धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२५ –

“आबासाहेब, कधी नव्हे तो सवाल उठतो आहे, आमच्या मनी आज! आमच्या जागी आपण असता तर? महाराणींच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला मासाहेब म्हणून भेटती तर? आपण साफ-साफ अशा मासाहेबांना तोंडावर बजावलं असतं की, “आपण महाराणी असलात, तरी आम्ही युवराज आहोत! उद्याचे राजे आहोत! अदब राखून बोला!”

“धावत्या नदीला मागे पडणाऱ्या घाटबुरुजांचा शोक करता येत नाही. पुढे येणाऱ्या दरी-दरडींची धास्ती बाळगून चालत नाही. आता आम्हाला साथ-जोड आहे, ती कमरेच्या हत्याराची. अंगच्या रक्ताची. आम्हीही राजअंकुरच आहोत. वसबीखाली कुचमत वाढण्यासाठी आमचा जन्म नाही. आबासाहेब आमच्या थोरल्या महाराजसाहेबांपासून दूर झाले. दूर राहूनच मोठे झाले. आम्हीही आमच्या आबासाहेबां पासून दूर जाणार आहोत…शक्य आहे असं दूर जाणं? छे! आम्ही कुठंही असलो, तरी मनानं त्यांना क्षणभरही विसरूच शकत नाही… पण… या दौलतीत आता क्षणभरही राहू शकत नाही. जाणे आहे. जिकडे पुढा होईल तिकडचा मुलूख थोडा करीत जाणे आहे.

मथुरेत आबासाहेबांनी आम्हास मागं ठेवलं. आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता “राजगडावर आमच्या बाळराजांचा काळ झाला!’ अशी अफवा पसरविली. ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असताही आमच्या नावचे राजगडावर दिवस घातले! आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत, “आबासाहेब, तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे, असे समजोन खरेखुरे दिवस घालावेत! आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं!” आमचं यात कसलंही राजकारण नाही. आहे ती मनची सच्ची भावना….

“आज पाय मागे खेचतात ते फक्त धाराऊ तुझ्या यादीनं! आमच्यावर मायेशिवाय आजवर तू दुसरं काहीच केलं नाहीस. आज आम्ही खरे बेइमान होतो आहोत, ते फक्त तुला!! पण आम्ही तरी काय करावं? तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्यांचं रक्त! आज या भोसल्यांच्या रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे. मानी मनानं मायाळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे. तुझ्या रायाजी-अंतोजीसारखे आम्हीही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपजतो तर! तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीस खातरीनं उतरलो असतो. शक्‍य झालं, तर या शंभू भोसल्याचं कुचमलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे!

दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्याची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरपट सज्जनगडाची पायरी-पायरी उतरताना झाली. पायथा येताच सर्वांना थांबण्याचा इशारत देत एकदा गर्दन उठवून त्यांनी आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन केले. कपाळी दाटलेला घाम शेल्याने निपटला.

“चला” भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले. पौषाचे उन्ह तावू लागले. कृष्णा-वेण्णा संगमाचे तीर्थस्थान श्रीक्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसांनी फुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगमस्रानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तरभाग माणसांनी आपणहून राजकुळासाठी मोकळा करून दिला. एका बगलेला जिजोजीने झडपा टाकून जनानखान्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती.

संभाजीराजांनी अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत, ते डेऱ्याबाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोहोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मुजरे झडू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत ते आले. अंगीचा शालनामा झटकन त्यांनी दूर हटविला. मागच्या सेवकाच्या हाती दिला. पौषाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णा- वेण्णेच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला पडले. पाण्याच्या स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजांनी दोन कासऱ्यांचा चौक फिरून घेतला.

झडपांआड बंदिस्त हमाम्यात राणूअक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्रान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्यांनी एकदा सूर्यदर्शन केले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपा टाकीत दोन-दोन पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णा-वेण्णेची हळदी-कुंकवाने पूजा करून, खणानारळांनी त्या नद्यांच्या ओटया भरून राणूअक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या.

जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोनमोहरा, धान्ये, वस्त्रे यांची सरपोसबंद तबके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती.

युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्यामागून आक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनाना आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत, समाधानी चर्येने, हसत्या मुखाने युवराज पर्वणीची दाने देऊ लागले. भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी, पिंगळे, वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनान्याने खणनारळ दान केले.

“जिजोजी, घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय माग घ्या.” संभाजीराजांनी गडकऱ्यांना फर्मावले. जी,” म्हणत जिजोजी घाटाचा माग घ्यायला गेला. तेवढ्यात संभाजीराजांनी आपल्या निवडल्या धारकऱ्यांच्या म्होरक्‍्यांना समोर घेतले, कुणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली, “प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगमापार घ्या. पेटारे, सारी शिबंदी पैलतीराला सोडा. जल्दी करा!”

“जी” म्होरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले.

“च्यार-दोन गोसावी बाकी हाईत. पर त्ये म्हंत्यात आमी गोसावी. आमस्री दान नगं. होतर शिधा देवावा.” जिजोजीने घाटाचा माग दिला.

“ठीक आहे. त्यांना शिधा द्या.” संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैलतीराला पोहोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता चार-पाच नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐलतीरावर हिंदोळत उभ्या होत्या.

संभाजीराजे डेऱ्यात आले. राणूअक्कांना म्हणाले, “अक्कासाहेब, जरा संगमावर येता?”

“चला.” काहीच अंदाज नसलेल्या राणूअक्का बोलून गेल्या.

संभाजीराजे राणूअक्का, दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले. त्यांच्या मागून “शिबंदी पैलतीराला का ग्येलीय?” या घोटाळ्यात अडकलेला जिजोजी अदब धरून चालला. संगमतीर आला. नावाड्यांनी नौकातूनच युवराजांना मुजरे दिले. ते आपले करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते.

राणूअक्कांना ध्यानीमनी नसता संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडविली. “आम्ही येतो आहोत! आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन!”

“मतलब?” चमकत आक्कासाहेबांनी विचारले.

“आम्ही-आम्ही, पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे!” गोळीबंद जाब आला.

“बाळमहाराराज!” अंगावर वीज पडल्यागत राणूअक्का चीत्कारल्या. जिजोजींच्या डोळ्यांसमोर दिवसाढवळ्या काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे, ते मान उठवून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फराट्याने मुखाभोवतीचा पदर उडून गेल्याचे भान राणूअक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजावर जोडीत त्यांनी विचारले, “काय-काय बोलताहात हे? आबांचा काही विचार केलात?”

“जी, केला आहे. आता आम्ही कुणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढंही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुखत्यार आहात. जाताना आम्हाला ऐकवून जावं की, “तुमच्यासारखा भाऊ पाठीशी असण्यापरीस पाठ सुनी असती तरी बरं होतं!” ते ऐकण्याचीही आम्ही तयारी केली आहे.”

ते ऐकताना राणूअक्का सुन्न-सुक्न झाल्या. मान डोलवीत म्हणाल्या, “बाळमहाराज, कसं बोलता हे? यासाठी आम्ही तुम्हास साथ दिली? जे तुमच्या वाटेत आडवे आले, त्यांना आडवे करण्याची धमक दाखविण्या ऐवजी तुम्ही त्यांना पाठ दावता? तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे. विचार केलाय तुम्ही? या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी?” दुर्गाबाईकडे हात करीत राणूबाईने विचारले.

“आम्ही विचार केलाय. कुणाचं काय फावेल, काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही! आम्ही येतो. आपण परतावं.”

राणूअक्कांना पाठवान दावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. “चला” त्यांनी नावाड्यांना फर्मावले. संगमाच्या लाटांवर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली.

“बाळमहाराज. थांबा.” अक्कांची कातरी साद कृष्णा-वेण्णेच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारत दिली. नौका किनाऱ्याला भिडताच संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला, “काय बोला? आम्हास वखत नाही.”

“आम्ही – आम्ही येतो आहोत तुम्हा संगती!” मायेच्या चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावरून उठले. कळवळत्या नजरेने तीच साद दुर्गाबाईनी आपल्या कुंकवाला घातली.

“तुम्ही? देवदर्शनाला नाही जात कुठं आम्ही आक्कासाहेब. कशाला पायी खोडा घालता?

“बाळमहाराज, एकवार आम्ही स्वत:ला पारखे होऊ, पण तुम्हाला एकलं सोडणं नाही जमणार आता आम्हाला. आम्ही निर्णय केला आहे, जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही. पण आज आई भवानीची आण घालून, हे मागणं करतो आहोत आम्ही. आम्हाला संगती घ्या.”

सगळी जाणच ताठरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथे बोलणेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती.

“ठीक आहे. जशी आपली मर्जी. चलावं.” नौकेतून उतरून संभाजीराजांनी हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईंना हातजोड दिली. घाट सुना-रिता करीत, एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते तीन जीव नावेत झेपावले.

“नगा, धाकलं धनी असं कायबाय नगा करूसा!” छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला.

“किल्लेदार, घाटावरचा बार्दाना सज्जनगडी पावता करा.”

“धनी….”

“दिल्या आज्ञेची तामिली करा. तुमच्या महाराजांना सांगा – आम्ही परतू ते हा सह्याद्रीचा डोंगरदरा जिंकण्यासाठीच!” भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णा-वेण्णेच्या पावन अंगावर टपकले. नौका अज्ञाताचा संगम पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची वळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावता मावत नव्हती.

पैलतीर येताच सज्ज शिबंदीतील तीन जातवान घोड्यांवर संभाजीराजांनी राणूअक्का मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगली तळाचा म्होरका धरत चालला. चालला – भगवा जरीपटका हिरव्या निशाणीच्या छायेत! शिवाचा पुत्र अशिवाकडे. एकला नव्हे; सोबत छत्रपतींची कन्या घेऊन.

युवराज संभाजीराजे भोसले, छत्रपतींना पारखे झाले!

स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके, पोरके झाले!!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here