माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार

माणकेश्वर मंदिर | माणकेश्वर मंदिरावरील शिल्पाविष्कार

माणकेश्वर मंदिर –

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार –

महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर मंदिर (ता. परंडा जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व.

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.

एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्याम चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत.

माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्यार स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत.

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्यां चा आहे.

मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.

मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्यामतील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.)

अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते.

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते.

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे, भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism)

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here