धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०८ –

“या आजारात महाराजसाहेबांचं काही बरंबाईट होतं तर! छे छे !” मनचे हे अशिव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वत:शीच पुटपुटले, “जगदंब, जगदंब.” मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली. जनावर उधळले, दौडत-दौडत बरेच पुढे गेले. तांडा बराच दूर मागे राहिला, हे ध्यानी येताच संभाजीराजांनी घोड्याला आवर घातला आणि त्याला धिमे करीत-करीत स्वतःला तांड्याशी जमवून घेतलं. पुतळाबाईंच्या मेण्याजवळून जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले. त्यांच्या मनाचा बिसकटलेला तांदूळ चौक पुन्हा नीट मांडला जाऊ लागला. त्यांना वाटले, तांडा अमळ रोखावा. मासाहेब पुतळाबाईशी मनभर बोलून घ्यावे. मन हलके करावे, पण तसे काही त्यांनी केले नाही.

सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती. प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते, तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती! तिरस्काराने भरलेले अनेक डोळे त्यांच्या उरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते. श्रींच्या छत्रपतींना, प्रत्यक्ष जन्मदात्याला, विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले आहे, असा आरोप- क्षेप त्या नजरांतून होत होता.

बधिर मनाची कोंडी-खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्याची जागा संताप- यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली. मार्गावरील झाडाझुडपांत त्यांना सोयराबाईच दिसू लागल्या. पण – पण त्यांच्या जरीकिनारी पदराआड कवळ्या उमरीचे रामराजे हात उभवून “दादामहाराज’ अशी साद घालताहेत, असा भास होताच त्यांचे याही मोर्च्यावर बांधलेले मन ढासळू लागले. कोंडीच कोंडी पडली. विचाराने सैरभैर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुकतेच पुटपुटू लागले… “जगदंब! जगदंब!”

पाचाडात जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेताना संभाजीराजांचा ऊर दाटून आला. रायगड चढून जावे, असे त्यांना वाटेना. पाचाडच्या वाड्यातच पुतळाबाई, येसूबाई यांच्यासह चार दिवस त्यांनी मुक्काम टाकला. ते आल्याची वर्दी गडावर पोच झाली होती, पण त्यांच्या हालहवालासाठी फडाकडील कुणीच गड उतरले नाही. नाही म्हणायला कबी कुलेश तेवढे त्यांची भेट घेऊन गेले. चार दिवसांनंतर कबिल्यासह संभाजीराजे रायगड चढून आले. वैराने पाठीवर लादून आणल्यासारखी साताऱ्याची अफवा इथे रायगडावरही पसरली होती. भेटणारी कारखानदारी माणसे संभाजीराजांकडे विचित्र घृणेच्या नजरेने बघत होती. त्यांनी बघितले आहे असे वाटले, तर जुलमाने केल्यासारखे मुजरा करीत होती.

पंधरा दिवस झाले. रायगडी आलेले संभाजीराजे दोन वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय ते तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उधो जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराणग्रंथांवर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत-बाहेर करणारी धाराऊ त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, ‘धाकलं…”

“बोला.” तिच्या कपाळावरच्या गोंदणावर नजर ठेवीत संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या तेजवान डोळ्यांकडे आणि मानेभोवती रुळून पडलेल्या केसांच्या कुरळ्या, दाट घेराकडे बघताना धाराऊ काय विचारायचे आहे, तेच विसरली. तिचे अलीकडे असेच होत होते. ऐन भरीचे, महाराजांच्या वाणावर उतरलेले “धाकले’ बघताना तिला खऱ्याखुऱ्या धाकल्यांची तिने बघितलेली कैक बालरूपे आठवायची.

धाराऊला गुमान थांबलेली बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चलबिचल झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वत:शी बोलल्यासाखे घोगरट म्हणाले – “धाराऊ, आम्ही जाणतो, तुम्हाला काय विचारायचं आहे ते! आम्ही… आम्हीच महाराजसाहेबांना…अभक्ष्य…”

झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठांवर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डबडबून आले. “धाकलं – म्या तुम्हास्री दूद पाजलंय. ते दगा-फटका करणारं बेमान न्हाई. त्यासाठनं न्हाई म्या जीभ उचालली. गडावं येऊन पंदरोडा जाला. सूनबाईंची तुम्ही बरं-वाईट म्हून सब्दानं दखल घेतल्याली न्हाई. काय वाटत असंल त्येस्री? धाकल्या रानीसाबास्त्री भेटत न्हाई तुम्ही. काय करावं त्येनी?”

जे सांधायला प्रसंगी जिजाऊही थकल्या असत्या ते धाराऊ आपल्या गावरान मायेपोटी सांधू बघत होती.

“धाराऊ, आम्हास कुणालाच भेटावंसं वाटत नाही.”

“असं म्हून कसं चालंल? तुमची वाट बघून-बघून थकल्याल्या धाकल्या रानीसाब इकडंच याया निगाल्यात. संगं बाळ म्हाराजबी हाईत.”

पुतळाबाई येताहेत हे जाणवताच संभाजीराजे विचारात गेले. राणीवशाकडचा हा एक जागा त्यांच्या भरोशाचा होता. काही बोलावे, असे हे एकच ठिकाण होते. धाराऊ निघून गेली. थोड्याच वेळात राजारामांचा हात हाती धरलेल्या मासाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आल्या. त्यांना तसे बघताना संभाजीराजांना वाटले – “खरोखरच बाळराजे यांच्याच पोटी उपजायला पाहिजे होते!

महाराजांच्यासाठी आंबेचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसताच खेचल्यासारखे संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी रामराजांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला.

“ युवराज ..” बोलणे कसे फोडावे, या विचाराने पुतळाबाई थांबल्या.

“आमच्यावर नाराजी धरलीत, तर ती आम्ही समजू शकतो. पण… पण सूनबाईंचा काय दोष? त्या गडावर आहेत, याचंही भान तुम्ही ठेवत नाही. हा कोण रिवाज?”

“मासाहेब… आमचे सारेच रिवाज चुकले आहेत. एका सुवासिनीचं बळमर्दीनं हरण करणारे आम्ही… जन्मदात्याला अभक्ष्य देणारे आम्ही. कुठल्या… कुठल्या तोंडानं त्यांच्यासमोर जाऊ शकतो? रोज दर्पणी बघून आमच्या नावानं कपाळी पट्टे घेताना त्यांना काय वाटत असेल, तेच आम्हाला समजेनासं होतं!” संभाजीराजे कुठंतरीच एकरोख बघत ताठर झाले.

“युवराज – ” पुतळाबाईंनी शब्दांचाच हात करून जसा त्यांच्या खांद्यावर अलगद ठेवला. “पुरुषांना असं आपलं आपणालाच तोडून बोलायची मोकळीक तरी असते. आम्हा बायकांना तीही नसते! तुम्ही युवराज आहात. तुम्हीच काळीज टाकून स्वत:ला कोंडून घेऊ लागलात, तर बाई म्हणून जन्माचंच कोंडलेल्या सूनबाईंनी काय करावं? बाब लागून राहिली आहे ही त्यांच्या मनास.”

“दादामहाराज…” एवढा वेळ ऐकत असलेले रामराजे संभाजीराजांच्या हाताला झोल देत काही बोलायला गेले. ते येसूबाईंच्याबद्दल काही बोलणार या कल्पनेने त्यांना दाद देत संभाजीराजे प्रेमानं म्हणाले, “काय बाळमहाराज?”

“तुम्ही… तुम्ही महाराजसाहेबांना तेवढं विष दिलंत… आल्यापासून आम्हास मात्र एकदाही नाही दिलंत! आम्ही आबासाहेबांची वाट बघतो आहोत. तुम्ही… तुम्ही नाही दिलंत, तरी ते नक्कीच देतील आम्हाला विष!!”

ते ऐकताना संभाजीराजांची कानपाळी रसरसून सुन्न झाली. रामराजांच्या हातातला त्यांचा हात विचित्र थरथरला. पटकन त्यांना उचलून घेऊन त्यांच्या गालावर ओठ ठेवताना संभाजीराजांना त्यांचा चेहराही दिसेनासा झाला. त्या दोघांना तसे बघणे असह्य झालेल्या पुतळाबाई मंद, जडशीळ पावलांनी दालनाच्या झरोक्याशी गेल्या. बाहेर दिसणाऱ्या हनुमानाच्या देवळाच्या घुमटीकडे बघत राहिल्या. हे सारे सावरायला आपले हात थिटे आहेत, या जाणिवेने खिन्न झालेल्या पुतळाबाईंना महाराजांची आठवण झाली. ‘हे बांधायला फक्त स्वारीच समर्थ आहे.’ या एकाच आशेच्या धाग्याला धरून त्यांचे मन स्वत:ची समजूत घालू बघायला लागले. डोळे घुमटीवर जखडले. मन राजांच्या मागाने भटकत राहिले.

विसातमहालातील पुतळाबाईंच्या वाड्यातील बैठकी दालनात येसूबाई उभ्या होत्या. त्यांच्यासमोरून संभाजीराजांची स्वारी लगीने येरझारा टाकीत होती. मध्येच थांबत होती. साऱ्या दालनभर दोघांनाही जाणवेल, अशी शांतता दाटून पडली होती. कुणी बोलावे यासाठी जसा कौलच लागला होता. “कानी पडणाऱ्या बाबींनी तुम्ही आमच्यासाठी शरमिंद्या असाल.” संभाजीराजांनी स्वभावाप्रमाणे सरळ विषयाला हात घातला.

चमकून येसूबाईनी वर बघितले. आपल्या स्वारीच्या चर्येत पडलेला केवढातरी फेर त्यांना जाणवला. मनाला खोलवर चटका चाटून गेला. “आम्ही सारं ऐकून आहोत. अभिमान वाटतो, अशा स्वारींच्या पायाची सेवा करण्याचा मान आम्हांस मिळाला याचा!” येसूबाईंचा आवाज बांधलेला, ठसठशीत झाला.

“मतलब?” गोंधळलेल्या संभाजीराजांचे हात पाठीशी झाले.

“निवाड्याच्या पेचप्रसंगीही स्वारीनं बहीम बोलण्यासाठी मासाहेबांचं नाव ओठाबाहेर दरबारी सुटू दिलं नाही. आबासाहेबांच्या साताऱ्यावरच्या आजारपणात आलेला आरोप ऐकूनही बाळमहाराजांना स्वारीनं तुसडेपणानं तोडून दिलं नाही. आता आम्हास कळून येत आहे…” कुठतरी दूरवर पाहिल्यासारख्या येसूबाई थांबल्या.

“काय?”

“अण्णाजींच्या घरच्या सुवासिनीनं लिंगाण्यावरून आपली कुडी का झोकून दिली असेल ते!”

“का? का दिली असेल?” त्या आठवणींनी संभाजीराजांचा आवाज कातरला.

“तिनंच काय प्रसंगी आम्हीसुद्धा कुडी झोकून द्यावी, असाच स्वारीचा स्वभाव आहे! भरल्या दरबारी स्वारीबद्दल काही वेडे-बिद्रे ऐकण्यापेक्षा आणि एखादा गैरबाका शब्द उच्चारावा लागण्यापेक्षा त्या धीराच्या स्त्रीनं मरण पत्करलं. जे तिला कळलं ते घरच्यांना कळू नये, याचीच खंत वाटते आम्हास!”

त्या शब्दाशब्दाने संभाजीराजांच्या मनी घालमेल उठली. येसूबाईच्याबद्दल त्यांनी बांधलेला अंदाज साफ चुकीचा ठरला! त्या चुकीचाही एक न कळणारा आनंद त्यांना खोलवर स्पर्शून गेला. हलकेच पुढे होत त्यांनी मान खाली घातलेल्या येसूबाईच्या हनुवटीखाली मूठ दिली. त्या टेकणीने त्यांचा मुखडा वर घेत ते म्हणाले, “आम्हालाही आता कळतंय. आबासाहेबांनी शिक्के-कट्यार तुमच्या सुपुर्द का केली ते!”

गोऱ्यामोऱ्या झालेल्या येसूबाईनी मागे होत हनुवटी खुली करून घेतली. तुम्ही शतरंजची खेळी छान खेळता. आम्ही त्या पटाकडे बघताना तक्रार करीत होतो. आठवतं?” संभाजीराजांनी विचारले.

“कसली तक्रार?” येसूबाईना माग मिळेना.

“त्या पटात मासाहेब, युवराज अशी मोहरी नाहीत ही. आज वाटतं तो खेळीचा पट आहे, तसाच ठीक आहे!” सुस्कारा सोडत संभाजीराजे झरोकक्‍याशी चालत गेले. बाहेर बघत पाठीशी असलेल्या येसूबाईना म्हणाले, “तुम्ही, आबासाहेब पटावरची शतरंजखेळी सावधानगीनं खेळता. पण… पण तुमचं कसब थाऱ्यालाही टिकणार नाही, असा शतरंजचा खेळगडी आजवर आमच्या ध्यानी आला नव्हता.”

“कोण?” गोंधळलेल्या येसूबाईनी त्यांच्याकडे बघत विचारले.

“थोरल्या महालीच्या मासाहेब!” झरोक्‍याजवळून थंडगार बोल आले.

तुम्ही पटावरचा शतरंज खेळता. त्या नात्यांचा शतरंज खेळतात. एवढ्या खुबीनं चाल टाकतात की, शह बसणाऱ्याचा जीवच घुसमटून जातो! त्यांच्या पटात मोहऱ्यांना तोटा नाही. शह कुणाला घालावा याचं बंधन नाही.” त्यावर काय बोलावे, तेच येसूबाईंना सुचेना. एवढ्यात संभाजीराजांचे कारभारी महादेव यमाजींची वर्दी घेऊन एक कुणबीण आत आली. युवराज पाठमोरे बघून तिने ती येसूबाईच्या कानी घातली — “साताऱ्यावरनं दत्ताजीपंत आल्यात. धाकल्या सरकारांची भेट मागत्यात.”

“येतो आम्ही,” म्हणत संभाजीराजे महालाबाहेर पडले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here