महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सरखेल संभाजी आंग्रे

By Discover Maharashtra Views: 3888 4 Min Read

स्मरण एका शूर सागरी सेनानीचे | ‘सरखेल’ संभाजी आंग्रे
(मृत्यू – दि. १२ जानेवारी १७४२)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक घटना आपल्याला आजही चकित करतात. अशा काही घटनांनी सामाजिक व राजकीय बदल झाले कि जे आजही जाणवतात. त्यापैकी सर्वात महत्वाची घटना म्हणजे ‘स्वतंत्र आरमाराची उभारणी’.
पुढे कान्होजी आंग्रे यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. कान्होजींच्या ६ मुलांपैकी संभाजी व तुळाजी यांनी कान्होजींच्याही पेक्षा काकणभर जास्त पराक्रम गाजविला. इ.स. १७३१ मध्ये कान्होजींच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे १७३४ पर्यंत सरखेल पदावर होते. त्यांच्या निधनानंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुढाकाराने छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशावरून इ.स. १७३५ मध्ये संभाजी आंग्रे यांस ‘सरखेल’ हा किताब व ‘सुवर्णदुर्ग किल्ल्याची जहागिरी’ देण्यात आली.

शिवाजी-संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांच्या जहाजांना पोर्तुगीज-इंग्रज यांचे परवाने विकत घ्यावे लागत असत. कान्होजी आंग्रे यांनी असे परवाने घेणे बंद करून मराठ्यांकडून परवाने देण्यास सुरुवात केली. संभाजी आंग्रे यांच्या काळात व्यापाऱ्यांना परवाने (दस्तके) विकत घेण्याची सक्तीच करण्यात आली. इतकी सामुद्री दहशत मराठ्यांनी या परकीयांवर बसविली. मराठ्यांकडून परवाने (दस्तके) न घेतलेल्या युरोपीय कंपन्यांची व्यापारी जहाजे जप्त करण्याचा सपाटा संभाजी आंग्रे यांनी लावला.
इ.स. १७३५ मध्ये ईस्ट इंडिया मेन डर्बी या इंग्रजांच्या गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या व्यापारी जहाजावर संभाजी आंग्रेंनी आपल्या जहाजांनिशी हल्ला केला व ते जहाज त्यातील सर्व मालासह जप्त केले. यात संभाजी आंग्रेंना जवळपास २० लाखाची लूट मिळाली. इंग्रजांच्या इतिहासात त्यांची झालेली हि सर्वात मोठी लूट असेल. या सर्व लुटालुटींमुळे इंग्रज संभाजी आंग्रेंवर प्रचंड चिडून होते.

डिसेंबर १७३८ मध्ये इंग्रजांनी कमांडर जॉर्ज बग्वेल याला फार मोठे आरमार देऊन संभाजी आंग्रेंवर हल्ला करण्यासाठी पाठविले. संभाजी आंग्रेंनी या आरमाराला भर समुद्रातच विजयदुर्ग-दाभोळ-कारवार असे पुरते पळविले. यामुळे पुरती दमछाक झालेला बग्वेल मुंबईला हात हलवत गेला. त्याने आपल्या वरिष्ठांना जो रिपोर्ट दिला तो अत्यंत महत्वाचा आहे. संभाजीचे आरमार बुडविणे याचा विचार करणे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात आणणे यात जमीन आसमानचा फरक होता हे इंग्रजांना यातून उमजून आले.
केवळ इंग्रजांचीच नाही तर पोर्तुगीजांची, डचांची देखील जहाजे संभाजीने पकडली.
अशा या शूर सागरी सेनानी संभाजी आंग्रे यांचे दि. १२ जानेवारी १७४२ रोजी सततच्या दगदगीमुळे निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा सावत्र भाऊ तुळाजी आंग्रे हे मराठा आरमाराचे ‘सरखेल’ झाले.
मराठी व्यापाऱ्यांचे लुटमारीपासून संरक्षण करणं; तसेच समुद्रावर मराठा सत्ता निर्माण करणेही सोपी गोष्ट नव्हती. पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्दी या सर्वांशी लढा द्यायचा होता. पूर्वी समुद्रावर संचार करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीज-इंग्रज यांचे परवाने घ्यावे लागायचे. मराठ्यांच्या समुद्री दहशतीमुळे हि परिस्थिती बदलली. आता पोर्तुगीज-इंग्रजांसह सर्व व्यापाऱ्यांना, मराठा आरमाराकडून परवानापत्र (दस्तक) विकत घेण्याची सक्ती करण्यात आली. जे युरोपियन महासागराला स्वतःच्या मालकीचं समजायचे, त्यांनाच मराठा आरमाराने धडा शिकविला.

शिवाजी महाराजांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे आरमार उभे केले. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी आरमार वाढवले, नौदल सैनिक निर्माण करणे, समुद्री किल्ले बांधले. तोच कित्ता पुढे कान्होजी आंग्रे व त्यांचा पराक्रमी मुलगा संभाजी व तुळाजी आंग्रे यांनी गिरविला.
मराठ्यांचे पराक्रमी सरदार “संताजी-धनाजी” यांनी ज्याप्रमाणे शत्रूला जमिनीवर सळो-कि-पळो करून सोडले, त्याप्रमाणे “संभाजी-तुळाजी” यांनी बलाढ्य आरमारी शत्रूंना समुद्राचेच पाणी पाजले.

– अनिकेत यादव

Leave a comment