महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मुळशीच्या जीवनदायनी मुळा मुठा

By Discover Maharashtra Views: 1581 4 Min Read

मुळशीच्या जीवनदायनी मुळा मुठा –

मुळा- मुठा मुळशी तालुक्यातील या दोन  प्रमुख मोठ्या नद्या  यांची आज आपण इतिहासापासून ची माहिती घेणार आहोत. भीमा माहात्म्य या हस्तलिखित ग्रंथामध्ये दत्त किंकर या कवीने भीमा नदीचे माहात्म्य याचे वर्णन केले आहे. यात भिमेसोबतच तिच्या उपनद्यांच्या रंजक कथा सुद्धा यात संगीतल्या आहे. त्यातीलच २६ व्या अध्यायात मुळा मुठा आणि भीमा यांच्या संगमाची वर्णने येतात खाली त्या अध्यायाच्या शेवटच्या ओळी .

“इति श्री पद्यपुराणे उत्तराखंडे भीमा माहात्म्ये मुळा मुठा संगम महिमानम षट विशती नमो अध्याय ”

भीमाशंकर पर्वतावर गजानक राजाने कठोर शिवभक्ती सुरू केली. त्यामुळे महादेव त्याला प्रसन्न होतील आणि आपलं इंद्रपद जाईल अशी भीती इंद्राला वाटू लागली. त्याने आपल्या दरबारातील दोन अप्सरांना गजानकाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा हा डाव गजानकाच्या लक्षात आला. त्याने त्या दोन अप्सरांना शाप दिला की ‘‘तुम्ही नद्या व्हाल!’’ त्या अप्सरांनी गयावया केल्यावर त्याने उ:शाप दिला की भीमा नदीशी संगम झाल्यावर तुम्हाला मुक्ती मिळेल. इंद्राच्या दरबारातील त्या अप्सरा मुळा-मुठा नद्यांच्या रूपाने वाहू लागल्या.

मुळा नदी –

मुळा नदी ही पौड खोऱ्यातील नंदिवली या गावाजवळ देवघर या ठिकाणी मोठ्या उंबराच्या झाडाच्या मुळा पासून एका झऱ्याच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणूनच या नदीचे नाव मुळा असे पडले अस सांगितले जाते. पुढे या नदीला निळा नावाची उपनदी येऊन मिळते. आता ती मुळशी धरणांमध्ये गेली आहे. त्यामुळे तिचा प्रवाह दिसत नाही पुढे या नदीवर टाटा ग्रुप ने एक मोठे धरण बांधले आहे. आज ते मुळशी धरण या नावाने प्रसिद्ध आहे . यावर मुंबई शहरासाठी लागणारी वीज निर्मिती भिरा या ठिकाणी केली जाते . या बद्दल सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत. पुढे कोळवण खोऱ्यातून येणारी वळकी ही छोटी नदी मुळेला मिळते. पुढे भुकुम गावाजवळ उगम पावणारी रामनदी मुळेला जाऊन मिळते.   पुढे पवना नदी पुण्यातील खडकी जवळ मुळा नदीला मिळते .

मुठा नदी –

मुठा नदी ही मुठा खोऱ्यातील वेगरे गावाजवळील मांडवखडक वस्तीजवळ मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे. या नदीचा उगम मुठा नावाच्या खेकडीच्या  बोळातून एक झरा बाहेर पडून झाला आहे. म्हणून हीचे नाव मुठा असे पडले आहे. पुढे या नदीवर टेमघर हे धरण बांधले गेले आहे. दुर्दैवाने ते गळके निघाले आहे .

इथून पुढे येणाऱ्या मुठेला दोन नद्या येऊन मिळतात. एक आहे आंबी आणि दुसरी आहे. मोसी. आंबी नदीवर पुढे पानशेत धरण बांधले गेले आहे. तर मोसी नदीवर वरसगाव हे धरण या नद्या पुढे एकत्र जाऊन पुण्यातील प्रसिद्ध असे खडकवासला धरण बांधले गेले आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत  व  टेमघर या 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पुण्याला पाणी पुरवठा करण्यात येतो.

अश्या या मुळशी तालुक्यातील जीवनदायनी मुळा मुठा या बहिणी पुण्यातील  संगम पुल येथे एकत्रित येऊन भीमा नदीला भेटायला पुढे जातात .

परंतू वाईट या गोष्टीचे वाटते की मुळशी तालुक्यातून निघणाऱ्या या जीवनदायनी नद्या पुण्यात गेल्यावर मात्र त्यांचे गटारामध्ये  रूपांतरित होतात.  हजारो वर्षांपर्वीच्या सभ्यतांचे, संस्कृतींचे अवशेष सापडलेल्या या नद्यांच्या खोऱ्यात आज मात्र सांडपाणी आणि फक्त दुर्गंधी पसरत आहे . हे कुठे तरी बदलले पाहिजे

धन्यवाद .

आकाश रवींद्र मारणे .

टीम मुळशी.

Leave a comment