मराठ्यांचा राजा हत्तीवरून लढाई खेळतो तेंव्हा…

By Discover Maharashtra Views: 3595 2 Min Read

मराठ्यांचा राजा हत्तीवरून लढाई खेळतो तेंव्हा…

रायगड किल्ल्यास मोगलांच्या वेढा पडल्यानंतर राजाराम महाराज तिथुन निसटले व त्यांनी प्रतापगड चा आश्रय घेतला. प्रतापगड वरुन राजाराम महाराज पुढील युद्ध धोरणाचे नियोजन करीत असताना गडाच्या पायथ्याशी त्यांची मोगलांच्या फौजेशी लढाई झाली. मोगलांच्या तीन लष्करी तुकड्या त्यांच्या वर चालून आल्या. यावेळी महाराजांच्या जवळ थोडी बहुत शिबंदी होती तिच्यासह ते शत्रु वर चालून गेले. शत्रु पायथ्याशी पार या गावी छावणी करून होता. शत्रूसैन्याचे नेतृत्व काकरखान नावाचा सरदार करीत होता. त्यास लोधीखान, अंबाजी चंद्रराव, आणि हिरोजी दरेकर ही मंडळी मिळाली होती.
राजाराम महाराज यावेळी हत्तीवर आरूढ झाले होते. सोबत पिलाजी गोळे, रूमाजीराव येरूणकर व जावजी पराटे हे मराठे सरदार होते.

लढाई मोठी तेज झाली. महाराजांच्या राणू नामक माहुताने आपला हत्ती ऐन रणधुमाळीत घातला, तेंव्हा हिरोजी दरेकराने पुढे होऊन हत्तीच्या सोंडेवर वार करून ती तोडली. त्याबरोबर हत्तीने रणांगण सोडले. शत्रुचे भारी संख्याबळ व जखमी हत्ती यामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतून राजाराम महाराजांनी सुखरूपपणे माघार घेऊन गडाचा आश्रय घेतला. या लढाईत उभय बाजुंची अनेक माणसे मारली गेली. तर अनेकजण शेजारच्या कोयना नदीत बुडुन मरण पावले. इतिहासात आजपर्यंत राजाराम महाराजांची ही लढाई अज्ञातच राहिली आहे. या लढाईचे महत्त्व राजाराम महाराज विजयी झाले की पराभुत झाले यात नसुन 8-9 वर्षे रायगडावर असणार्या या नव्या राजाने गडाबाहेर पडुन मोगली लष्कराशी निकराची झुंज दिली यात आहे.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांचे जीवित मराठी राज्याच्या दृष्टीने अत्यंत मुल्यवान बनले होते. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून मराठ्यांचा हा नवा राजा प्रतापगडाच्या बाहेर पडुन संख्येने आपल्या पेक्षा अधिक असलेल्या शत्रु वर चालून जातो ही गोष्ट फारचं महत्त्वाची आहे.
या लढाईची तारीख होती
10 जुन 1689.

माहिती साभार – रवि पार्वती शिवाजी मोरे

Leave a comment