खैरी घुमट ता. सेनगाव जि. हिंगोली

खैरी घुमट

खैरी घुमट ता. सेनगाव जि. हिंगोली

येलदरी धरणाच्या 5-10 कि.मी. अंतरावर खैरी घुमट हे गाव पुनर्वसित झाले आहे. येथे डोंगरावर कानिफनाथाचे गड वजा मंदिर आहे. पाच बुरूजासह मजबूत तटबंदी असलेले हे ठिकाण एखाद्या पुरातन किल्ल्यासारखे दिसते. नजरेच्या एका टप्यात हा गड येतच नाही. गडाच्या बांधकामाचा कालावधी सुमारे 200-300 वर्षापूर्वीचा असून आजही मजबूत अवस्थेत शड्डू ठोकून  उभा असल्याचा भास होतो.

तटबंदीच्या आत शिखर असलेली नऊ मंदिरे आहेत. शिखर शैली घुमटाकार आहे. नाथपंथिय मंदिरामध्ये आधुनिक मुर्ती आहेत. तिथेच एका बाजूला भुयार असल्याचे दिसते. या गडावरून धरणपात्राच्या दिशेने नजर टाकली तर गाळपेरा असलेली हिरवीगार पिके आणि त्या पुढे पाणीच पाणी असे विहंगम दृष्य दिसते….पण या धरणांचा इतिहास जर जाणून घेतला तर धरणात मोठ्या प्रमाणात  गावे , जमिनी  गेले आहेत. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांची घरेदारे डोळ्यादेखत पाण्याखाली जाताना त्यांनी स्वतः पाहिलीत. स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीच्या नावाखाली अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. या सर्व घटनेची मूक साक्ष देण्यासाठीच जणू काही हा गड आजतागायत उभा आहे.

डोंगरउतारावर धरणपात्राच्या दिशेने आणखी एक मंदिर आहे. हे मंदिर या मठाच्या गादीवर असणा-या महाराजांचे आहे असे समजते.तेथेच एक विटांनी बांधलेली एक विहीर आहे. विटांच्या आकारावरून ती विहीर सुमारे 100  वर्षांपूर्वीची असावी असे वाटते. गडापासून  1 कि.मी. च्या अंतरावर धरणपात्राच्या दिशेने भव्य अशी चिरेबंदी विहीर वजा बारव आढळून आली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती चौकोनी आकाराची असून दोन्ही बाजूंनी खाली उतरण्यासाठी पाय-या आहेत. त्या पायरीवरून एकावेळी दोन तीन माणसे सहज चढु अगर उतरू शकतात. विहीरत गाळ साचला असल्यामुळे तिची निश्चित खोली समजू शकली नाही पण 100 फुटापेक्षा जास्त खोल असावी. विहिरीचे बांधकाम पूर्ण दगडातच झाले आहे. बांधण्यासाठी शिसे किंवा चूना वापरला असावा. बांधकामाचा कालावधी गड बांधून झाल्यानंतर चा असावा. त्या विहीर वजा बारवेचे वर्णन अभूतपूर्व असेच करावे लागेल. खैरी हे गाव होडबे नाईकांचे वतनी गाव. तेथिल वाडा  व गढीचे अवशेष आजही दिसतात….  निजाम काळातील नियोजित जिल्ह्याचे ठिकाण…..

या गडाची कथा खुपच रोमांचित करणारी आहे. हत्ता येथील श्री. धोंडबाराव फकिरराव गडदे नाईक यांचेशी चर्चा केल्यावर पुढील माहिती मिळते…. गडदे नाईकांच्या पुर्वजांमध्ये कान्होजी नाईक व त्यांचे वडील( लक्ष्मण नाईक असावेत असा अंदाज आहे.) पराक्रमी पुरूष होवून गेले. धोंडबाराव नाईक हे कान्होजी नाईक यांचे सातवे वंशज. तत्कालीन हैद्राबाद च्या निझामाने हत्त्याच्या xxx नाईकांना (कान्होजी नाईकांचे वडील) काही कारणास्तव बोलावणे पाठवले होते.  xxx नाईकांनी त्यांना घेवून जाण्यासाठी आलेल्या तुकडीतील सैनिकांचे कान व नाक कापून सात तोबरे भरून उलटटपाली पाठवून ही हत्त्याच्या xxx नाईकाची भेट आहे असा संदेश दिला. निझामाने हे पाहून नाईकांचा निर्वंश करून धरून आणण्याचे फर्मान आपल्या सैन्याला सोडले. निझामी सैन्याने खूप शोधाशोध केल्यावर  पेडगाव व पारडा परिसरात xxx  नाईकांशी सामना झाला. नाईकांनी आपल्या सैन्यानिशी शत्रू ला तोंड दिले. निझामाचे सैन्य जास्त असल्यामुळे नाईकांचा पराभव झाला. त्यांच्या दंडातील मासात एक ताईत रुतवून बसवलेला होता. शत्रू सैन्याला ते ताईत काढायला सांगितले. सैनिकाने दंडावर वार करून ते ताईत काढले. त्या क्षणीच त्यांचा तिथे मृत्यू झाला. पारडा हे गाव गडदे नाईकाच्या आप्तस्वकीयापैकीच मस्के नाईकांचे.  मस्के नाईकांनी त्यांचा अंत्यविधी  पारडा येथे करून त्यांची समाधी व त्यांच्या घोड्याची समाधी बांधली…. इकडे त्यांची पत्नी गरोदर होती. तीला पकडून ( औरंगाबाद येथील असावे ) तुरुंगात टाकले. मुलगी झाली तर सोडून द्यावे आणि मुलगा झाला तर त्याला मारावे असा हुकूम निझामाने दिला. त्या मातेने तेथिल दायिंना विश्वासात घेवून मुलगा झाल्याची बातमी लपवून मुलगी झाल्याची बातमी तेथिल अधिका-यांना दिली. अधिका-यांनी त्या मातेला सोडून दिले. अशा प्रकारे तुरुंगात कान्होजी नाईकांचा जन्म झाला. या कठिण प्रसंगातून जात असताना त्या मातेने कानिफनाथाला नवस बोलला की माझा वंश सुखरूप वाढू दे…. मी तुझे मंदिर बांधेन. आणि हाच तो गड जो त्या मातेने येथे आल्यावर खैरी या गावाच्या डोंगरावर बांधला व मुलाचे नाव कान्होजी ठेवले. त्या माऊलीचे माहेर चिंचोली महादेव ता. हिंगोली.

……. इति श्री धोंडबाराव नाईक.

गडदे नाईकांचे मूळ गाव किल्ले वडगाव ता. कळमणुरी असल्याचेही सांगितले. तिथे एक किल्ला असून तो त्या काळी  राजे नौवसाजी नाईकांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आहे. नाईकांच्या पुर्वजांमध्ये  जयवंतराव नाईक हे आणखी एक पराक्रमी पुरूष  अलिकडील काळात  होवून गेल्याचे चर्चेतून समजले. 300 रझाकारांनी खैरी येथील गडावर ताबा केला होता. होडबे नाईक व जयवंतराव नाईक यांच्या नेतृत्वात तेथिल रणसंग्राम झाला. बरेचसे रझाकार मारले गेले काही पळून गेले.

डोरली ( हराळ )  ता. हदगाव येथून हारवाडी मार्गे  महादेवाची कावड खैरी घुमट येथे येते. या कावडीची परंपरा खूप जुनी आहे. हत्ता येथील गडदे व  पिनगाळे यांचा मान त्या कावडीला आहे……

गडदे नाईकांची परिसरातील वतनी गावे ब्रम्हवाडी , तांदुळवाडी , हत्ता , पातोंडा अशी गावे आहेत. साडे बारा गावांचे वतन गडदे नाईकांना होते .

सदर माहिती ही मौखिक स्वरूपाची असून यात आपणास अधिक माहिती वा दुरूस्ती किंवा पुरावे असल्यास कळवावे, आपल्या सूचनांचे स्वागत असेल.

माहिती व फोटो सौजन्य-

# मनोहर नाईक तुर्क पिंपरी

# अशोक थिटे पाटील.

सहकार्य-

# श्री धोंडबाराव गडदे नाईक हत्ता.

# श्री राम गडदे नाईक पातोंडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here