धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३४ –

पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यातील खाशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते. त्यांच्या पायगती मांडलेल्या बिछायतीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती. किल्लेदार विठ्ठलपंत, हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोनाजी व कृष्णाजी बंकी, बहिर्जी इंगळे, बाबाजी ढमढेरे, सूर्याजी विचारे अशी मंडळी अदब धरून सदरेत उभी होती. कोल्हापूरहून आलेले जनार्दनपंत सुमंत आणि कोकणसुभ्याचे सुभेदार रावजी पंडित; आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे, या विचारात एका बगलेला खडे होते. त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते.

“जनार्दनपंत, असे पुढे या.” महाराजांनी जनार्दनपंतांना फर्मावले.

“जी.” म्हणत हात जोडून पंत बैठकीसामने आले.

“युवराज, हे कोल्हापूर तर्फेचे अधिकारी. आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही तुम्ही राहायचे आहे. हे कोकणसुभा रावजी पंडितजी तुमच्या दिमतीला राहतील.”

छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठविला.

“आज्ञा स्वामी.” म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला.

“स्वामी, एक पेच आहे. आज्ञा होईल तर…” रावजींनी आपल्या सुभ्याचा मुद्धा पेश केला.

“बोला, काय आहे?”

“राजापूर बंदरात टोपीकरांची काही गलबतं नांगर टाकून आहेत. त्यावरून कुणीच बंदरात उतरत नाही. गलबतंही हाकारीत नाहीत. काय करावं? येरगटावी?”

“बोला युवराज, तुमच्या अखत्यारीतल्या या मामल्याला तुम्हीच तोड सांगा कोकणसुभ्यांना!” महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घातले.

संभाजीराजे क्षणभर विचारात झाले. रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला, “गलबतं कुणाची आहेत? फिरंग्यांची, गोऱ्यांची, डचांची की फ्रेंचांची? काही अंदाज?”

“जी. फ्रेंचांची आहेत.” रावजींनी तपशील दिला.

“मग त्यांच्या गलबतांवर आपले खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील, तर दोस्ताना राखावा. ते आम्हाला हत्यारे पुरवितात.”

“बिलकूल ठीक.” महाराज समाधानाने हसले.

“युवराज, तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या रावजींच्या मदतीनं देख ठेवा.”

छत्रपतींची चर्या प्रसन्न होती.

“हे सोनाजी बंकी, बाबाजी, तुमचे कवी गुरू उमाजी पंडित पन्हाळगडीच तुमच्या तर्फेने राहतील. आमचा फेरहुकूम होईतो, हा पन्हाळाप्रांत रक्ष्न असा. दिलेर-सर्जा या भागाचा केव्हाही मोहरा धरतील त्याचा अंदाज ठेवा.”

सदरेतील प्रत्येक असामी ध्यान ठेवून महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती. सर्वांनाच जाणवत होते की, छत्रपतींचा आवाज नेहमीसारखा तडफेचा नाही. त्यांची चर्या सुमार आहे. गालापासून नाकाचा फेर वर उचलल्यागत दिसतो आहे.

“विठ्ठलपंत, मंडळींना विडे द्या. युवराज, चला शिवलिंगाचे दर्शन करून येऊ.” महाराज बैठकीवरून उठले. संभाजीराजांना बरोबर घेत महाराज बालेकिल्ल्या बाहेर पडले. मागून येणाऱ्या विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी यांना त्यांनी हातइशाऱ्याने दरवाजातच थोपते केले.

सांजावत आल्याने गडाच्या जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, चाफ्यांच्या गर्दाव्यात कलकलणारे पक्ष्यांचे थवे उतरत होते. नगारखान्यावरून उठलेली सांजनौबतीची दुडदुड पन्हाळ्याच्या रानावर उतरून थिरावत होती. पाठीशी कोणीच घेतले नाही त्याअर्थी आबासाहेब काही मनचे बोलणार आहेत, याचा संभाजीराजांना केव्हाच सासूद आला. पण ते काय बोलणार आहेत, याचा थांग मात्र काही त्यांना येईना.

शिवालयाची घुमटी आली. पुजाऱ्याने स्वाऱ्यांना नमस्कार केला. घुमटीपर्यंत येईतो, तिथे पुजारी असणार याचा विचार छत्रपतींना स्पर्शला नव्हता. क्षणात त्याला कसा हटवावा, हे त्यांनी बांधूनही टाकले. “पुजारी, सोमेश्वर टाक्‍्यावरच्या पिंडीच्या दर्शनास आम्ही येणार आहोत.

किल्लेदारांना याची वर्दी द्या. तुम्ही टाक्यावरच्या देवळात आमची वाट बघा.”

जी.” म्हणत पुजारी बालेकिल्ल्याच्या रोखाने लगबगीने निघून गेला. पितापुत्रांनी पायीच्या मोजड्या उतरल्या.

मावळतीला चाललेल्या तापदेवाला छातीशी हात नेऊन महाराजांनी वंदन केले. एकदा तो नार्रिंगी, पिवळा तेजोगोल डोळाभर बघून घेतला. “आत या.” असे संभाजीराजांना म्हणत छत्रपती घुमटीच्या दगडी चौकटीला टोप थटणार नाही, याची दक्षता घेत वाकून घुमटीत प्रवेशले. त्यांच्या मागून संभाजीराजे घुमटीत आले. बेलफुलांनी आच्छादलेली रंगरूपी पिंडी ठाणवयांच्या मंद प्रकाशात अभिषेकपात्रा तील एकलग थेंबावळ अंगावर घेत होती. पितापुत्रांनी गुडघे टेकून तिच्यासमोर माथे नमविले. वर होत हात जोडून नमस्कार घातले.

 

“शंभू, ही रंगरूपी पिंडी आहे. आम्हाला सांगत आलेली की, माणसाच्या हयातीलाही कैक रंग असतात, सुखदु:खांचे. ” पिंडीवर नजर जोडीत महाराज क्षणभर थांबले. “हिला साक्ष ठेवून आम्ही काय सांगतो आहोत, ते सावध चित्तानं ऐका. ही पिंड खालच्या शाळुंकेत ए झाली आहे म्हणूनच साजून दिसते. तुम्ही आणि रामराजे आम्हाला असेच वाटता. तुम्हा दोघांना आम्ही वेगळ॑ कधीच बघितलं नाही. दोन डोळ्यांसारखे आहात तुम्ही उभयता, आम्हाला आणि आमच्या रयतेलाही. ते अजाण आहेत, तुम्ही भरीचे आहात.

“आता अधिक काल आमचा भरोसा नाही. म्हणूनच जे स्वप्नीसुद्धा आम्ही कधी मनी आणलं नसतं, ते करणार आहोत. तुमच्या आणि राणीसाहेबांच्या मनाचा मेळ कधी पडणार नाही. जे त्यांच्या रागापोटी तुम्ही केलंत ते आमच्या माघारी उद्या केलंत, तर समजून घेणारं कुणीच असणार नाही. यासाठी… यासाठी या श्रींच्या राज्याची आम्ही वाटणी करणार आहोत!”

“आबासाहेब, आम्ही आणभाकेनं वचन देतो, आम्हाला काही-काही नको. हवे आहात फक्त तुम्ही. हे असं निरवानिरवबीचं का बोलताहात? आम्ही आपला शब्द आता कधीच पडू देणार नाही. कुठंही असलो तरी सावलीसारखे रामराजांच्या पाठीशीच असू. आपली तब्येत बघितल्यापासून मात्र आमचं मन उडालं आहे. काही सुचत नाही.”

“ते जाऊ दे. तब्येतीकडं बघण्याएवढा वखत आम्हा जवळ नाही. तुम्ही नको म्हटल्यानं दौलतीची जिम्मेदारी टळत नाही. युवराजपदाचा अभिषेक झाला आहे तुम्हाला. खरे तर साऱ्या राज्याचे वारस तुम्हीच आहात. पण महाराणी तुम्हाला ते लाभू देणार नाहीत. जे करून बसला आहात, त्यानं तुमचा इतबार प्रधानमंडळाला येणार नाही.

यासाठी कर्नाटक फाट्याचं तुंगभद्रेपासून कावेरीपावेतो जिंजीचं राज्य आम्ही तुमच्या अखत्यारीखाली देणार आहोत. गोदावरीपासून तुंगभद्रेपावेता उत्तरेकडील रायगडाचं राज्य रामराजांना सुपुर्द करणार आहोत. ते जाणते होईपर्यंत प्रधानमंडळ या राज्यावर देख ठेवील. या निर्णयानं तुमची आणि महाराणींची मतभेदांची कारणं निकाली पडतील. दृष्टिआड सृष्टी भली असते. बोला, यावर काय इरादा आहे तुमचा?”

“आबासाहेब, आमचे बोल मोल हरवून बसलेत. आम्ही सन्चेपणी आपल्या चरणांच्या शपथेवर कळवळून सांगतो आहोत. दौलतीचा काडीइतकाही विचार तो आमच्या मनी नाही. आम्ही रामराजांना परके मानीत नाही. आम्हाला आपणाला दिल्या यातनांची खंत हयातभर पुरेशी आहे. आपण स्वत:ला जपावं. एकट्या आम्हालाच नाही, तर असंख्यांना आपण पित्याच्या ठायी आहात. आमचं एकच मागणं आहे….”

“सांगा.”

“आपण ठरवून कुठंतरी निवांत स्थानी आराम घ्यावा. रायगडी आपणाला तो मिळणार नाही.”

“राजे, आता आम्हाला रायगडाशिवाय कोण आराम देणार? आमच्या आऊसाहेबांची छत्री तिथं गडपायथ्याला आहे. आता अधिक काळ तुम्हाला आमची चिंता नाही करावी लागणार! आम्हाला पन्हाळा सोडताना चिंता वाटते आहे ती तुमची – एक ऐकाल?”

“आज्ञा व्हावी.” संभाजीराजांनी महाराजांवर डोळे जोडले. एरव्ही महाराज बोलत असले की बोलतेच राहावे, असे त्यांना वाटायचे, पण का कुणास ठाऊक आज आबासाहेबांनी अधिक बोलूच नये, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या बोलण्याला गहिऱ्या दु:खाची, मनाची कातर करणारी गूढ छटा होती म्हणून.

“शंभूबाळ, आमचं हे सांगणं कधी झोपेतसुद्धा विसरू नका. एका मातब्बर गनिमाच्या – औरंगच्या तडाख्यातून तुम्ही दोनवार सहीसलामत सुटला आहात, पुन्हा चुकूनसुद्धा त्याच्या तावडीत फसण्याची गफलत कधी करू नका. आता आम्ही सांगेतो पन्हाळा प्रांत सोडू नका. आई जगदंब तुमचं भलं करणार थोर आहे. चला.”

संभाजीराजे घुमटीबाहेर पडण्यासाठी पुढे झाले. त्यांना हात आडवा टाकून रोखत महाराज शांतपणे म्हणाले, “शिवपिंडीची अर्धप्रदक्षिणा विसरलात! घ्या ती.”

अर्धप्रदक्षिणा घालून होताच शिवाजी महाराजांनी ओणवे होत, रंगरूपी पिंडीवरील एक बिल्वदल हलकेच उचलले आणि ते संभाजीराजांच्या तळाहातावर ठेवीत ते म्हणाले –

“तुम्ही उपजलात तेव्हा तुमची कुंडली मांडणाऱ्या ज्योतिष्यानं भाकीत केलं होतं – तुम्ही साक्षात रुद्राचे अवतार आहात. उंच गडकोटावर राहाल. प्रलय माजवाल – पण… पण -”

“पण काय महाराजसाहेब?”

“पण रुद्र जसा आप्तगणांकडून फसला, तसाच योग तुमच्या कुंडलीत आहे!

“तुम्ही वर्षांचे असताना एकदा आप्तगणांकडून फसलात. तुमच्या मासाहेबांकडून! युवराज झालात आणि फसलात तुमच्या थोरल्या आऊंकडून! कुणी सांगावं आम्हीही तुम्हाला फसवू! कडी सजा फर्मावू! आम्हाला विश्वास आहे तुम्ही रुद्र आहात, ती धीरानं पाचवाल!”

आबासाहेब केवढे गूढ बोलले, ते संभाजीराजांना किती कळले कोण जाणे! ते पितापुत्र शिवालयाबाहेर पडले. तेव्हा उभा पन्हाळगड धुक्याच्या पटलाने पार वेढून टाकला गेला होता!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here