महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक दफन विधी

By Discover Maharashtra Views: 1252 4 Min Read

महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक दफन विधी –

ज्याप्रमाणे आपण वस्त्र जुने झाले की ते टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे जीवाचा आत्मा शरीर जुने झाले की त्याचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो (गीता 2:22)अशी सामान्य भारतीयांची धार्मिक समजूत आहे . परंतु ज्याप्रमाणे वस्त्र टाकून/फेकून दिले जाते त्याप्रमाणे शरीर टाकून दिले जात नाही, तर शरीरावर उत्तरक्रिया/ अंत्यसंस्कार केले जातात. विविध संस्कृतींमध्ये अंत्यसंस्कार वेगवेगळ्या पध्दतीने केलेला दिसतो. त्या पद्धतींवरून आपल्याला त्या मानवसमाजाबद्दल, त्यांच्या धार्मिक समजुतींबद्दल माहिती मिळते.(महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक दफन विधी)

जोर्वे काळात प्रौढ व्यक्तीचे दफन खड्डा करून त्यात केले जाई. त्यावेळेस त्याचे पाय दक्षिणेकडे तर डोके उत्तरेकडे ठेवले जाई. दफन करण्यापूर्वी त्याचे पाय घोट्यापासून तोडून टाकत (मृताने भूत बनून परत येऊ नये म्हणून असे असावे).  या लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास होता. मृताला मरणोत्तर जीवनात उपयोगी पडावे म्हणून अन्न-पाण्याची भांडी ठेवत. सर्व दफने ही वसाहतींत किंवा अंगणात केली जात. व्यक्तीला समाजात खुप मान असल्यास तिला घरात पुरले जाई. तापी खोऱ्यात मात्र सिंधुसंस्कृतीप्रमाणे दफनभूमी दूर असे.

अनेक दफनांमधून एक विशिष्ट प्रकारची मातीने तयार केलेली डबी आढळते. त्या डबीमध्ये एक लहान मूर्ती ठेवलेली असे. ती मूर्ती शिरोहिन स्त्रीची (woman’s statue without head) असायची. ही मूर्ती मातृदेवतेची असावी आणि ती देवता सुफलनाशी (fertility) संबधित असावी. आंध्र-कर्नाटक मध्ये काही ठिकाणी पुजली जाणारी लज्जागौरी नावाची मस्तक नसलेली देवता, वारली लोकांची शिरोहिन देवता या सगळ्या त्या देवतेशी साम्य दाखवतात व त्या सगळ्या सुफलनाशी संबंधित आहेत. मृतव्यक्तीने पुन्हा जन्म घ्यावा ही या मागची धारणा असेल. यावरूनच तत्कालिन लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता हे दिसून येते.

व्यक्तीचे दफन करताना त्यासोबत कुंभ (मडके) ही पुरले जाई. मातेचा गर्भ हा कुंभासारखा दिसतो म्हणून पुन्हा मातेच्या गर्भात या व्यक्तीने प्रवेश करावा अशी संकल्पना असावी.

उत्तर जोर्वे काळातील दफनांमध्ये लहान मुलांची अनेक दफने आढळून आली आहेत. यावरून बालमृत्यूचे प्रमाण अधिक असावे असे कळते.लहान मुलांचे शव दोन कुंभात घालून पुरले जाई, त्यातील एक लहान व दुसरा मोठा असे. दोन्ही कुंभ एकाला एक तोंड लावून ठेवत. लहान कुंभात डोके आणि मोठ्यात शरीर असे. शव कुशीवर, पोटाशी दुमडून, गर्भात असल्याप्रमाणे ठेवत.मातेच्या उदरातून आलेला जीव पुन्हा मातेच्या उदरात जावा अशी त्यामागची भावना होती. अशा प्रकारे ही दफने आपल्याला बरंच काही सांगून जातात.

अशी ही महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची संस्कृती, जिने तांबं महाराष्ट्रमध्ये आणलं, सिंधू संस्कृतीच्या आठवणी टिकवून ठेवल्या, ती हळू हळू स्वतः लोप पावत होती.इ.स.पू. 1000 नंतर पर्यावरण खूपच प्रतिकूल झाले. त्यामुळे या ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांना एके ठिकाणी वस्ती करून जीवन जगणे अशक्य झाले. याच सुमारास ही जोर्वे संस्कृती ज्या भूमीच्या उदरातून आली शेवटी त्याच भूमीच्या उदरात  काळाची चादर ओढून लुप्त झाली. पण जसं फक्त शरीर नष्ट होतं, आत्मा नाही. तो फक्त रूप बदलतो तशीच संस्कृती ही देखील सनातन असते ती फक्त आपले स्वरूप बदलते.

जोर्वे संस्कृती जशी सिंधू संस्कृतीचाच पुढचा भाग आहे, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रात आपल्याला सरकलेली दिसते त्याच प्रमाणे दक्षिण भारतातील एका संस्कृतीची शाखा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत गेली तिचा आणि जोर्वे संस्कृतीचा मिलाफ महाराष्ट्रामध्ये चिरोली टेकड्या, नागपूर-चंद्रपूरचा भाग या ठिकाणी झालेला दिसतो. तो कालखंड म्हणजेच प्रागैतिहासिक व ऐतिहासिक कालखंडाच्या सीमेवरील हे लोक. त्यांची ओळख तीन मुख्य गोष्टींनी असणार होती – त्यांचा लाडका प्राणी , त्यांची विचित्र दफन पध्द्ती आणि त्यांनी आणलेला अतिसामान्य पण अतिमहत्वाचा धातू….त्याबद्दल नंतर।

पितांबर जडे

Leave a comment