महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११६

By Discover Maharashtra Views: 1240 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११६ –

“युवराज, भाईर सदरेला सुभ्याचा हा कुणबाऊ रयतावा दरसनासाटनं खोळंबलाय. त्येंची कायतरी फिर्यादी अर्जी हाय. ” ही बैठक लवकर उठणार नाही, हे हेरून पिलाजींनी हे धाडस केले होते. जमल्या बैठकीची साखळी तुटली.

“आम्ही सदरेला येतो आहोत. वर्दी द्या त्यांना मामासाहेब. ” संभाजीराजे स्वत:शीच हसले. आणि “लोकाधार: ‘ कळेल न कळेलसे पुटपुटले. “पंडित, आम्ही आलो.” संभाजीराजांनी ऐन रंगाला आलेली काव्यबैठक सोडली ब ते सदरेच्या रोखाने चालू लागले. बाहेर उभे असलेले रायाजी, अंतोजी व खंडोजी बल्लाळ त्यांच्या पाठीशी झाले. सदरेवर आलेल्या युवराजांना, मुंडी- पागोटी घातलेल्या, लंगोट्याधारी धा-वीस कुणब्यांनी मुजरे दिले. संभाजीराजे सदरी बैठकीवर बसले. खंडोजी, रायाजी व अंतोजी त्यांच्या दुतर्फा अदब धरून उभे राहिले.

जमले कुणबी काही बोलतील म्हणून संभाजीराजांनी त्याच्यावर नजरफेर टाकला. त्या सगळ्यांच्या माना खाली होत्या. कसल्यातरी काळ्या, दाट कांबळीखाली ते मातीत खपणारे जीव डालल्यासारखे दिसत होते. संभाजीराजांनी खंडोजी बल्लाळला नजर दिली. तिचा रोख पकडीत खंडोजी पुढे झाला. कुणब्यांना म्हणाला – “कुणीतरी म्होरकं होऊन बोला. जी असेल ती फिर्यादी रुजू घाला. ”

त्या जमावातील, कानकल्ले चुन्यासारखे सफेत झालेल्या एका म्हाताऱ्याने काळीज बांधून जबान खोलली, “पर आमास्त्री न्याव मिळंल का कसं? ”

“बोला तरी. ” खंडोजीने त्यालाच चुचकारला.

“सरकार, आमी धरनी मायंची ल्येकरं, आपुन आमचं बाप. औंदा माय कोपली. शिवारं धरली न्हाईत. सरकारचा धारा गुदरायचा त्ये निभत न्हाई. गावकामदाराला हातापाया सांगिटलं. त्यो कानाला हाताच टाळं लावून रिक्‍यामी जाला. गडावं ह्यो पायाशी घालावं म्हून ग्येलो. पंत, सुरनिसांची भेट घ्येतली. त्ये म्हनलं, ‘ह्यो सरकारी धारा हाय. होतर सूट-सवलत मागा. पर त्यो गुदराय पायजे. ‘ मायबाप, काय न्हाई आमाकडं! धारा गुदरायचा तर दाव्याच्या गुराढोरांचा इक्रा कराय पायजे. ढोरं आमा कुनब्यास्री ल्येकरांगत. काय करावं धनी? ईस कोसाचा पल्ला टाकून आलो. मायबाप, म्हाराजांच्या माघारी आमास््री ठाव द्यावा. धारा औंदा माफ करावा. ” डोळ्यांच्या कडांना पाणी धरलेला म्हातारा कमरेत झुकला.

“लोकाधार:! लोकाधार:!! ” कुणीतरी संभाजीराजांच्या मनात आठी हातांनी भंडाऱ्याचा मुठी उधळू लागले. त्यांची कविमुद्रा पालटत-पालटत निर्धारी राजमुद्रा झाली. ऐकणाऱ्याला दरारा बसावा, असे निश्चयी बोल त्यांच्या ओठांतून सुटले,

“खंडोजी, या समस्तांस आम्ही कुल धारा माफ केला असे! असे जे-जे कोणी असत त्यांसही तो माफच असे! यासाठी रोखे सिद्ध ठेवा. दस्तुरांसाठी आम्हास रुजू करा. खासे हारकारे निवडून ते टाकोटाक गावचे गाव जातील तसे करा. ”

“जी. आज्ञा. ” खंडोजीने झुकत ती लोकाधारी आज्ञा वरच्यावर झेलली.

“बाबा, या तुम्ही आता. तुमचा धारा तुम्हास माफ आहे. काही अडले-नडले तर अनमान न करता आम्हास भेटा. आमचे दरवाजे तुम्हासाठी खुले आहेत.”

संभाजीराजे उठले. भरून पावलेले सगळे कुणबी कमरेत झुकले. आता त्यांच्या पाठीवर चिंतेची काळी कांबळी नव्हती!

पुन्हा बैठकी दालनाच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर सुरनीस अण्णाजींची चर्या मात्र एकसारखी नाचत राहिली. “हा माणूस आम्हास खूप नड देणार! ‘ शंकेचा झेपावता खंड्या पक्षी उडाला. त्यांच्या मनाच्या गंगासागरात डुबला. मासोळी मटकावून आपली लांब चोच साफ करीत नियतीच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला.

संभाजीराजे पुन्हा पंडितांच्या मेळ्यात येऊन बसले. हातातील गुलाबकळी त्यांनी बिछायतीवर दूर ठेवून दिली. डहुळलेल्या मनाच्या अवस्थेतच त्यांनी, तिष्ठत बसलेल्या

परशरामपंतांना मत्स्यपुराणातील निवडीचा श्लोक सांगितला –

“यद्यपि अल्पतरं कर्म तदपि एकेन दुष्करम्‌|

पुरुषेण सहायेन किमु राज्यं महोदयम्‌।। ”

– लहान का असेना, पण अवघड कर्म करणाऱ्या पुरुषांच्या साहाय्याने कोणते राज्य मोठे होणार नाही?

अनेक भावनांची जाळी चेहऱ्यावर पसरलेल्या संभाजी राजांना, त्यामुळे आणि गोंधळून गेलेल्या बैठकीतल्या पंडितांना कुणालाच कल्पना नव्हती की, या वेळी छत्रपती महाराज शहाजणांच्या गजरात, तोफ भांड्याच्या कल्लोळात, झुलबाज आणि नाना अलंकारांनी सजलेला निशाणाचा हत्ती समोर ठेवून, पांढऱ्याशुभ्र विजय घोड्यावर मांड जमवून, पश्चिम वेशीतून भागानगरात प्रवेशत होते. त्यांच्या पाठीशी हजारोंचा मावळी फौजफाटा चालला होता. तानाशहाची कुतुबशाही रय्यत हवेल्यांच्या सफेल्यांत येऊन दाटीवाटीने मराठ्यांच्या सर्जा राजाचे दर्शन डोळाभर घेत होती.

शृंगारपुरात ‘बुधभूषणम्‌’चा द्वितीय अध्याय संपत होता, भागानगरात महाराजांच्या हयातीचा “शिवभूषणम्‌’चा शेवटचा अध्याय सुरू होत होता!

“मिश्रकनीति ‘ हा बुधभूषणम्चा तिसरा अध्याय बांधून झाला. बैठक उठू घातली. सारे पंडित संभाजीराजांना अदब देऊन जायला निघाले, पण केशव पंडितांच्या मनी काहीतरी हेत घोळत असल्याने ते खोळंबले.

“बोला केशव पंडित, काय बाब आहे?” पंडितांना काहीतरी बोलायचे आहे हे ताडून संभाजीराजांनी विचारले.

“शुक… एक अर्जी आहे युबराजांच्या चरणी. आज्ञा होईल तर पेश करू. ” केशव पंडित अडखळत म्हणाले.

“बोला. ”

“पुरात कालिमातेचे एक शिवयोगी भक्त आहेत. युवराजांच्या दर्शनाची ते इच्छा करतात. आज्ञा झाली तर…”

“बेशक. पंडित, घेऊन या त्यांना एकवार. ” संभाजीराजांनी संमती दिली.

एके दिवशी मग पंडित कालिभक्त शिवयोगी व त्यांचे शिष्य गणेशभट जांभेकर यांना घेऊन वाड्यावर आले. शिव योग्यांनी अंगी कफनी धारण केली होती. रुद्राक्षमाळेने जटेचा संभार बांधला होता. दंडावर, कपाळावर भस्माचे पट्टे फिरविले होते. केशव पंडितांनी शिवयोग्यांना संभाजी राजांच्या बैठकी दालनात पेश करताच युवराजांनी पुढे होत कालिभक्ताचे पाय शिवले.

“जय भद्रकाली ” म्हणत शिवयोग्यांनी संभाजीराजांच्या टोपावर आशीर्वादाचा हात ठेवला. योग्यांच्या हाताला धरून संभीजाराजांनी त्यांच्यासाठी खास मांडलेल्या व्याघ्राजिनाच्या बैठकीवर त्यांना आदराने बसते केले.

“युवराज, एक संकल्प मनी आहे.” मिटल्या डोळ्यांचे योगी आभाळ कब्जात घेण्याच्या बोलीत बोलले.

“जी. आज्ञा व्हावी. ” संभाजीराजांनी त्यांना नम्नभावे दाद दिली.

“या राजवास्तूत माता भद्रकालीची प्रतिष्ठापना व्हावी. तुमच्या वीर हातांनी तिला भोग मिळावा. ”

“जी. आज्ञा प्रमाण. ” संभाजीराजांनी शिवयोग्यांसमोर गर्दन झुकती केली. संतुष्ट झालेले शिवयोगी व गणेशभट निरोप घेऊन वाड्यातून बाहेर पडले.

शिरक्यांच्या वाड्यावर कालीच्या प्रतिष्ठापनेची जोरदार तयारी सुरू झाली. पिलाजीमामा, गणोजीराजे ब खासा संभाजीराजे यांनी देख देऊन प्रतिष्ठापनेचा सारा सरंजाम सिद्ध केला. पुरातील कसबी शिलावटाने कृष्णवर्णी कातळ पारखून, अंगावर धावून आल्यासारखी वाटावी, अशी भद्रकालीची पुरुषभर उंचीची मूर्ती खोदली. शिवयोग्यांनी शोधलेल्या सुमुहुर्तावर मः महाकालीची ही मूर्ती बाजत-गाजत वाड्यावर आणण्यात आली. तिला रक्तरंगी आसवाब चढविण्यात आले होते. राणूअक्का, येसूबाई, दुर्गाबाई, राजकुवरबाई यांनी आपल्या भरल्या चुड्यांच्या हातांनी भद्रेची ओटी भरली.

शिवयोग्यांनी एका तबकात ठेवलेली नंगी तेग उचलून ती संभाजीराजांच्या हाती दिली. भद्रेच्या डोळ्यांना डोळे जोडलेले संभाजीराजे भारावल्यासारखे धीम्या कदमी पुढे झाले. मातेसमोर गुडघे टेकीत त्यांनी आपले कपाळ क्षणभर फरसबंदीला भिडविले. मग माथा वर घेत हातीची तेग कपाळाला लावली. हत्यार डाव्या हाती पेलून ‘जय भद्रकाली ‘ अशी भाक फोडून त्यांनी उजव्या हाताचा अंगठा हत्याराच्या पाणीदार शिकलेवरून सरकन ओढला. भोसलाई गरम रक्ताची धार अंगठ्यावरून उमळली. आपल्या राजरक्ताचा तवाना भोग भद्रेला देण्यासाठी युवराजांनी ठिबकता अंगठा तसाच तिच्या चरणांजवळ नेला. दुर्गाभद्रेची प्रतिष्ठापना झाली!

रायगडावर मात्र वेगळेच शिजले गेले होते. महाराणी सोयराबाईंच्या खासेमहालातून बाहेर पडलेल्या अण्णाजी दत्तोंनी एक थैलीबंद खलिता विश्वासू खबरगिराच्या हवाली केला होता. खलित्यापोटी मजकूर होता – “महसुलाचे उसुलाबाबत युवराज कारण नसता घालमेली करतात. रयतेस सरसकटीने धारा माफ केलिया सरकारी खजिना आबादान रक्षावा ते कैसे व्हावे? ”

या कशाची कल्पना नसलेले छत्रपती तिकडे भागानगरात तानाशहाशी मनाजोगे राजकारण बांधून, मुलूखमारीसाठी त्यांच्याकडून हवा तसा सुलूख करवून घेऊन, भागानगराबाहेर पडले होते. आदिलशाहीवर चालून जाण्यासाठी. दूरवर नजर पोहोचणारी महाभद्र दुर्गाकाली मात्र आपल्या विस्फारल्या डोळ्यांनी हे सारे शांतपणे बघत होती!!

शृंगारपुरात संभाजीराजांनी भक्तिभावाने ‘काली’ची प्रतिष्ठापना केली होती. रायगडावर मात्र सुरनीस अण्णाजी दत्तो आणि महाराणी सोयराबाईसाहेब यांच्या मनी “कलीची प्रतिष्ठापना चालू होती!!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment