धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३१

By Discover Maharashtra Views: 1239 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३१ –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहायला त्यांना तोंड नव्हते! त्यासाठी सिद्दी मसूदची मध्यस्थी घेऊन मगच ते दौलतीत परतणार होते!

धाब्याच्या घरट्यांनी दुहाती शिस्त धरलेले विजापूर समोर येताच संभाजीराजांनी वेशीवरच आपल्या पाठची घोडाईत शिबंदी थोपती केली. दोन दिवस अविश्रांत उडत्या खुरांची ही दौड सतत चालली होती. जमावातील विश्वासाचा एक जासूद पुढे घेऊन, त्याच्या हातावर आपल्या बोटातील निशाणी अंगठी उतरून ठेवीत युवराज त्याला म्हणाले, “ही परवल किल्ल्याच्या पहाऱ्याला दाखव. वजीर मसूदखाना सामने पेश होऊन आमचा सांगावा सांग – आम्ही जातीनिशी आलोत. खास निमित्ताने भेटीची इच्छा करतो आहोत.”

“जी.” जासूद मूठ भरून घोडा फेकीत विजापुरात घुसला.

समोर दिसणारे विजापर निरखताना संभाजीराजांना आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची – शहाजीराजांची आठवण झाली. त्यांची सरती वर्ष याच शाहीत गेली होती. कधीच त्यांचे रूप डोळ्यांत भरून घेता आले नव्हते. पुरात गेलेला जासूद मसूदखानाची भेट घेऊन परतीचा निरोप घेऊन आला. वजिराने दहा-वीस हत्यारबंद हशम त्याच्या संगती देऊन निरोप धाडला होता – “जल्दी आना।”

आपल्या शिबंदीसह संभाजीराजे विजापुराच्या किल्ल्याकडे निघाले. घडीव दगडांच्या भक्कम तटबंदीने किल्ला बंदिस्त होता. तटाच्या बुरुजाबुरुजांवर हाती नंग्या तेगी झळकवीत हबशी धारकरी पहारा देत फिरत होते.

सिद्दी मसूदला वर्दी गेली. आपल्या मसलतगारांसह युवराजांना तो सामोरा आला. काळीशार दाडी हनुवटी भोबती फिरलेल्या फरीसारखा भरगच्च, सतेज चर्येच्या संभाजीराजांचे रूप निरखतच मसूदने शिवाजीराजे कसे असतील, याचा अंदाज बांधला!

“आईये शाहजादे,” म्हणत मसूदने संभाजीराजांना खांदाभेट दिली. हाताला धरून बैठकीमहालात आणून त्याने युवराजांना इतमामाने बैठकीवर बसविले.

“वजीर, आमचा पठणाचा बेबनाव झाला आहे. आम्ही मोगलाई सोडली आहे.” संभाजीराजांनी विषयाला हात घातला.

“सुना है राजे। यह वजह है, तुम्हे जल्दी किलेमें लाया है। एक मसलत हम पेश करते है, सुनेंगे आप?”

“जरूर.” संभाजीराजांनी मसूदचा चेहरा अंदाज घेत निरखला.

“जल्दसे जल्द आप अपने आब्बाजानके पास लौटिये! हमें खबर हे, खाँ दिलेरखानका हेजिब अब्दुल रझ्झाक फौजबंद होकर विजापूर आ रहा हे, आपको कब्जेमें लेनेके लिए। यहाँ रहना आपको खतरेका है। आपको यहाँ रखना हमारे तख्तको धोखा है, सोचिये।”

ज्याचा मुलूख शिवाजीराजांनी नुकताच लुटला होता, प्रत्यक्ष संभाजीराजे, दिलेर, सर्जा यांनी रगडला होता, तो सिद्दी मसूद दूरच्या अक्कलहुशारीने मसलत घालत होता.

संभाजीराजांना ठेवून घेऊन तो दिलेर आणि शिवाजीराजे या दोघा मातब्बरांना विजापूरवर हल्ला करू द्यायची संधी व कारण द्यायला तयार नव्हता. तसेच हाताशी आलेल्या संभाजीराजांना घाताने जेरबंद करून त्या दोघांचा संताप आदिलशाहीवर ओढवून घ्यायलाही तो राजी नव्हता. समोर बसलेले संभाजीराजे त्याला “सोनेरी कट्यारी’ सारखेच वाटले असावे! देखणे, धारदार तरीही उराशी न लावता येणारे!

मसूदची मसलत ऐकून संभाजीराजे विचारगत झाले. समय गमावला तर अब्दुल रझ्झाकशी चकमक द्यावी लागणार. सगळ्या वाटा कोंडल्या होत्या. सिद्दी मसूदच्या मार्फतीने महाराजांशी बोलणी लावण्याइतकाही वेळ हाताशी उरला नव्हता. काय करावे सुचत नव्हते. कसलातरी निर्धार बांधत संभाजीराजे बैठकीवरून उठत म्हणाले, “ठीक आहे वजीर. आम्हास विडे द्या.”

समाधानाची एक नकळती लकेर मसूदच्या दाढीवर तरळून गेली. पुढे होत संभाजीराजांचा हात हातात घेत तो म्हणाला, “ये शाही मेहल है। शाहजादे। आपके इतमाममें यहाँ कसूर नहीं होगा।” मसूदने आपल्या कारभाऱ्याला टाळी दिली. पेश आलेल्या कारभाऱ्याच्या कानात काही अस्पष्ट कुजबुज केली. ‘जी’ म्हणत कारभारी बाहेर पडला.

थोड्या वेळातच महालात सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार आले. त्यांच्याकडे बघत मसूद म्हणाला, “ये नजराना हे, राजा सिवाजीके फर्जदके खिदमतमें। हमारे हशमभी साथ रहेंगे आपके)” पोशाख, बिछायती, सरंजामाच्या त्या आदिलशाही तबकांचा स्वीकार केल्याबद्दल त्यांना हातस्पर्श देताना संभाजीराजांची जबानच खिळली – कारण परतीचा म्हणून वजिराला द्यायला त्यांच्याजवळ कसलाही नजराणाच नव्हता! कारण आता तर ते सप्तहजारी मोगली मन्सबदारही नव्हते! सिद्दी मसूदचा निरोप घेऊन संभाजीराजे किल्ल्याबाहेर पडले. पन्हाळ्याचा रोख ठेवून हजार-दीडहजारांच्या शिबंदीनिशी दौडू लागले.

मांडाखाली दौडणाऱ्या जनावरांच्या खुरांच्या खडखडीत युवराज संभाजीराजे भोसले यांचे राजमन जागजागी अडखळू लागले. मराठ्यांच्या दौलतीहून फुटून निघणे सोपे नव्हते. पण त्याहून कठीण होत ते दौलतीत परतणे. दौडत्या संभाजीराजांना विचारांचे कायदे थडाथड फटकारून फोडून काढू लागले –

“कोणती सजा फर्मावतील आबासाहेब आता आम्हांस? अरबी जनावरांच्या खुरांना जखडून फरफट करण्याची, साखळदंड जडवून हयातभर कैदखान्यात डांबण्याची, हातपाय कलम करण्याची, टकमक टोकावरून दरी-दरडीत लोटून देण्याची की तोफेच्या तोंडी देऊन आमच्या विचारा एवढेच देहाचे तुकडे उडविण्याची? की राजगजाच्या पायी चितचुराडा करण्याची?

“कोणतीही सजा सामोरी येवो, आम्ही बांधल्या मनानं ती प्रसाद म्हणून कपाळी लावू. मोगली खिल्लत चढवून विटाळलेला हा देह; झालाच तर त्या सजेनंच पावन होईल. इच्छा एकच आहे. कसलीही सजा फर्मावण्यासाठी का होईना; महाराजसाहेब एकदा सामोरे यावेत. तीन साल पारखे झालेले त्यांचे चरण एकवार आम्हाला मनसोक्त डोळ्यांत भरून घ्यायचे आहेत.

“हातून झाल्या गैरवाका वर्तावाची कसलीही सफाई आम्हाला द्यायची नाही. आसावल्या कानांनी महाराज साहेबांच्या तोंडून उमटलेली “शंभूबाळ’ ही साद फक्त एकवार ऐकण्यासाठी जिवाची तगमग होते आहे.

“या एकाच हेतूनं आम्ही पन्हाळा जवळ करतो आहोत. बाकी साऱ्या उमेदी थिजल्या आहेत. ‘शंभू’ या नावातील शिवपणाला आपल्या अपेशी हातांनी आम्ही काळिमा फासला आहे. या बेगुमान पावलांनी आमची बांडी हयात वाहतीला लावली आहे. जे नेताजींनी, प्रतापरावांनी दिलं नाही, ते काळजाचा देठ कुरतडणारे चिवट दु:ख, पुत्र असून, आम्ही महाराजसाहेबांना दिले आहे. अभय मागण्याचा कुठलाही अधिकार आम्हाजवळ नाही. बाकी तो विचारही मनाला शिवत नाही.

“पण… पण या अशा आम्हाला महाराजसाहेब भेटतील? आमचं करंटं तोंड बघतील? की – की इथंही आमचं कमनशीब सवयीप्रमाणं बाजी मारणार?

“नाही! आम्ही कुणाचे मन्सबदार नाही, युवराज नाही. आहोत एक माणूस. एक भोसला. मिटल्या ओठी, पडल्या गर्दनीनं का होईना, आमच्या जन्मदात्याचं एकवेळ दर्शन घेण्याचा आमचा अधिकार आहे. प्राणबाजीनं आम्ही तो कमवू. महाराजसाहेब नाही भेटले, तर आम्ही आतल्या आत घुसमटून संपून जाऊ!

पेटत्या वणव्यात झळींनी, धूर लोटांनी जीव कोंडलेला शार्दूल गरगरा फिरत भांगा शोधण्यासाठी धडपडावा, तसे ते राजमन धडपडू लागले. सुन्न, बधिर झालेल्या संभाजी राजांच्या ताकदवर खोटा खाऊन मांडाखालचे जनावर फेसाटले.

गर्द झाडीने घेर टाकलेल्या किल्ले पन्हाळ्याचा पायथा आला. शिंबदी थोपवून संभाजीराजांनी एका धारकऱ्या मार्फत किल्ल्यावर वर्दी दिली. उभा पन्हाळगड थरारून उठला. “युवराज परतले!” ही वार्ता वाऱ्यावर स्वार होऊन गडभर पसरली. माणसांच्या झुंडीच्या झुंडी चौ-दरवाजांच्या रोखाने धावू लागल्या. किल्लेदार विठ्ठल त्रिबक महाडकर संगती हवालदार बहिर्जी इंगळे, हिरोजी फर्जंद, कृष्णाजी व सोमाजी बंकी अशी मंडळी घेऊन चौ-दरवाजांकडे निघाले. विठ्ठलपंतांनी पायथ्याला निरोप धाडला – “अनमान करो नये. वर फौजेसुद्धा निघोन यावे.”

संभाजीराजे आपल्या शिबंदीसह पन्हाळ्याची चढण चढू लागले. चार दगडबंद कमानींनी बंदिस्त असा पन्हाळ्याचा चौ-दरवाजा आला. रायगडी जेव्हा नेताजी पालकर परतले तेव्हा गडाची माणसे गोंधळली नसतील, तेवढी पन्हाळगडाची माणसे संभाजीराजांकडे गोंधळून बघत होती. विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे, या विचाराने गोंधळले. पुन्हा निर्धाराने मन बांधून त्यांनी “युवराजांचे स्वागत आहे.” म्हणत तिबार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर जमल्या जमावाला भान आले. एक-एक हात मुजरा झडवू लागला. समोर उभा असलेला हिरोजी फर्जंद मात्र गुमान होता. किल्लेदारांच्या पाठीशी होत, संभाजीराजे बालेकिल्ल्याकडे चालले. एरव्ही खाशांच्या आगमनाबरोबर झडणारी नौबत आज पन्हाळ्यावर झडली नव्हती.

बालेकिल्ल्याचा बैठकी महाल आला. मोजड्या उतरून संभाजीराजे महालात आले. संथ बोलीत विठ्ठलपंतांना म्हणाले, “किल्लेदार, रायगडी खलिता द्या. लिहा –

आम्ही कबिल्यासह पन्हाळगडी पावलो आहोत.”

ते ऐकताना आतापर्यंत वर असलेली विठ्ठलपंतांची गर्दन पडली. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. ते जाणवलेले संभाजीराजे आवाज तोलीत पुन्हा म्हणाले, “आम्ही सांगितलं ते ऐकलंत? खलिता टाकोटाक जाऊ द्या.”

“जी. पण…” विठ्ठलपंतांचा आवाज पार पडला होता.

“पण काय?”

“कसं बोलावं? जबान उचलत नाही युवराज, आम्ही छत्रपतींचे चाकर. राजकुळाची भलीबुरी खबर खाशांच्या कानी घालताना आतड्यांची तोड होते.”

“मतलब? साफ बोला पंत.”

“युवराज आपला – आपला कबिला – दिलेरच्या पठाणांना मागं हस्तगत झाला!

! अक्कासाहेब आणि धाकट्या युबराज्ञी दस्त झाल्या! ! घडू नये ते वाईट घडलं आहे.”

“पंड त!” सापाच्या आक्रसत्या वेटोळ्यांसारखे संभाजीराजांच्या पिंढऱ्यात गोळे भरले. डोळ्यांसमोर काजवेच लखलखले. बालेकिल्ल्यासह उभा पन्हाळगड, नदीच्या पात्रातील गरगरत्या पणतीसारखा त्यांच्याभोवती फिरू लागला. त्या गरगरीतूनच लाटाच लाटा उसळू लागल्या, “बाळमहाराज, काय करून बसलात हे?”

“आम्हाला एकले सोडा.” म्हणत संभाजीराजांनी विठ्रलपंतांकडे पाठ केली.

पंत बाहेर पडताच उभे राहणे मुश्कील झालेले संभाजीराजे महालाच्या मंचकावर कोसळले. त्यांच्या मिटल्या डोळ्यां समोर पठाण दिलेरखान हलेना. हाती कोरडा घेऊन, गर्दन मागे टाकीत तो खदखदा हसत संभाजीराजे भोसले या मोगली मन्सबदारावर निर्दय कोरडे ओढीत गर्जत होता – “होश रख्खो, तुम्हारा कबिला हमारे जनानेमें है!”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment