महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२१

By Discover Maharashtra Views: 1242 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२१ –

सारे थैलीस्वाराची वाट बघू लागले. आता दुपार टळली होती. मने कुचमली होती. बऱ्याच वेळाने कदमबाज चालीने घोडा रेटणारा थैलीस्वार नजरेत आला. त्याला बघताच संभाजीराजांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली. पुढे होत त्याला गाठला. “कुठवर आलेत महाराजसाहेब?” संभाजीराजांनी उतावीळ सवाल घातला.

कसाबसा थैलीस्वार पायउतार झाला. मुजरा देत त्याने मान डोलावली. कमरेची थैली संभाजीराजांच्या हाती दिली. गडबडीने संभाजीराजांनी थैली खोलली. तीत खलिता होता!

“मतलब?” संभाजीराजांच्या कपाळी आठ्याच आठ्या धरल्या. “धन्यांची… धन्यांची भेट जाली न्हाई. त्ये… त्ये सामानगड, कोल्लापूर, सातारा मार्गानं… पुन्याच्या वाटंला लागल्यात!” “पुण्याच्या वाटेस!” संभाजीराजांची मुद्रा क्षणात बदलली.

“आबासाहेब आम्हास विसरले? की रागावले आमच्यावर? की रायगडी काही घडले?’ शंकांनी संभाजीराजांचे काळीज थडथडू लागले.

“चला, परतू या.” एक चांदीच्या कड्याचा वृद्ध हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवरची अदब बाजूला ठेवून आपल्या जावयाची व्यथा जाणलेला तो हात, पिलाजींचा होता. पथक परतले. आता आंबवतीच्या वेशीवर सांजेची काळी झांझट उतरली होती. त्यामुळे तोरण नीट दिसू येत नव्हते. कुणब्यांनी चढविल्या गुढ्या खाली घेतल्या

कुणाशी काही न बोलता संभाजीराजे आपल्या महालात आले. त्यांच्यामागून कधी नव्हे ते, आज गणोजीराजे येताहेत, हे त्यांच्या ध्यानी आले नाही. महालात शमादाने जळत होती. संभाजीराजांनी डुईचा टोप चौरंगीवरच्या तबकात उतरला

“युवराज…” गणोजींच्या आवाजाने संभाजीराजे दचकले. तरीही स्वत:ला सावरीत म्हणाले, “बोला.” “युवराज, खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे शंकरासारखे सांब-भोळे आहात.”

“मतलब?” संभाजीराजांचे मानेवर रुळणारे केस डोलले. त्यांनी गणोजींच्यावर नजर रोखली

“आम्ही सांगतो काय झाले आहे ते. छत्रपतींनी ही वाट का टाळली ते. तुम्ही कलशाभिषेक केलात तो छत्रपतींचे काही बरे-वाईट व्हावे म्हणून अशी बोलवा रायगडावर उठली आहे. स्वत:ला राज्यपद मिळावं म्हणून युवराजांनी कलशाभिषेक केलाय, असे गडावर बोलले जाते आहे!”

“गणोजी, बस्स करा हे!” दोन्ही कानांवर तळहात ठेवून संभाजीराजे केवढे तरी थरकते ओरडले.

“सांभाळून असा एवढंच सांगतो आम्ही.” गणोजी निघून गेले.

संभाजीराजांचे रक्तबंबाळ काळीज तडफडू लागले. अण्णाजी दत्तो आणि मासाहेब सोयराबाई यांच्या मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोरून हटता हटेनात.

“काय झालं?” येसूबाई आता येऊन बराच वेळ झाला होता.

त्यांना काहीच न बोलता संभाजीराजे झरोक्याशी आले. बाहेरचा मिट्ट काळोख निरखू लागले. त्या काळोखातून शुभ्र नेसूची आकृती – थेट आऊंसारखी दिसणारी आपल्या रोखाने येते आहे, असा त्यांना भास झाला. ते पुटपुटले, “बरं झालं आज तुम्ही हयात नाही पाठीशी उभ्या असलेल्या येसूबाईच्याकडे वळून संभाजीराजांनी छातीवरची कवड्यांची माळ उतरली. ती येसूबाईंच्या हातावर ठेवीत, ते केवढ्यातरी पडल्या आवाजात म्हणाले, “हा मोलाचा डाग वागवायला आम्ही काबील ठरू की नाही, भय वाटतं! तुम्हीच तो अधिक सांभाळाल!”

दिवसभर थकल्या, सजल्या शृंगारपुराला काळोखी रात्र कवेत घेऊ लागली! खिन्न संभाजीराजांची पावले दुर्गाबाईच्या सुखमहालाकडे चालली.

रायगडावर छत्रपतींच्या खासेवाड्याच्या सदरेला खलबत बसले होते. बाहेर आर्द्राच्या धारा कोसळत होत्या. दक्षिण दिग्विजय करून रायगडी परतलेले छत्रपती साऱ्या कारखान्यांचा शांतपणे करीणा घेत होते. सदरेत मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, सावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी,बाळाजी आवजी, गंगाधरपंत हणमंते, हंबीरराव मोहिते अशी शेलकी मंडळी होती.

“महाराज, पंतांनी नाशिक, त्यंवकचा मुलुख लूख लुटीला घातला.” अण्णाजी दत्तोंनी मोरोपंतांची कामगिरी रुजू केली. बाळाजी नी फिरंगी, कुतुबशाही, टोपीकर यांच्या दरबारातून आलेल्या निवडक पत्रांचा तपशील पेश केला.

राजपागा, खजिना, शिलेखाना अशा चर्चेतून खलबत धाराबसुलीवबर आले. धारावसुली अण्णाजींच्या अखत्यारीत होती. त्यांनी या खात्याचा करीणा देताना युवराज संभाजीराजांच्याबाबत तक्रार नोंदविली, “महाराज, युवराज धारावसुलीत हस्तक्षेप करतात. आम्ही त्याची वेळीच स्वामींना कल्पना दिली आहे.”

“कोण भातेचा हस्तक्षेप करतात युवराज?” महाराजांनी शांतपणे अण्णाजींना विचारले.

“रयतेस मनमानी सूट देतात.” अण्णाजी उत्तरले.

“आपणहून रयतेकडं जाऊन सूट देतात की रयत जाते, त्यांच्याकडे सूट मागण्यास?” छत्रपतींनी घेर टाकला.

“रयतच जाते त्यांच्याकडे.”

महाराज हसले. अण्णाजींची चूक त्यांना न दुखविता त्यांच्या पदरी घालण्यासाठी गोमट्या बोलीत म्हणाले, “अण्णाजी, धाराबवसुलीचे खाते तुमच्याकडे. रयतेच्या काही अडीअडचणी असतील, तर तिनं तुमच्याकडे यायला पाहिजे! ती युवराजांकडं का जाते, ध्यानी नाही येत आमच्या!”

अण्णाजी चमकले. गुमान झाले. मग महाराजच त्यांना सावरीत म्हणाले, “अण्णाजी, रयत आपली देव. तीच आम्हास लढते हात पुरविते. आमचे अंबारखाने धनधान्यांनी भरते. गनिमांच्या घोडधावेत टापाखाली रगडली जाते, ती तीच. तिची सुखदु:खे तुम्ही-आम्हीच जाणली पाहिजेत. प्रसंगी तिला धीर, दिलासा दिला पाहिजे.

युवराजांनी तसं केलं असेल, तर त्यात गैरवाका असं आम्हास काहीच वाटत नाही. आम्ही जातीनं घेऊ त्याचा माग.”

“जी. एक परीनं ते ठीकच आहे. पण दिलेरसारख्या प्रत्यक्ष गनिमाशी जेव्हा युवराज खलित्यांची हातमिळवणी करतात; साक्षात स्वामींच्या जिवाचं बरंवाईट व्हावं म्हणून शाक्तपंथीयांच्या भरीला पडून कलशाभिषेक करतात तेव्हा आम्हाला शंका येते. स्वामीनिष्ठा म्हणून वेळीच हे नजरेस आणणं, आमचं कर्तव्य मानतो आम्ही.”

अण्णाजींनी मनाच्या तळवटातले काजळकाळे सफाईच्या भाषेत बाहेर काढले.

हे ऐकताना महाराजही गंभीर झाले. काय बोलावे त्यांना सुचेना. सारे खलबत चळबळले. “याची शहानिशा करून घेतलीत तुम्ही अण्णाजी?” छत्रपतींचे सावधपण बोलले.

“जी. आमच्यावर स्वामींनी सोपबिलेल्या कार्यात आम्ही कुचराई कशी करावी?”

सदरेवर शांतताच शांतता पसरली. कुणाला काय बोलावे कळेना. अशात मोठ्या धीराने हंबीररावांनी आपली मसलत पेश केली, “अण्णाजींनी केलेल्याली शानिशा गैर न्हाई असायची. पर आम्हास््री वाटतं, एकडाव धन्यानी युवराजास्रीच सामने याद बोलवावं. ज्ये असलं नसंल, त्याचा साफ जाब विचारावा.”

खलबतातील कितीतरी जणांना ही मसलत मनोमन पटली. तशा मानाही डुलल्या. पण छत्रपतीच म्हणाले, “हंबीरराव, तुमचं म्हणणं पटतं आम्हास. पण – पण तुम्हाला वाटतं जर खरोखरच असं असेल, तर युवराज आमच्यासमोर ते मान्य करतील? आणि तसं नसेल तर आम्हीच हे विचारतो आहोत, याचा कोण कयास बांधतील ते? जवळची माणसं आमच्या शब्दांचा गैरमतलब लावून कशी बिथरतात, हे नेताजींच्या आणि प्रतापरावांच्या बाबतीत पारखलं आहे आम्ही. दोनदा पोळलेले हात तिसऱ्यांदा पोळून घ्यावेत? तेही युवराजांच्याबाबत? कैसे व्हावे?” छत्रपती अस्वस्थ झाले. कुणीच काही बोलेनात तसे तेच म्हणाले, “आम्हास कलशाभिषेकाचं कोणतंच भय नाही वाटत. तसा मिर्झा राजा रजपूतही आपल्या कुलदेवी चंडीला लक्षाभिषेक करूनच आम्हास नेस्तनाबूत करण्यासाठी आला होता. आमच्या जिवाचं जे बरंवाईट होणं असेल, ते कणाच्या इ्च्छेनं नाही. ते साक्षात जगदंबेच्या इच्छेनंच होईल. पण आम्हास धास्त वाटते, तौ या राज्याच्या बरंवाईटाची. युवराजांच्या मनी सिंहासनाची हवस उठली असेल आणि ते दिलेरसारख्या कडव्या पठाणी गनिमाशी हातजोड करीत असतील याची खातरजमा झाली, तर आम्हास रक्ताचं नातं परतं सारून त्यांचा बंदोबस्त कठोरपणे करावा लागेल! त्यापूर्वी त्यांना एक संधी देण्याचं आमचे मनी आहे. आजवर आईनं कौल दिला तसं करीत आलो. तसंच करू.”

छत्रपती थांबले. त्यांचा निर्धार बघून अण्णाजींचे डोळे लखलखले. सदर उठली. मानकरी खासेवाड्याबाहेर पडले. अण्णाजी दत्तो कारभाऱ्याबरोबर आपल्या वाड्याकडे निघाले. झडते मुजरे ते स्वीकारीत होते, पण त्यांचे मुजऱ्यात लक्ष नव्हते. मनोमन ते एकाच गोष्टीचा अंदाज घेत होते. महाराज युवराजांना एक संधी देणार ती कोणती असावी? काय बेत असावा छत्रपतींचा?

सृष्टी उन्हाच्या सोनेरी श्रीफळाने आणि तांदूळदाण्यांनी श्रावणश्रीची ओटी भरू लागली. येसूबाईचे डोहाळजेवण झाले. या विधीला येसूबाईना ओटी भरण्यासाठी रायगडाहून साजपेहरावाची दोन तबके आली. एक छत्रपतींचे आणि दुसरे पुतळाबाईसाहेबांचे. पुतळाबाईंनी निरोप धाडला होता – “येण्याची खूप हौस असता येणे होत नाही. मनी किंतू धरू नये. तब्बेतीस राखून असावे.”

धाराऊ आता येसूबाईंना सोडून हलेनाशी झाली. तळहातावरच्या फोडासारखी जपू लागली. श्रीकृष्णजन्माष्टमी मागे पडली. श्रावण वद्य एकादशीचा दिवस उमटला. शिरक्यांच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला.

“कन्यारतन आलं. भावेसरी पावली.” सुइणीने सुवार्ता ऐकवली.

येसूबाई “मासाहेब’ झाल्या! संभाजीराजे ‘आबा’ झाले! राजकुळातील लाभाचे पहिले नातमुख’ ख जन्मास आले. वाड्यावर नगारा, चौघडा दुडदुडु लागला. उखळीचे बार उठले. आजोबा झालेले पिलाजी वाड्याच्या सदरेवर बैठक घेऊन परातीतील साखर रयाताव्याला वाटताना हसत म्हणाले, “आम्ही म्हातारं झालो बाबांनू! नातवंड आलं.”

संभाजीराजांना ही खबर कळताच त्यांच्या मनाची गत लागली – “आज थोरल्या आऊ असत्या, तर किती लगबगीनं त्या आमच्याकडे आल्या असत्या! कशा-कशा प्रकारे बोलून त्यांनी आम्हास सामने खडे राहणं कठीण करून सोडलं असतं! आणि आमच्या मासाहेब… त्यांचा तर चेहराही नीट याद नाही होत. त्या सावळ्या होत्या म्हणे. धाराऊ उजळ आहे. तिची सावली बघताना तीच आम्हास मासाहेब वाटली. आम्ही ‘आबा’ झालो! केवढं मनाची घालमेल करणारं हे सत्य! सत्य की स्वप्न? आमचे आबासाहेब “आजोबा’ झाले. आजोबा! थकले असतील आबासाहेब दख्खनेच्या मोहिमेनं. ही खबर ऐकून त्यांना कोण खुशी होईल. टाकोटाकीनं ते नातमुख बघण्यास पुरात येतील. आम्ही त्यांचे चरण बघू. किती दिवस झाले, त्यांचे दर्शन नाही. जिवाची उलघाल इथे कुणास बोलावी? कशी?

“काय आज्ञा आहे युवराजांची?” रुजू झालेले परशरामपंत अदबीने बोलले.

“पंत, फलटण, सिंदखेड, रायगड असे चौवाटा थैलीस्वार धाडा. आम्हास कन्यारत्न झाल्याचं कळवा. रायगडी आबासाहेबांना लिहा – ‘आपण आजोबा झालात.

आपलं दर्शन घेण्यास आपली नात वाट बघते आहे.”

बारशाचा दिवस उजाडला. पिलाजींच्या वाड्याला आज कौतुकाचे, उत्साहाचे कसे भरते आले होते. वाड्यातील लहान-थोर माणूस नवे नेसून नटले होते. पिपाणी, नगाऱ्याची झुंज जुंपली होती. वाजत-गाजत चारी वाटांनी गोतावळ्यांचे बाळंतविडे वाडा चढू लागले. सदरी बैठकीवर बसलेले संभाजीराजे भट-भिक्षुक, गोसावी, बैरागी यांना दाने देऊ लागले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment