प्रति शिर्डी | साईबाबा मंदिर – शिरगाव

By Discover Maharashtra Views: 5480 2 Min Read

प्रति शिर्डी | साईबाबा मंदिर – शिरगाव

“प्रति-शिर्डी” म्हणून ओळखले जाणारे शिरगाव हे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्याच्या लगेचच डाव्या बाजुला अंदाजे ४ ते ५ किलोमीटरवर वसलेले आहे. पुण्यातील माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकारातून हे मंदिर उभं राहिलं आहे. ११ जून २००९ रोजी मंदिर स्थापन झाले. श्री साईं बाबांच्या आशीर्वादाने, बांधकाम कार्य नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले.

शिरगाव मधील साई मंदिर हे शिर्डीच्या साई मंदिरसारखेच बांधलेले आहे. शिर्डी प्रमाणेच, साई मंदिरच्या गुरुस्थानात देखील एक कडुलिंबाचे झाड आहे. येथील साई मंदिर शिर्डीप्रमाणोच मोठे भव्य आहे. मंदिराच्या समोरच एक विशाल सभागृह आहे. सभागृहातील भिंतींवर साईभक्तांचे फोटो आहेत. सभागृहाच्या पुढील गाभा:यात संगमरवरी चौथा:यावर साईबाबांची सोन्याने सजवलेल्या सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. ही मूर्ती शिर्डीतील मूळ मूर्तीप्रमाणोच असून संगमरवरात साकारलेली आहे. या परिसरात बाबांची द्वारकामाई देखील आहे जेथे बाबांची धुनी सतत पेटती असते.

जवळच असलेल्या प्रसादालयात अल्पदरात भक्तांची जेवणाची सोय होते. हे भव्य प्रसादालय श्री साई अन्नछत्र आहे. ही इमारत राजवाडा म्हणून ओळखली जाते. इमारत तीन मजली आहे. इथे तळमजल्यावर एका वेळी १००० लोक भोजन करू शकतात. भोजनासाठी खास डायनिंग टेबलं आहेत. केवळ वीस रुपयांत ही भोजनाची सोय आहे.

मंदिराचं बांधकाम छान आहे. मोठी व सुशोभित असा हा परिसर स्वच्छता व टापटीप यामुळे छानच दिसतो. मंदिराजवळच्या मोकळय़ा जागेत वाहनांच्या पार्किगची व्यवस्था आहे.

येथे प्रतिष्ठाना दिवस, गुरु पौर्णिमा, राम नवमी आणि दसरा सारखे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. हे मंदिर स्थापन झाल्यापासून शिरगावला नवीन ओळख मिळाली आहे.

Leave a comment