खांदेरीचा रणसंग्राम भाग ८

खांदेरीचा रणसंग्राम

खांदेरीचा रणसंग्राम भाग ८

खांदेरीचा रणसंग्राम भाग ८ – आता मागे उरलेल्या रिव्हेंज वर मराठ्यांनी रोख वळवला. डव शत्रूच्या ताब्यात गेलीय हे कॅप्टन कॅंग्विनने बघितलं. आपल्या मदतीला कोणतंच इंग्लिश जहाज नाहीय हे त्याच्या लक्षात आलं. आपली जहाज होती ती कुठे गेलीत ह्याचा काहीच थांगपत्ता नव्हता. काही अंतर पुठे आल्यावर कॅप्टन कॅंग्विनने शांतपणे विचार केला. आल्या प्रसंगाला त्याने सामोरे जाण्याचा विचार केला. त्याने आपले सगळे सैनिक व खलाशी ह्यांना एकत्र केलं. आणि “जर आपण ह्या अधर्मी लोकांच्या ताब्यात सापडून कैदी झालो तर तो मोठ कलंक असेल तुमच्यावर” हे खडसावून सांगितलं. आपल्या अधिकाऱ्यांना तुमची इच्छा काय म्हणून विचारलं. सगळ्यांनी एकमुखाने आपण शेवट पर्यंत आपल्यासोबत असल्याचं सांगितलं. सागरी लढाईत मुरलेल्या कॅप्टन कॅंग्विन ह्याने त्याचा अनुभव पणाला लावला.(खांदेरीचा रणसंग्राम भाग ८)

त्याने जहाज होतं तिथे उभं केलं. आपल्या जहाजाचा वरच शिड उतरवून घेतलं. रिव्हेज सारखी नौका सुद्धा शरण आली बघून मराठ्यांचा उन्माद अजूनच वाढला. कॅप्टन कॅंग्विनने आपण आदेश देत नाही तोपर्यंत कोणीही मारा करायचा नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे जहाजावर सगळे शांतपणे वाट बघू लागले. एकूण २४ एक गुराब रिव्हेंजच्या आजूबाजूला घिरट्या घालू लागली. जहाजावर कसलीच हालचाल नाही की आवाज नाही. जहाजवरच टोकाचं शिड पण उतरवलं आहे बघुन मराठ्यांनी आपली गुराब रिव्हेंजला अजूनच खेटली आणि इथे मोठी घोडचूक झाली. मगापर्यंत शिकारी असलेले आता शिकार झाले. अगदी बंदुकीच्या टप्प्यात मराठे कधी येतात ह्याची कॅप्टन कॅंग्विन वाटच बघत होता. मराठे अगदीच आपल्या टप्प्यात आलेत बघून कॅंग्विनने तोफा व बंदुकीच्या माऱ्याचे आदेश दिले.

एकच आवाज जहाजावर झाला. अचानक झालेल्या हल्ल्याने मराठेही गडबडले. आपली जहाज मागे घेता घेता तीन जहाजांना जलसमाधी मिळाली. प्रचंड धूर आकाशात उठला. त्याचा फायदा घेत दौलतखानाने मागे फिरण्याचा धोरण स्वीकारले. मागे फिरण्याची इशारतीची नौबत वाजू लागली. त्या चपळतेने मराठे समुद्रात शिरले त्याच चपळतेने ते माघार सुद्धा घेऊ लागले. रिव्हेंज ला थोपवून ठेवायला एक शेवटचा बार दौलतखानाने काढायला सांगितलं. अगदी उथळ पाण्यात येईपर्यंत रिव्हेंज ने मराठी आरमाराचा पाठलाग केला. पण एकाही बोटीला ते पकडू शकले नाही. मराठेही आपली जहाज घेऊन पुन्हा नागावच्या खाडीत घुसले.

The rest of the fleet run from mi, seeing oversleves alone, Capt. Minchin and myself encourage our soldiers . Admonishing them what disgrace it would be christian to be prisoners to heathens. But courageously we defend. We held up our sail. I order our men not to fire until the word of command. So when they come within pistol shot, and the finding us mute, thrust themselves forward. but wee discharged our sterne chase with round shot and patridge, and presently our blunder busses and small shot so smartly ply’d that checkt their drums and pipes and in half an hour wee beat them from their guns and musquets.

रिव्हेंज पुन्हा आपल्या जागेवर आली. कॅंग्विनने वेळ मारून नेली. रिव्हेंजवर इंग्रजांचा जीवात जीव आला. प्रत्येक जण एकमेकांना आलिंगन देत होता. इथे मराठ्यांनीही इंग्रजांचे मोठं नुकसान केलं म्हणून खुश होते. जी धडकी त्यांना भरवायची होती त्यात ते यशस्वी झाले. पळून गेलेलं इंग्लिश आरमार पुन्हा एकत्र आलं. इथे खांदेरी बेटावर किल्ला बांधायचं काम काही थांबलं नव्हतं. तिथे आजच्या सगळ्या गदारोळात सापडलेले इंग्रज कैदी म्हणून ठेवले होते.

दुसऱ्याच दिवशी काय घडलंय विचारायला म्ह्णून मुंबईहून पत्र घेऊन एक बोट आली. कॅंग्विन ने सगळी माहिती मुंबईला पोचवली. जर तेव्हा आपलं सगळं आरमार एकत्र असतं तर मराठ्यांची अर्धेअधिक जहाज समुद्रात बुडवली असती. उद्या ते पुन्हा आले तरीही आम्ही त्यांच्याशी लढू हा विश्वास तो व्यक्त करत होता. बरोबर आपली पाच जहाज मराठ्यांनी पकडून नेली हे ही कळवलं. मराठी आरमार लांब पळून गेलं असं त्याला वाटत होतं पण तसं काहीही झालं नव्हतं.

इंग्रज ही दर्यावर्दी जात. खोल समुद्रात संचार करू शकतील अशी जहाज त्यांच्याकडे होती. पण जेव्हा उथळ पाण्यात लढाईचा प्रसंग आला तेव्हा त्यांची मर्यादा उघड झाली. तिथे मराठे हे सरस ठरले. आपल्यावर शिवाजी राजाचं आरमार चालून आल तरीही आपण हे सहज परतवून लावू हा एक विश्वास इंग्रजांना होता तो फोल ठरला. मराठी आरमार चालून येताच इंग्लिश आरमार चारी बाजू पळून गेलं. ह्यात त्याची पार नाचक्की झाली होती. मराठी आरमाराचही नुकसान झालं हे खरं होत पण ह्या हल्ल्याने इंग्रजांचे मनोधैर्य पार खचलं होत. मराठे पुनः चाल करून येतील ही भीती त्यांना सतत वाटे हे त्यांच्या पुढच्या हालचाली वरून दिसून येत. सुरतेला मुख्य अधिकारी आता हा लढा अजून किती दिवस चालू ठेवायचा हा विचार करायला लागले होते. एखादा सुवर्णमध्य भेटतो का हे ते पाहू लागले होते. पावसाळा सरू लागला होता. दर्या आता शांत होत होता. आता ह्या समुद्रात आणखी वेगाने कुरघोडी वाढत जाणार हे नक्की होतं.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग ८

संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English records

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here