जाधव-भोसले वैर

By Discover Maharashtra Views: 4332 5 Min Read

जाधव-भोसले वैर

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला – भाग 7

शहाजीराजे निजामशहाच्या म्हणजेच मलिक अंबरच्या बाजूने लढत होते. त्याचवेळी लखुजी जाधवरावही निजामशहाकडेच होते. निजामशहाने एके दिवशी दरबार भरवून मोगलांशी चालू असलेल्या लढाई संबंधात चर्चेसाठी सर्व सरदार एकत्र बोलावले होते. दरबार संपला तेव्हा खंडागळे हत्ती प्रकरण घडले व जाधव-भोसले वैर निर्माण झाले.

निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता. सर्व सरदार मंडळी दरबार संपल्यानंतर आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला. वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून उडवू लागला. हत्तीवर माहूत होता. तो माहूत हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करत होता.पण तो बिथरलेला गजराजा ,लोकांना तुडवीत,चित्कार करीत धावतच होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की, त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना; त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजेच जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना. कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून ओढून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजींचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजींना खूप झोंबला. दत्ताजी हत्तीपेक्षा जास्त पिसाळले व थेट हत्तीवर धावून गेले. स्वतः दत्ताजी हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळी केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले, त्यावेळी मालोजीराजांचे बंधू खेळोजी व संभाजी खंडागळे यांच्या मदतीला धावून आले. दत्ताजी जाधवरावांनी रागाच्या भरात आपला मोर्चा संभाजी भोसले यांचेकडे वळवला .संभाजी भोसले यांचे वरती त्यांची तलवार सपासप वार करू लागली. दोघांची खडाजंगी लढाई सुरू झाली.खडाखड एकमेकांवर धाव पडू लागले. दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली .क्षणभरातच दत्ताजी जाधवराव व संभाजी विठोजी भोसले एकमेकावर तुटून पडले.हत्तीचा विषय बाजूलाच राहिला व जाधवराव भोसले आपआपसात लढू लागले.संभाजीराजे व दत्ताजीराजे इतक्या आवेशाने लढत होते की,दोघांनीही आपल्या भोवती तलवारींचे तेजोवलय निर्माण केले होते.

युध्द गर्जनांनी दिशा सुन्न झाल्या होत्या. नातगोत विसरून एकमेकांवर साता जन्मीचे वैरी असल्यासारखे एकमेकांवर हत्यार चालवत होते.खरेतर जिजाऊ यांच्या विवाहात ह्याच दोघांनी व्याहीभेट घेतली होती.अगदी उराउरी कवटाळुन …..आणि आता एकमेकांचे सैनिकही एकमेकांवर हल्ला करू लागले होते. दत्ताजी जाधवरावांनी भोसल्याकडील सैनिकांच्यावर प्रतिहल्ला करून अनेक लोकांना ठार मारले .हे पाहून विठोजी भोसले यांचा पुत्र संभाजी यांनी दत्ताजी जाधवराव यांच्यावर हल्ला करून त्यांचे शिर धडावेगळे केले. भुईवर तर अगदी रक्ताचा सडाच पडला होता.त्यावेळी लखुजी जाधवराव तेथे नव्हते. त्यांना व शहाजीराजांना हे वृत्त समजतात ते दोघे माघारी फिरले व आपापल्या लोकात मिसळून एकमेकांच्या वर तुटून पडले .आपला पुत्र ठार झाल्याचे पाहून लखुजीराजे यांच्या डोळ्यात अंगार फुलला. संतापाने लखुजी जाधवराव लाल झाले. त्यांच्या क्रोधाने अवघ्या दाहीदिशा शहारल्या.लखुजीराजे यांना समोर दिसले ते आपले जावई शहाजीराजे .प्रत्यक्ष जावई .लाडक्या लेकीचे कुंकू. कसली माया आणि कसली नाती .आपल्या पोटच्या गोळ्याचा अंत करणाऱ्याचा नायनाट करण्याकरिता त्यांनी आपली तलवार उपसली. या रागातच त्यांनी संभाजी विठोजी भोसले यांना ठार केले. आपला भाऊ आता वाचत नाही हे पाहून शहाजीराजे मध्ये पडले. परंतु लखुजी राजांनी संतापून आपले जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर तलवारीने वार केला. झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याचा परिणाम होऊन शहाजीराजे बेशुद्ध पडले. मलिक अंबरने मध्ये पडून आपापसातील भांडण मिटवले .या प्रकरणात जाधव-भोसले कुटुंबातील दोन जीव विनाकारण बळी गेले. यामुळे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एक तासापूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती येथे असा काही भयंकर प्रकार घडेल.

जाधव-भोसले याचसाठी लग्न बंधनाने एकत्र आले होते का ?ढाली- तलवारी घेऊन लढण्यासाठी का ? आपल्या बायकांच्या कपाळीचे कुंकू रक्षणासाठी का पुसण्यासाठी ?
आता काय म्हणायचे ह्या दैवगतीला? काय नाव द्यायचे ह्या यादवीला? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे! दोघींच्याही भाळी वैधव्य आले .बांगड्या फुटल्या…. कशासाठी? काय कारण?…. काही नाही! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला .पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
हत्तीसाठी जाधवराव- भोसले आपआपसात झुंजले .मात्र जिजाऊंचे माहेर आपोआपच तुटले गेले. भोसले -जाधवराव कायमचे अंतरले .परंतु जिजाऊंनी सासर -माहेरच्या भांडणाचा राग आपल्या संसारावर कधीच होऊ दिला नाही.पुढे जाधव भोसले वैर फार काळ टिकले नाही.भातवडीच्या लढाईत लखुजीराजे जाधवराव व शहाजी राजे भोसले एकमेकाविरूद्ध न लढता ,लखुजीराजे निघून गेले.पुढे निजामशाहीत ते एकत्र येऊन लढाई करू लागले.

आता जाधव कुटुंबीय अश्रू ढाळत होते दत्ताजीराजांसाठी तर, भोसले कुटुंबीय रडत होते संभाजीराजांसाठी .पण जिजाऊंचे काय? त्यांनी कोणासाठी रडायचे? भावासाठी का दिरासाठी? त्या रडत होत्या मराठ्यांमधील यादवीसाठी ! पारतंत्र्यासाठी! ह्या अंधःकारासाठी. (जाधव-भोसले वैर)

– लेखन डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर ( इतिहास अभ्यासक पुणे )

Leave a comment