाऱ्याने आत आला. बाहेरची हवालदिल माणसे युवराजांच्या सुजबट झाल्या डोळ्यांकडे बघतच राहिली. आता त्या डोळ्यांचा माग तसा सहजासहजी कुणालाच येणार नव्हता. रायगडावर लुप्त झालेले शिवपण त्या डोळ्यांच्या खोलवटीत अल्लाद पावलांनी उतरले होते!

“चिटणीस, चंद्रास खळं धरतं, ते केवळ महापुरुषालाच आपत्तिकारक नसतं. ते त्याच्या स्वप्नालाही घेर पडणार याचं सूचक असतं!” समोरच्या परशरामपंतांना संभाजीराजे विचारात टाकीत म्हणाले.

“रायाजी-अंतोजी, आज गडाची सांजनौबत ऐकलीत , तुम्ही?”

“न्हाई.” गोंधळला जाब आला.

“मतलब किल्लेदार विठ्ठलपंतांना महाराजांची खबर पावली आहे! तरीही ते आम्हाला भेटून ती कानी घालीत नाहीत! नजर ठेवा त्यांच्यावर.” संभाजीराजांकडे सारे बघतच राहिले. बालेकिल्ल्यात या वेळी विठ्ठलपंत रायगडाहून आलेल्या हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांच्याशी कानगोष्टी करण्यात गढले होते! सोयराबाईंनी रायगडाचा बंदोबस्त कान्होजी भांडवलकर आणि शहाजी भोसला सरनौबत यांच्या हाती दिला होता. जामदारखाने, दफ्तरखान्यांना आपल्या मोहरा ठोकल्या होत्या. हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना पुढील व्यवस्थेसाठी विठ्ठलपंतांना पोहोचवायचा कानमंत्र देऊन दिंडीदरवाजाने रायगडाहून पन्हाळ्याकडे पिटाळले होते.

शतरंज खेळीला पडला – पन्हाळ्याकडून संभाजीराजांचा आणि रायगडाहून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतलेल्या महाराणी सोयराबाई आणि त्यांचे हस्तक यांचा! महाराजांचे रक्षासंवर्धन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोकणपट्टीतून आलेले अण्णाजी दत्तो रायगड चढून आले. सांत्वनासाठी महाराणींची भेट घ्यायला ते सातमहाली त्यांच्यासमोर रुजू झाले. रिवाजांची बोलणी होताच सोयराबाईनी मतलबाला हात घातला – “स्वारी गेली. पुढील निर्गत काय याची धास्त पडली आहे आम्हास.”

“त्यासाठीच आम्ही एकधावेनं राणीसरकारांच्या सेवेत तातडीनं रुजू झालो आहोत. आपण सांगाल त्याचाच पाठपुरावा करू आम्ही. धीर ठेवावा.” अण्णाजी मान लववीत म्हणाले.

“तुमचा इतबार आहे आम्हाला. पण इतरांचं काय? आता पन्हाळा केव्हाही उचल खाईल. मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी आणि महत्त्वाचे ते सरलष्कर त्यांचं काय?”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here