महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

नानावाडा, पुणे

By Discover Maharashtra Views: 3036 4 Min Read

नानावाडा, पुणे –

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस म्हणजे, अत्यंत कठीण परिस्थिती आली असता स्वतःच्या बुद्धीवैभवाने पंचवीस वर्षे मराठी राज्य सांभाळणारे; इतकेच नव्हे, तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मराठी राज्याचा वचक बसवणारे पेशवाईतील एक उमदे व्यक्तीमत्त्व, भानू मूळचे कोकणातील वेळासचे. बाळाजी विश्वनाथ भट व त्रिवर्ग भानू (हरी, रामाजी व बाळाजी) हे कोकणातून तिवऱ्याच्या घाटाने वर चढून साताऱ्यात आले. बाळाजी विश्वनाथ व त्रिवर्ग भानू सेनापती धनाजी जाधव याच्याकडे चाकरीला राहिले.नानावाडा, पुणे.

शाहूमहाराजांनी हळूहळू साताऱ्यात जम बसवला, सर्व कर्तबगार मंडळी त्यांच्या बाजूने जमा झाली. बाळाजी विश्वनाथांची कर्तबगारी, शौर्य व निष्ठा पाहून महाराजांनी त्यांना पेशवा नेमले. बाळाजींनी विनंती करून शाहूमहाराजांकडून राज्याची फडणविशीही आपल्याकडे मागून घेतली व ती वस्त्रे हरी महादजी भानू (नानांचे आजोबा) यांना दिली.

अशा रीतीने भानूंकडे फडणविशी आली. हरी महादजींचा अल्पकाळात मृत्यू झाला. त्यानंतर बाळाजी महादजींकडे फडणविशी आली. दिल्लीहून चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणण्यासाठी बाळाजी विश्वनाथांनी आपल्याबरोबर बाळाजी महादजींना नेले. परतताना विरुद्ध बाजूच्या लोकांकडून बाळाजी महादजी मारले गेले. आख्यायिका अशी की सनदा घेऊन परतताना काही माणसे हल्ला करणार आहेत, त्याचा सुगावा लागताच बाळाजी विश्वनाथांच्या अंगलटीचे नानांचे आजोबा बाळाजी महादजी पालखीत बसले, बाळाजी विश्वनाथ सनदा घेऊन अन्य मार्गाने सुरक्षित स्थळी पोहोचले.

बाळाजी विश्वनाथांऐवजी बाळाजी महादजी मारले गेले. पेशव्यांचा जीव वाचवण्यासाठी बाळाजी महादजींनी जिवाची कुर्बानी केली. बाळाजी महादजींच्या मृत्युनंतर रामाजी महादेव यांच्यावर जबाबदारी आली. बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना व त्यांचे चुलत बंधू मोरोबादादा ही त्यांची नातवंडे. या दोघांचे शिक्षण विश्वासराव व माधवराव यांच्याबरोबर झाले. बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला त्या सुमारास भानू घराणे पुण्यात आले असावे. नानांकडे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी फडणविशीची वस्त्रे आली. त्याचवेळी कलमदान व शिके मिळाले. शिक्क्यावर “श्री शिवचरणन लिननिरत जनार्दनसुत बाळाजी पंडित” असे लिहिलेले.

शनिवारवाड्याच्या जवळच आग्रेय कोप-यात नानांनी आपल्या विश्रांतीसाठी वाडा बांधला, आजही तो नानावाडा म्हणून प्रसिद्ध आहे. नानांच्या हयातीतच शेवटच्या बाजीरावाच्या काळात नानांच्या सर्व मिळकती जप्त झाल्या त्यातच हा वाडाही.

आजच्या परिस्थितीत एकूण सर्व वाड्याचे वर्णन करणे अशक्य आहे. पण वाडा प्रशस्त व भव्य असावा. आतील रचना कशी होती, हे समजण्याधी पुसटशी खूणही शिल्लक नाही. वाड्याच्या दर्शनी भाग मात्र जराच्या तसा शाबूत आहे. या बाजूने दुसऱ्या मजल्यावर जो भाग दिसतो,तो होता नानांचा दिवाणखाना या प्रशस्त दिवाणखान्याचे छत सुंदर नक्षीदार असून महिरपदार सुरूचे हारीने असलेले खांब कोरीव नक्षीकामाने मन वेधून घेतात.

पौराणिक देखावे दाखवणारी उत्तम भितीचित्रे तेथे आहेत. त्या काळातील वास्तुवैशिष्ट्य दाखवणारी वंचित दिसणारी मेघडंबरी हा वास्तुप्रकार नानावाड्यात आहे. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून बाहेरील दृश्य पाहण्यासाठी मेघडंबरीची खास योजना असावी.

मुख्य दिवाणखान्यातून तेथे जाण्यासाठी दार महिरपदार कमानी व काळ्या कातीव लाकडी सुरूच्या खांबावरच सुशोभित अर्धघुमटाकार दोन छत्र्या योजून मेघडंबरीची खास योजना केली आहे. जाळ्यांची नक्षी तक्तपोशी आदी कोरीव लाकडी कामाचा अप्रतिम नमुना आहे. खालील चौकात उतरण्यासाठी येथूनच जिना आहे.

पण हा नंतर केलेला असावा. त्यामागील चौकात पूर्वी मोठे तुळशीवृंदावन होते म्हणून हा तुळशीचा चौक येथे ओवऱ्या दिसतात. तेथेही महिरपी व सुरूचे लाकडी खांब आहेत. सव्वादोनशे वर्षापूर्वी बांधलेल्या नाना वाड्यातील एवढ्याच खुणा आज शिल्लक आहेत, पण उत्तर पेशवाईतील वैभवाची व भारदस्त वास्तुवैशिष्ट्यांची झलक त्यातही दिसते. बांधकाम अजून चांगले आहे. त्याकाळी मळलेला चुना व शिश्याचा रस मातीत घालत. त्यामुळे भितीचे बांधकाम बळकट आहे. – डाॕ. मंदा खांडगे.

टिप-(सदरील माहिती ही १९९२ सालच्या वैभव पेशवेकालीन वाड्यांचे मधून घेतली आहे व फोटो २०२० मधील आहे)

– विकास चौधरी

Leave a comment