मुळशी सत्याग्रह

मुळशी सत्याग्रह –

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।। खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या भारताचा।। – सेनापती बापट. यंदाचे मुळशी सत्याग्रह चे १००वे वर्ष याच निमित्ताने मुळशी सत्याग्रहाचा इतिहास थोडक्यात तुमच्या समोर मांडत आहे

मुळशी सत्याग्रह… देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात धरणाच्या विरोधात लढलेला पहिला संघर्ष! हा लढा लौकिक अर्थाने अयशस्वी ठरला असेल, पण धरण पुनर्वसनाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी एक मैलाचा दगड ठरला. परंतु तरीही इतिहासाच्या पानांत त्याला काही ओळींपुरतेच स्थान मिळाले.

मुंबापुरीला झगमग-विण्याकरिता लागणारी वीज तयार करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीने मुळशी परिसरात धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला तत्कालीन ब्रिटिश सरकारने पाठिंबा दिला. या धरणासाठी तब्बल ५२ गावे आणि हजारो नागरिक विस्थापित होणार होते, तेही त्यांच्या परवानगीशिवाय आणि कोणतेही पुनर्वसन न होता..! आणि मग सुरू झाला एका महासत्तेशी आणि एका बलाढ्य भांडवलदाराशी सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा संघर्ष.

मुळशी पेट्यात (आताचा मुळशी तालुका) १०० वर्षांपूर्वी धरण बांधण्याचा निर्णय झाला. त्‍यात आपल्या जमिनी, घरे, श्रद्धास्थाने, त्याचबरोबर संस्कृतीही बुडणार, या कल्पनेने येथील शेतकरी हादरला. पुण्यातील पत्रकार विनायकराव भुस्कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सत्याग्रहाचा लढा उभारला. पांडुरंग महादेव बापट यांनी त्‍याचे नेतृत्व केले. त्यातून मुळशीकरांकडून ‘सेनापती’ ही उपाधी त्यांना देण्यात आली. प्रचंड मोठा भांडवलदार आणि इंग्रज सरकारपुढे हा संघर्ष टिकला नाही. अखेर धरण झाले. त्‍यात ५२ गावे आणि हजारो एकर सुपीक जमीन  गेली.मुळशी सत्याग्रह तीन वर्ष चालले रूढार्थाने हे आंदोलन यशस्वी झाले नाही पण भारताच्या स्वतंत्रलढ्याला या मुळशी सत्याग्रहाने दिशा  जगभरातील धरणग्रस्तांना लढण्याची वाट या आंदोलनाने दिली. या सत्याग्रहावर सेनापती बापट यांनी एक कविता लिहिली आहे ती अशी.

यह मुलशी रण मुल है महाराष्ट्र निद्रा भंग का यह मुलशी रण मुल मानो भावी भारत के जंग का!

आकाश रविंद्र मारणे
टीम मुळशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here