महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०५

By Discover Maharashtra Views: 1233 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०५ –

महाराज साताऱ्याला निघून गेले. रायगड सोयराबाईंच्या कब्जात आला. संभाजीराजे पंडितांच्या सहवासात शास्त्र-पुराणांच्या अभ्यासात गढून गेले. पंधरवडा लोटला. साताऱ्याहून निघालेला एक हारकारा धापावत रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीपत्राने सारा गड चिंतेच्या काळजीने कळंजून गेला. महाराजांच्या जोखमीचा आजार पोहोचला होता. खाल्ले अन्न उलटून पडत होते. मस्तकशूळ चढला होता. अंगी ज्वर धरला होता.

“पत्रदेखत जरोरीने अवघियांनी निघोन येणे.’ असा निकडीचा खलिता कारभाऱ्यांनी साऱ्या गोतावळ्याला लिहिला होता. चिंताचूर संभाजीराजे पुतळाबाईच्या महाली होते. प्रवासी सामानाच्या संदुका दासदासी निसबतीने भरत होत्या. येसूबाई त्यांना दबक्या जबाबीने सूचना देत आत-बाहेर करत होत्या. कापडाने झाकलेले एक लोटके येसूबाईच्या हाती देत, काळजीची जाळी चेहऱ्यावर चढलेल्या पुतळाबाई म्हणाल्या, “हे मेण्यात घ्या. संदुकेत टिकायचं नाही.”

“हे काय?” अशा अर्थाने येसूबाईनी भुवया चढविल्या.

“ती आंब आहे. उलट्यावर गुणकारी आहे असं सारी म्हणतात.” पुतळाबाईनी त्यांना, आपले मन केव्हाच साताऱ्यावर पोचलेय हे पटवून दिले. येसूबाईनी ते लोटके एका कोनाड्यात आबादानीने ठेवले. सारी जिवाच्या ओढणीने बैचेन असताना थोरल्या महालाकडून कुणबीण आली तिने आपल्या सरकारस्वारींची इच्छा पुतळाबाईंच्या कानी घातली,

“साऱ्यांनी न्याहरीचा अवसर धरून गड उतरून पुढे होणे. स्वारी टळत्या उन्हावर मागून गड उतरणार आहे.”

ते ऐकताना काही न बोलता पुतळाबाईंनी संभाजीराजे आणि येसूबाईच्याकडे नुसते बघितले इथे कुणाचा इलाज चालत नव्हता रली. न्याहारीची वाट न बघता मेणे सिद्ध करण्याची आज्ञा संभाजीराजांनी भोयांना देवमहाली त्या तिघांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पुतळाबाई, येसूबाई मेण्यात बसल्या. संभाजीराजे पुतळाबाईंच्या मेण्याच्या बगलेला झाले. बेगारांनी संदुका डोक्यावर घेतल्या. हुजराती शिलेबंद धारकऱ्यांनी शिस्त धरली. मेणे गड उतरू लागले. हिंदकळू नये म्हणून येसूबाईनी आंबेचे लोटके अल्लाद ओंजळीत धरले होते. त्यांचे मन मात्र हिंदकळतच होते. आबासाहेबांची अनेक रूपे लाटेसारखी त्यातून क्षणभर तरळून जात होती –

“एवढासा जीव पण केवढा भार वाहून नेतो सूनबाई!” एकदा मुंग्यांच्या रांगेकडे बघत ते म्हणाले होते. “तुम्हा-आम्हाला डोळे लाभलेत, ते जगदंबेचे! ते पाझरून नाही चालत.” येसूबाईचे डोळे दाटत चालले

बाहेर पुतळाबाईच्या मेण्याच्या डंबरीला एक हाताची पकड रुपवून एक-एक पावलाने मनोरे, गंगासागर, महादरवाजा मागे टाकणाऱ्या संभाजीराजांना, महाराजांचा एकच विचार हात धुऊन पाठलागावर पडताना हैराण करीत होता – ‘आमच्या जागी तुम्ही असतात तर कळलं असतं, छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम बिछान्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं!

पाचाड आले. मनच्या शंकाकुशंका वारण्यासाठी साऱ्यांनी जिजाऊंच्या समाधाची धूळ मस्तकी घेतली. बेगारांनी संदुका काबाडीच्या बैलांच्या पाठीवर लादल्या. शिलेबंद धारकऱ्यांची पथके वाढविण्यात आली. किरमिजी वाणाच्या जनावरावर संभाजीराजांनी मांड घातली. भोयांनी कदमबाज चाल धरली.

जीवघेण्या व्याधीने घायाळ असलेल्या “शिवा’च्या दर्शनासाठी, ते रक्तजोडीने बांधलेले त्रिदळी, भोसलाई बिल्वदळ वरंद घाटाच्या रोखाने चालू लागले. साताऱ्याच्या किल्ल्यावरच्या, झरोक्‍याची दारे लावलेल्या, पडदे सोडून अंधारी केलेल्या दालनात मंचकावरचे महाराज जिवाची लाही करणाऱ्या यातनेने तळमळत होते. आले माणूस छत्रपतींना ओळखू पडावे म्हणून मंद तेवणाऱ्या दोन ठाणक्या त्या दालनाच्या कोनाड्यात उदास दिसत होत्या.

महाराजांच्या पायगतीला पुतळाबाई त्यांचे पाय, चेप देऊन सुमार करताना खोलवर हरवल्या होत्या. हाती लोटके घेतलेल्या येसूबाई मंचकाची काठाळी धरून त्याच शिवचरणांबवर नजर लावून उभ्या होत्या. त्यांना पाठीशी अशा, महाराणी सोयराबाईसाहेब खड्या होत्या. पदरबंद मुद्रेवरचे त्यांचे डोळे एका जागी ठरता ठरत नव्हते. भोवतीच्या अंधाऱ्या उजेडात त्यांची चलबिचल कुणाच्याही नजरेला येत नव्हती. महाराजांच्या उशालगत बसलेल्या संभाजीराजांच्या हातात असलेला छत्रपतींचा हात, उन्हात तापलेल्या तोफेच्या पाठवानासारखा ऊनजाळ लागत होता.

“शंभू” कण्हते छत्रपती तळमळले. त्यांच्या हाताच्या पकडीत संभाजीराजांचा हात घट्ट-घट्ट आवळला गेला. ती पकडच सांगत होती, त्यांना काहीतरी बोलायचे आहे.

“जी” हलकी साद देत संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील कबड्यांची माळ महाराजांच्या छातीला हिंदोळत भिडली. तिच्या स्पर्शाने राजांच्या खोल गेलेल्या डोळ्यांत पुन्हा बांधले गेलेले अवसान संभाजीराजांना धुकट उजेडात दिसू शकले नाही.

“कसं वाटतंय आबासाहेब?”

मानेखालच्या गिर्दीवर महाराजांचे मस्तक दोन वेळा असह्मपणे नुसते डावे- उजवे फिरले. उडालेल्या डोळ्यांनी महाराज संभाजीराजांच्या, धुकट उजेडातही लखलखणाऱ्या डोळ्यांकडे नुसते बघतच राहिले. सेवेत असलेले शिवरामशास्त्री वैद्य दालनात आले. शिंपल्यातून त्यांनी कसलीतरी उगाळलेली मात्रा आणली होती.

“स्वामी” डोळे मिटलेल्या महाराजांना वैद्यांनी मंचकाजवळ येत केवढीतरी मायेची, कातरलेली साद घातली. महाराजांनी डोळे उघडले. “मात्रा.” संभाजीराजांनी महाराजांना उठते करावे म्हणून त्यांच्याकडे बघत वैद्यांनी शिंपला पुढे केला. मानेखाली हात देत संभाजीराजांनी आबासाहेबांना हळुवार वर घेत, बसते केले. शिंपला ओठांशी नेत वैद्यांनी बोटाने महाराजांना मात्रा चाटविली. पुतळाबाईंनी तत्परतेने पोसाने राजांचे ओठ टिपले. काही क्षण गेले. मात्रा पोटात जाताच वळीव वाऱ्याने ढगांची घुसळण करावी, तसे होऊन राजांची आतडी ढवळून निघाली. त्यांचे दोन्ही हात लांब पसरते झाले. नरड्याची घाटी लकलकली. घाबरे झालेले वैद्य, महाराजांना हातांचा आधार देत म्हणाले, “तस्त.” महाराजांच्या तोंडासमोर पुतळाबाईंनी मंचकाखालचे तस्त उचलून धरले मात्र – दिली मात्रा, आतल्या कफासह उलटून पडली! महाराजांना खळखळून उलटी झाली. वैद्यांचा हात महाराजांच्या पाठीवरून फिरू लागला.

“स्वामींना लेटते करा.” वैद्यांनी राजांच्या बगलेत हात दिला. संभाजीराजांनी मानेखाली हात देऊन आबासाहेबांना पुन्हा झोपते केले.

“शिव, शिव” मनाच्या विचाराशी मेळ घालण्यासाठी हाताची बोटे चाळवीत वैद्य ओढल्या पायांनी दालनाबाहेर पडले. मोहोळ भरल्यासारखे एका क्षणातच संभाजी राजांच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मंचक सोडून ते उठले. वैद्यांच्या मागाने दालनाबाहेर पडले. साफ होणारी सहाण शास्त्रीबुवा निरखीत होते.

“शास्त्रीबुवा, आम्हास धीर निघत नाही. महाराज साहेबांच्याकडे बघवत नाही. कोण जातीची ही व्याधी?” संभाजीराजांनी विचारले. “आम्ही उपचारांची शिकस्त करतो आहोत. युवराज, आता मात्र आमच्या मर्यादा आम्हाला जाणवताहेत.” मूळ प्रश्नाला बगल देत, वैद्य गंभीरपणे म्हणाले. “पण झालं आहे काय तब्येतीस? आणखी कुणाला तुमच्या मदतीसाठी बोलावून घ्यायचं आहे काय?”

“आमची हरकत नाही त्याला. पण तब्येत आता जोखिमेत आहे.” वैद्यांचा कपाळीचा गंधटिळा आक्रसला.

“मतलब?” सर्वांगाला इंगळ्या डसल्याप्रमाणे संभाजीराजे दबके चीत्कारले.

“युवराव… युवराज, तुम्हाला कसं सांगावं. आमचं आम्हाला सुधरत नाही.” “बुवा, काय करणं आहे आम्हास सांगा. आम्ही… आम्ही आमचा प्राण देऊन आबासाहेबांना वाचवू.” पुढे झालेल्या संभाजीराजांनी वैद्यांचे हात आपल्या हाती घेऊन आवेगी हलविले.

“त्यानं उतारा मिळता, तर आम्हीच आमचा देह स्वामींच्या पायी ठेवला असता युवराज!” वैद्य शांतपणे बोलले.

“मग काय केलं पाहिजे; सांगा शास्त्रीबुवा.”

वैद्यांनी मान खाली घातली, “माणसांना करता येण्यासारखं एकच आहे.”

“काय?”

“कुलदेवता भवानीची भाक.” वैद्यांचेच डोळे भरून आले.

“बुवा ”

“युवराज, महाराजांची व्याधी ऐकायला दगडाचे मन आणि लोखंडाचं काळीज करावं लागेल? करता?” संभाजीराजांची चर्या असंख्य शंकांच्या गळांनी ताणून टाकली. “जनार्दन” वैद्यांनी पडशीत सहाण भरणाऱ्या शिष्याला साद घातली.

“जी!” म्हणत तो पुढे आला.

“स्वामींच्या दालनातून तस्त येऊन ये.” वैद्यांनी त्याला सांगितलं.

जनार्दन बाहेर पडला. थोड्याच वेळात तस्त घेऊन परतला. ते हाती घेत वैद्यबुवा झरोक्याशी आले. “युवराज, ही स्वामींच्या तोंडून उलटून पडलेली मात्रा बघा!” संभाजीराजे थरकत्या पावलांनी झरोकक्‍्याजवळ गेले. तस्तात बघताना त्यांना पिवळट-जांभळट कफ-मात्रेचा लगदा दिसला. त्यांच्या डोळ्यांतले रंग ते बघताना पालटले.

“बुवा!” संभाजीराजांच्या तोंडून दबला भयकातर चीत्कार उठला.

“होय युवराज, स्वामींना अभक्ष्य प्रयोग झाला आहे! विषबाधा झाली आहे!!”

“विचित्र आहे ही व्याधी. कोठ्यातलं अन्न न पचता जागीच गाठी होऊन पडलं आहे. कोठ्यातील अन्न उलटून यावं म्हणून आम्ही शिकस्त केली. ते साधत नाही. त्याचं आतल्या आत पाणी करावं, म्हणून दिलेली मात्रा आत पोचत नाही.” आपल्याशीच बोलल्यासारखे वैद्य शून्यात बघत बोलले.

कवी भूषणचा सर्जा सूर्य – छत्रपती राजा शिवाजी, मृत्यूच्या ग्रहण-वेधांनी घेरला गेला! किल्ले साताऱ्यावर जमा झालेली माणसे चिंतेच्या काढण्यांत आवळून पडली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचे तासाचे टोल घुमून उठले. भोवतीच्या अंधाराला सामील झाले. किल्ल्याच्या पायथ्याच्या दरवाजावरचा, पहाऱ्याचा देवडीवाला चटक्या पावलांनी बालेकिल्ल्याच्या तटाआत आला. छत्रपतींच्या दालनावर देख देत फेर टाकणाऱ्या धारकऱ्यांशी काही कुजबुजला. भाल्याचा दंड पेलत तसाच आत गेला.

छत्रपतींचा मंचक धरून संभाजीराजे, पुतळाबाई, येसूबाई, हंबीरराव, शिवराम वैद्य सारी मंडळी हवालदिल, चिंतागत खडी होती. महाराजांचा डोळा झापडेला पडला होता. त्यांच्या पापण्यांवर डोळे लावून सोयराबाई उभ्या होत्या. “धाकलं धनी, गडाखालतं देवडीवं रामदासबुवांचं कुणी बैरागी स्वामी आल्यात. थोरल्या धन्यास्ती ह्याच पावली भेटवा म्हनत्यात. काही ऐकाय तयार न्हाईत.” देवडीवाल्याने हलक्‍या सादी वर्दी दिली. संभाजीराजांनी हंबीरमामांना नुसती नजर दिली. तिचा मतलब जाऊन हंबीरराव “चल?” म्हणत देवडीवाल्यासह दालनाबाहेर पडले.

किल्ल्याच्या पायथ्याशी दिंडी दरवाजाबाहेर गर्दन घालून हंबीररावांनी बाहेरची असामी पलोत्याच्या धूसर उजेडात पारखली. बाहेर अंधाराला चिरत धनुष्याच्या टणत्कारासारखा रामबोल उठला – “जय जय रघुवी र समर्थ!”

घातले पाऊल तसेच पुढे घेऊन हंबीरराव दिडीबाहेर आले. बाहेर समर्थशिष्य, तपस्वी कल्याणस्वामी उभे होते! बेंबीपर्यंत रळणारी काळी, दाट दाढी. कपाळावर टाळूमागे बांधलेल्या केसांची टोके जटा होऊन मानेभोवती उतरलेली. दंड, मनगट, गळ्यात रुद्राक्षमाळा. कपाळी भस्माचे पट्टे. हाती कमंडलू व लाकडी थोपा. ढालीसारखी गोल, तेजस्वी मुद्रा. काखेला बैरागी झोळी.

“सेनापती, समर्थांची आज्ञा आहे. समय न दवडता आम्हाला प्रथम छत्रपतींच्या समोर घेऊन चला.”

“चलावं!” हंबीररावांनी स्वामींना दिंडीचा माग दिला.

खटखटत्या खडावा छत्रपतींच्या दालनाच्या दगडी उंबरठ्याजवळ उतरल्या गेल्या. कल्याणस्वामी दालनात प्रवेशले. त्यांच्या दर्शनाबरोबर मंचकाभोवतीचा राजगोतावळा पुढे झाला. संभाजीराजांचे हात बैरागी चरणांना भिडले. राजस्त्रियांनी तळहाती पदरशेव धरून कंकणांचा आवाज उठवीत, त्या संन्यस्त चरणांना तिपेडी नमस्कार घातले. कुणीच काही बोलत नव्हते. साऱ्यांच्या हालचालींत एकच आर्तता होती.

“स्वामी, आमच्या महाराजांना बाचवा.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment