नाथ वाडा शांती ब्रम्ह

नाथ वाडा शांती ब्रम्ह

नाथ वाडा शांती ब्रम्ह –

पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे त्याला गावातील नाथांचा वाडा म्हणून जास्त प्रसिद्ध आहे या पूर्वाभिमुख वाड्यात किंवा मंदिरात प्रवेश करताच समोर लाकडी खांबां पलीकडे दिसते ते नाथांचं देवघर आहे, नाथ महाराज स्वतः या देवांची पूजा करत होते. मूळ देवघर लाकडी आहे त्यावर सुबक चांदीकाम केलेले आहे. देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते.(नाथ वाडा शांती ब्रम्ह)

वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेवर आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो. (खाली फोटो देते आहे म्हणजे नीट समजेल) म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात. हे समोर दिसणारे सगळे देव नाथांच्या नित्यपूजेतले देव आहेत हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपान मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीचकिलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यान मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे…

त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण ला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात तर ते संपेपर्यंत थांबले (राजा रामदेवराय)आणि ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सांगितले तर भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले…त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छाये पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत ,वास्तविक पाहता नाथां श्रीमंत संत नव्हता नाथांना पैठणात चार चौकाचे तेरा वाडे होते हजारो एकर जमीन होती ,रोज कितीतरी लोकं वाड्यात पुरणपोळीचे जेवण जेवत असतं तरीसुद्धा नाथ पांडुरंगाला असं म्हणाले तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली “दास जेवू घाला न.. घाला”म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत.

प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नी ला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक शुद्ध आणि वद्य एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो असे नाथांचे अकरावे वंशज श्री प्रवीण जी गोसावी आहेत जे आजही तिथे वास्तव्यास आहेत त्यांचे म्हणणे आहे

याच भगवंतांनी नाथांच्या घरी१२,१२आणि १२असे ३६ वर्षे काम केलं त्यातले बारा वर्षे त्यांनी श्रीखंड्या च्या रूपात वाड्यात असलेल्या रंजणात पाणी वाहील(भरलं)

आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी

एकचि काय वदावे भरल्या कार्यार्थ वाहिले पाणी

श्रीखंड्या चंदन उगाळन करी वस्त्र गंगातीरी धुत असे मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतातअशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे.

वाड्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला रांजण आहे(ज्यात बारा वर्षे श्रीखंड्याने पाणी भरलेअशी आख्यायिका आहे) आज तो व्यवस्थित झाकून सुरक्षेखातर बंदिस्त केलेला आहे हा नेहमीच्या रांजणा सारखा नाहीये तर तो २१फूट खोल आणि१ १/२ (दीड) रुंद पूर्ण काळ्या दगडी पाषाणातले बांधकाम आहे बुडात त्याच्या मधोमध गोमुख आहे तिथून थेंब थेंब पाणी गीदावरीला जाऊन मिळते कुठं मिळतं हे मात्र अजूनही माहीत नाही… त्याकाळचं स्थापत्य शास्त्र साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेला हा रांजण आणि त्यावेळी ठेवलेलं खाली छिद्र म्हणजे ज्या पाण्याला परक्यूलेशन आहे जे पाणी झिरपत राहतं त्याला खाण वास येत नाही वर्षभर कोंडून राहिलेले पाणी खराब होत नाही.. नाथांच्या काळात याचा नित्य वापर व्हायचा हजारो लोक रोज घरी जेवायचे.

आजही जेव्हा हा रांजण स्वच्छ केला जातो कोरडा करायला खाली जाणारी माणसं सांगतात की तिथे एकदम गार वाटतं (ए .सी) खालच्या गोमुखातून हवा येते ..रंजणाततली पूर्वेकडची भिंत आहे तिथे कोनाडा आहे त्यात पांडुरंग आणि रुक्मिणीची अतिशय सुबक मूर्ती आहे जेव्हा कोणी रंजणात उतरते तेव्हाच ती दिसते… हा रांजण नेमका भरतो कधी हे ही एक वैशिष्ट्य आहे.

हा रांजण फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे ज्या दिवशी तुकाराम बीज असते त्याच्या आदल्या दिवशी हा रांजण उघडा केला जातो मागच्या वर्षी जे पाणी भरलेलं असतं ते थोडं थोडं झिरपून अर्ध झालेलं असतं ते या दिवशी उपसावे लागते त्याच रांजणा शेजारी दुसरं छिद्र आहे त्या छिद्राला मोठ्ठ नरसाळं लावून त्यात हे उपसलेलं पाणी सोडलं जातं जेणे ते इकडे तिकडे कुठे फेकले जाऊ नये कुणाच्या पायदळी येऊ नये हा हेतू यामागे असावा असे मला वाटते याचं सुद्धा दुसरं छिद्र गोदावरीला जाऊन मिळालं आहे हे सगळं फार अद्भुत आहे.

यानंतर सगळा रांजण कोरडा करून घेऊनत्याला धूप देऊन फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बिजेपासून नाथांच्या शष्टीचा उत्सव सुरू होतो मग या रंजणाची पूजाकरून पैठणातील ब्रम्हवृंद, नाथवंशज, नाथांवर श्रद्धा असणारे देशातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व यात सामील होतात तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांच्या वंशजातील सुवासिनी स्त्री पहिल्यांदा पाणी टाकते आणि पुढे हा रांजण भरण्याचा कार्यक्रम चालू होतो इच्छुक सर्व स्त्री पुरुष लहान मूल अगदी कोणीही गंगेतून ओलेते होऊन घागर, कळशी अगदी जे झेपेल तशी लहानमोठी घागर घेऊन ती धातूची असावी ही मात्र अट असते पाणी आणून रंजणात टाकणे अहोरात्र चालू असते कधी चार घागरीत भरेल कधी हजरो घागरी टाकल्यातरी भरणार नाही कधी पहिल्या दिवशीच तर कधी पाचव्या दिवशी ही भरतो.

हा भरलेला ओळखायचा कसा तर तिथे उत्सवा दरम्याम एक व्यक्तीची खास नेमणूक याच कामासाठी केलेली असते जेव्हा रांजण भरतो तेव्हा पाण्याला प्रचंड उसळी येऊन पाणी बाहेर पर्यंत उडते तेव्हा तिथे खास नेमणूक असल्याने मोठ्यांदा गजर करायचा “देवाचा रांजण भरला हो..”तेव्हा हजारो माणसं दर्शन घेत असतात त्यातीलज्यांना श्रीखंड्या ची आख्यायिका माहिती आहे ते उत्सुकतेने येऊन विचारतात कुणाच्या हाताने भरला कधी ती व्यक्ती सापडते कधी सापडत ही नाही जर सापडली तर त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान केला जातो की त्याच्या रूपाने भगवंत पाणी भरून गेले म्हणून आजही नाथांच्या त्यांच्या घरी चारशे वीस वर्षानंतर भगवंत पाणी भरतो असं मानलं जातं.

असा हा नाथ वाडा आणि त्याची ही आख्यायिका अत्यंत पवित्र, पूजनीय शांतिब्रम्ह….! नाथां जवळ काय मिळतं तर परम शांती ,शांतीचा उगमच त्यांच्यातून होतो.

“सकल संतांचा हा राजा

स्वामी एकनाथ माझा”

असं निळोबा रायानी म्हणलेलं आहे याची प्रचिती येतेनाथांचे गुरू जनार्धन स्वामी आणि त्यांचे गुरू दत्तात्रय महाराज म्हणजे स्वतःच्या गुरू चे गुरू म्हणजे नाथांचे दत्तात्रय भगवान परात्पर गुरू नाथांच्या घरी भालदारकी केली असे मानले जाते म्हणून वाड्याच्या बाहेर एका बाजूला हनुमंतराय आहेत तर एक बाजूला दत्तात्रय आहेत… याहूनच नाथांचे श्रेष्ठत्व समजते एवढ्यात. नाथ महाराजांचा जन्म १५३३ तर निर्वाण १५९९ ला झाले त्याच्या सहासष्ट वर्षाच्या आयुष्यातील ४०वर्षे वास्तव्य या वाड्यातले आहे.

नाथवाड्यात देवघरासमोर दोन खांब आहेत त्यातला एक पुराण खांब ज्याला टेकून नाथ प्रवचन सांगायचे तर दुसरा आहे उद्धव खांब ज्याची आख्यायिकाआहे ती अगदी थोडक्यात सांगते.

भगवंताने नाथनकडे केशव, श्रीखंड्या,उद्धव  या रुपात१२,१२,१२असे तीन तप चाकरी केली तो काळ पूर्ण झाला तेव्हा द्वारकेत एक भक्त हट्टाला पेटला भगवंताचे दर्शन हवे आहे म्हणून तेव्हा रुक्मिणीने त्याला सांगितले की भगवंत गेल्या छत्तीस वर्षांपासून द्वारकेत नाही आहेत तू इथे बसू नकोस ते भेटणार नाहीत ते, तेव्हा तिने सांगितल्या प्रमाणे पैठण स्थित भगवंतास शोधत ती व्यक्ती आली नाथांची चाकरी करणारा केशव, श्रीखंड्या, उद्धव कुठे आहे तो द्वारकेतला कृष्ण आहे त्याला मला भेटायचच आहे हे जेव्हा भगवंताला समजले तेव्हा ते उद्धव रूप या खांबत अंतर्धान पावले असे केशवकृत नाथांचे चरित्र लिहिणारे लेखक होते जे नाथांच्याच कुळातले होते ते त्यांचे शिष्य ही होते ते नाथांची प्रत्येक कृती (नित्यक्रम)  रोजनिशी सारखी लिहीत असत तोच एक ग्रंथतयार केला म्हणजेच केशवकृत नाथांचे चरित्र त्यात हा उल्लेख आहे म्हणून तो प्रत्यक्षदर्शी असल्याने प्रमाण मानला जातो.

मग नाथांना लक्षात आलं की आपण काय काय काम करून घेतलं भगवंतकडून मग नाथांनी धावा केला या भक्ताला दर्शन देण्यासाठी तरी मला दर्शन दे तेव्हा पुन्हा दर्शन देऊन ते अंतर्धान पावले असे हे  मला समजलेले नाथ आणि नाथवाडा लिहिण्यासारखं बरच आहे पण प्रत्येक गोष्टीला सीमा असते. लिहीन अजून कधीतरी यातीलप्रत्येक वाक्य नाथांचे अकरावे वंशज श्री प्रवीण जी गोसावी यांचे आहे. मी फक्त शब्दांकन केले आहे.नाथ वाडा.

अमिता पैठणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here