महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,73,845

लखुजीराजे जाधवरावांची हत्या

By Discover Maharashtra Views: 3854 5 Min Read

लखुजीराजे जाधवरावांची हत्या

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9

लखुजीराजे जाधवरावांची हत्या – भातवडीच्या युद्धानंतर मलिक अंबर आणि शहाजीराजे यांचे संबंध बिनसल्यामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीच्या सेवेत दाखल झाले.इतकेच नव्हे तर शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी यशस्वी प्रयत्न करून मोगलांकडे असलेल्या लखुजीराजांना निजामशाहीत आणले .या अगोदर मलिक अंबरने जाधव -भोसले घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजीराजांना दोषी ठरवून शहाजीराजांची बाजू निजामाने घेतली होती. पुढे मात्र भातवडीच्या लढाईतनंतर मलिक अंबर शहाजीराजांचा व्देष करू लागला. या धोरणामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून विजापूरकडे गेले. याचाच अर्थ मलिक अंबर हा मराठा सरदारांना विरोध करून त्यांना एकत्र येऊ देत नव्हता.

मलिक अंबर हा महत्त्वाकांक्षी व अत्यंत हीन स्वभावाचा होता. त्याच्या या स्वभावाचा जाधव-भोसले कुटुंबाला चांगलाच त्रास झाला. या दोन कुटुंबात वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न मलिक अंबर नेहमीच करत होता. लखुजीराजे व शहाजीराजे एक दिलाने लढून निजामशाहीला विजय मिळवून देत होते.हे दोन सरदार एकत्र राहिले तर आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती मलिक अंबरला नेहमीच वाटत होती. म्हणूनच खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजी जाधवरावांना दोषी ठरवून त्यांना निजामशाही सोडण्यास मलिक अंबरने भाग पाडले.

भातवडीच्या लढाईत शहाजी राजांचे शौर्य ,पराक्रम, तेजस्विता, लढाऊपणा पाहून त्यांनाही निजामशाही पासून दूर केले गेले. मलिक अंबरने या दोन घराण्यात वितुष्ट निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला .
पुढे मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फत्तेखान हा निजाम शहाचा कारभारी झाला.तो अत्यंत जुलमी व अत्याचारी होता. हमिदखान हा लखुजी जाधवरावाच्या विरोधात निजामशहाचे कान भरत असे. जाधवराव हे आपल्या सैन्यात राहून आपल्या राजाच्या विरोधात फार मोठे कार्य पार पाडत आहेत,असे त्यांच्यावर खोटेच आरोप करून मुर्तजा निजामशहा याने लखुजी जाधवरावांच्या विरोधात फार मोठा कट रचला. निजामशहाने लखुजी जाधवराव यांना दौलताबाद किल्ल्यावर दरबारात बोलावून घेतले.

25 जुलै 1629 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी लखुजीराव जाधवरावांना निजामशहाने भेटीला बोलावले. मोगलांनी जाधवरावांना 24 हजारी मोगली सरंजाम दिलेला होता.निजामशाहीत आल्यावर लखुजीराजे यांना तेवढाच सरंजाम देण्याचे कबूल केले गेले होते. त्यानुसार त्यांना निजामशाही दरबारात खिल्लत घेण्यासाठी बोलविण्यात आले .निजामशहावर विश्वास टाकून लखुजीराजे आपल्या पूर्ण लवाजम्यासहित भेटायला आले होते.लखुजीराजे आपल्याबरोबर पुत्र अचलोजी, रघुजी ,आणि नातू यशवंतराव यांचेसह गडावर सुलतानाच्या भेटीसाठी आले. लखुजीराजांचा एक पुत्र बहादूरजी आपल्या आईजवळ गडाखाली थांबले होते. लखुजीराजे जाधवराव दरबारात आले.चौघेही जाधवराव मोठ्या आदबीने सुलतानाच्या पुढे जाऊन उभे राहिले. मुजरे घातले, परंतु सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेले. जाधवरावांसारख्या तोलामोलाच्या सरदारांचा मुद्दाम त्यांनी ठरवून अपमान केला .लखुजीराजे यांना अपमान फार जिव्हारी लागला. या अपमानामुळे लखुजीराजे संतापाने पाठ दाखवून चालू लागले असता, निजामशहाचा अपमान केला, या सबबीवर निजामशहाच्या सैनिकांनी दग्याने लखुजीराजांवर हल्ला चढवला.सर्र सर्र सर्र सर्र आवाज करीत म्यानातून तलवारी बाहेर पडल्या !

धवरावांवर हमिदखान,फर्रादखान वगैरे सरदारांनी सपासप वार केले. दगाबाजांच्या आरोळ्यांनी शाही महाल दणाणला. भर दरबारात चकमक झडू लागली .मारेकऱ्यांनी गर्दी केली. रक्ताच्या धारा उडू लागल्या. लखुजी, अचलोजी , रघुजी, आणि यशवंतराव या चौघांचीही प्रेते खांडोळ्या उडून रक्ताच्या सरोवरात पडली ! लखुजीराजे यांना सफ्दरखानाने ठार केले आणि तिघा मुलांना इतरांनी मारून टाकले.जाधवरावांचा निकाल लागला. जिजाऊंचे माहेरच संपुष्टात आले .
गडाखाली लखुजीराजे यांच्या पत्नी म्हाळसाबाई पुत्र बहादूरजी व बंधू जगदेवराव होते.हत्याकांडानंतर हे सर्वजण लपतछपत, घाबरत सिंदखेडला येऊन पोहोचले. एका शूर, बलाढ्य ,इभ्रतदार मराठ्यांची अशाप्रकारे वाताहात झाली. जिजाऊंचे पिता ,दोन भाऊ व भाचा ठार झाले .जिजाऊंचे संपूर्णपणे माहेरच उध्वस्त झाले .जिजाऊंचा शोक व संताप खदखदू लागला. कारण जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई व दोन भावजया नंतर सिंदखेडला येऊन सती गेल्या. लखुजी जाधवराव यांनी तमाम मराठा सरदारांना आपल्या खंबीर नेतृत्वाखाली व प्रेमळ स्वभावामुळे बांधून ठेवल्याने निजामशाही तरली होती.

तब्बल चाळीस वर्षे लखुजी जाधवराव निजामशाही वाचवण्यासाठी लढत होते. परंतु निजामशहाने त्याची कदर न करता सत्ता ,स्वार्थ ,ईर्षा व मत्सराने पेटून लखुजीराजे जाधवरावांचे हत्याकांड घडवून आणले .अशाप्रकारे जाधवरावांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समर्पण अजरामर झाले. जाधवरावांचे हत्याकांड इतिहासाला कलाटणी देणारे ठरले.
या सर्वांच्या हत्याकांडाने जिजाऊंचे माहेर उद्ध्वस्त झाले होते. आणि तेही दगाबाजीने ! असीमदुःखा बरोबरच अलोट संताप जिजाऊसाहेबांच्या हृदयात दाटला होता. मानाचे मुजरे घालायला गेलेल्या आबांना आणि वडील बंधूंना निजामशहाने दगाबाजीने ठार मारले? लखुजीराजांनी इमानेइतबारे त्यांची सेवा केली होती. त्यांचीच त्या पातशहाने कत्तल केली? लखुजीराजे यांनी त्यांच्यावर देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केला. या प्रकारांची जिजाऊंना अतिशय राग आला…….

मोठेपणानी समजून घेणारे, जीवाला जीव देणारे बंधू, उत्तम संस्कार करणाऱ्या ,सोवळ चेहेर्याच्या आऊसाहेब ,लहानपणी मनाची भीती घालविणारे ,आधार देणारे आबा आता ह्या जन्मात पुन्हा कधीही दिसणार नाहीत, आता जिजू अशी हाक कोणी कधीच मारणार नाही ह्या विचारांनी जिजाऊ साहेबांना गलबलून आले. डोळ्यातून नकळत अश्रू पाझरू लागले…कोणासाठी रडायचे पित्यासाठी ,भावासाठी का भाच्यासाठी…
… पण रडत बसणार्यांमधील जिजाऊसाहेब नव्हत्याचमुळी! त्या अधिकच सूडाने पेटून उठल्या, आणि हा सूडाचा ध्यासच गर्भातील जीवात उतरत होता. आणि जन्माआधीच त्या बालजीवाच्या मुठी वळल्या जाऊ लागल्या होत्या.(लखुजीराजे जाधवरावांची हत्या)

– डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a comment