खांबटाके, खंबाटकी घाट

By Discover Maharashtra Views: 3098 3 Min Read

खांबटाके, पारगाव खंडाळा जि.सातारा –

महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे एक ठिकाण म्हणून खंबाटकी घाटातील खांबटाक्याला विशेष महत्व आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावर साताऱ्यानजिक खंबाटकी हा महत्वाचा घाट आहे. खंबाटकी घाट चढताना साधारणपणे मध्यावर आल्यानंतर खामजाई मंदिर आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी बांधले आहे ते दुसरे-तिसरे काही नसून खंबाटकी घाटाच्या प्राचीनतेची साक्ष देणारे ऐतिहासिक खांब टाके आहे. विशेष म्हणजे डोंगरात खोदलेल्या या खांबटाक्यात वर्षभर पाणी असते. मात्र महामार्गाच्या सुरु असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे हे ऐतिहासिक खांबटाके लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार असून त्यमुळे एका ऐतिहासिक वारश्याला आपण मुकणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी या प्राचीन घाटवाटांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. त्या प्राचीनतेची साक्ष देणारा एक घाट म्हणजे खंबाटकी घाट. पारगाव खंडाळा या गावामुळे हा घाट पूर्वी खंडाळा घाट म्हणून ओळखला जात होता. नंतर मात्र खांबटाक्यामुळे हा घाट खांबटाकी घाट म्हणून व त्याचाच अपभ्रंश होऊन खांबटकी घाट म्हणून ओळखला जाऊ लागला.

उत्तर व दक्षिण भारत जोडणारा हा महत्वाचा प्राचीन घाटमार्ग आहे. तसेच या घाटाच्या जवळच असणाऱ्या शिरवळ आणि पारगाव खंडाळा येथील प्राचीन लेण्या पाहता या घाटाचे महत्व भरपूर असावे असे लक्षात येते. मंचर येथे प्राचीन कुंड असून ते चौदाव्या शतकात बांधले असल्याचे तेथील लेखावरून समजते. पुढे आल्यानंतर शिरवळला यादवकालीन पाणपोई दिसते. त्यानंतर घाटात ही टाकी आहेत. त्याकाळी व्यापारी आणि प्रवासी मंडळींच्या सोयीसाठी ती सर्व टाकी खोदण्यात आली असावीत, असे पुरातत्वज्ञ अभ्यासकांचे मत आहे.

खंबाटकी घाटातील हि खांबटाकी नक्की कधी खोदली याचा काळ सांगता येत नसला, तरी अठराव्या शतकात पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या टाक्यासाठी ४५ हजार रुपये खर्च करून डागडुजी केली असल्याचे साताऱ्याजवळ धावडशी येथे जी ब्रह्मेंद्र स्वामी यांची समाधी आहे, तेथे फलकावर याबाबत सविस्तर माहिती लिहिण्यात आली आहे. आजही कोल्हापूर-सांगली-साताऱ्याकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या खंबाटकी घाटातील  या खांबटाक्या जवळ थांबतात आणि प्रवासी या टाक्यातील थंड पाणी पिऊन तृप्त होतात.

या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने प्राचीन काळापासून प्रवाशांची तहान भागविणारे खंबाटकी घाटातील हे खांब टाके मात्र लवकरच गाडले जाणार आहे. त्यामुळे या घाटामधील एका ऐतिहासिक वारश्याला आपण लवकरच मुकणार असून खांबटाके पाहताना ही जाणीव मनाला अस्वस्थ करून जाते.

स्थापत्य अभियांत्रीमध्ये अनेक नव-नवे शोध लागलेले आहे. या नव्या संशोधनाचा वापर करून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना खंबाटकी घाटातील हा ऐतिहासिक वारसा वाचविण्यासाठी शासनाने, रस्ते विकास महामंडळाने व या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या स्थापत्य अभियंत्यांनी प्रयत्न करावेत हीच माझी या सर्वांना कळकळीची विनंती.

@सचिन तोडकर, पत्रकार

Leave a comment