धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३३ –

दगड-भिंतीलगत शरमिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते. आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली. छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली. तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले – “जिंकलात सह्याद्री? उठविलेत तुमचे आपले राज्य? झाले तुमच्या मनाजोगे मोगलाईत?

“या दौलतीचे युवराज असून, उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झालात! जे हात मुजऱ्यांसाठी आमच्यासमोर झुकले ते मांजऱ्याच्या पठारावर कलम झालेले कोडगेपणानं बघितलेत! पठाणांच्या नि तुमच्या धास्तीनं तिकोट्याच्या विहिरी- आडांत तीनशे अश्राप बायाबापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या. खुद्द तुमचा कबिला पठाणानं दस्त केला. शरम – शरम वा टते तुमची आम्हास! एवढीशी पापणीसुद्धा वरकड कस्पट डोळ्यांत घेत नाही. तुम्ही तर युवराज असून, कमरेला हत्यार वागविणारे पुरुष कसली शिकस्त घेतलीत ही ऐन उमेदीत! केवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बांधीन फार-फार गफलत केलीत तुम्ही. हे राज्य आमचे एकल्याचे मानण्यात. हे राज्य देवा-धर्माचे, गोरगरीब रयतेचे राज्य आहे. ती भोसल्यांची खाजगी मिरास नाही. तुम्ही आमचे पुत्र आहात ते नंतर, प्रथम आहात ते रयतेचे युवराज. तुमचा आमचा वारसा आहे, तो छातीवरच्या आईच्या माळेचाच. रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे. तुम्ही-आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत. केवळ राजे नव्हे.

“मराठ्यांचे युवराज असून मोगली गोटात दाखल होताना, फौजबंदीनं दौलतीच्या भूपाळगडावर चालून येताना, पित्यासमान फिरंगोजींना बेगुमान टाकून बोलताना तुमच्या मनाला एवढीसुद्धा शरम शिवली नाही! बरे ध्यानी ठेवा – ‘अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं!”’ संतापाने युवराजांची खरड घेताना छत्रपतींना ठसका लागला. छातीवर तळहात फिरवून तो सुमार करणाऱ्या आबासाहेबांना बघताना संभाजीराजांचे काळीज देठासह पिळवटले. शब्द म्हणता शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून फुटेना. आबासाहेबांचा घुसमटविणारा तडफडाट समोर गुमान बघवेना.

“सवतं राज्य कमवायला गेलात आणि कबिला गमावून आलात! परक्या घरचं कुलधन असलेल्या आमच्या राणूबाईना हरवून आलात! ज्या राजाला आपल्या घरच्या कुलस्त्रीचं रक्षण करता येत नाही, तो नामधारी छत्रपती प्रजा काय सांभाळणार, असा सवाल उद्या कुणी केलाच तर कुठल्या तोंडानं आम्ही त्याला आता काय जाब देणार?

रजपुतानं मुलूख जाळून आम्हाला शरणागत पत्करायला लावली. त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. पण आमच्या साऱ्या उमेदींना जाळ लावून जी शरणागत तुम्ही आम्हाला पत्करायला लावली आहे, तिच्यातून आम्ही कधीच बाहेर पडणार नाही. बरे तर बरे, दिलेरच्या तावडीत सापडून तुमची रवानगी दिल्लीला झाली नाही! नाहीतर नेताजींसारखी तुमचीही गत झालेली बघताना अभक्ष्य सेवनावाचून दुसरं काय उरतं आमच्यासाठी? जबान खुंटल्यागत गुमान का झालात? जाब द्या. आम्ही तुम्हाला विचारतो आहोत.” महाराज थेट संभाजीराजांच्या पुढेच येऊन उभे ठाकले. खाली मान टाकलेल्या संभाजीराजांच्या आत्म्याचा कढ आसवांच्या रूपाने दाढीवरून घरंगळत रुजाम्यावर टपटप कोसळला.

“जंजिऱ्यावर मांड ठोकून, कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्दीला जरब देता येत नाही, याची जरा खंत ठेवा. समुद्रपट्टीला टोपीकर आमचा खांदेरीबेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही, याची चिंता करा. आज-उद्या प्रत्यक्ष औरंगजेब फौजेसुद्धा दख्खनेत उतरणार याचा अंदाज ठेवा. आदिलशाही, कुतुबशाही आणि हे श्रींचे राज्य धूळदोस्त करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तो जंग-जंग पाडणार याचा विचार करा. त्यासाठी पहिल्यानं मावळा व्हा – माणूस व्हा! आम्हाला तडकाफडकी पारखं होणं सोपं आहे. काल आणील त्या कसोटीला सामोरं होणं, सोपं नाही.

“ज्यांना आम्ही दुसऱ्या आऊसाहेबांच्या रूपात बघतो त्या सूनबाईना – येसूबाईंनी तुमचा कसला अभिमान बाळगावा? पोटी आलेल्या तुमच्या वारसांनी कसला वसा ताठ गर्दनीनं उद्या सांगावा? काय बघून आमच्या मावळ-धारकऱ्यांनी तुमच्यासाठी – राज्यासाठी जिवांची कुरवंडी करावी?

“मानापमानाचा फार मुलाहिजा धरता, पण विसरता की देवादिकांनाही अवमान सोसावे लागले, वनवास भोगावे लागले. तुम्हाला दिसतं सिंहासन – पण त्यावर विखुरलेले काटे नाही दिसत. इतरांतील ऐब तुम्ही नेमका हेरता, पण स्वत: ठायी असलेला ऐब तुम्हाला कधी उमगत नाही. राजाला भावनेला सायवळ असून भागत नाही, हे भुलता तुम्ही.” छत्रपतींचा आवाज थरथरू लागला. तापल्या शिसाच्या रसात डुबून उठलेले जळजळीत बोल संभाजी राजांच्या मनातले माजलेले तण मुळासकट जाळून काढू लागले.

“प्रधानमंडळातील अण्णाजींसारख्या असामींशी तुमचं पटत नाही. महाराणींशी तुमचं जमत नाही. अण्णाजी राज्याचे कदीम चाकर आहेत. त्यांना वळतं करून घेणं तुम्हाला साधत नाही. आम्ही तर मुरारबाजी, बाजीप्रभूं सारखी हत्यार उठवून चालून आलेली शत्रू गोटातील माणसं वळवून कार्यी लावली. तुम्ही ते कसं साधणार?

“अफजलभेटीचा, आग्राकोठीतील कैदेचा आमच्यासारखा प्रसंग तुमच्यावर गुदरला, तर कसं निभावणार आहात तुम्ही? “आमची नाही ती नाही, ज्या थोर स्त्रीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या गेल्या आऊसाहेबांची तरी आण राखा. बरं आहे आज त्या हयात नाहीत ते! नाहीतर त्यांच्या कुशीत सुख होणारे तुम्ही, आमच्या कुशीत कट्यार चालवून पठाणाला मिळालात ही खबर ऐकूनच त्या शांत….”

“नको! आबासाहेब नको.” मनाचा चोळामोळा झालेले संभाजीराजे क्षणातच आबासाहेबांच्या पायांना मिठी भरून हमसाहमशी स्फुंदू लागले. त्यांच्या दाटल्या कंठातून शब्दांचे पश्चात्तापदग्ध मोती टपटपले.

“आम्ही – आम्ही चुकलो. आम्हाला युवराजपद नको. जोड आहे ती या पायांची. आम्ही दूधभात खाऊन या पायांशी राहू. शरमिंदे आहोत आम्ही. मन चाहेल ती सजा आम्हास फर्मावावी, पण – पण शब्दांचा एकही वार आम्हाला आता सोसवणार नाही. आबा – आबा!”

नाकगड्डा चिमटीत धरलेल्या, डोळे गच्च मिटलेल्या छत्रपतींच्या मनाच्या घुमटीत कसलीतरी अज्ञात नौबत झडझडली – “एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांच्या आऊ आणि आबा!” सईबाईच्या सावळ्या स्मृतीने छत्रपतींनी लोंबता दीर्घ नि:श्वास टाकला.

“चुकलं तरी लेकरू आपलंच आहे. पदरी घ्यावं. अभय द्यावं.” पुतळाबाईंच्या बोलांनी महाराजांना घेर घातला.

“हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार बळतं करून घ्यावं. पस्तावल्यात ते.” सरलष्कर हंबीररावांची मावळबोली मुजरा करून गेली.

“आबासाहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर?” एक अजाण पोर हात उठवून विचारीत होता.

आज तो स्वत:च चुकल्या वाटांच्या, पश्चात्तापाच्या वणव्यात होरपळत होता.

शिवाजीराजांचे मानी छत्रपतीपण विरघळले. राज संतापाची जागा आता अपार-अपार अशा करुणेने घेतली. निमुळत्या नेत्रकडा पाणावून आल्या. लपकन झुकून छत्रपतींनी आपल्या पोटच्या गोळ्याचे खांदे तळहातांच्या घट्ट पकडीत घेत संभाजीराजांना उठते केले. आपली पाणथर नजर आपल्या फर्जंदाच्या पाझरत्या डोळ्यांत खोलवर रुतवून क्षणैक डोळ्यांनीच त्याला उदंड काही सांगितले. दुसऱ्याच क्षणी चिंब, घोगरट बोल त्या सर्जा राजाच्या ओठांतून अडखळत बाहेर पडले – “लेकरा, कुठं गेला होतास? असा कसा रे चुकलास?”

रात्रभर पारखा झालेला सूर्यगोल, दिवसफुटीला उगवतीने हात पसरून आवेगाने कुशीत घ्यावा, तसे छत्रपती शिवाजीमहाराजांनी शंभूराजांना आवेगाने छातवानाला घट्ट बिलगते घेतले. पिळाची दोन भोसलाई छाताडे एकमेकांना खूप काही सांगून गेली. अभिषेक घेतलेल्या छत्रपतींच्या नेत्रांतले पावन तीर्थ संभाजीराजांच्या टोपावर उतरले.

पन्हाळा त्या पावन मनोमीलनाने कृतार्थ झाला!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here