महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११८

By Discover Maharashtra Views: 1222 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११८ –

तळपत्या, समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्याची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडाईताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तसलीम देऊन तो सदरेबाहेर पडला.

संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरेमागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजीने त्यांना मुजरा दिला. त्याच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले, “खंडोजी, आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे. हाक्‍्यांना वर्दी द्या.”

खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धन्याकडे बघतच राहिला. वळिवाच्या बेलाग धारांनी टिपण धरले. शिर्क्यांच्या वाड्यातून मोगली घोडाईत तशा धारांतही बाहेर पडला. दिंडीबाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला बिचकून जागचे हलेना. त्याच्या खुब्यावर मनगटाचा तमाचा लगावत स्वाराने त्याला शिवी हासडली – “इसकी मा का!”

मोगली घोडाईत मांड जमवून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळिवाची मारझोड ठेवून! त्याच्या पाठोपाठ शिरक्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडाईतही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्याच्या टापांबरहुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ!

महाराजांनी शृंगारपुरावर नेमलेला खास विश्वासू चाकर! वारा, पाऊस, विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गोटातून आला होता, याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन त्याची खबर सुरनीस अण्णाजींच्या कानी घालणार होता.

दरुणीदालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाचे कोपलेले रूप बघणाऱ्या येसूबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या – “आम्ही सुचवून बघितलं स्वारींना आज वळिवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजांचा भरोसा नसतो. पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमखास बाहेर पडणार! तेही पोळलेला हात घेऊन!”

“युवराज, एक सोचनेकी खबर है। विश्वनाथ शृंगारपूरसे गुम हो गया? कहाँ गया ठिकाना नहीं॥” कवी कुलेश कमरेत झुकत संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दालनात आसनावर बसलेले संभाजीराजे ते ऐकताच चटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोनचंपकाचे फूल फिरका घेऊ लागले.

“कोण आहे?” एक राजजरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रोखाने उठला. दरवाजावर हत्यारी पहारा देणारा आत पेश झाला.

“खंडोजींना याद फर्माव!” त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कवी कुलेश बुचकळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्लाळ दालनात आला.

“आज्ञा स्वामी,” म्हणत त्याने मुजरा दिला.

“खंडोजी, रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीनं आमच्या सामने पेश करा. दोन खातरजमेचे घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे.”

“जी.” खंडोजी आला तसा निघून गेला.

“कविराज, तुम्हास आठवतो महाभारतातला तो श्लोक आम्ही आग्रहानं “बुधभूषणम्‌’मध्ये घ्यावयास लावलेला. ‘जैसा मनुष्य इतरांशी वागतो, तैसेच त्याला अवघे वागवितात.’ ते धर्मास धरूनच आहे. फसवेपणास फसवेपणाच मारक ठरतो. सच्चेपणाला सच्चेपणच सायवळ होते, असे सांगणारा!” कवी कुलेशांनी होकाराची मान डोलवली आणि तो क्लोकच युवराजांना पेश केला

“यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्यस्तस्मिंस्तस्था वर्तितव्यं स धर्मः।

मायाचारो मायया बाधितव्य: साध्वाचार: साधुना प्रत्युपेय:।।”

“व्वा! कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो.” संभाजीराजे बोल बोलत कुलेशांच्यासमोर आले. आपल्या हातीचे चंपकफूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले.

“या तुम्ही कविराज.” कसल्यातरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले.

“जो आग्या.” कुलेश बाहेर पडले.

विश्वनाथ, अण्णाजी दत्तो आणि मातुश्री सोयराबाई साहेब यांच्या चर्या आलटून- पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. “जैसा मनुष्य इतरांशी वागतो, तैसेच त्याला अवघे वागवितात!’ युवराजांच्या मनी काहीतरी बांधून पक्के झाले.

“मुजरा धाकलं धनी.” रायाजी, अंतोजीची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघताच संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रोखाने आपणहून गेले. दोघांच्याही खांद्यावर झटकन हाततळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खिनभर निरखले. धाराऊची ती बांडी पोरे त्यांना रामराजांसारखी रक्ताचीच वाटली.

“दरवाजा लोटून घ्या.” पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली.

“सरखायाजी, अंताजी आम्हास वळिवाचे ढग घेर टाकणार! रायगडी काहीतरी शिजू घातलं आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडं कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील, ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्यावर घारीची नजर ठेवा!! आमच्या बाबतीनं काही कानी आलं, तर टाकोटाकीने आम्हास माग द्या. इथून निघताना कापूरहोळास शेतकामाची जोडणी लावणेस जातो आहोत, अशी हूल ठेवा. धाराऊला याची समज द्या. निघा तुम्ही.” संभाजीराजांनी दोघा भावंडांचे खांदे थोपटले. ऊरभेट दिली. दोघेही गाडेबंधू काही न बोलता, पण सारे मनोमन उमगून बाहेर पडले.

त्या दिवशी दुपार टळतीला लागली, असे शिरक्यांच्या वाड्यातून चार घोडाईत बाहेर पडले. भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत ते यात्रेला चालल्यासारखा सादिलवार चालीने चालले. वेस मागे पडताच मात्र त्यांची जनावरे चौटाप उधळली. रायगडाच्या रोखाने! रायगड आता घरच्याच डाव-प्रतिडावावर पडला. नियतीच्या इच्छेने! प्रतागडची आणि तुळजापूरची अष्टभुजा ‘श्री’ हे सारे शांतपणे बघत होती.

दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या फत्ते घेणाऱ्या खबरीमागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या – “किल्लेदार नसिर मुहमदास वळते करून छत्रपतींनी जिंजी मारली. सोमोत्तर पेरुमल्लम्‌ येथे ज्या मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या, त्यांचे महाराजसाहेबांनी पन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले. तेथे शिवर्पिडी स्थापन केल्या. महाराज वेलोर, तिरुवाडीवर चालून गेले. वालदूर व तेवेनापट्टमचे किल्ले महाराजांनी मारले.”

येणारी हर खबर घेऊन शेृंगारपुरात पिलाजींच्या वाड्यावरची नौबत पडत्या पावसात झडझडू लागली. ती ऐकताना शिवारातले गारठलेले कुणबी हातची मशागत खिनभर थांबवून, एकमेकांना नजरांचे इशारे देत, हरळ्या देत “भवानी भावेसरी उदं गं उदं!!’ म्हणत पुन्हा अंगी नवा ताव घेत जोमाने मातीशी झटत होते. येणाऱ्या खबरीचा वकूब बघून संभाजीराजे सदरेवर खबरगीराला होनांची थैली, सोनकडे, घोडा, हत्यार, पेहराव तळपत्या डोळ्यांनी बक्ष करीत होते. लागलीच सदरी बैठक सोडून अंत:पुरात जाऊन ती-ती खबर जातीनिशी राणूअक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांच्या कानी घालीत होते. प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रोखाने स्वत:ला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता – “महाराजसाहेब, या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीतच पाहिजे होतो.’ बाहेर कोसळणाऱ्या पाणसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवीत होत्या. अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत, ते अंत:पुर सोडून बैठकमहालात येत होते. पंडित मंडळींच्या संगतीत अष्टदश पुराणांवर चर्चा करीत होते. कालीमातेची पूजा बांधीत होते.

पावसाने आता चांगलेच अंग धरले. एके दिवशी आपल्या डावे-उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजीराजांच्या महाली रुजू करून खंडोजी बल्लाळ बाहेर पडला. ते रायगडाहून परतलेले अंतोजी व रायाजी होते. पगड्यांच्या कडांवरून टपटपते पाणथेंब महालाच्या उंची रुजाम्यावर निथळवीत अंतोजी- रायाजीने युवराजांना अदब दिली. त्यांना बघताच रायगडचा करीणा ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. “बोला.” राजाज्ञा सुटली.

“धनी, गडावं सात म्हालांत बॉट शिरकवाय वाव न्हाई, असा बंदोबस्त हाय. सुरनिसांच्या दफ्तरावर हत्यारबंद पहारा जारी ठेवलाय. त्येंची थोरल्या म्हालाकडं ये- जा वाडलीया.” अंतोजीने हाती लागले होते, तेवढे पेश केले.

“गडावयनं भल्या फाटेचं हाराकारे खलितं घिऊन थोरल्या धन्यांच्याकडं कांदडी मुलकात कूच होत्यात.” रायाजीने आपल्या भावाची जोड देत, त्यात भर घातली. “वाड्यावं काय चाललंया माग येत न्हाई पर… पर…” बोलता-बोलता अंतोजी थांबला.

“पर काय? बोल अंता.” संभाजीराजांनी त्याला धीर दिला.

“गडावं चाकरमान्यांत बोलवा उटलीया की….”

“कसली बोलवा?” संभाजीराजांनी त्याचा खांदा हाताच्या पकडीत आवळला.

“तुमी… धाकलं धनी तुमी म्हनं गलिम दिलेलच्या गोटात जाणार!” अंतोजीने गर्दन पाडली. “अंतोजी!” दोघाही गारठलेल्या गाडेबंधूंच्या अंगावर काटा उठविणारी जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठांतून फुटली. जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले. अंतोजी-रायजीला “या तुम्ही” असे म्हणण्याचेही भान त्यांना राहिले नाही.

पावसाळा परतला. धुक्याची शिबंदी घेऊन थंडीने शृंगारपुरावर तळ टाकला. दसरा धरून, सारवलेल्या खळ्यांबर तिवडे उभारून कुणब्यांनी मळण्या साधल्या. भात, नागली, साव्याचा दाणागोटा कणगुल्यांत आबादान झाला. नंदीबैलवाले ‘गुब गुब’चा ढोलसाद घुमबीत वाडी-मजऱ्यांतून फिरू लागले. मोरपिसांच्या उंच टोप्या घालून घाटा बाजवीत, वासुदेव भल्या पहाटेचे सुभ्यातील रयतेला जागवीत फिरू लागले. शाळूचे दिवस हटून दिवाळसण मागे पडला. दिवस कासराभर वर चढला तरी दहा हातांवरचे दिसत नसावे, असे धुक्याचे वट करायचा जोर धरला.

पिलाजींच्या वाड्यावरची सांजनौबत झडून भोवतीच्या रानकाळ्या झांझटात विरली. एका चांदीच्या तबकात हुलग्याच्या गरम-गरम माडग्याचा वाडगा घेऊन येसूबाई आपल्या स्वारींच्या सुखमहालात आल्या. तबक चौरंगीवर ठेवताना त्यांच्या सोनपुतळ हातीचा चुडा किणकिणला. अंगीचा जरीबुंदी, चंद्रकळी शालू महालातील शमादानांच्या उजेडात झगमगला. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेले, केस मानेवर रुळणारे संभाजीराजे येसूबाईच्याजवळ आले. काही न बोलता येसूबाईनी माडग्याचा वाडगा उचलून स्वारींच्या हाती दिला.

काव्यपंक्तीसारख्या गोमट्या दिसणाऱ्या येसूबाईना संभाजीराजे निरखीतच राहिले. खालच्या मानेने येसूबाई पायतळीच्या फरशीवर पसरलेला उजेड पायाच्या अंगठ्याने उकरण्याची कोशिश करीत होत्या. भरून पावलेल्या रानावरचे फडफडते पतंग त्या महालात मुजोरीने घुसून शमादानांच्या ज्योतींवर घालून घेत होते. ती उबदार शांतता फोडीत मग येसूबाईच म्हणाल्या, “हातचं माडगं खोळंबून राहिलंय!”

“नुसतं माडगंच का? आम्हीही खोळंबून राहिलोय!” मर्दानी मंद हसत संभाजीराजांनी बाडगा ओठांना लावीत, एक भुरका घेतला. समाधान पावल्याने येसूबाईंनी त्यांच्याकडे एक कोनी नजर टाकली. संभाजीराजांच्या मिशीत हुलग्याचा कण अडकून पडलेला बघून त्यांनी पटकन नजर खाली टाकून पदराचा शेव लगबगीने आपले हसू दाबण्यासाठी ओठात दिला.

माडगं चाखत संभाजीराजे महालात फेर धरू लागले. कसल्यातरी ओढीने ते येसूबाईंच्या सामोरे आले. हातचा वाडगा पुढे करीत म्हणाले, “घ्या. तुम्ही दिलेलं माडगं केवढं जमलंय चाखून बघा!”

संकोचून येसूबाई तशाच उभ्या राहिल्या होत्या.

“घ्या. आमच्या ओठांनी याला काही खारटपणा नाही आलेला!” संभाजीराजे खळाळून हसले. झटका बसावा तसा हात पुढे करीत, येसूबाईनी वाडगा आपल्या हाती घेतला आणि तीर्थांचा घोट घ्यावा, तसा एकाच दमात वाडगा रिता करून, चांदीच्या तबकात तो ठेवला. तबक उचलून त्या तरातरा चालत महालातून पापणी लवायच्या आत बाहेरही पडल्या!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment