धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२४ –

“थोरल्या आऊ गेल्या त्या दिवशीच आमचं ‘युवराजपण? पोरकं झालं. महाराणी झालेल्या मासाहेबांना आमचं युवराजपद रुपलं. त्यांच्या करणीमुळंच आम्ही भरल्या दरबारी आरोपित म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालोत. आम्हीच आबासाहेबांना अभक्ष्य चारलं हा काळीज चिरणारा आळ मासाहेबांनी आमच्या माथी मारण्याचा घाट घातला. रामराजांना आमच्यापासून तोडण्याची एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वारीला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपुरी धाडण्याचा हट्ट धरला तोही त्यांनीच. आम्ही अडल्या रयतेला धारामाफी करतो, याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतूनं, त्याची खबर कर्नाटकी गेली, ती कसल्या बेंगरूळ रूपानं? काय- काय नि कसं-कसं घडलं आहे हे?

“रजपूत मिर्झाच्या गोटात ओलीस म्हणून जाणारे आम्ही, शाहजादा मुअज्जमच्या भेटीस औरंगाबादेस जाणारे आम्ही, थोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कफनी चढविणारे आम्ही आज काय भरून पावलो आहोत?

“परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपुरी आले नाहीत. आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन, आशीर्वाद द्यावेसं त्यांना वाटलं नाही, ते आमच्यामुळं!

भवानीबाईच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराजसाहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं ते आमच्यामुळं. आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत, असा त्यांचा गैरमेळ रायगडावरच्या जाणत्या महाराणी आणि सुरनिसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडचा मार्ग दाखवला.

“आम्ही आबासाहेबांना समोर नकोसे झालो? त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं? मग भारभूत असलेली ही युवराजपदाची वस्त्रे अंगी कशासाठी वागवावीत आम्ही?

किती दिवस सोसावं हे? का?” ठणकत्या काळजाने ते मंचकावर बसले. मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहातांनी तो गच्च दाबून त्यांनी डोळे मिटते घेतले.

“घण घण घण’ पाचाडच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेले नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले. बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली. म्हणता-म्हणता ती विती हातांनी मोठी होत रायगडाच्या आघाडी मनोऱ्याएवढी

उदंड उंच झाली. त्या होत्या थोरल्या आऊसाहेब! त्यांच्या ओठांतून ममतेची साद घुमली, “बाळ शंभू!” एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रोखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला. युवराजांच्या उभ्या अंगभर त्या हाताला निरखताना विजाच विजा सळसळून गेल्या. देह क्षणभर थरारून ताठरला. सारे अंग घामाने कसे चिंब डवरून आले. असह्यूपणे त्यांनी भोवतालच्या पोकळीला “थोरल्या आऊ” अशी साद घालीत, भयाने थरकापून डोळे उघडले. दालनातील मंद-उजळ उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे, असा संभाजीराजांना भास झाला. सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला. मनाशी पडलेली मनाची चावरमिठी काही केल्या निखळत नव्हती.

“थोरल्या आऊ, तुम्ही गेल्यानंतर या हयातीत जमेला आल्या फक्त युवराज्ञी येसू!” त्यांचे ओठ पटपटले. कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डाळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, “भावेश्वरीच्या कृपेनं सारं ठाकेठीक होईल.”

कुठलंतरी एक धारदार राजमन संभाजीराजांच्या तोंडून त्यांना जाब देऊन गेले –

“होळीसणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं श्रीफळ बाहेर खेचलं. तुमच्या केवळ दर्शनानंच पोळल्या हाताच्या वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो. पण… पण आज आमच्या मानी मनाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे! कोणी ते बाहेर खेचावं, असं आम्हालाच वाटेनासं झालं आहे. कारण नसता ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता आम्हाला कुणालाच दावू नयेसा वाटतो! युवराज्ञी, तुम्हालासुद्धा!”

येसूबाईंच्या आठवणीबरोबर कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांना ऐकविलेला “चोरचोळी’ हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला. हिरव्या रंगाची ‘चोरचोळी’ कुणालाही माग न देता केलेली! हिरवा पिंपळवृक्ष! काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली. पेटता बोळा भिरभिरत येऊन दारूच्या कोठारावर आदळावा, तशी मनाच्या तळवटातून हिरव्या रंगाची फासबंद थैली त्यांच्या धुमसत्या मनाच्या तोंडाशी आली. बर चांद असलेले हिरवे निशाण दृष्टीसमोर फडफडले. वळवळता भुजंगसर्प बाहेर पडावा, तशी थैलीतील खलित्याची वळी बाहेर पडली. शब्दांचे फूत्कार टाकू लागली.

“मशहुरल अनाम, दाम दौलतहु, जंगेबहाहर शाहजादा संभूः… इस मुकामपर आगवानी के लिये तुम्हारी राहे ताक रहे है!!” त्या फूत्कारांनी क्षणभर संभाजीराजांच्या पिंढऱ्यात घट्ट गोळे धरले. घशाला सोक देणारी कोरड पडली. डोळ्यांसमोर काजवेच काजवे चमकले. झपाझप चालत त्यांनी चौरंगीवरच्या गडव्यातील पाणी घटाघट घशाखाली सोडले. कपाळीचा घाम पोसाने निपटला. कऱ्हेपठारावर रजपूत मिर्झाच्या गोटात एकवार बघितलेला दिलेरखान पठाण त्यांनी आठवून बघितला. आता त्यांची चर्या पार पालटून गेली होती. मनाच्या धारा बोथट झाल्या होत्या.

“सारे दोर तुटले आहेत! उरलेले आम्ही तोडणार आहोत! खुद्द आमच्या हातांनी!” स्वत:लाच समजावीत ते पुटपुटले. “होय! आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाणेचा निर्णय केला आहे!! तिथे आम्ही कुणाचे पुत्र, पती, बंधू, युवराज असणार नाही! जे काही असू ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त्त संभाजीराजे भोसले!”

गादीवर ओळंबून युवराज संभाजीराजे भोसले खलित्याच्या वळीवर स्वहस्ते मोगल सरलष्कर पठाण दिलेरखान यास मजकूर लिहू लागले – “मशहुरल अनाम, दाम दौलतहु, लष्करे सालार दिलेरखान सुभे दख्खन यांसी, रा. रा. संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष,

आम्ही श्रीक्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुरांचे भेटीस जातीनिशी येत आहोत!!! दरोबस्त आगवानी करून आमचा मरातब करावा. तपशीलाने समक्ष भेटीगाठीत बोलू. जाणिजे!”

बाहेर सज्जनगडाचे रात्रमेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हरळ्या देत होते. “मेटकरी ह्ोे हुश्शार!” मठमंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थशिष्य एकजोडीने म्हणत होते –

“जयाचे तया चुकले प्रास नाही।

गुणे गोविले जाहले दुःख देही।

विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी।

परि लिहितो कोण त्याचे कपाळी।”

पौष शुद्ध दशमीचा दिवस वर उठला. पक्ष शुक्लाचा असला, तरी तो मराठी दौलतीतला सर्वांत काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता. संभाजीराजांनी निवडलेले दोन-एकशे धारकरी दानधर्माच्या होनांचे पेटारे घेऊन सज्जनगड उतरले. नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजांनी उतरून ठेवला. सादिलवार आसवाब अंगी धारण केले. छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको, या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली. “कुठंही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत. आता आईशिवाय पाठराखण ती कोण करणार?” असे पुटपुटत त्यांनी भवानीमाला छातीवर घेतली.

“तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्रानास जाताहात म्हणे?” दालनात आलेल्या राणूअक्कांच्या बोलण्याने संभाजी राजांची तंद्री तुटली. त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली – “जी!”

“आम्ही यावं म्हणतो संगमस्रानाला.” राणूअक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली.

संभाजीराजांची कपाळपट्टी आक्रसली. ते अक्कांच्याकडे बघतच राहिले. त्यांना काय सांगावे, ते युवराजांना कळेना. थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले, “जशी आज्ञा. मेणा जोडायला सांगतो आम्ही. तयारी करावी.”

“आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाही येणार. दुर्गाबाईना घेणार आहोत संगती!” प्रसत्ष हसत राणूअक्का बोलल्या.

“जशी मर्जी.” संभाजीराजांना बोलायला जागाच उरली नव्हती.

मेणा सिद्ध झाला. संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमानदर्शन घेतले. कल्याणस्वामींच्या चरणांवर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले, “स्वामींचा कृपाप्रसाद असावा.”

“जय जय रघुवीर समर्थ.” नित्यनांदी उठवीत कल्याण स्वामींनी युवराजांना वर घेतले. प्रसन्न हसत त्यांच्या ओंजळीवर झारीतील तीर्थ सोडले.

संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली. मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना राणूअक्का व दुर्गाबाईचा मेणा उठवायला इशारत दिली. जिजोजी काटकर आणि धारकऱ्यांचे पथक पाठीमागे घेत मेणा आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळीगड उतरू लागले! गडाची एक-एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आज वरच्या हयातीचीही एक-एक पायरी उतरू लागले. प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागले. “जावं की परतावं? कशासाठी? काय उरलं आहे पिछाडीला?’

“आम्ही पठाणाच्या गोटात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय बाटेल?… छे! परतावं आणि पुढं?… शृंगारपुरी पिलाजीमामांचा पावणेर झोडीत बसावं?… पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तींशी हुज्जत घालावी?…. छे! हे होणे नाही? त्रिकाल होणे नाही! आम्ही केला आहे, तोच निर्णय पक्का आहे.

“आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. दोन असामींना मात्र दूध-भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या, कदीम महाराणीसाहेबांना आणि अक्कलहुशार, इमानदार सुरनीस अण्णाजींना!

“भ्रम आहे हा की, आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल हा! रयतेला राजा लागतो. फक्त राजा… आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपानं उभा राहील. आम्ही – आमचं राज्य – राजा शंभूचं राज्य – मनगटाच्या बळावर उठवू. तिथं आम्हाला कुणी जाबसाल करणार नाही. आबासाहेबांना कुठं होतं, स्वत:चं राज्य! त्यांचे शब्द अजूनही आठवतात. ते म्हणाले होते, “युवराज, बडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची?” त्यांचेच आम्ही फर्जंद आहोत. पुरुषार्थ दावायला अनायसा संधी आली आहे. दोनदा निग्रहानं बाजूला सारली, पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय. त्यासाठी या क्षणी दिलेरशिवाय दुसरी जोड नाही. आम्ही धरली वाट बिकट आहे; पण – खुंटल्या, खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय?

“आमच्या जाण्यानं युबराज्ञींना काय वाटेल? शरमतील त्या आमच्या नावाचे कुंकुपट्टरे कपाळी घेताना. होय, शरमतील. पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जिरेटोपाचा भार घेणं, त्या कुंकुमपट्टयापेक्षा शतपटीनं कठीण आहे.

“आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जिवात होतं. थोरल्या आऊसाहेबात! पण त्या असत्या तर ही आफतच ना येती आमच्यावर!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here